मस्कीपुराण – डॉ. रिबेका दोडती

“मस्कीपुराण”

  •  डॉ. रिबेका दोडती, निर्मळ

         पावसाळ्यानंतर प्रचंड वाढलेली पिलावळ घेऊन मच्छराची झुंडच्या झुंड सायंकाळच्या संधीप्रकाशात चुकून उघड्या राहिलेल्या मेन डोरमधून घरात प्रवेशती झाली..

         आल्या आल्या सोप्याच्या कोपर्‍यात, पडद्यांवर, कूशन्सच्या मागे अशा अडचणींच्या जागी यांची फौज दबा धरून बसली. जेवणाचे ताट घेऊन आम्ही अन्नावर तुटून पडताच ही फौज आमच्यावर तुटून पडली… जेवता जेवता आमच्या आऊट ऑफ रिच होईल अश्या जागांवर आपल्या स्ट्रॉस टोचून खुशाल पेयपान करीत बसली…

         एक हात ताटाला पकडून दुसर्‍या हाताने खमंग माशाच्या तुकडा तोंडात टाकणार इतक्यात पाठीतून सुई भसकन खोल खुपसणार्‍या मच्छराधमाला मागची कुशन आणि पाठीत मधोमध चेचावे म्हणून मी केलेले सगळे यत्न फोल ठरवून मोठ्या शिताफीने माझ्या पाठीवर तुरी देऊन त्या मच्छराने पलायन केले. परंतु रक्तमदिरेचे अति प्राशन झाल्याने तुडूंब भरलेल्या पोटाचा भार सहन न होऊन पुर्‍या दिवसाच्या गर्भार बाईसारखं ते मच्छर भुईवरून भेलकांडत चालू लागलं. आधीच मच्छर त्यात रक्त प्यालेल्या त्या दुष्ट जीवाचा चेंदामेंदा करावा म्हणून मुलांच्या मॅग्नेटिक टॉईझ मधली एक टाईल मी त्या मच्छरवर नेम धरून फेकली. धनुर्विद्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसले तरी अचूक निशाणा साधण्याचे माझे कसब वाखाणण्याजोगे असल्याची कबूली माझ्या एका मावशीने आमच्या इन्गेजमेंट प्रोग्रामच्या दिवशी दिली होती. त्यावरून अचूक निशाणा साधण्यात अर्जूनानंतर मीच…

         चेहर्‍यावर विजयश्री घेऊन मी ती टाईल उचलली. मच्छर धारातीर्थी पडले होते रक्ताच्या थारोळ्यात. थोड्या वेळाने मुंग्यांची एक फौज मार्च पास्ट करत अवतरली आणि त्यांनी त्या मच्छराला उचलून नेले. शासकीय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार पार पडला असावा…

         त्यानंतर घटनास्थळावरचे उरले सुरले पुरावे मोठ्या चलाखीने आणि मेहनतीने घासून पुसून नाहीसे करुन मी निश्चिंत होऊन झोपी गेले.

         काही सेकंदाच्या अत्यंत क्षणिक पेयपान सुखासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्‍या मच्छरांचं कौतुक करावं तितकं कमीच.

         तसं पाहिलं तर मच्छरांशी मानवजातीचा ‘खून का रिश्ता’ आहे. पण आपण सगळे हात वाजवत आणि पुरळ खाजवत ‘सात खून माफ’ असल्यासारखे मच्छरांच्या पाठी लागलेलो असतो.

         ’10 मोस्ट डेंजरस जॉब्स इन द वर्ल्ड’ अश्या यूट्यूबवर व्हिडिओ करणार्‍या लोकांना मच्छरांच्या एवढ्या डेंजरस जॉबचा सपशेल विसर पडावा ही शोकांतिकाच नव्हे काय? अखिल मानवजातीने आजवर मच्छरांची कत्तल करून ह्या संगीतप्रिय किटकजमातीवर घोर अन्याय केला आहे.

         ज्यांची कत्तल करणे जमले नाही अश्यांना पंगू करून त्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत.

         कुठे फेडेल मानवजात हे अघोरी पाप?

         पण पुढेमागे काळ बदलूही शकतो..

         कारण सध्याच्याच काळात माणसं अक्षरशः काहीहीबाही प्राणी ‘पेट’ म्हणून बाळगू लागली आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अनादी काळापासून मानवाच्या घरांवर आणि कानांवर अधिराज्य गाजवणार्‍या या किटकांना पाळीव प्राण्यांचा दर्जा मिळण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

         अमेरिका युरोपात लोकं पायथन, इंग्वाना, हेजहॉग पाळत असताना, दुबई सौदीचे शेख चित्त्या वाघासारख्या हिंस्र श्वापदांना माणसाळत असताना ‘मच्छरे जाहली उदंड’ चा नारा घेत भारतीयांनी मस्किटोस् पाळणे हे वेगळेपण सिद्ध करणारे ठरेल.

         तश्या मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकणगुणिया या मच्छरांच्या नगण्य खोड्या त्यांना वेट कडून टाईम टू टाईम वॅक्सिनेशन देऊन सहज नियंत्रणात आणता येऊ शकतात.

         कुत्र्या मांजरापेक्षा मच्छर पाळलेल्यांच्या घरी जाणं नक्कीच जास्त सेफ वाटेल की नाही?

         मच्छरांच्या नशीबी कायम असलेली अवहेलना धूळीत मिसळून त्यांना ग्लॅमर प्राप्त होईल!

ह्या पेट प्रेमींचा काय भरवसा?

         जागोजागी मच्छरांच्या पैदाईशीसाठी गटारांवर इनक्यूबेशन प्लांट उघडले जातील.

         पोटापाण्यासाठी मानवी रक्ताच्या शोधात वणवण आणि घरघर गुणगुणणार्‍या मच्छरांसाठी  अखिल भारतीय मच्छर संवर्धन संघटना उभारली जाईल.

         सतत औषधं आणि धूर फवारणी करून मच्छरांची मास किलिंग करणार्‍या पालिका कर्मचार्‍यांवर सक्त कारवाई केली जाईल.

         मच्छरांच्या सेवेसाठी आणि हौसेपोटी वेगवेगळ्या ब्लडगृपची माणसे बहुमच्छर सुखाय आपली शरीरे स्वच्छेने रक्तदानार्थ बहाल करतील.

         मच्छरांनी माणसांना आणि माणसं मच्छरांना किश्श्यू बिश्श्यू करतानाचे फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होऊ लागतील.

         मच्छरांच्या मस्कीऑलिंम्पिक वैगेरे स्पर्धा सुरू होतील.

         मच्छरांना घराघरांतून मायेनं स्वीकारून अडगळीच्या अडचणीच्या जागी नव्हे तर उजळ माथ्यानं  बसता येईल अश्या खास जागा उपलब्ध करून दिल्या जातील.

         चूकून मच्छर चावलंच तर मोठ्या मनानं त्याला माफ केलं जाईल. इतकंच काय तर कौतुकानं आल्यागेल्यांना दाखवलं जाईल ‘it’s so notorious. it has bitten me almost 15 to 20 times. naughty fellow.’

         शेवटच्या दोन पायांना नाजूक धागे बांधून बागेत फिरायला, मनोमिलनाला आणि शीसू करायला येणारी मच्छरांची लाडाकोडात वाढलेली जमात घेऊन धावणारे आबालवृद्ध नजिकच्या भविष्यात बागेत, जॉगिंग ट्रॅक वर दिसू लागले तर आश्चर्य वाटू नये म्हणून अगोदरच हा प्रपंच…

काय सांगावे असले घडेलही…

कालाय तस्मै नमः