भिक्षां देहि
- मॅटिल्डा ॲंथनी डिसिल्वा, मर्सेस
“राघवऽऽ रवीऽऽ चला लवकर. चहा तयार आहे.” दिनाकाका मुलांना हाकारत म्हणाले.
“आलो.. आलो…” राघव धावत पळत येत म्हणाला.
“राघवा, जरा लवकर उठावं रे माणसांनी. वेळेवर पोहोचायला नको का कामावर. नविन नोकरी आहे तुझी.” काका राघवला समझावत म्हणाले. “रवीऽऽ”
“येस, बाबा, आलोच मी.” रवीसुद्धा ॲाफिसला जायच्या तयारीतच आला होता.
“चहा घ्या आणि दोघांचे डबे भरून ठेवले आहेत. ते घ्यायला विसरु नका.” दिनाकाकांनी सांगितले.
दोन्ही मुले गेली आणि मग दिनाकाका अंमळ टेकले. रोज त्यांची खुप धावपळ व्हायची. सकाळी उठून सगळ्यांचे चहापाणी, मग मुलांना न्यायचे डबे तयार करीपर्यंत ते थकून जात असत.
राघव त्यांच्या भावाचा मुलगा. गावाकडेच असायचे ते. दादा अख्खा दिवस शेतावर काम करून दमुन आले की त्यांना घरी आल्यावर एक-दोन ‘पेग’ लागायचे. पण हळूहळू दोनाचे चार आणि चाराचे सहा पेग कधी झाले ते समजलेच नाही. वहिनी सांगून थकली पण त्यांनी काही ऐकले नाही. आणि शेवटी दारुनेच त्यांचा घात केला. राघव लहान होता तेव्हा. नंतर वहिनींनी काबाडकष्ट करुन राघवला वाढवले. पण लाडही तेवढेच केले. त्यामुळे झालं काय; राघव थोडा आळशी, ऐतखाऊ झाला. शिक्षणातही फारशी गती नव्हती त्याला. जेमतेम एसएससीपर्यंत त्याची गाडी पोहोचली होती. वहिनीला आताशा कष्ट झेपत नव्हते. अशातच करोना घुसला आणि ती ही दादामागोमाग राघवला सोडून गेली. राघव एकटा पडला. म्हणून मग दिनाकाकांनी त्याला आपल्या घरी आणले.
त्यांनाही एकच मुलगा होता. रवी… पण तो अभ्यासात हुशार होता. आईबाबांच्या शिस्तीत वाढत होता. जबाबदार होता. राघवला घरी आणल्यावर त्याने त्याला सहज स्विकारले. घर काही मोठे नव्हते, आपल्या खोलीतच त्याला सामावुन घेतले. राघव गावाकडचा असल्यामुळे शहरी रितीरिवाज त्याच्या अंगवळणी पडावयास वेळ लागला. पण तरी रवीने त्याला सांभाळून घेतले होते. दिनाकाकांची बायको, सुमीताकाकीनेही त्याला मुलासारखेच मानले. दोन्ही मुलांचे लाड पुरवता पुरवता तिचा दिवस कसा भरायचा ते तिलाही कळत नव्हते.
सारं काही ठीक चालले होते. रवी इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला होता. राघवला काकांनी आयटीआयचा एक कोर्स दिला होता. कंटाळ्याने का होईना काकांच्या सांगण्यावरून तो जात होता. काका रिटायर्ड झाले त्याच वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने सुमिताकाकूंना देवाज्ञा झाली. सगळ्या घराचा भार आता दिनाकाकांवर पडला. थोडे दिवस काकूंशिवाय त्यांना खूप जड गेले. पण मग त्यांनी स्वत:ला सावरले. आता त्यांच्यापुढे एकच ध्येय होते. दोन्ही मुलांना मार्गाला लावायचे.
“अरे राघवा, तुझा कोर्स पूर्ण झाला आता नोकरीधंद्याचे काही बघावे लागेल.” काका राघवला बोलले.
“हो.. हो.. काका किती घाई करता हो तुम्ही ? आताच तर कोर्स संपलाय. जरा थोडे दिवस आराम करतो. मग बघु नोकरीचं…” राघव आळस देत म्हणाला.
