मी मुग्धा : बन्याची आई –  भरत काशिनाथ वाळिंजकर

मी मुग्धा : बन्याची आई

  •  भरत काशिनाथ वाळिंजकर

समेळपाडा, नालासोपारा ( प )

फोन– 9869461011

काल बऱ्याच दिवसानी काल मुग्धा भेटली अगदी अचानकच. माझी बालपणीची मैत्रीण. आज डॉक्टर म्हणून तीचं चांगल नाव आहे. पहिल्या पासूनच हुशार, चुणचुणीत. मला पाहताच तीही आनंदली. मग अगदी तासभर गप्पा…. तीच सांगत होती.

दि. ०३ डिसेंबर २०२१, माझा बन्या वयाच्या ३५व्या वर्षी आम्हांस सोडून गेला. माझा ज्येष्ठ पुत्र. सुटला बिचारा असं एका आईला कसं म्हणता येईल. कदाचित इतरांच्या मनात त्या भावना उमटल्या ही असतील. आम्हीही सुटलो असंही ते म्हणतील. खूप केलं आईने म्हणून माझं कौतुकही करतील. त्यांच्यादृष्टीने त्यांचे विचार बरोबरही असतील, पण मी आई असा विचार करू शकते ? 

१८ डिसेंबर १९८४, मी डॉ. प्रताप सरनाईक ह्यांच्याशी विवाहबद्ध झाले अन् मुंबईची मी नाशिकवाशी झाले. माझा डॉक्टरकीचा पेशा तिथे चालू झाला. घर भरलेलं, सासू-सासरे, दिर-जावा. सार्‍यांनी खूप समजून घेतलं. छान चाललं होतं.

वर्षभरातच मला दिवस गेले. सासर-माहेर दोघेही खूप जपत होते. डोहाळे जेवण अगदी हौसेत झाले. पहिलं बाळंतपण म्हणून एक महिना आधीच मी माहेरी आले. घराशेजारीच वाशी येथे नर्सरी होम होते. तेथेच चेकिंग व्हायचे. पण ह्यांच्या आग्रहाखातर मी ह्यांचे जवळचे मित्र डॉ. उपासनी ह्यांच्या कांदिवली खारघर येथील नर्सरी होम मध्ये मला डिलिव्हरीसाठी अॅडमिट करण्याचं ठरलं.

खरं म्हणजे नऊ महिने उलटून गेले होते. आठवडा झाला पण मला हव्या तश्या कळाच येत नव्हत्या. मन खूप बैचेन व्हायचं. मी स्वतः डॉक्टर असूनही असं का व्हावं ह्याचं उत्तर सापडत नव्हतं. आई-पप्पा, धाकट्या बहिणी, शिल्पा, शितल व चंदु भाऊही काळजीत पडले. अखेर मला १० फेब्रुवारी १९८६ रोजी अॅडमिट केलं, इंजेक्शन दिले. पण अजूनही हव्या तश्या कळा येत नव्हत्या. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अखेर सिझरींग करण्याचं ठरलं. नर्सने मला तसं सूचित केलं आणि ती त्या तयारीसाठी निघून गेली. आता मी एकटेच होते. अन् अचानक मला जोराची कळ आली. मी जिवाच्या आकांताने ओरडले. मुलाचं डोकं बाहेर आलं होतं. नर्स धावत आली.

मला तसंच पलंगावर आडवं केलं, मूल बाहेर आलं होतं. नाळ कापली, पण मुलाचं रडणं कानावर आलं नाही. मूल चक्क हसत होतं. मला खूप टेन्शन आलं. निसर्ग नियमाप्रमाणे घडत नव्हतं. मी तसं डॉक्टरांना सांगितलं.

डॉक्टरांनी मला त्यांच्या परीने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण माझे समाधान झाले नाही. मी तुमच्यासमोर दहा लहान मुलांचे डॉक्टर आणतो, तुम्ही त्यांना विचारा. मी गप्प बसले.

मातृत्वाची सुरुवात अशी मोठ्या बैचेनीत झाली. दूधही बाळ हवं तसं ताकदीने घेत नव्हतं. आई-पप्पा, बहिण-भाऊ सारेजण आले. किती हसरा चेहरा आहे म्हणून बोलूनही दाखवत होते.

दोन महिने मी माहेरीच होते. आई खूप करायची, माझं अन् बाळाचं. पण बाळाची वाढ योग्यप्रकारे होत नव्हती. हे आता सर्वांच्याच लक्षात आले होते. मी नंतर सासरी आले. सासू-सासरे, सर्वांनीच छान स्वागत केले. बाळाचं खूप कौतुक व्हायचं. तीन महिने झाले तरी बाळ अजून मान धरत नव्हत. एव्हाना माझी ड्यूटी सुरु झाली होती. आता सर्व काही सासू-सासरेच बाळाचं पाहत होते.

आता बाळाला आठ महिने झाले आणि एका रात्री आम्हाला एक विचित्र आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही दचकून जागे झालो. एव्हाना घरातील सर्व मंडळी उठली होती. आवाज बाळाचाच होता. त्याचं अंग भयंकर तापलं होते. ह्यांनी त्याला तसेच उचलले आणि पाहतो तर बाळाचं शरीर चक्क लोंबकळत होत. आम्ही अक्षरशः गर्भगळित झालो. भयंकर होतं ते.

