ब्रुटस तू सुद्धा! – दीपक मच्याडो

ब्रुटस तू सुद्धा!

          “या दोघांचा नेहमीच वाद असतो”, वसंत म्हणाला.

          “तू त्यांच्यात पडू नकोस रे,” रोहन त्याला म्हणाला, “हे दोघे इकडे दोन तास भांडतील आणि नंतर दोघे जाऊन बारमध्ये मस्त मेहफिल रंगवत बसतील.” रॉनी सॅमसन आणि मंदार यशवंत यांच्यातील शाब्दिक वादविवाद त्यांच्या सर्व मित्रमंडळीत परिचित होता. तसा तो खऱ्या अर्थाने वाद नसायचा. ते बहुतेक बौद्धिक आणि वैचारिक द्वंद्व असायचे. अत्यंत तात्विक आणि संयुक्तिक मुद्द्यांची रेलचेल असलेले त्यांचे वैचारिक बॅडमिंटन चालायचे. त्यात अपशब्द किंवा बाजारी भाषा चुकूनही ऐकायला मिळत नसे परंतु आपापल्या धर्म शिकवणुकीच्या मुद्द्यावर त्यांची जी वागयुद्ध व्हायची त्यामुळे इतर मित्रांची मात्र भरपूर करमणूक होत असे.

          शाळा कॉलेज पासून एकमेकांच्या सहवासात असलेल्या या सर्व सहा जणांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. कधी ट्रेकिंगला जाणे, कधी बाहेरगावी पर्यटन करणे अशा अनेक कारणास्तव ते नियमितपणे एकत्र येत आणि आपल्या या वर्षानुवर्षीच्या मैत्रीच्या स्वच्छ आनंदात मनसोक्त डुंबून जात. रॉनी हा जसा हाडाचा ख्रिश्चन होता तसाच मंदार हा कट्टर संघीय होता. तो लहानपणापासून शाखांमधल्या कवायतीत भाग घ्यायचा परंतु हे वेगळेपण त्यांच्या निश्चल मैत्रीच्या कधी आड आलं नाही. किंबहुना त्या सहा जणांमध्ये रॉनी आणि मंदारची वैयक्तिकपणे सर्वात घट्ट मैत्री होती. ज्या आस्थेने रॉनी मंदारच्या घरी जाऊन त्याच्या आईने प्रेमाने वाढलेल्या पुरणपोळ्या खायचा त्याच भावनेने मंदार रॉनीच्या घरी येऊन त्यांच्याकडे बनवलेल्या केक अथवा पुडिंगवर ताव मारायचा. मंदार तर नेहमीच मोठ्या गर्वाने सांगत असायचा की सार्वजनिक स्तरावर सांप्रदायिक मुद्द्यांवरून कितीही उहापोह होवो, रॉनी आणि मी प्रथम भारतीय आहोत आणि प्रसंग आला तर त्याच्यासाठी प्राणही द्यायला मी तयार आहे.

          रॉनी एका कॉल-सेंटरमध्ये नोकरीला होता तर मंदार एका खाजगी कंपनीत काम करायचा. रॉनीला मात्र जीवनात नोकरी करण्यापेक्षा ह्या चौकटीतून बाहेर पडून एखादा उद्योगधंदा काढावा असे नेहमी वाटे. घराच्या बाजूला जमीन होती आणि अनेक वर्ष त्यावर काहीही पीक न घेतल्यामुळे ती ओस पडली होती. शेतीविषयक काही उद्योग असतील तर या जमिनीचा योग्य उपयोग करणे शक्य होते. त्याच वेळेला पेपरमध्ये आलेली एक बातमी बघून रॉनीने आपल्या भावी उद्योगाच्या दिशेवर शिक्कामोर्तब केले. पोलिसांनी एक छापा मारला असता युरियाची भेसळ असलेली दुधाची पाकिटे सापडली होती. “पुर्णा” ब्रँडचे हे दूध पंचक्रोशीतले अनेक जण वापरत होते. भरपूर राजकीय लागेबांधे असलेल्या एका परप्रांतीय आसामीच्या मालकीच्या असलेल्या पुर्णा डेअरीने मात्र ही भेसळ बाहेर झाली आहे आणि आपला यात काहीही हात नाही असे जाहीर पत्रक काढून प्रकरण निभावून नेले; नव्हे, मिटवून घेतले. परंतु संशयाची सुई होतीच. रॉनीने विचार केला, का नाही आपणच एखादी डेअरी चालू करूया आणि लोकांना निदान शुद्ध दुधाची शाश्वती देऊ या.

