- डॉ. अनुपमा उजगरे, ठाणे
तब्बल अठरा वर्षांनी नगरला जायला मिळतंय यावर खरं म्हणजे सुमाचा विश्वासच बसला नव्हता. ‘ऑफिसचं काम निघतंय, चल तू पण’ असं त्यानं म्हटल्यावर तिच्या डोळ्यांपुढे पहिला प्रश्न उभा राहिला. “मुलांची शाळा ?”
“त्याचं काय विशेष ? राहतील मामाकडे. दोन चार दिवसांचा तर प्रश्न आहे.”
सुमाला ते एकदम पटलं. उत्साहानं ती नगरला जायच्या तयारीला लागली. भावाला बेत सांगितला तर तो गपगारच झाला. मग जराशानं उसासत म्हणाला,
“आज आजी आणि आबा असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं, नाही ? नातजावयाची आवभगत करताना काही कमी पडू दिलं नसतं त्यांनी.”
वहिनीनं मुलांची जबाबदारी घेतली आणि मग सुमा नवऱ्याबरोबर तरंगतच नगरला निघाली.
आबांच्या मळ्यात सुट्टी घालवायची म्हणजे तिला अन् तिच्या मामेभावंडांना काय आनंद व्हायचा ! आई बाबांच्या धाकाच्या कचाट्यातून सगळी कशी मोकाट सुटलेली असत. सगळ्यांचे लाड भरपूर होत पण त्यातल्या त्यात थोरल्या मामांच्या आक्कीवर आजीचा भारी लोभ.
आक्की रूपानं बेताची अन डोक्यानंही कमीच. आक्कीला एक गोष्ट मात्र चांगली जमायची. तिच्या ज्वारीच्या भाकरी कशा चंद्रासारख्या वाटोळ्या असायच्या. भाकर टरारून फुगली की आक्कीचा चेहरा समाधानानं फुलून जायचा. एरव्ही आक्कीचा चेहरा नेहमीच त्रासिक अन् रागीट असायचा. सगळं जग आपल्याविरुद्ध आहे असा संशय तिच्या नजरेत स्पष्ट दिसायचा. आपल्याच नादात भिवया उंचावणारी आक्की आठवली अन् सुमाला हसू आलं. आता हसणं ठीक होतं. पण तेव्हा आक्कीच्या वाटेला फारसं कुणी जात नसे. गेलंच तर आजी त्यांच्यावर ‘ अरे चिळश्यांनो….’ म्हणत धावून जायची.
आक्कीला लहानपणापासून आजीनं स्वत:जवळ ठेवून घेतलं होतं. त्यामुळे आक्कीबद्दल
कुणालाच विशेष जिव्हाळा वाटत नव्हता. प्रत्यक्ष तिच्या सख्ख्या भावंडांनाही तिच्याबद्दल फारशी आपुलकी वाटत नसे, मात्र तिच्या अर्धवटपणामुळे पुढं तिचं कसं होणार या विचारानं आजीनं डोळ्याला पदर लावला की सगळ्या मुलांना आपल्यालाही रडू फुटणार असं वाटायचं. पण तेही तेवढ्यापुरतंच. परत सगळे आपापल्या खेळात रमत.
आजीच्या आठवणीनं सुमाच्या मनात खूप कालवाकालव झाली. सोनईच्या आणि श्रीरामपूरच्या मामांची मुलं आणि तिची भावंडं अशी नऊ-दहा जणांची पलटण आबांच्या मळ्यात दाखल झाली की आजी लगबगीनं नातवांचे मुके घ्यायला यायची. सगळ्यांच्या तोंडावरून आपले खरखरीत हात मायेनं फिरवत म्हणायची,
“आली बाई, चिळशी माकडांची टोळी !”
हीच माकडांची टोळी जेव्हा तिच्या नाकी नऊ आणी, तेव्हा मात्र ती वैतागून म्हणायची, “मेल्यांनो, थांबा जरा, आता पुढच्या सुट्टीत एक्काला जरी पाऊल टाकू दिलं इथं, तर माझं नाव ते !”
“ते कोणतं ग आजी ?” एखादं टारगट नातवंडं तिला चिडवायचं. मग लटक्या रागानं त्याला आजी म्हणायची,
“तू रे टग्या ऽऽ तुला तर नाहीच कधी मी बोलावणार. तोंड करी बाता न ढुंग खाई लाथा. चिळसा कुठला !”
