मी स्वर्गात आहे! (एक चिंतन) – फादर मायकल जी.

मी स्वर्गात आहे! (एक चिंतन)

  •  फादर मायकल जी.

प्रति संपादक ‘खिस्तायन’,

         यंदा लांबलचक लेख नाही पाठवत. एक माझं चिंतन पाठवतो आता हया वयात मी ‘देवाधर्माला’ लागलो आहे, असे समजा. आजच्या चिंतनात मला आलेला संदेश आपल्याला सांगू इच्छितो. तो तुम्हा तरूणांना नक्कीच विचार करायला लावील.

         येशू म्हणालाच आहे, “अरे मागत काय बसलात? तुमच्या गरजा पित्याने तुम्ही मागण्याआधीच देऊन ठेवल्या आहेत. (मत्तय ६.८) योगासनांचा अभ्यास करताना मला येशूच्या हया शब्दांची खात्री पटली. ईश्वराने आपल्याला केवळ शरीर दिले नाही तर शरीर-मनाच्या गरजा भागविणाऱ्या शक्तीदेखील त्यातच देऊन ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ रोज रात्री आपण झोपलो असताना एक आंतरिक डॉक्टर आपले हिलिंग करत असतो!

         त्यासाठी मी सकाळी जाग येताच बिछान्यातच श्वसनाचे प्राणायाम करतो. दीर्घ श्वास घेतो. त्यातून प्राणवायूच नव्हे तर प्राणशक्ती घेतो. सारं शरीर आणि मन दिव्य शक्तींनी स्वच्छ करून घेतो आणि चार्ज करून घेतो. गेली अनेक वर्षे नैसर्गिक शक्तींचा अनुभव घेता वाटते, दैवी चमत्काराची वाट का बघा? स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच नाही का?

मी आज स्वर्गात आहे.

         मी ८३ वर्षाचा झालो. आज माझ्या शरीरात कोणतीच दुखापत नाही की दुखावा नाही. सगळं शरीर स्वस्थ आहे. मेंदू, हृदय, किडनी, हात, पाय, हाडे, रक्तवाहिन्या, इंद्रिये, सगळे अवयव त्याच्या नियमाप्रमाणे काम करतात. दिरंगाई नाही, गैर व्यवहार नाही. सार्‍यांचे सारे काम चोख चालले आहे! काहींच्या अस्तित्वाची मला जाणीवदेखील होत नाही.

         माझ्या मनात कसलीही खंत नाही. भूतकाळात झाल्या आहेत चुका, पण त्यांचा एक तर पश्चाताप करून मी हिशोब चुकता केला आहे, किंवा त्यांच्या मागची कारणे जाणून मीच स्वतःला क्लीन चिट दिली आहे. एरवी मनात चांगल्या भावनाच निर्माण होतील, ह्याची दक्षता घेतो. सर्वांप्रति सद्भावना बाळगतो आणि व्यक्त करतो, “सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे!” हे गाणं गुणगुणतो. दुष्ट भावना नाहीत. मन सारं स्वस्थ आहे. एकाग्र आहे अलर्ट आहे, जागरूक आहे.

         निवृत्त असलो तरी खूप कामात व्यग्र आहे. समाजशुध्दी अभियानाची अनेक प्रकरणे हाताळतो. सर्वांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. काहींना मी विरोध करतो पण तो सत्यासाठी न्यायासाठी. तोदेखील शांतपणे. कधी जाणीव होते, ‘आपलं चुकलं’! पण ती जाणीव म्हणजेच पश्चाताप! त्यानेच पुढे आचरण सुधारणार. स्वर्गाचा अधिक अनुभव घेणार. परवा गोव्याहून अपंग बांधवांसोबत बसने परतत होतो. वाटेत रात्री पोलिसांनी बस उगाच अडवली. खाली उतरलो, शांतपणे विचारले, “मी फादर मायकल जी. काय अडचण आहे?”

         उत्तर आले, “तुम्ही फादर का? मग जा जा. काही अडचण नाही!”

मरणाची भीती नाही.