          गायीचे शुद्ध दूध मिळेल म्हणून जाहिरात करून प्रथम चार जर्सी गायी खरेदी करून रॉनीने आपला उद्योग चालू केला. रॉनी आपल्या डेअरीवर दूध-शुद्धता चाचणीची उपकरणे ठेवत असे आणि कोणीही ग्राहक त्याच्या दुधाची चाचणी करून खात्री करून घेऊ शकत होता. काही काळानंतर म्हशी देखील घेऊन रॉनीने आपला उद्योग चांगला नावारूपास आणला. “रॉनीप्युअर” या नावाने आता पिशवीबंद दुधाचीही निर्मिती त्यांनी चालू केली. शुद्धतेची हमी असल्यामुळे रॉनी डेअरी हे प्रचलित घरगुती नाव झाले. आपल्या डेअरीचा पहिला वर्धापन दिन रॉनीने आपल्या सहा जीवश्व-कंठश्व मित्रांना बोलावून साजरा केला. नेहमीप्रमाणे या वेळेला मात्र मंदारबरोबर विशेष वाद झाला नाही. या कालावधीत मंदारने राजकारणात पदार्पण केले होते. पक्षाच्या संस्कृती रक्षण मंडळाचा तो आता मुख्य होता. गळ्यामध्ये आता स्वास्तिकाचे लॉकेट असलेली गोळ्या-गोळ्यांची जाड साखळी होती. उजव्या हाताच्या मनगटाला रुद्राक्षा सारख्या दिसणाऱ्या दोन माळा बांधल्या होत्या. गळ्याच्या खाली पूर्वीपासूनच त्याच्या स्वर्गवासी वडिलांचे ‘यशवंत’ हे नाव गोंदलेलं होतं. उच्च दर्जाचे मद्य आणि स्वादिष्ट भोजन प्रकार असलेली ही पार्टी चांगली उशिरा रात्रीपर्यंत चालली. रॉनीच्या उद्योगातील त्याच्या यशाचे मित्रांनी कौतुक तर केलेच पण अशीच प्रगती केली तर अमूलला आपला धंदा बंद करावा लागेल अशी हलकी थट्टा केली. मंदार घरचा शाकाहारी पण रॉनीच्या घरी मात्र मटण चिकन आवडीने खायचा.

          “काय रे रॉनी”, मंदारने रॉनीची थोडी खेचण्याकरिता विचारले, “हे बकऱ्याचेच आहे ना? की ‘त्याचे’ आहे?”

          रॉनी हसला. “काय मंदार? अरे “त्या” ला माझे आई-वडील स्पर्श सुद्धा करीत नाहीत. किंबहुना इकडचा नव्वद टक्के समाज आहे त्यालाही त्याची आवड नाही आणि तशी परंपराही नाही. खरं म्हणजे येथे आगरी म्हणा, कोळी म्हणा, भंडारी म्हणा किंवा ख्रिस्ती म्हणा सर्वांवर भारतीय संस्कृतीचाच प्रभाव आहे. त्या परंपरेला पुढेही कधी तडा जाईल असे मला वाटत नाही.”

          “चेष्टा केली रे तुझी!”, मंदार म्हणाला, “मी हे जाणत नाही का? जस्ट बाय द वे सांगायचे म्हणजे मी आता संस्कृती रक्षण संघाचा मुख्य आहे आणि त्यामध्ये गोसंरक्षण देखील आहे.”

          “वा अभिनंदन! अरे, जरूर संस्कृती रक्षण कर पण चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नकोस म्हणजे झाले.” रॉनी हसत म्हणाला. त्यानंतर रॉनीने आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत याबद्दल सर्वाना माहिती दिली. लोणी आणि पेढे याचे उत्पादन करण्याचा आपला मानस त्याने विशद केला. त्याकरिता आणखी एक तबेला उभारण्यास सुरुवात झाली होती.

          पुर्णा डेअरीचा मालक चंदुलाल बजरंगी हा परप्रांतीय, अनेक वर्षांपासून आपली डेअरी चालवत होता आणि त्याने चांगला जम बसवला होता. त्याचबरोबर आपल्या धंद्यास अडसर येऊ नये म्हणून आसपासच्या राजकीय धेंडांशी तसेच सरकारी यंत्रणेशी व्यवस्थित संधान बांधून होता. भेसळ प्रकरणातून तो सहीसलामत बाहेर पडला होता परंतु रॉनीच्या शुद्धतेची हमी या घोषवाक्याचा जनमानसांवर चांगलाच प्रभाव पडला होता. रॉनीप्युअर दुधाच्या यशामुळे पुर्णा दुधाचा मार्केट शेअर अपूर्णत्त्वाकडे चालला होता हे कटू सत्य होते. आता पेढे आणि लोणी यांचे उत्पादन करण्याचा घाट घालून परप्रांतीयांच्या या हक्काच्या उत्पादनांच्या विक्रीवरही आफत येण्याचा संभव नजरेस येत होता.