आक्कीला मात्र कुणी आल्या गेल्याचं काही सोयरसूतक नसायचं. बाकी भावंडं एकत्र जमली की त्यांच्या आपोआप जोड्या पडत. धाकट्या मामांची शुभी सुमाची जोडीदारीण असायची. जशा दोघी वयानं सारख्या तशा त्यांच्या आवडी निवडीही सारख्याच. एका ताटात जेवल्याशिवाय त्यांचं पोट भरायचं नाही. चिंचा, पेरू, दुधावरची साय असलं चोरटं खाणं जोडीनं खाण्यात त्यांना भारी मौज वाटायची.
सगळ्या मुलांवर लक्ष ठेवायला मग आबा मिन्याला स्वत:च्या तैनातीतून मोकळा करीत. त्यानं मग मुलांचं हवं-नको बघायचं. मुलांना फिरायला न्यायचं. कणसं भाजून त्यांना लिंबाचा रस, मीठ चोळून द्यायचं. हुरडा भाजून सोबत घट्ट दही द्यायचं. पिकलेल्या कवठात गूळ-मीठ घालून कवठाच्या वाट्या प्रत्येकासाठी सारख्या प्रमाणात तयार ठेवायच्या हे कौशल्याचं काम मिन्याचंच ! वर पक्षपात केल्यावरून मुलांचा आरडाओरडा मुकाट्यानं सोसायचा तोही मिन्यानंच !
मिन्या सगळ्या मुलांचं सगळं ऐकायचा. त्यामुळे तो मुलांना फार आवडायचा. त्यांना नको असेल तेव्हा मिन्या निमूटपणे आक्कीकडे जाऊन तिला स्वयंपाकात मदत करायचा.
मिन्या एका डोळ्यानं आंधळा होता. डोळा कशानं गेला म्हणून कुणी विचारलं तर उरलेला एक डोळा मिचकावत खुशाल हसत हसत सांगायचा, “तुमच्या पक्षा ल्हान व्हतो, तवाची गोस्ट. यकदा बोरं तोडाया गेल्तो त फांदीचा काटाच घुसलान् काय !”
मिन्या रंगानं काळाकुट्ट होता. त्याचे केसही तसेच काळेभोर अन् कुरळे होते. मिन्या कुणाचा कोण ते आबांना तरी ठाऊक होते की नाही आबाच जाणोत ! आक्कीच्या बरोबरच तोही आबांच्या घरात वाढला, एवढंच आम्हाला ठाऊक. मिन्या गोष्टी खूप छान सांगायचा. आक्की कामं आवरून आल्याशिवाय मात्र त्याची गोष्ट सुरूच होत नसे. मिन्याची गोष्ट सुरू झाली की मुलं रमून जात. छान छान गोष्टी सांगणाऱ्या मिन्याचं दिवसभरातलं अजागळ न् भेसूर रूप मुलं विसरून जात. तेव्हा त्यांना मिन्या म्हणजे त्याच्याच गोष्टीतला एक देखणा राजपुत्र वाटायचा. आक्की झोपली की मिन्याची गोष्ट संपत यायची. मुलांच्या ते लक्षात यायचं पण झोपेनं घेरल्यामुळे मिन्याशी भांडायला दम नसायचा.
सुमा आठवू लागली. मिन्यानं खरंच इतक्या गोष्टी सांगितल्या पण त्यातली एक तरी आठवतेय का ? तिनं स्वत:च्याच नादात मान हलवली. मिन्याच्या गोष्टीमधली एक जागा मात्र तिला आठवली. त्याच्या गोष्टीत एका बंगल्याचा नेहमी उल्लेख व्हायचा. त्यावेळी खेड्यात राहणाऱ्या त्या बाळगोपाळांपैकी कोणालाच बंगला म्हणजे नक्की काय ते ठाऊक नव्हतं. त्या बंगल्यात सगळ्या वस्तू मिळायच्या आणि गंमत म्हणजे त्या सगळ्या फुक्कट मिळायच्या म्हणे ! कारण त्या बंगल्यातले मड्डम साहेब जगभर फिरायला गेले होते. मिन्याला त्या बंगल्याची चावी देऊन गेले होते. जाताना मिन्याला त्यांनी सांगितलं होतं की, “आम्ही जगून-वाचून परत आलो तर ठीक. नाहीतर तूच त्या बंगल्याचा मालक.”
