मति आणि गती
- डॉ. सुरेश पाटील, वसई
गोष्ट आहे जूनी. त्यावेळी शाळांचा बाजार नव्हता ना वेगवेगळ्या मिडीयमचा बोलबाला. शहरात नगरपालिका किंवा सामाजिक संस्थेच्या शाळा असायच्या. हाडामासाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे शिक्षण. त्या काळात शाळा ह्या खरोखरच ज्ञानमंदिर होत्या.
अशाच एका शाळेत अमोल आणि विकास शिकत होते. अगदी बालवाडी पासूनचे मित्र. एकाच शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे. अमोलचे बाबा सरकारी नोकरीत मोठे अधिकारी तर विकासचे बाबा बँकेत कामाला होते. दोघांच्या आई ह्या एकाच प्राथमिक शाळेत शिक्षिका.
दोन्ही कुटुंबाचा फार जिव्हाळा होता. दोन्ही घरचं वातावरण शिस्त मात्र खूप वेगळी होती. अमोलच्या घरी अभ्यासाला प्रचंड महत्त्व होते. त्याची आई वेळातवेळ काढून त्याचा अभ्यास घेत होती. स्कॉलरशिप, गणित; विज्ञान प्राविण्य या परीक्षेत तो चमकत होता. पूर्ण शाळेत त्याने पहिला नंबर कधी सोडला नव्हता. त्याला ही अभ्यासाची आवड होती. कॉलनीतील मस्ती करणाऱ्या मुलांबरोबर खेळायला त्याला आई बाबांनी मना केले होते. ठराविक हुशार मुले सोडली तर त्याचे मित्र कमी. शिवाय सुट्टीमध्ये त्याचे वेगवेगळे कोर्स चालू असायचे. एक अतिशय हुशार मुलगा अशी अमोलची ख्याती. ‘मुलगा असावा तर असा’ असे कॉलनीतील पालकांच मत होते.
विकासच्या घरात खेळीमेळीचे वातावरण. त्याचे बाबा नोकरीबरोबर सुट्टीच्या दिवशी गावी जाऊन शेती करत होते. त्याचा अभ्यास कोणी घेत नव्हते. फक्त तो अभ्यास करावा यासाठी आई त्याला प्रोत्साहित करत होती. विकासला खेळ, कला यांची आवड होती. शालेय अभ्यासात तो ठीक होता. गणेशोत्सव, दहीहंडी या सामाजिक कार्यक्रमात तो नेहमी आघाडीवर असायचा. शाळेच्या कबड्डी टीमचा कॅप्टन. भरपूर मित्रपरिवार. त्यात ‘हुशार’ आणि ‘ढ’ असे वर्गीकरण नव्हते. शाळेतून कधीकधी मस्ती केल्याबद्दल घरी तक्रारी यायच्या. सुट्ट्यात तो गावी आजी आजोबाकडे जायचा व बाबांना शेतातील कामात मदत करायचा. कॉलनीतील मुलांमध्ये तो प्रसिद्ध होता पण मोठ्या लोकांच्या दृष्टीने तो वाया गेलेला. त्याच्यात आणि अमोल मध्ये नेहमी तुलना करून ‘हुशार’ आणि ‘ढ’ असे दोन शिक्के समाजाने त्यांना दिले होते.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत अमोल चमकला. नावाजलेल्या मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला प्रवेश भेटला. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला. विकासही बारावी कसाबसा पास झाला. त्याने मॅकेनिकलच्या डिप्लोमामध्ये प्रवेश घेतला. पण दोघांचेही आई बाबा खुश होते. पुढे विकासचे कुटुंब गावी शिफ्ट झाले. त्या दोन्ही कुटुंबातील संपर्क तुटला.
अमोलने आपले शिक्षण संपवून पुढे नावाजलेल्या कॉलेजमधून MBA केलं. वेगवेगळ्या कंपनीमध्ये पुढे पंधरा वर्षे नोकरी केली. आतातर त्याला एका खुप मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीची संधी मिळाली होती. त्याच्या मेहनतीने पहिल्या वर्षीच कंपनीचा त्याला ‘उत्कृष्ट कामगार’ हा पुरस्कार मिळाला. कंपनीचे मालक खुद्द पारितोषिक वितरणासाठी परदेशातून येणार होते.
मुंबईच्या आलिशान हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होता. अमोलचे सर्व कुटुंब हजर होते. कंपनीचे मालक पारितोषिक वितरणासाठी स्टेजवर आले. अमोल स्टेजवर पोहोचला तर त्याला धक्काच बसला. ज्या कंपनीत तो काम करत होता त्याचा मालक दुसरा कोणी नसून त्याचा शाळेतील मित्र ‘विकास’ होता.
