​​फिटे अंधाराचे जाळे… – ॲलेक्स मच्याडो

​​फिटे अंधाराचे जाळे…

  •  ॲलेक्स मच्याडो, नंदाखाल

मोबाईल – 7207161213

सूर्य आता मावळतीकडे झुकू लागला होता. ऊन जरासं नरमल्यासारखं झालं. दिवसभराच्या कडक ऊन्हात करपलेल्या जीवांनी जरा निश्वास टाकला. आता थोडंसं हायसं वाटत होतं. चार वाजले आसावेत… ओटीवर बसलेल्या तानाजीच्या मनात आलं.. ‘साडेपाच वाजता पोट्टं घरी येईल शाळेतून. त्या अगोदर निघायला हवं आपल्याला.’ थोडासा विचार करून तो ऊठला आणि आतल्या बाजूने तोंड करून जोरातच बोलला.

“येतो गं मी, पार्वते जरा.”

त्याचा आवाज ऐकून पार्वती लुगड्याच्या पदराला हात पुसतच लगबगीने बाहेर आली. तानाजीने एकदा तिच्याकडे पाहीले. किती वाळलीय ही? ह्या दुष्काळाने कोणालाच सोडलं नाही. त्याने एकवार स्वतःच्या काटकुळ्या देहाकडे पाहिले.

“कुठं निघालात ह्या वेळेला?”

“जरा शिवारात जाऊन येतो. कंटाळा आलाय बसून बसून.” गोठ्याकडे एक नजर टाकून तो पुढे म्हणाला,

“आपल्या ढवळ्याला नेतो जरा सोबत. फिरवून आणतो शेतातून. लागेल तोंडाला त्याच्या काहीतरी.”

एवढं बोलून तो गोठ्याकडे निघाला. ढवळ्या त्याचा अतिशय लाडका बैल. त्याच्या कुटूंबाचा घटकच. एकेकाळी काय रूबाब होता त्याचा. तो रस्त्याने चालायला लागला की लोकं बघत राहायचे. पण ह्या दुष्काळाने त्याची रयाच पार घालवून टाकली होती. खायला ना चारा ना वैरण. जे काही दिसेल, मिळेल ते पोटात ढकलायचं. तानाजीला जवळ येताना बघून ढवळ्याचे डोळे खुशीने लकाकले. आपले कान त्याने फडफड हलवले. तानाजीने त्याच्या पाठीवर हळूच थोपटलं. ढवळ्याचं अंग थरथरलं. तानाजीने पुढे होऊन त्याचा कासरा सोडला आणि त्याचं टोक आपल्या हातात धरलं. ढवळ्या गोठ्यातून बाहेर पडला आणि तानाजीपुढेच चालू लागला. कुठे जायचंय हे त्याला बरोबर ठाऊक होतं. त्याला आपल्यासमोर खुरडत चालल्याप्रमाणे चालताना पाहताना तानाजीला खूप वाईट वाटत होतं. 

गाव एकदम भकास दिसत होतं. रस्त्यात  माणूस दिसत नव्हता. दिसला तरी बोलत नव्हता. चालता चालता तानाजीला पूर्वीचे दिवस आठवत होते. किती भरलेलं वाटायचं तेव्हा गाव. ऊत्साहाने सळसळत असे नुसतं. रस्त्यात, अंगणात  सगळीकडे माणसंच माणसं दिसायची. आता जणू सगळं  ओस पडलं होतं. बरीच माणसं गेली होती शहराकडे. पोटाची खळगी भरण्यासाठी. काही गेली होती कायमचीच… हे जग सोडून. काहींनी आपणहून जवळ केलं होतं मरणाला ह्या जगण्यालाच कंटाळून.

ढवळ्या आता पुढे चालला होता, गावाबाहेरच्या रस्त्यावरून शिवाराच्या दिशेने. त्याच्या मागून ओढत नेल्यासारखा तानाजी चालला होता. जसजसं शिवार जवळ येत होतं तसतसा तो अस्वस्थ होत होता. जुन्या आठवणींनी कासावीस होत होता.

तानाजीला पहिल्यापासूनच शेतीची खूप आवड. त्याने बारावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकला आणि बाबांना शेतीमध्ये मदत करू लागला. त्यांची जमीन एकदम सुपिक. त्यात मुबलक पाण्याची सोय आणि दोघा बापलेकांची मेहेनत ह्यामूळे शेती छान होऊ लागली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. तानाजी छान रमला होता शेतीमध्ये…

पण…

एक दिवस अचानक  छोट्याश्या आजाराचं निमीत्त होऊन बाबा गेले. आधीच आईविना पोरका असलेला तानाजी आता अनाथ झाला. मग लहान वयातच लग्न झालं आणि पार्वती घरात आली. सुंदर आणि सुस्वरूप. तिने तानाजीला सावरलं, घर सांभाळलं. घरात छोट्या नामदेवाची, (हे तानाजीच्या बाबांचंच नाव) पावलं घरभर दुडूदुडू धावू लागली. शेतीने खूप चांगला हात दिला होता तानाजीला. खाऊन पिऊन ते आनंदाने जगत होते. दोन पैसे गाठीला जमले होते. पार्वती घर सांभाळून त्याला शेतीमध्ये देखिल हातभार लावत होती. नाम्या शाळेत जात होता. अभ्यासात खूप हुशार होता तो. त्याचे मास्तरच सांगायचे तसं. त्याला शिकवून खूप मोठं करायचं असं स्वप्न त्या दोघांनी रंगवलं होतं.