तो लाकडी बंगला खूप मोठा होता म्हणजे. त्याच्या मोठमोठ्या खोल्यांमध्ये हेऽऽ मोठमोठे नक्षीचे पलंग होते. भिंतींना लांबरुंद आरसे लावलेले होते. एक खोली तर नुसती खेळण्यांनी भरलेली होती. मिन्याचं लग्न होऊन त्याला मूलबाळ झालं की सगळी खेळणी त्यालाच मिळणार होती. कारण मिन्याच्या त्या मड्डम-साहेबांना मूलच नव्हतं. मिन्या त्या बंगल्याचं असं वर्णन करून सांगू लागला की मुलांना मिन्याच्या अजून नसलेल्या मुलांचा हेवा वाटायचा. मिन्या सांगायचा, “तिथं अत्तराच्या कुप्या हैतीऽऽ”
आक्कीचे डोळे चमकायचे.
“कमर बारीक करायचे पट्टे बी हैती.”
शुभी-सुमीची नजरानजर व्हायची. त्यांच्या खाण्याला काही धरबंद म्हणून नसायचा. दोघींनाही त्यांच्या लठ्ठपणामुळे ‘चुरमुऱ्याच्या गोण्या’ म्हणून सगळे चिडवीत. बारीक कंबर
हे सौदयांच लक्षण आहे अस नुकतंच कुठतरी वाचनात आल्यानं आपली कंबर बारीक करण्यासाठी वाट्टेल ते करायला त्या दोघी एका पायावर तयार होत्या. झालं ! कंबर बारीक करायचा पट्टा आणून दे म्हणून त्यांनी मिन्याच्या मागे टूमणं लावलं. त्या जितक्या उतावीळ झाल्या होत्या तितकाच मिन्या बेफिकीर होता. आज आणतो, उद्या आणतो, त्यात काय मोठं कठीण आहे किंवा मग विसरलो, उद्या नक्की असं म्हणून तो त्यांची समजूत घालायचा. शेवटी सुमी आणि शुभी दोघी हट्टाला पेटल्या.
“तुझा बंगला तरी दाखव, खरचं आहे की नाही तो, तेवढं तरी बघू दे.”
तसा काहीसा वैतागून मिन्या म्हणाला,
“ए भिंगऱ्यांनो, माजं बोलनं खोटं वाटतंय व्हय? मंग इच्यारा त्या आक्कीला. तिनं बघितलाय बंगला बी आन् आत्तराच्या कुप्या बी.”
सुमी आणि शुभी मग लगेच आक्कीकडे गेल्या. आक्की हातावर भाकर थापण्यात गुंतली होती. त्या दोघींच्या येण्याकडे तिनं लक्षच दिलं नाही.
“आक्के….” सुमी
“………”
“ए आक्के……” शुभी
आक्कीनं तव्यावर भाकर टाकली. वरून तिला पाण्याचा हात लावत तिनं दोघींकडे कपाळावर आठ्या घालून पाहिलं. त्याबरोबर दोघींनी तिच्याकडे बघून प्रेमळ हसण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे आक्की आणखीनच बिथरली. तिच्या डोळ्यात आणखीनच संशय दाटला. काही न बोलता तिनं दुसऱ्या भाकरीच पीठ मळायला घेतलं.
“आक्के, मिन्याच्या बंगल्यात गेली होतीस ?” शुभीला गप्प बसवेना.
“काय कायै ग तिथं ?” सुमीपण ऐकायला उत्सुक होती.
आक्कीनं दोघींकडे आळीपाळीनं रोखून पाहिलं.
“आक्के तू काय केलंस गं तिथं जावून ? अत्तराच्या कुप्या आणल्या असशील ना? अं?”
“आणल्या ! मग ?” आक्की.
दोघींनीही तिला खूपच गोडीत घेतलं. कारण त्यांना माहीत होतं, मिन्याचा बंगला बघायला मिळाला तर तो फक्त आक्कीमुळेच मिळणार होता आणि दोघींना बंगला दाखवायला म्हणून आक्की तिथे गेली तर तिला परत अत्तराची कुपी मिळेल हे त्यांनी आक्कीला खूपच गोडीत पटवून दिलं. अत्तराच्या कुपीचं आमीष ऐकून आक्की हुरळली. तिला अत्तराचं वेड मिन्यानच
लावलं होत. सुमी-शुभीला उदबत्तीचा वास हा एकच चांगला वास म्हणून माहीत होतं. अत्तर बित्तर वापरायला त्या बर्याच उशिरा शिकल्या. त्यांना कंबर बारीक करायच्या पट्ट्याचं आकर्षण होतं तर आक्कीला अत्तराचं. आक्कीची आवड त्यांच्यापेक्षा वेगळी असणं साहजिकच होतं. त्यांच्यापेक्षा आक्की मोठी होती. एव्हाना तिला पदर आला होता.