विकासने त्याला कवेत घेतले. त्याच्या हुशारीने कौतुक केले आणि तो म्हणाला “मी हिरा निवडला होता. मला माहित होते. गेल्या वर्षी तुझी या पदासाठी तुला न कळता मीच निवड केली होती. तुझ्यासारखी गुणवत्तापूर्ण मेहनती माणसे ह्या कंपनीला अजून उज्ज्वल भविष्य देऊ शकतात.”
“अरे पण तू इथपर्यंत पोहोचलास कसा? कुठे तो ‘ढ’ विकास आणि कुठे हा ‘कुबेर’! मान गये भाई” अमोलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“सांगतो नंतर पार्टीमध्ये निवांत!” हसत हसत विकास बोलला.
रात्री दोन्ही कुटूंब जेवणासाठी एकत्र भेटले. विकासने आपला प्रवास सांगितला. डिप्लोमा झाल्यावर त्याने एका कारखान्यात काम सुरु केले. पुढे मित्रांच्या मदतीने गावीच त्याने छोटा कारखाना काढला. प्रचंड लोकसंपर्क आणि नेतृत्वगुण या जीवावर त्याने हा व्यवसाय वाढवला. पुढे काही आपल्या मित्रांनाच पार्टनर घेऊन भारतभर कंपनीचा विस्तार केला. व्यवसायात त्यांनी काही धोके आणि मोठे निर्णय घेतले. सर्व यश अपयशाची जबाबदारी त्याने घेतली. कामगारांच्या भावना जाणून घेणारा एक प्रेमळ आणि मेहनती मालक अशी त्याने प्रसिद्धी कमावली होती.
त्याचा हा प्रवास ऐकून अमोलची आई बोलली, “विकास, तू केलेला हा ‘स्वयंविकास’ अभिनंदनीय आहे. खरा हुशार तू आहेस. हुशारी म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे तू दाखवून दिलेस. तुझा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे”
अशाप्रकारे विकासला लावलेला ‘ढ’ तला ‘ढ’ ढगात गेला.
अशा कित्येक गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि अनुभवलेल्या असतील. तुमच्या शाळेतील, कॉलेजमधील अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्या मुलामुलींची नेत्रदिपक प्रगती तुम्ही पाहिली असेल. काही लोक त्याला गुडलक वा नशीब म्हणतील. पण मी असे म्हणणार नाही.
पण आपलीही मुले अशी ‘हुशार’ बनावी ही आकांक्षा सर्व पालकांच्या मनात असते. आपली मुले हुशार आहेत का? आणि त्यांना हुशार कसे बनवायचे? हे प्रश्न आता तुमच्या मनालाही पडले असतील! मुळात बुद्धीमान वा हुशारी याकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टीकोनच चुकीचा आहे.
बुद्धीमत्ता म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? ती कशी मोजतात? मुलांची बुद्धीमत्ता कशी वाढवावी? मुले कशी घडतात? हे सर्व समजून घेणे गरजेचे आहे. बुद्धीमत्ता म्हणजे समजण्याची, शिकण्याची व विचार करण्याची क्षमता. बुद्धीमत्ता हे अनेक घटकांपासून बनलेली जटील बाब आहे. बुद्धिमापन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मुलाच्या वयानुसार योग्य ती पध्दत मानसशास्त्रज्ञ वापरतात.त्यातून आपणास बुद्धांक समजतो. सर्वसामान्य मुलाचा बुद्धांक हा ९० ते ११० मध्ये असतो. Verbal IQ आणि परफॉर्मन्स IQ हे दोन घटक या तपासणीत मोजले जातात. यावर मुलाची हुशारी समजते.
जसा आपल्या कथेतील अमोलचा बुद्धांक विकासपेक्षा जास्त होता. पण यशस्वी होण्यासाठी फक्त बुद्धांक नाही तर त्यापलीकडे अजून काही गोष्टी कारणीभूत आहेत हे नवीन संशोधनातून लक्षात आले आहे. त्या गोष्टी म्हणजे भावनिक बुद्धीमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स) आणि सामाजिक बुद्धीमत्ता (सोशल इंटेलिजन्स). भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे आपल्या मनातील भावनांची जाण असणे.
त्या भावना आपल्या नियंत्रणात ठेवता येणं. दुसऱ्याचा मनातील भावनांचा अचूक वेध घेणे. वेगवेगळ्या भावनांचे सूक्ष्म पोत ओळखणे. या सर्वाचा वापर आपल्या विचारात आणि वागण्यात बदल करण्यासाठी करणे.