आणि एके वर्षी निसर्गाने धोका दिला. अस्मानी संकटच जणू. खूपच कमी पाऊस झाला त्या वर्षी. पिकं गेली शेतकऱ्यांची. खूप नुकसान झालं. अगोदरच्या पुंजीवर कसंबसं ढकललं लोकांनी ते वर्ष. पुढच्या वर्षी मोठ्या आशेने परत शेतकरी कामाला लागला. ह्यावर्षी चांगला पाऊस पडू दे, पिकपाणी होऊ दे, असं गाऱ्हाणं तो देवाला घालत होता. पण निसर्गराजा जणू कोपला होता. पावसाचा थेंब नाही. पुन्हा पिकं गेली. शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. लागोपाठ चार वर्षे कोरडी गेली. पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी सुध्दा अनवाणी पायांनी लोकं मैलो न मैल वणवण भटकू लागली.

बँकेचा आणि सावकराचा वसुलीसाठी तगादा सुरू झाला. काही लोकांच्या जमिनी गेल्या. काहींनी आपल्या जमिनी कवडीमोल किंमतीला विकून शहराचा रस्ता पकडला. काहींनी ह्या कर्जाला कंटाळून आपलं जीवनच संपवून टाकलं. ऊपाशी गुरंढोरं वैरणीच्या शोधात रानोमाळ भटकू लागली. त्यांचे निष्प्राण सांगाडे भेगाळलेल्या जमिनीत सडू लागले. गिधाडांच्या झुंडी आकाशात घिरट्या घेऊ लागल्या. एकेकाळच्या हिरव्यागार शिवाराला जणू स्मशानाची अवकळा आली.

तानाजीने आणि पार्वतीने एक मात्र पक्कं ठरवलं होतं…

जमिनीवर कर्ज काढायचं नाही, नाम्याचं शिक्षण थांबवायचं नाही आणि 

ढवळ्याला शेवटपर्यंत सांभाळायचं. 

दोघं खूप काटकसर करत होती. स्वतःच्या पोटाला चिमटा घेत, नाम्यासाठी आणि ढवळ्यासाठी. पण म्हणतात ना, सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं नाही. जवळची होती नव्हती ती सगळी पूंजी संपली. समोर सगळाच अंधार दिसत होता. सावकाराकडे जाण्याशिवाय तानाजीला मार्ग दिसत नव्हता. पण पार्वतीने त्याला अडवलं. आपल्या आईला का कधी कोण गहाण ठेवतं? असं म्हणत तीने आपले सगळे दागीने तानाजीच्या हवाली केले. तानाजीचं मन तयार होत नव्हतं. पण तिने ऐकलं नाही…

तिचं म्हणणं… काय करायचेत हे दागीने नुसतेच असे ठेऊन ? आणि हे दिवस पण जातील की. पुन्हा चांगले दिवस येतील. तेव्हा बनवू परत दागीने. पण पुढची दोन वर्षे सुध्दा काही चांगले दिवस आले नाहीत. पार्वतीच्या अंगावर फक्त मंगळसूत्र तेवढं राहीलं. सगळे दागिने संपले तिच्या अंगावरचे. सगळा गळा भरून तानाजीच्या घरात आलेली पार्वती पार लंकेची पार्वती बनून गेली. तानाजी खूप दुःखी होत होता. आता सगळंच संपलं होतं. काय करावं ते सुचत नव्हतं….

पार्वतीने त्या रात्री आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून तानाजीच्या हवाली केले. तानाजी अवाक झाला. हे तर हिच्या सौभाग्याचं लेणं. हे कसं घ्यायचं काढून तिच्याकडून. नकोच, त्यापेक्षा एखादा जमिनीचा तुकडा…

पण पार्वतीने मानलं नाही. बळेबळेच हसत ती म्हणत राहीली.. एवढा जीता जागता कुंकवाचा धनी सोबत असताना हा मंगळसूत्राचा सोपस्कार कशासाठी? बाजारात मिळतात साधी मंगळसूत्र, वापरेन मी तशातलंच एखादं.

आता पुढे काय? तानाजीला झोप लागत नव्हती. काय करावं काही सुचत नव्हतं. स्वतःचीच त्याला लाज वाटत होती. निराश, हताश झाला होता तो. त्याच्या मनात भलते सलते विचार यायचे. पार्वतीची आणि नामदेवाची आठवण काढून तो ते विचार झटकून टाकायचा. पण दिवसंदिवस परिस्थिती बिघडतच होती. सगळे मार्ग संपले होते, सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या.