          रॉनी अन्नपदार्थ उत्पादनाकरता लागणाऱ्या विविध प्रकारचे परवाने याकरिता अन्न प्रशासन व इतर कार्यालयात फेरे घालत होता. त्यात यशही येत होते. आता नवीन तबेल्यासाठी काही दुभत्या गायी आणण्यासाठी पालघरला जायचे होते. एके संध्याकाळी रॉनीला फोन आला. रुक्ष आवाजाची एक व्यक्ती पलिकडून बोलत होती.

          “क्यों रॉनीभाई, कैसे हो?”

          “मै ठीक हुं. कौन बात कर रहा है”

          “आप ठीक हो सुनकर अच्छा लगा. आगे भी ठीक रहना है या नही?”

          तेवढ्यात आणखी एका व्यक्तीने पलीकडून फोन घेतला. “हे बघ रॉनी. जास्त उडायचा प्रयत्न करू नकोस. जेवढे आहे त्यावर समाधान मान नाहीतर… समझनेवालों को इशारा काफी!”

          “हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? हॅलो…. ” फोन कट झाला होता.

          त्यानंतर काही दिवसांनीच रॉनी आणि त्याच्या मित्राचे नेहमीप्रमाणे गेट-टुगेदर झाले. आपल्याला आलेल्या धमकीबद्दल त्याने सांगितले. “तुझे यश बघून कुणाचे तरी पोटात दुखतंय. गो अहेड, अवर फ्युचर वर्गीस कुरियन. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.” मित्रांनी दिलासा दिला. मंदारने मात्र थोडी पोक्त भूमिका घेतली. “रॉनी, तू आतापर्यंत चांगली प्रगती केली आहेस. आर्थिक दृष्ट्या सुस्थापित झालाहेस. ह्या पलीकडे जाऊन कोणाशी शत्रुत्व होत असेल आणि जीवाला धोका होत असेल तर त्याचे सारासार अवलोकन करूनच काहीतरी निर्णय घे. अनेक लोकांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे यात हितसंबंध गुंतलेले असतात.”

          “अरे मंदार, तू असताना मी का घाबरायचे”, रॉनी म्हणाला, “कॉलेजमध्ये राडा झाला होता तेव्हा नव्हतास का छातीची ढाल करून बुरुजासारखा माझ्या समोर राहिला होतास? चला, आता जरा इतर गोष्टी करूया. चिअर्स!” मग मंदारने एक गोड बातमी दिली होती. “माझे एंगेजमेंट होतेय दोस्तांनो!”

          “अरे, वसंत म्हणाला, कोण आहे ती स्वप्नसुंदरी? आमच्या भावी वहिनीचा फोटो तरी आम्हाला बघायला मिळेल का?”

          “नो, नो, नो, नॉट नाव! मंदार म्हणाला, “ते सद्या सिक्रेट आहे. तुम्हाला सर्वांना एंगेजमेंट पार्टीला आमंत्रण करण्यात येईल, मगच सरप्राईज देऊ!”

          त्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात रॉनी पालघरला गेला. दोन जर्सी गायी खरेदी करून एका मोठ्या टेम्पोमध्ये त्या आणल्या जात होत्या. रॉनी पुढे ड्रायव्हरशेजारी बसला होता. रॉनीला वाचनाचीही भरपूर आवड होती. इंग्रजी क्लासिकल साहित्यात त्याला विशेष रस होता. आता देखील प्रवासात टाईमपास होण्याकरिता टेम्पोमध्ये शेक्सपियरची ज्युलियस सीझर ही कलाकृती वाचण्यात तो गर्क होता. जिवश्व-कंठश्व मित्र असून देखील ब्रुटसने सीझरचा कसा विश्वासघात केला हे वाचून आपण मित्रांच्या बाबतीत किती सुदैवी आहोत याचा तो विचार करू लागला. एकमेकावर जीव ओवाळून टाकणारे मित्र आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले.