उच्च भावनांक(EQ) असणारे लोक भावनांची योग्य माहिती असल्याने चांगले नातेसंबंध जोपासतात, नेतृत्व करू शकतात आणि कामामध्ये खूप यशस्वी होतात.दुसऱ्याला कसे वाटत असेल याची कल्पना करण्याची क्षमता उच्च भावनांक असणाऱ्या लोकांत असते. त्याला आपण समवेदना वा तदनुभूती (Empathy) असे म्हणतो. मुलांना यशस्वी होण्यासाठी ही भावनिक बुद्धीमत्ता जास्त उपयोगी येते.
सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःला आणि समाजातील इतरांना जाणून घेण्याची क्षमता. समाजातून आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून, यश अपयशातून या बुद्धिमत्तेचा विकास होतो. याला बोली भाषेत आपण ‘कॉमन सेन्स’ वा ‘टॅक्टस’ म्हणतो.
उच्च सामाजिक बुध्दांक असणारी लोक बोलकी असतात आणि इतरांना बोलत करण्याची त्यांच्यात कला असते. ते समाजात नेतृत्व करू शकतात. मार्केटिंगच्या या युगात ही बुद्धीमत्ता खूप कामाची आहे. आपल्या कथेतील विकासचा खरा ‘विकास’ याच्या अंगी असलेल्या भावनिक आणि सामाजिक बुद्धीमत्तेने झाला होता हे आता तुमच्या लक्षात आले असेल.
पण यशस्वी होण्यासाठी फक्त हुशारीच कामाला येते का? तुम्ही कधी खूप मोठ्या संकटात सापडला आणि मार्ग दिसत नाही अशावेळी तुम्ही हुशार माणसाकडे न जाता चतूर माणसाकडे सल्लासाठी जाता.
ही माणसं खूप बुद्धीमान असतात असे नाही पण संकटातून मार्ग कसा काढायचा याची कला त्यांच्या अंगी असते. त्याला आपण चतुराई (Cleverness) म्हणतो. वेगवेगळे सामाजिक पेच सोडवणे, कधी गोड बोलणे, कधी विनोद बुद्धी वापरणे तर कधी छक्के पंचे वापरणे हे चातुर्य मुलांना शिकवणे गरजेचे आहे. बिरबल, चाणक्य, तेणालीरामन यांच्या चातुर्याच्या कथा मुलाना आवर्जून वाचायला द्यावा.
पण यापेक्षा ही सर्वात महत्त्वाचा व दुर्मिळ गुण म्हणजे शहाणपणा (wisdom). त्याची व्याख्या नेमकी सांगणे फार कठीण. शहाणपण आपल्या अंगी आहे हे त्या व्यक्तीला माहीत ही नसते आणि त्याचे त्यांना कौतुकही नसते. पण समाजातील सर्वजण त्याच्याकडे आकर्षित होतात. अश्या व्यक्ती शांत, संयमी, निर्विकार, ज्ञानी असतात. त्यांना ना प्रसिद्धीचा कौतुकाचा हवास असतो ना ऐहिक सुखाचा लोभ. मनाच्या समाधानाकडे आणि शांतिकडे अंतर्मुख होऊन ते वळतात. म्हणूनच हे शहाणपण मुलांच्या अंगी येणे खूप महत्त्वाचे.
मुले घडवण्याचे काम फक्त आईवडील करत नसतात. कुटुंब, शाळा, मित्र परिवार, समाज यांच्यामुळे मुलांची जडणघडण होत असते.खर पाहिलं . मुलांचा स्वतः चा स्वभाव, आवड निवड ही पण खूप महत्त्वाची आहे. या सर्वांचा विचार करून आपण फक्त त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे आणि मार्गदर्शन केले पाहिजे.
मति म्हणजे ‘बुद्धी’. ती तर दैवी असते पण त्याला गती देण्याचे काम आपण करू शकतो. मुलांच्या भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास करणे गरजेचे आहे. फक्त हुशारीकडे न पाहता ‘चातुर्य’ आणि ‘शहाणपणा’ ही यांच्या अंगी कसा येईल याचा विचार केला पाहिजे. ढ’ आणि ‘हुशार’चा असे लेबल देणे थांबवले पाहिजे आणि सुजाण बनून पालकत्वाचा आनंद लुटला पाहिजे.
डॉ. सुरेश पाटील
मनोविकार व मनोविकास तज्ञ
वसई, नालासोपारा विरार
9987230222