त्याच दिवशी दुपारी आक्कीनं दोघींना हाक मारली. कधी नव्हे ते त्या दोघी आक्कीच्या पहिल्या हाकेला धावून गेल्या. आक्की बर्यापैकी तयार झाली होती.
स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूने येऊन मिन्या पण त्यांच्या बरोबरीने चालू लागला. आबांच्या मळ्याची हद्द संपली की रामभाऊंचं शेत लागत होतं. तिथं ज्वारीची उंच ताटं उभी होती.
“पोरी व्हो. त्या शेताच्या पल्याड त्यो बंगला दिसतूय नव्हं ? त्योच त्यो. तुमी जवारीची ताटं खावा तवर मी आन आक्की बंगल्यापोत्तर जातो, बंगला उघिडतो न मंग तुमास्नी हाळी घालतो. हाळी ऐकल्याबिगर इऊ नका काय ? नै त कमरपट्टा मिळायचा नै….. हां !” मिन्यानं दम दिला.
“पण आपण सगळेच जाऊ या की….” शुभी.
“आन् येवढ्यानला जाताना कुनी बघितलं मंग ?”
“मग आक्की राहू दे की आमच्याबरोबर.” परत शुभीचा आग्रह.
“नगं, नगं, तीन तिघाडा न काम बिघाडा हुईल.”
“बरं बरं.”
दोघी चटकन म्हणाल्या, कंबरपट्टा असा हाताशी नव्हे कमरेशी आलेला होता. तो दोघींपैकी कुणालाच कुठल्याच अडथळ्यामुळे गमवायचा नव्हता. दोघी मग उत्सुकतेने त्या पट्टयाविषयी बोलत राहिल्या. पण किती वेळ बोलणार तेच ते.
भोवती ज्वारीची रसरशीत ताटं पाहून त्यांना स्वस्थ बसवेना. एकीकडे ताट उपटून चोखत असताना कान मात्र मिन्याच्या हाकेकडे होते. एव्हाना तो पोहचला असेल. रामभाऊंचं शेत कुठे संपतं हे दोघींनाही माहीत नव्हतं. पण कुठेही संपत असलं तरी आंधळ्या मिन्याला तेवढे अंतर कापायला एवढा वेळ लागायला नको होता. मिन्यानं दुरून दाखवलेला तो लाकडी बंगला अगदीच काही दूर नव्हता. दोघी बेचैन झाल्या. शुभी आधीच उतावीळ. म्हणाली, “चल गं, आपण जाऊ शेतातून वाट काढत, मिन्याची हाक आली की आणखी लवकर पोहचता येईल. उगीच उशीर व्हायला नको.”
सुमीला पटलं. दोघी एकमेकींचे हात धरून शेतातून लपत छपत वाट काढत हलक्या पावलांनी जाऊ लागल्या. भर दुपारी त्यांना असं दुसऱ्यांच्या शेतात भटकताना पाहून कुणी आबांना सांगितलं असतं तर आपली धडगत नाही म्हणून दोघींच्याही मनात धाकधूक होती.
तेवढ्यात डावीकडे सळसळ झाली. दोघींनी दचकून पाहिलं.
मिन्या आणि आक्की ?
इथेच ?
मघाशी तर आक्की नीटनेटक्या कपड्यात होती. आता अशी कशी ?
मिन्याचा उरलेला एक डोळा आणखीनच केविलवाणा झाला होता. आक्कीचे डोळे घाबरले होते. सुमी शुभीनं एकमेकींकडे पाहिलं. दुसऱ्याच क्षणी अत्तराच्या कुपीचा अर्थ त्यांना कळला आणि म्हटलं तर नीटसा कळलाही नाही. दोघींची छाती धडधडू लागली. भूत पाठीमागे लागल्यासारख्या त्या वाट मिळेल तिथून घराकडे धावल्या.
“काय ग पोरींनो, कुठं हुंदडता भर दुपारी ?”
हातात काठी घेऊन मागच्या दारातच उभ्या असलेल्या आबांना बघून तर दोघींचीही वाचाच गेली !
“बोलत का नाही ?” आबा गरजले.
“आबा… मिन्या… आक्की…”
“कुठे आहेत ?”
“रामभाऊंच्या शेतात…”
आबा पुढे काय करणार आहेत याची वाट न बघता धापा टाकत दोघी जीव मुठीत घेऊन आत पळाल्या.