          वाड्याहून वसईकडे येणाऱ्या रस्त्यावर टेम्पो असताना समोर रस्त्याच्या मधोमध एक ट्रक उभा असलेला त्याने पाहिला. त्याच्या आजूबाजूला पंधरा-वीस माणसे उभी होती. ट्रकच्या बाजूने पुढे निघून जायला वाट नव्हती. रॉनीने खिडकीबाहेर डोकावत विचारले, “काय झालंय, टायर वगैरे गेलाय का?”

          रॉनीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यातील एका आडदांड तरुणाने दरडावणीच्या सुरात विचारले, “गाडीत काय आहे?”

          “गायी आहेत,” रॉनी म्हणाला, “माझा डेअरीचा उद्योग आहे”

          “आम्हाला अशी तक्रार आहे की तुम्ही कत्तलीसाठी जनावरं नेत आहात!”

          “अहो, असे काय करता?” आर्जवाच्या स्वरात रॉनी म्हणाला, “माझ्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत. पशुपालन विभागाची सर्व सर्टिफिकेट्स आहेत. वाटल्यास पालघरच्या गोसेवा फार्म येथे फोन करून खात्री करून घ्या. त्यांच्याकडून अधिकृतरित्या मी खरेदी केली आहेत. मी स्वतः फोन लावून देतो.” टेम्पो भोवती आता टपोरी दिसणाऱ्या तरुणांचा वेढा पडला होता.

          “खेचा त्याला आणि चांगला धडा शिकवा.” त्यांच्यातील एक जण बोलला. परिस्थितीचे गांभीर्य आता रॉनीच्या लक्षात आले होते. टेम्पोचा चालक रदबदली करीत असता त्याच्याही दोन चार कानशिलात बसवून त्याला त्यांनी गप्प बसवले होते. दोन-चार तरुणांनी त्याला खाली खेचून लाथा बुक्क्याने तुडवायला सुरुवात केली.

          “भावांनो,” रॉनी आकांताने ओरडला, “मी निर्दोष आहे. अहो त्यात दुभत्या गायी आहेत. मी लाखाने पैसे मोजलेत, आणि तुम्ही…!” असे बोलता बोलता सायकल चेईनच्या जोरदार वाराने त्याचे एक गालफड फोडून काढले. गयावया करीत कसाबसा उठून रॉनी त्यांना म्हणाला, “थांबा! मला दोन मिनिटे द्या. अहो मंदार यशवंत माझा खास मित्र आहे. त्याला मी फोन करतो.”

          थरथरत्या हाताने मंदारचा नंबर शोधत असतानाच लाठीने हातावर एक जोरदार फटका बसला आणि फोन दूर फेकला गेला. त्या अगतिक परिस्थितीत टेम्पोच्या पायरीवर कण्हत बसलेला असताना त्यांने ते धारदार अस्त्र पाहिले आणि भीतीने त्याचा श्वास रोखला गेला. पुढच्या क्षणीच तो अजस्त्र चाकू त्याच्या आतड्याना चिरत पोटात गेला. पोटामध्ये जणूकाही अग्नी पेटलाय अशा वाटणाऱ्या त्या जळजळीत वेदनेतही त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याची जीवन-ज्योत मालवण्यास कारणीभूत होणारा तो अखेरचा आघात करणाऱ्या व्यक्तीच्या मनगटाला रुद्राक्षासमान दोन माळा बांधल्या होत्या, त्याच्या गळ्यातली स्वास्तिकाचे लॉकेट असलेली गोळ्या-गोळ्यांची जाड साखळी सांजप्रकाशात चमकत होती. उडालेल्या रक्ताच्या काही चिळकांड्यानी त्याच्या गळ्याखाली गोंदलेल्या “यशवंत” नावाला जणू काही अभिषेक केला होता.

“मंदा…, मं, मं, तू?”  अखेरचा श्वास घ्यायच्या आधी रॉनी तेवढेच बोलू शकला. त्या सुनसान रस्त्यावर विसावलेल्या त्या निष्प्राण देहाच्या बाजूला पडलेल्या पुस्तकाच्या पानावर ‘एट टू ब्रुटे!’ (ब्रुटस तू सुद्धा!) असा मथळा असलेले दृश्य दाखवणारे चित्र फडफडत होते.

          काही दिवसांनी पुर्णा डेअरीचे मालक चंदुलाल बजरंगी यांच्या मुलीचा श्री. मंदार यशवंत यांच्याबरोबरचा झालेला साखरपुडा थाटामाटाने पार पडला.