“अरे आराम कसला करतोय ? तो रवी बघ, त्याला कॅम्पसमधूनच जॉबची ॲाफर मिळाली आणि तो जायला पण लागला.“ काका रागाने बोलले.
“इथे तुमचे भलतेच असते काका. सारखी धावाधाव करायची. थोडा आराम करावा तर नसतोच कधी.” राघव तणतणत बोलून निघून गेला.
काकांना काही समजतच नव्हते, या मुलाला सुधरवावे कसे ? एकदा नोकरी लागली असती म्हणजे याचे लग्न करता आले असते. मग याच्या बायकोनेच ह्याला वेसण घातली असती. पण राघव स्वत: काही नोकरीसाठी प्रयत्न करीत नव्हता. शेवटी त्यासाठी सुद्धा काकानांच प्रयत्न करावे लागले. त्यांच्या एका मित्राच्या मुलाला सांगुन एका छोट्या खाजगी कंपनीत त्याला चिकटवून टाकला.
मुले मोठी झाली तशी त्यांच्या लग्नाची काळजी दिनाकाकांना लागून राहिली. रवीने त्याच्या ॲाफिसमधलीच मैत्रिण शोधली होती. पण त्याआधी राघवचे बघावे लागणार होते. शेवटी गावाकडचीच एक मुलगी काकांनी राघवसाठी पसंत केली. धुमधडाक्यात राघवचे लग्न लावले आणि रेखा घरात सून म्हणून आली. काकांचा घरातला थोडा भार कमी झाला. काही महिन्याच्या अंतराने रवीचेही लग्न झाले. त्याची मैत्रिण सविता, दुसरी सून म्हणून घरात आली. काकांचे घर भरले. खूप खुश होते ते. दिवस आनंदात चालले होते. रवी आणि सविता दोघेही नोकरी करणारे होते. दोघांचे पगारही चांगले होते. त्यामुळे घरात सुबत्ता होती. राघवचा पगार कमी असला तरी त्याला कसली काळजी नव्हती. रवी आणि काका दोघेही समर्थ होते त्यांना सांभाळायला. पण तरी रेखाला मात्र आपला नवरा जास्त कमवत नाही त्याचा त्रास व्हायचा.
“राघव, तुम्हाला काहीच कसे वाटत नाही हो ? जरा दुसरीकडे पण बघा ना कुठे ह्यापेक्षाही चांगला जॅाब मिळतो का. आहेत तेथेच कमी पगारावर किती दिवस राहाणार ?“ रेखा रागाने बोलली.
“तुला काय करायच्यात ह्या गोष्टी ? आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित मिळतय ना ! मग गप्प बैस. जास्त डोकं चालवू नकोस तूझे.“ राघव आपले हातपाय ताणत, आळस देत तिच्यावर डाफरला.
रेखाला माहित होते, आपला नवरा आळशी आहे. रोज कामावर जायला निघायचा पण रोज ॲाफिसला पोहचत होताच असे नाही. मधेच एखादी दांडी मारून मित्रांबरोबर मजामस्ती, पार्ट्या करायला जायचा हे तिला कळले होते. त्याउलट रवी आणि सविता होते. त्यांचे जॅाबही चांगले होते नी इमानेइतबारे करत होते. एकत्र कुटुंब होते म्हणून राघव व रेखाला त्याची झळ लागत नव्हती. पण त्या दोघांचे रहाणीमान, कपडे पाहून रेखाला त्यांची असुया वाटायची. आपला नवरा चांगला कमावता असता तर आपणीही असेच टेचात राहिलो असतो असे तिच्या मनात येई. त्यासाठीच ती सतत राघवच्या मागे लागत असे. पण तो मात्र तिला कायम उडवून लावी.