रात्रीचे दोन वाजले होते. तसेच बाळाला घेवून लहान मुलांच्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी अॅडमिट करून घेतले. चार तासांनी बाळ पुन्हा नॉर्मल झाले. पण ताप एव्हाना डोक्यात गेला होता. आधीच तब्बेत ठिक नसताना हा मोठा घाव त्याच्यावर पडला. अन माझं बाळ मतिमंद होत गेलं. मला खूप रडू कोसळलं. हे सहन करणं खूप कठीण होते. आम्ही दोघंही खूप खचलो. सासर माहेर सार्‍यांनीच खूप समजूत घातली.

त्याचं बारसं केलं, बबन नाव ठेवले. सासूबाई त्याला बन्याच म्हणत. दुसरा चान्स घ्यावा की नाही याचे  खूप टेन्शन आले, पण साऱ्यांनी धीर दिला. या काळात आम्ही स्टेशनजवळच नविन घर घेतले. ह्यांचा दवाखाना तिथेच चालू केला.

जानेवारी १९८८मध्ये मला पुन्हा दिवस गेले. यावेळेस आम्ही जरा जास्तच काळजी घेतली. वेळोवेळी सोनोग्राफी केली. इतरही आवश्यक टेस्ट करून घेतल्या. परमेश्वर कृपेने सारं काही व्यवस्थित होतं. पण तरीही मनाची घालमेल चालूच होती. त्याला काहीच उपाय नव्हता. सासर, माहेर ह्यांचीही मनस्थिती तीच होती.

ह्या काळात ह्यांनी बन्याची खूप काळजी घेतली. दोघांच्या जॉबमुळे बन्याला सांभाळायला बाई ठेवली, कस्तूरबा. छान सांभाळायची. त्याचं खाणंपिणं वेगळंच होतं. 

१४ सप्टेंबर १९८८. मी या वेळेस घराजवळच असलेल्या नर्सरी होममध्ये अॅडमिट झाले, नासिकलाच. अगदी वेळेवर कळा आल्या अन् सांज वेळेस मला कन्यारत्न झाले. तीच्या रडण्याचा आवाज ऐकून मला मातृत्वाचा सुखद अनुभव जाणवला. शरीर आनदांनं मोहरलं. मन शांत झालं. दादूला बहिण आली पण दादूला त्याच काहीच सोयरसुतक नव्हतं.

मुलीचं बारस थाटात केलं,  मुक्ता. गौरीच्या सणाला आलेली माझी मुक्ता गोरीपान, देखणी. घरभर फिरायची, तीच्या आगमनाने घर कसं आनदांनं भरून गेलं.

अन् मग २० मार्च १९९२मध्ये प्रसाद झाला. दोन्हीही मुले छान शिकली. मुक्ता माझी अमेरिकेला गेली, उच्च शिक्षण घेतलं. लग्न झालं, दिपक पाटील बरोबर आता ठाण्याला राहते.

माझा प्रसाद डॉक्टर झाला. त्याच्यासाठी मी एक वर्ष घाटकोपर मुंबई येथे राहिले, त्या वर्षभरात ह्यांनी बन्याला खूप छान सांभाळलं.

बन्या फक्त वयाने वाढत होता. अधे मधे त्याला फिटस् यायच्या. रात्री बराच वेळेस ओरडायचा. मी धावत जायची. त्याला जवळ घ्यायची. त्याला पुन्हा झोपवायची. कोणी पाहुणे आ​ले की तो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. पाहुण्यांना  ते कितपत आवडायचं कुणास ठाऊक. मग तो खिडकीत जावून बसायचा. वाकडाच चालायचा. जगाचं त्याला काहीच घेण देण नव्हतं आणि अर्थात त्याचं जगालाही.

सहा दिवसापूर्वी अचानक बेडवरून खाली पडला. कदाचित जरा जास्तच जोराने मोठ्याने ओरडला. मी धावतच गेले. त्याची शुद्ध हरपली होती. हेही मागोमाग आले. त्याला औषध पाजलं. बराच वेळ तेथेच बसले. तो शुन्यात बघत होता. मला खूप भरून आलं. डोळ्यात पाणी आलं. सकाळी मग त्याला अहमदनगर येथे मोठ्या दवाखानात नेले. तपासल्यावर समजलं त्याला ब्रेन हॅमरेज झालंय. लगेचच त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. मुक्ता व प्रसादला कळवल्याबरोबर ते ठाणा व मुंबईहून लगेच आले. प्रसादने दादूच बरंच केलं. भावाचं कर्तव्य तो छान पार पाडत होता. चार दिवस होवूनही दादूच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती. अखेर आम्ही त्याला नासिकच्या दवाखान्यात दाखल केलं. रात्री त्याची तब्येत खूप खालावली. आम्ही जवळच्या नातेवाईकांना तसं कळवलं. अनू सकाळी सातच्या सुमारास दादू अनंतात विलिन झाला. आम्ही त्याचे नेत्र दान केले. जगाला त्याचा तेवढा तरी उपयोग. एक मानसिक रुमाधान…