बोरं ईकणारा आज्या – अमोल विनायकराव देशमुख

बोरं ईकणारा आज्या

सुरकुतलेल्या मरणाला टेकलेला म्हतारा

शाळंसमोरच्या वट्यावर

बसतो ईकत बोरं

दोन रुपायला एक वाटी

करून वाटीएवढा जीव

दिवसभर बसतो धूंडत

ह्या ना त्या बोरीला बोरं

बोरीला जाताच

त्याला हाकलून लावतात

कुत्र्यागत

बोरीचे मालक

तवा भिकाऱ्यावनी

तो हजारदा करतो इनवणी

झाडू द्या एखादं टोपलं

बोरीला दगड मारताच

बोरं पडतात पावसावनी खाली बदाबदा

तवा नाचतो लहान मुलासारखा

दिवाळीला फटाका फोडल्यावर

मुलं नाचतात तसा

त्याला सहज इच्यारलं

बाबा पोरंबाळ काय करतात

गोळामोळा करून जीव

तो म्हणला

महेपण मुलं याच शाळेत शिकली

मोटी झाली

आन आता कोण कुठं आन कुठं

लागलेत आपापल्या सवसाराला

बायकोचा हात निसटून गेला

हाताच्या मायेतून कायमचा

तवा हिंडत असतो असाच जगभर

अनाथ वाऱ्यावानी

पोरं वर्गात जाताच हा बाबा

आजकाल

सांगत बसतो

स्वतःलाच सुखदुःखाच्या जन्मभराच्या आठवणी

करून ताज्या

मोग्र्याच्या फुलागत

  •  अमोल विनायकराव देशमुख

महेंद्र नगर,परभणी

संपर्क – 7620949985