हळूहळू काका आता वयोमानाप्रमाणे थकू लागले होते. नातवंडाची वाट पहात होते. पण दोन्ही पोरांनी अजुन विचारच केला नव्हता. रवी आणि सविता ॲाफिसच्या कामामुळे कायम थकलेलेच असायचे. तर राघवची उलटीच तऱ्हा होती. आताशा तो काकांचेही ऐकेनासा झाला होता. कामावर जायला त्याला कंटाळा यायचा. एक तर घरात लोळत पडायचा किंवा सोबत्यांबरोबर बाहेर मजा करायला जायचा. मनात आले तर कामावर जायचा. त्यामुळे पगारही कमीच मिळायचा. तो त्याच्या मजामस्तीलाच संपून जायचा. घरात खायला प्यायला मिळत होते. म्हणून त्याला कसली फिकीर नव्हती. पण आता रवी आणि सविताला ते जाणवू लागले होते. आपल्या जीवावर फुकट बसुन खाणाऱ्या आपल्या भावाचा त्याला राग येऊ लागला. एक दिवस असेच सगळे बसले असताना रवीने विषय काढला.
“काय रे राघव, हल्ली बऱ्याच सुट्ट्या व्हायला लागल्या तुझ्या ? करतो काय तू अख्खा दिवस घरात बसून ?“ रवीने जरा रागातच विचारले.
“अरे रवी, तुझ्यासारखा मी एसी ॲाफिसमधे जाऊन नाही बसत काम करायला. एकदा आमचे काम करून पहा म्हणजे कळेल.” राघव उध्दटपणे म्हणाला.
“याचा विचार आधी करायचा असतो. आता पस्तावून काय फायदा ? आणि आम्ही एसी ॲाफिसमधे बसतो म्हणजे आम्हाला काम नसते असे थोडेच आहे ? अरे डोक्याचा भुगा होतो नुसता.” रवीने सांगितले.
“ते काही नाही. आम्ही घरात पैसे देतो तेवढेच राघव भाऊजींनी पण द्यायला हवे घरखर्चाला.” सविता पहिल्यांदाच असे काही तरी बोलली.
“अगं पण त्यांना तुमच्याएवढा पगार थोडाच आहे ? “ रेखानेही लगेच उत्तर दिले.
“म्हणूनच मी सांगतो ना ! व्यवस्थित नोकरी कर. दुसरा काही कामधंदा शोध. ते काहीच नाही. घरात आराम करायचा नी आमच्या जीवावर मजा मारायची. असे किती दिवस चालणार ?“ रवीचा राग अनावर झाला.
“रवी म्हणतो ते बरोबर आहे राघवा. तुला आता दुप्पट काम केले पाहिजे.“ काका समजावणीच्या स्वरात म्हणाले.
“मला ते काही जमणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा.” असे ताठ्यात बोलून राघव निघुन गेला. त्यामागोमाग रेखाही गेली.
त्या दिवसापासून राघव आणि रवी यांच्यात थोडासा दुरावा निर्माण झाला. पण राघवला त्याचा काही फारसा फरक पडला नाही. तो नेहमीप्रमाणेच मनमानी करत राहिला.
“बाबा, आम्ही दोघेही थोडे दिवस बाहेर फिरायला जायचे ठरवतोय. चालेल ना ?“ रवी बाबांकडे परवानगी मागत होता.
“हो का ? कुठे जातायेत तुम्ही ? “ रेखाने उत्सुकतेने विचारले.
“अगं वहिनी, रोज कामाचे एवढे प्रेशर असते ना ॲाफिसमधे; की जाम दमायला झालंय. थोडे आऊटिंग केले की बरे वाटेल.” सविता महणाली.
“हो का ?“ कसनुसं हसून रेखा म्हणाली. मनात आपण कधीकाळी जाऊ की नाही बाहेर फिरायला याची खंत होती.
“अरे पोरा विचारतोस काय मला. जाऊन या तुम्ही. कामातून थोडा श्वास मिळेल.“ काका उत्साहाने म्हणाले. घरातल्या नेहमीच्या कटकटीने वैतागलेल्या आपल्या पोरांना जरा विसावा मिळेल म्हणून काकांनाही बरे वाटले.
रवी आणि सविता लोणावळ्याहून चार-पाच दिवसांनी येणार होते; त्यादिवशी काकांनी रेखाला त्यांच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले. स्वत: काकांच्या हातची शेवयांची खीर रवीला विशेष आवडत असे. ती ही त्यांनी बनवुन ठेवली. संध्याकाळी त्यांची वाट पहात असताना काकांना का कुणास ठाऊक काहीतरी विचित्र भावना मनात दाटून येत होत्या. बराच वेळ त्यांची वाट पाहात होते काका. जेवण सारे थंड झाले होते. रेखा दोनतीन वेळा सांगून गेली. पण जेवायची त्यांची इच्छाच होत नव्हती. राघव मात्र चमचमीत जेवणावर ताव मारून भरपेट जेवला होता.