         मी मरणपंथाला लागलोय, पण मरणाची भीती नाही. मरणाला तयार आहे. कारण मरणाने काही बदलणार नाही. शरीरातून प्राण जाताच माझी पंच तत्वे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही मूळ पंच तत्वांत विलीन होतील. माती मातीत, पाणी पाण्यात, अग्नि अग्नीत, हवा हवेत, आणि अवकाश अवकाशात. ती तत्वे अमर आहेत आणि अमर राहातील. माझं चित्त, त्याला प्राण किंवा आत्मा म्हणा, तो परमात्म्यामध्ये विलीन होईल. अहंकार संपेल पण ‘मी’ संपेन? नाही! मी व्यापक होईन. माझी जाणीव व्यापक (Universal consciousness) होईल. आयुष्यभर ‘सोहम’चा जप करत आलो आहे. मी सगळ्या विश्वाचा आत्मा होईन. मी ब्रह्मांड होईन. तो स्वर्गाचा अधिक व्यापक असा अनुभव येईल. ईश्वरा, या सगळ्याबद्दल धन्यवाद!

         सद्या जीवनातच स्वर्ग मानण्यात मी फार अल्पसंतृष्ट आहे, असे वाटते? मरणोत्तर काही नको? नाही, मरणोत्तर स्वर्गात जादा काही मिळेलच. ज्याची कधी ऐहिक जीवनात रुची घेतली नाही अशा अध्यात्मिक दशेची स्वर्गामध्ये मला अनुभूती मिळणार आहे. ईश्वराशी एकरूप झाल्याने असाधारण असं सुख, समाधान, शांती लाभणार आहे; पण त्याच्याविना आज मी दुखी नाही.

         बुद्ध म्हणालाय, सर्व दुःखाचे कारण अभिलाषा आहे. म्हणून मरणोत्तर स्वर्गाची इच्छा सद्य जीवनात नको. ख्रिस्त म्हणालाय, “उद्याची चिंता करू नका.” हे माझे व्रत कठीण वाटते का? म्हाताऱ्याचे वाटते का? पण त्याशिवाय दुसरा सुखाचा मार्ग नाही. स्तोत्र (८.३१) म्हणते, ईश्वर जर आपल्या बाजूने असेल तर आपल्या विरोधी कोण उभा राहू शकेल?” हा जर विश्वास पक्का झाला तर सगळे आशेने कामाला लागतील, निराश होणार नाहीत, कोणी दुःखी राहाणार नाही. पण विश्वास ठेवतो कोण? विश्वासाची प्रार्थना म्हणतो जोरात पण हृदय राहाते कोरडेच.

तरूणांनाच खरी चिंतनाची गरज

         तरुणानो, तुम्हीच पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करावयाचा आहे. तेव्हा माझं ऐका, Believe as if everything depends on God, and act as if everything depends on you! नुसते देवदेव करत बसू नका, हरी खाटल्यावर देणार नाही. प्रयत्नवादी असा. आणि देवालाही विसरू नका. He helps those who help themselves! हा नियम पाळाल तर स्वर्ग इथेच अनुभवाल! नाही तर बसाल, Sing and pray, live on hay for the pie in the sky when you die!

         एकदा एका वर्गात फादर मुलांना म्हणाले, “कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे?”

         एक सोडून सर्व मुलांनी हात वर केले.

         त्या एकाला फादरांनी विचारले, “तुला स्वर्गात नाही जायचे तर कुठे जाणार?” मुलाने उत्तर दिले, “मला ह्या पृथ्वीवरच राहायचे आहे,. कारण हे स्वर्गात जायला निघाले आहेत त्यांनी इथे नरक करून टाकलाय. तो मला साफ करून ह्या इथेच स्वर्ग बनवायचा आहे!”

         असे प्रयत्न आपण सर्वांनी केले तर मग सर्वच म्हणतील, “मी आजच स्वर्गात आहे. स्वर्ग हाच आहे!

माझी नजर लागली पैलतीरी

पण आहे पाय रोवून ह्या तीरी!

बनविण्या स्वर्ग ह्या पृथ्वीतलावरी

दैवी नव्हे नैसर्गिक चमत्कारांनी!