माझे पुस्तक प्रेम आणि ‘गीत’ नाताळ अंक.
- लेस्ली से. डायस ‘गीत‘ नाताळ अंक
सांडोर वसई
माझे वडील पुस्तकप्रेमी होते. पुस्तके वाचून ते त्यातल्या गोष्टी आम्हाला सांगत असत. त्यामुळे लहानपणीच पुस्तकांशी माझी छान गट्टी जमली होती. पुढे शिक्षण संपवून मी नोकरीस लागलो. आता खऱ्या अर्थाने मीही पुस्तकप्रेमी झालो होतो. वाचनाचा झपाटा एवढा वाढला होता की दिवसाला दोनअडीचशे पानांचे पुस्तक सहज वाचून मी हातावेगळे करू लागलो.
गोरेगाव ही माझी कर्मभूमी. त्याकाळी गोरेगाव पश्र्चिमेस स्टेशनजवळ ‘पंचम’ नावाचे एक खाजगी वाचनालय होते. तेथे नुकतीच प्रकाशित झालेली नवीन नवीन पुस्तके सहज उपलब्ध असायची. रोज संध्याकाळी कामावरून सुटल्यावर तेथून मी पुस्तक बदलून दुसरे घेई.
प्रवासात गर्दी कितीही असो कामावर जाता येता, ट्रेनची, बसची वाट बघताना जेथे जेथे मला संधी मिळेल तेथे पुस्तक उघडून मी वाचन करीत असे. गर्दीत उभा असतानाही माझं वाचनात कधी खंड पडत नसे. वाचनाचा माझा हा झपाटा पाहून वाचनालयात काम करणारी मुलगी खूप अचंबित होऊन जाई. चांगली वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या, प्रवासवर्णन आणि छान छान दिवाळी अंक निवडताना माझ्या मदतीस ती नेहमी तत्पर असे.
बऱ्याच वर्षांनंतर मी ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’च्या गोरेगाव आणि पुढे बोरिवली शाखेतूनही पुस्तके घेऊ लागलो. पुढे काही वर्षानी मी नोकरीचा राजीनामा दिला आणि वसईतच माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायाच्या धावपळीतही माझे वाचन सुरुच होते. वसईतील दोन-तीन वाचनालयांचा मी आजही सदस्य आहे.
या पुस्तक प्रेमामुळेच वाचकांसाठी काहीतरी करावं या विचारातून आमच्या-कडून डिसेंबर २०१२ साली ‘गीत’ नाताळ अंकाला सुरवात झाली. ‘गीत’ नाताळ अंकाचे यंदा तेरावे वर्ष आहे. या तेरा वर्षात अनेक कडू आणि गोड प्रसंगाला आम्ही सामोरे गेलो आहोत.
अंकाच्या पहिल्या वर्षीची गोष्ट. आम्ही अंक प्रकाशित करतोय हे जेव्हा माझ्या मित्रमंडळीना कळले तेव्हा बरेच मित्र मला टाळू लागले. चुकून ते जेव्हा माझ्या समोर येत तेव्हा “कशाला हा या नसत्या उठाठेवी करतोय? याला ते जमणारच नाही.” असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर मला वाचायला मिळत.
पण मदतीसाठी धावून आलेल्या इतर साहित्यिक मित्रांनी आणि आयुष्यभरात मी वाचलेल्या हजारो पुस्तकांनी मला साथ दिली ती आजतागायत. वाचलेले कधी फुकट जात नसते. त्यातील शब्द नी शब्द आपला खास जवळचा असा जोडीदार झालेला असतो. तो शब्द कायमचा आपल्या बरोबर असतो. आपल्याशी कधी तो दगाफटका करीत नाहीत. वागायचे कसे? बोलायचे कसे? लिहायचे कसे? तोच आपला खराखूरा मार्गदर्शक.
‘गीत’ नाताळ अंकाच्या बारा-तेरा वर्षात मोठमोठ्या साहित्यिकांना मी भेटलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना भेटलोय. बऱ्याच जणांनी आमचे कौतुक केले, सहकार्य केले. बहुमोल असे मार्गदर्शनही केले. तर काहींचे अनुभव येथे न सांगण्यासारखेही आहेत. पण वर ‘कडूगोड’ शब्दाचा उल्लेख आलाय म्हणून थोडे सांगावं लागतेय. आपल्याच भावविश्वात कायम दंग असलेलीही अशी माणसे असतात. त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं.
असो, ‘गीत’ नाताळ अंकाने जे यश दिले ती सर्व बाळयेशूचीच कृपा. त्याच्या जयंतीनिमित्त सुरू असलेला ह्या उपक्रमास त्याची कृपादृष्टी लाभतेच लाभते.
पाठीराखा परमेश्वर आणि साहित्यिक मित्रमंडळींची बहुमोल साथ मिळतेय म्हणूनच हे ‘गीत’.