आणि ती बातमी आली ! रवी आणि सविता ज्या उबर कारमधे येत होते त्या कारचा अपघात झाला होता. टॅंकरने त्यांना एवढी जोरात टक्कर मारली होती की गाडीची दशा पाहावत नव्हती. ड्रायव्हरसकट दोघेही जागीच ठार झाले होते. बातमी ऐकुन काका एकदम सुन्न झाले. काही बोलतही नव्हते नी धड रडतही नव्हते.
त्या तशा स्थितितच त्यांनी दोघांना अग्नी दिला. तसेही चेहरे ओळखण्यापलिकडे गेले होते. त्यानंतर ते मात्र एकदम भ्रमल्यासारखे वागू लागले. मधेच लोकांना ओळखायचे, तर कधी एकटक रवी-सविताच्या लग्नाच्या फोटोकडे पाहात बसत. रेखा त्यांना बळेबळे जेवायला लावायची. पण तेही थोडे खाल्ले की त्यांची तंद्री लागायची. पण या गोष्टीचा फायदा कोणाचा झाला असेल तर तो राघवचा ! सगळे घडून गेल्यावर त्याने कामावर जायचेच बंद केले. काही दिवसांनी रेखा त्याला म्हणाली.
“अहो… दिवस झाले, सुतकही संपले. तुम्ही कामावर कधी जाणार ?
“अगं सोड. आता कामावर जायची गरजच नाही आपल्याला. रवीचे आणि काकांचे पैसे आहेत तेच खुप आहेत आपल्यासाठी. तू टेन्शन नको घेऊस.” राघव बेफिकिरपणे म्हणाला.
“ते पैसे काय आयुष्यभर पुरणार आहेत का आपल्याला ? उद्यापासून जायला लागा कामाला.” रेखाने ठणकावले.
“तू गप गं ! मला शहाणपण शिकवू नकोस.” राघवने तिला उडवून लावले.
दुसऱ्या दिवसापासून त्याने हळूहळू काकांकडून त्यांच्या चेकवर सह्या घेण्याचे काम सुरु केले. एक दिवस काकांना बॅंकेत घेऊन जाऊन रवीच्या खात्यावरचेही पैसे काकांच्या खात्यावर वळते केले. आता जेव्हा हवे तेव्हा तो पैसे काढू शकत होता. रेखाला हे सारे काही पटत नव्हते पण नवऱ्यापुढे तिचे काही चालत नव्हते. आणि शेवटी पोटाची भूक होतीच.
काम न करता दिवसभर मजामस्ती करायची राघवला सवय पडली होती. फुकटच्या पैशांवर मजा मारायला मित्रांचीही कमी पडत नाही. हळूहळू बॅंकेच्या खात्याला ओहोटी लागली. घरात खायचे वांधे होऊ लागले. मग मात्र राघवचे धाबे दणाणले. नोकरी तर कधीच गेली होती. दुसरी शोधायची तसदी त्याने घेतली नाही. काय करावे याचा विचार करता करता त्याला एकदम एक गोष्ट आठवली.
तो जेव्हा नोकरीला जायचा तेव्हा रेल्वेचा मोठा ब्रिज पार करायला लागायचा. त्या ब्रिजच्या पायऱ्यांशी एक आजी भिक मागायला बसायची. एकदोन वेळा त्याच्या लक्षात आले होते की एक माणूस रोज तिला तेथे सोडून, बसवून जायचा. त्याच्या डोक्यात पटकन एक कल्पना चमकली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच राघव उठला. काका उठलेलेच होते. राघवने त्यांना तयारी करायला सांगितली. रेखाला समजेना काय चालले आहे ते.
“अहो, काकांना कुठे घेऊन चालले आहात तुम्ही ?”
“तू मला काही आता विचारू नकोस, मला एक काम आहे ते करुन येतो.” राघव बोलला.
राघव काकाना घेऊन स्टेशनवर गेला. लिफ्टने रेल्वे ब्रिजवर काकांना नेले. सकाळची ॲाफिसला येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाहत होती. तेथे एका जागी काकांना उभे केले.