मग दोनेक दिवसातच सगळ्या नातवंडांची रवानगी आपापल्या घरी झाली. खरं म्हणजे सुट्टी संपेपर्यंत दरवेळी सगळी इथे राहत. यंदा एवढ्या लवकर आबा आपल्याला का पाठवताहेत हे कुणालाच कळेना. आजी आणि आबांना विचारावं तर त्यांचे गंभीर चेहरे पाहून कुणाची हिंमतच झाली नाही. आक्कीला थोरले मामा स्वतः येऊन घेऊन गेले. त्यानंतर सगळी भावंडं आजी आबांकडे एकत्र अशी भेटलीच नाहीत. ती सगळी मजाच संपली. सुमीला तर कितीदा नगरला जावसं वाटे पण या ना त्या कारणानं बाबा जाऊ द्यायचे नाहीत. पुढे आजी आणि आबा वारल्यानंतर मामांनी तो मळा विकून टाकला. किती रडली होती सुमा तेव्हा !
आज अठरा वर्षांनी परत नगरमध्ये येऊन बालपणाच्या खुणा शोधायला सुमा अधीर झालीय. पहाटे मोकळ्या हवेत फिरायला म्हणून आबा सर्वांना घेऊन जायचे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या दगडी पुलांवर धावत जाऊन मुलं बूड टेकायचा प्रयत्न करीत. आता किती ठेंगणे वाटताहेत हे पूल. आणखी थोडं पुढे गेलं की टेकडी लागायची. तिच्यावर चढताना काय दमछाम व्हायची. पण चढण्याशिवाय गत्यंतर नसायचं. टेकडीच्या एका बाजूला मुलं आणि दुसऱ्या बाजूला मुली अशा थाटात त्या टेकडीवर प्रात:र्विधी पार पडे. सुमाला ती टेकडी कुठेच दिसली नाही. तिच्या जागी आता टुमदार घरं तयार झाली होती. डावीकडून वळून पुढे गेलं की आलं गोपाळकाकांचं दुकान. गोपाळकाका आबांचे जवळचे मित्र. त्यांच्या मुलांनी दुकान चांगलं वाढवलेलं सुमाला दिसलं. दुकानाबाहेर धान्याच्या गोण्यांशेजारी आरामखुर्चीत बसलेले गोपाळकाका बरेच म्हातारे दिसत होते. सुमानं त्यांना नमस्कार केला. “मी सुमी, आबांची नात.”
गोपाळकाकांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह अजून पुरं मिटलं नसल्याचं पाहून सुमानं मोठ्यानं आपण कोण ते पुन्हा एकदा सांगितलं. बहुधा त्यांना ऐकू गेलं असावं. मोठ्या आनंदाने ते म्हणाले, “या s या ऽ बसा.”
सुमी परकरात होती तेव्हाही गोपाळकाका तिला अहो-जाहो म्हणायचे. तिलाच नाही तर आबांच्या सगळ्या नातवंडांना.
“आबा म्हणजे देवमाणूस. खूप उपकार होते त्यांचे आमच्यावर…. आता आल्यासारखी रहा चाराठ दिवस. आबा नाहीत पण आम्ही आहोत. जावई कुठे आहेत? अन मुलंबाळंही दिसत नाहीत बरोबर ? सामान… ?
“हे ऑफिसच्या कामासाठी आलेत. मुलांना मामाकडे ठेवलंय. मला तुम्हा सगळ्यांना भेटायची आणि आजोळ पुन्हा एकदा बघायची इच्छा होती म्हणून मी मुद्दाम आले..”
“झालं पाहून ? भेटले का सगळे ?”
“हो. पाहून झालं सगळं. पण भेटायला फारसे कुणी उरलेच नाहीत ओळखीचे.”
बोलता बोलता अचानक सुमीला मिन्याची आठवण झाली.
“गोपाळकाका, तो मिन्या आठवतो तुम्हाला ? तो आंधळा मिन्या ? आबांकडे असायचा?”
“तो……? तो काय त्या पारावर बसून भीक मागतोय.”
सुमीच्या डोळ्यांपुढे छान छान गोष्टी सांगणारा मिन्या येतो. ज्याचा हेवा वाटावा असा खोलीभर खेळणी असलेला, हवी ती वस्तू फुक्कट देणारा. कधी न पाहिलेला मिन्याचा बंगला येतो….. कंबर बारीक करायचा पट्टा आठवतो.. आणि.. आणि.. रामभाऊंच्या शेतातून वाऱ्याच्या झुळकेसरशी अठरा वर्षांपूर्वीचा अत्तराचा घमघमाट दरवळतो…. पारावरच्या, पाठमोऱ्या मिन्याचा लाकडी बंगला वाळवीनं कधीच पोखरलेला असतो…