मोराचे पाय ओबडधोबड का?
(बालकथा)
- ॲन्थनी परेरा, नंदाखाल
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट, एकदा देवसभेत पक्ष्यांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. अनेक पक्षी या कार्यक्रमासाठी जाणार होते. चिमणीला त्या कार्यकमासाठी जायचे होते. ती सुंदर नृत्य करायची परंतु तिचे पाय ओबडधोबड होते. मोरालाही त्या कार्यकमासाठी जायचे होते, त्याचे पाय सुंदर होते. तो सर्वांगाने सुंदर होता परंतु त्याला उडता येत नव्हते.
चिमणी ही मोराची भाची होती, ती आपल्या मामाकडे आली आणि म्हणाली, “मोर मामा, मला देवसभेतील नृत्याच्या कार्यकमात भाग घ्यायचा आहे, पण माझे पाय हे असे ओबडधोबड. सगळे बघून हसतील मला! तुझे पाय आजच्या पुरता दे मला. तो पर्यंत माझे पाय तू घे. देशील ना मामा? मला तर नृत्यात भाग घ्यायचा आहे, काय करू?”
मोराला चिमणीची दया आली. आपल्या भाचीची लाज राखण्यासाठी आपले सुंदर पाय मोराने तिला दिले व तो चिमणीच्या येण्याची वाट पाहू लागला. देवसभेत चिमणीचे नृत्य खूप बहारदार झाले. देवाने तिचे खूप कौतुक केले. तिच्या नृत्याचे व सुंदर पायाचेही खूप कौतुक केले. चिमणीला खूप आनंद झाला. कार्यकम संपल्यावर ती घरी आली पण मोराकडे गेलीच नाही. खूप दिवसांनी ती मोराला भेटली पण तिने पाय देण्यास नकार दिला.
मोराला खूप वाईट वाटले. आपली भाची आपल्याशी असे वागावी? त्याला खूप दुःख झाले. आजही मोर आपल्या ओबडधोबड पायांनी नाचतो तेव्हा सतत आसवे गाळत राहतो. आपल्याला त्याचे सुंदर नृत्य दिसते आकर्षक पिसारा दिसतो परंतु त्याच्या मनातील शल्य कोठे दिसते? आपणही कमी अधिक प्रमाणात असेच वागतो नाही का?