“काका हात जोडा पाहू.” राघव बोलला. काकांनी हात जोडले आणि उभे राहिले.
“मी आलोच हं“ म्हणून राघव हळूच बाजुला सरकला.
काका हात जोडलेले तेथेच उभे राहीले. पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर नेसलेले. गळ्यात वारकरी माळ घातलेले आणि डोळ्यातील हरवलेले भाव अशा अवतारात उभ्या असलेल्या काकांकडे बऱ्याच जणांचे लक्ष जात होते.‘ चांगल्या घरातले दिसतायेत आजोबा, काय परिस्थिती आली बघा.’ असे संवाद कानावर पडत होते. प्रत्येक जण दोन रूपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत पैसे बळेबळे त्यांच्या हातात कोंबत होते. ते काहीही न बोलता हातात घेत होते. परत हात जोडत होते. हाताचा खोपा भरला तसे पैसे खाली पडू लागले. राघव दूर उभा राहून गुपचुप पहात होता. थोड्या वेळाने तो गर्दीत शिरला आणि काकांना म्हणाला.
“चला काका घरी जाऊया.”
त्याआधी काकांचा हात राघवने आपल्या खिशात रिकामा केला. घरी आल्यावर राघवने पैसे काढून मोजले. तीनशे पाच रुपये जमा झाले होते. तेही फक्त एक-दीड तासात ! राघव एकदम खूश झाला. मेहनतीविना पैसे कमवायचा एक नवा मार्ग त्याला सापडला होता.
“रेखाऽऽ हे रेखाऽऽ हे घे पैसे. आण तुला काय आणायची भाजी बिजी ते.“ दिडशे रुपये रेखाच्या हातावर ठेवत राघव म्हणाला.
“अहो. काय ? कुठुन आणले पैसे ? चोरीबिरी केली की काय कुठे ?“ रेखा आश्चर्याने विचारत होती.
“चोरी नाही गं. लॉंटरी लागली मला.” राघव हसत म्हणाला. “हं पण लॉंटरीचे तिकीट काढायला काकांना मात्र न्यावे लागेल रोज.. पण कमनशिबी आहोत ना ! आपल्याला लागत नाही ती लॉंटरी.” राघव निलाजऱ्यासारखा हसत म्हणाला.
मग हे आधी एक दिवसाआड किंवा कधीकधी रोज; वेगवेगळ्या पुलावर काकांची यात्रा निघत असे. काका हात जोडून उभे राहात असत. मधेच त्यांची स्मरणशक्ती जागृत होत असे. त्यांना कळत नसे आपण काय करत आहोत; इथे कसे आलो. मग भांबावल्यासारखे ते इथे तिथे पाहत असत. राघव आजुबाजुलाच कुठेतरी असे. त्याच्या लक्षात आले की लगेच तो काकांना घेऊन घरी निघायचा. त्या दिवशी कधीकधी काहीच कमाई झालेली नसे. मग काकांच्या वाट्याला पूर्ण रस्ताभर शिव्यांची लाखोली यायची. पण तरीसुद्धा हा ‘बिझनेस’ राघवला पसंत होता. कधीकधी आजुबाजुच्या गुंडांचा त्रास व्हायचा, पण राघवची नजर आता सरावली होती. त्यांच्यापैकी कोणी येताना दिसले की लगेच काकांना घेऊन तो निघुन जायचा.
काकांना आता थोडे थोडे लक्षात येऊ लागले होते की, राघव आपल्याबरोबर काहीतरी चुकीचा वागतोय. म्हणून एक दिवस त्यांनी राघवला सांगितले.
“मी आज येणार नाही राघवा तुझ्याबरोबर. तू एकटाच जा बरं.”
“ते काही चालणार नाही काका.“ राघव काकांना दरडावून म्हणाला.
“अहो ते नाही येत तर कशाला त्यांना जबरदस्ती करता तूम्ही ?“ रेखा मधेच बोलली.
“अगं हा मला स्टेशनवर उभे करतो नी स्वत: कुठेतरी गायब होतो.” काकांनी लहान मुलांसारखी तक्रार केली.
