माझा ‘ऑक्सिजन’ – भरत  वाळींजकर

माझा ‘ऑक्सिजन’

  • भरत  वाळींजकर, नालासोपारा  प.

             फोन – 9869461011

         जसं शरीरासाठी सुयोग्य प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मनालासुद्धा योग्य प्रमाणात ऑक्सिजनची नितांत गरज असते. ज्यावेळेस शरिर  व मन एकत्रितपणे  एकमेकांच्या हातात हात घालून एकोप्याने नांदतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण सुखीसमाधानी आणि निरोगी आयुष्याचा उपभोग घेवू शकतो.

         मनस्थिती स्थिर असली की परिस्थिती आपोआप स्थिर होते. ज्याच्यामुळे मनाला सुख लाभतं, मन  प्रफ्फुलित होतं, ती स्थिती म्हणजे आनंद आणि तोच आपल्या सुखी जीवनाचा ऑक्सिजन. मानसिक स्वास्थासाठी आपल्याला  एखाद्या चांगल्या छंदाचा ऑक्सिजन हवा असतो.

         माझ्या बाबतीत मला लाभला आहे  वाचन व लिखाणाचा ऑक्सिजन. माझ्या शिक्षकी पेशातल्या आईमुळे मला लहानपणीच  वाचनाची, लिखाणाची व वक्तृत्वाची आवड निर्माण झाली. मे महिन्यातील सुट्टी म्हणजे फक्त खेळ जो माझ्या किसनदादा  मुळे बहरत गेला आणि उरलेल्या वेळेत भरपूर वाचन व लिखाण. ऐतिहसिक पुस्तकांचा मला जास्त जिव्हाळा… शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर माझे दैवत. खऱ्या अर्थाने युगपुरुष. पुस्तके वाचायची व आवडीचे उतारे वहित  लिहून ठेवायचे.

         ह्याच प्रेरणेतून माझ्या कडून ‘मी’  लिहिले गेले. जवळजवळ विस दोनशे पानी वह्या ‘मी’ ह्या सदराखाली माझ्याकडून लिहिल्या गेल्यात. ‘मी’ म्हणजे काही प्रमाणातील माझी दैनंदिनीच. आयुष्यातल्या काही महत्वाच्या  घटनाचे शब्दरूप. मनातल्या विचारांचे भाव- भावनांचे शब्दात विणकाम करायचे. एखादं छानसं तलम मलमली रेशमी वस्त्र तयार करायचं ही एक प्रकारची साहित्यिक उर्मीच म्हणावी लागेल. मनातलं कागदावर उमटावयाचे ही प्रक्रियाच किती आनदांची.. मनाला सुखावणारी..

         आपले लेख दिवाळी अंकात, ख्रिस्तायन ह्या नाताळ विशेषाकांत, सृजन मासिकात, स्वेद ह्या अंकात प्रसिद्ध होतात, आपलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचून त्याची पावती मिळणं आप्तस्वकियांच्या, मित्रांच्या बोलण्यातून “छान लिहितोस, लिहित रहा” असं प्रोत्साहनरूपी टॉनिक मिळणं  ही खरंच सुखावणारी, समाधान देणारी गोष्ट आहे. मनाला लाभलेला ऑक्सिजनच आहे.

         अनेक साहित्यिक वाचनाबरोबर वृत्तपत्र वाचन हा ही माझा बौद्धिक प्रकारातला ऑक्सिजन मिळवण्याचा  हक्काचा स्तोत्र. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र वाचल्याशिवाय  मला चैनच पडत नाही मग त्यासाठी रात्रीचे अकरा वाजले तरी मला चालते. निर्भिडपणे, निष्पक्ष, परखडपणे  लिहिले जाणारे संपादकिय अग्रलेख तर माहितीचा उत्तम नमुनाच असतो. किती सखोलपणे पण तरीही विनम्रतेची किनार लाभलेले अग्रलेख मनाला खूप सकारात्मक दृष्टी देतात. सगुण-निर्गुण ही सात्विक   व जीवन आनंद  ही आनंदमयी लेखमाला मनाची खूप छान मशागत करतात.

         ख्रिस्तायन ऑनलाईन नाताळ विशेषांक तसेच सुवार्ता नाताळ विशेषांक म्हणजे साहित्यीक मेजवानीच. जुन्या नविन लेखकांचा उत्तम मेळ जमलेले हे अंक. नवोदितांना प्रोत्साहित करणारे,  उमेद देणारे, सात्विक उपदेश, उत्तम मांडणी ह्यामुळे माझ्यासाठी हे अंक म्हणजे वाचनीय खुराकच. एक प्रकारचा प्रेरणादायी ऑक्सिजनच.

         एकत्र  कुटुंबा साठी झटणं हाही तसा माझा मानसिक समाधानासाठी मिळत असलेला प्राणवायूच आहे. कुणाचा तरी मुलगा असणे, कुणाचा तरी भाऊ,   मग कुणाचा तरी पती, मग वडिल होण्याचे भाग्य मिळणे आणि नंतर आजोबा होण्याचे परमभाग्य लाभणे… आयुष्यातल्या ह्या आनंदमयी, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पायऱ्या  आपल्याही वाट्याला याव्यात आणि आपण ह्या प्रत्येक पायरीला योग्य तो सन्मान द्यावा, त्यांचा मान राखावा, त्या नात्यासाठी आपलेपणाने झटावे आणि आनंद मिळवावा म्हणजेच आपल्या जीवनाचा ऑक्सीजनच आहे…

         सकाळचा माझा सर्वधर्मसमभाव हे तत्व अंगिकारलेल्या  जवळजवळ पन्नास जणांचां  गुड मॉर्निंग क्लब म्हणजे मानसिक आनंदासाठी लाभलेला मोठ्ठा ऑक्सिजन टँकच म्हणावा लागेल. प्रत्येकाच्या सुख दुःखात सामिल होणारा, वाढदिवस आनंदसोहळा उत्साहात साजरा करणारा , धम्माल मस्तीत पिकनिक काढणारा,  नालासोपारा येथील हिरवाईच्या वनराईत भरपूर मॉर्निंग वॉक करणारा, वादविवादा  सहित  बॅडमिंटन खेळणारा हा क्लब म्हणजे सकाळचा प्राणवायूचा खजिनाच…

         तेव्हा  वाचन-लेखन, एकत्र कुटुंब आणि मित्रांबरोबरचा  मॉर्निंग वॉक हाच मी जोपासलेला माझ्या मानसिक स्वास्थासाठीचा माझा ऑक्सिजनच आहे.

                                                            श्री. भरत काशिनाथ वाळिंजकर

                                                            प्रभूकृपा, समेळपाडा, म. फुले नगर

                                                            नालासोपारा  (प)

                                                            9869461011