“चुप काका एकदम चुप बसा. काही सांगु नका. आणि तू गं तुला खायला प्यायला मिळते ना ! तू तर गप्पच रहा.” राघव दोघांवर डाफरला. आजकाल काकांचे आणि रेखाचे काहीच चालत नसे राघवपुढे. काकांना जावेच लागले त्याच्याबरोबर.
राघवने आज जरा लांबचे स्टेशन शोधले होते. त्याला माहित होते, नविन जागी पहिल्या दिवशी जास्त कमाई होते. राघवने गर्दीत काकांना उभे केले आणि तो बाजुला लांब जाऊन उभा राहिला. काका आज पूर्ण शुद्धीत होते. त्यांना कळून चुकले होते की मला राघव इथे भिक मागायला उभे करतो. त्यांना स्वत:ची लाज वाटू लागली. हे असे जिणे जगण्यापेक्षा मेलेले परवडेल असे त्यांना वाटून गेले. पण तेवढा धीरही होत नव्हता. त्यांचे डोळे पाण्याने भरले. लोकं आपले येता जाता त्यांच्या हातात पैसे देत होते. ते त्यांच्या हाताच्या खोप्यात जमा होत होते. रडणाऱ्या काकांना पाहून लोकांना आज जास्तच दया येत होती. काकांचा हात लवकरच भरला. राघव दुरून पाहात होता. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ‘आज लवकरच चांगला माल जमणार.‘ मनातल्या मनात तो मांडे खात होता.
इतक्यात एक सुटाबुटातला माणूस काकांजवळ आला.
“काकाऽऽ? रवीचे बाबा ना तूम्ही ? मला ओळखलत का ? मी समीर.. रवीचा मित्र. पण मला सांगा तुम्ही इथे काय करता ?“ तो माणूस एकावर एक प्रश्न विचारत होता.
काकांनी त्याला ओळखले होते. रवीचा कॉलेजपासूनचा मित्र होता तो. रवी असताना तो त्यांच्या घरीही यायचा. त्यामुळे राघवही त्याला ओळखत होता. समीरच्या नजरेस पडू नये म्हणून तो तोंड फिरवून जरा लांब निघून गेला. न जाणो काकांनी काही सांगितले तर !
काकांनी समीरला पाहिले आणि त्यांचा चेहरा लाजेमुळे कसानुसा झाला. आता काय करावे; काय सांगावे त्यांना कळत नव्हते. असा दिवस पाहायला मला कशाला ठेवले असे मनातल्या मनात ते देवाला कोसू लागले. त्याच बरोबर समीरपासून लवकर दूर जावे म्हणून ते भरभर चालू लागले. लोकांचे धक्के लागत होते. पण तसेच हात जोडलेले ते पुढे सरकत होते. हातातुन काही पैसे, नाणी खाली सांडत होती. समीरही त्यांच्या मागे ‘काकाऽऽ काकाऽऽ‘ करीत चालला होता. एका क्षणी जीन्याच्या पायरीवर काका पोहचले. पण गडबडीत पुढची पायरी चुकली आणि काका गडगडत खाली आले. अर्ध्या पायऱ्यांवर त्यांना कोणीतरी पकडले. पण आधीच कष्टाने, दु:खाने आणि लाजेने रक्तबंबाळ झालेल्या काकांना तेवढाही धक्का पुरेसा होता.
काका खाली पडले आणि त्यांच्या हातातले पैसे इतस्तत: पसरले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या समीरला ते पाहून वाईट वाटले, हे सगळे माझ्यामुळे झाले याची त्याला खंत वाटू लागली. तो खाली पडलेल्या काकांना उठवू लागला. पण काका कधीच अनंतात विलीन झाले होते. लपून मागे आलेल्या राघवला मात्र आपले लॉंटरीचे तिकीट फाटल्याचे अतीव दु:ख झाले.
* लेखनसंपदा
ग्रंथाली प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘निवांत’ कथासंग्रह
दिलिपराज प्रकाशन, पुणे, प्रकाशित बालकथा संग्रह ‘कासव येता घरा’.
मॅटिल्डा ॲंथनी डिसिल्वा
भिमटवाडी, मर्सेस, रानगांव रोड,
वसई पश्चिम -४०१२०१
फोन – ९५४५०९३४३६ / Mail: matildadsilva50@yahoo.co.in