त्याने मोठ्या कष्टाने आणि दुःखाने आपला निर्णय पक्का केला.

तानाजी एव्हाना त्याच्या शिवारात पोचला होता. ढवळ्या सुद्धा खुशीने फुरफूरत होता. तानाजीने शिवारभर नजर टाकली. घशाखाली आलेला आवंढा गिळला त्याने. त्याला त्याच्यासमोर हिरव्यागार शेतात राबणारे बाबा दिसत होते. छान वाऱ्यावर डुलणारी पिकांची लांबच लांब रांग समोर दिसत होती. दूर बांधावरून डोक्यावरुन न्याहारीचं टोपलं घेऊन येणारी पार्वती किती सुंदर दिसत होती… 

अचानक तो भानावर आला. भेगाळलेल्या आपल्या शिवाराकडे पाहून त्याचे डोळे ओले झाले. तो खाली बसला आणि खडबडीत जमिनीवरून आपले दोन्ही हात फिरवू लागला. जणू काही खाटेला खिळलेल्या आपल्या आईच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत तो, तिची विचारपूस करत होता, तिला धीर देत होता. 

तसाच तो ऊभा राहीला. ढवळ्या त्याच्यापासून थोडा लांब, मान खाली करून ऊजाड, ओसाड जमिनीवर ऊगाच काहीतरी शोधत होता. तानाजी त्याच्या जवळ गेला. आपले दोन्ही हात त्याने ढवळ्याच्या मानेभोवती घातले आणि खाली वाकून आपले गाल त्याने ढवळ्याच्या कपाळावर घासले. त्या मुक्या जनावराने आनंदाने आपली मान जोरजोरात हलवली. तानाजीने हळूच त्याच्या मानेभोवतालच्या कासऱ्याची गाठ सोडली आणि ती दोरी आपल्या हातात धरून तो शिवाराच्या मधोमध ऊभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने चालू लागला. त्याने त्या आंब्याच्या झाडावर एक नजर टाकली. किती वर्षांपासून हे झाड येथे ऊभे आहे. कसं नेहमी हिरवंगार आणि फळांनी लगडलेलं असायचं. त्याच्या गर्द सावलीत दुपारी किती आराम वाटायचा? आता मात्र ते एकदमच वठून गेलं होतं. पान सुध्दा दिसत नव्हतं त्याच्यावर. तानाजीने वर पाहीले. थोडीशी ऊंचावर एक मजबूत फांदी दिसत होती. त्याने हातातली कासऱ्याची दोरी घट्ट पकडली, दूरवर एक नजर टाकली आणि झाडाच्या  दिशेने पूढे सरकू लागला… 

नामदेव शाळेतून घरी आला असेल. त्याच्या मनात विचार आला. त्याने आपल्या सदऱ्याचे खिसे चाचपले. त्यानेच लिहीलेली चिठी एक त्याच्या खिशात होती. त्याने क्षणभर डोळे बंद केले… पुन्हा  त्याला डोळ्यांसमोर पार्वती आणि नाम्या दिसू लागले…

” बा SSSSपू “

अरे, हा नाम्याचा आवाज. माझ्या नाम्याचा आवाज. त्याने दूर नजर टाकली…

दूरवरून नाम्या त्याच्याकडे धावत येत होता. त्याच्या अंगावरील शाळेच्या गणवेशाचा सदरा धावताना मागे पुढे, खाली वर एका लयीत हलत होता. त्याने त्याचा एक हात ऊंच धरला होता आणि त्या हातात त्याने काहीतरी घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद जणू ओसंडून वाहात होता.

तानाजीच्या हातातील दोरी गळून खाली पडली होती. तो झपकन पुढे झाला. धावत आलेला नाम्या तानाजीने पसरलेल्या दोन्ही हातात विसावला.

” बापू, माझा पहीला नंबर आला शाळेत.”

आपल्या हातातलं प्रगतीपुस्तक त्याने तानाजीसमोर धरले. त्याला आनंद आवरत नव्हता. तानाजीने क्षणभर त्याला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवले. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. त्याने आपल्या पायाजवळ पडलेली कासऱ्याची दोरी ऊचलली, एका हाताने नाम्याचा हात पकडला आणि तो ढवळ्याच्या दिशेने चालू लागला. तानाजीने ढवळ्याच्या मानेभोवती कासऱ्याची दोरी बांधली, त्याच्या कपाळावर आपले गाल घसाघसा घासले. त्याच्या अंगावर प्रेमाने थोपटलं. ढवळ्या नखशिखांत थरथरला. तानाजीने खाली वाकून नाम्याला दोन्ही हातांनी ऊचललं आणि अलगद ढवळ्याच्या पाठीवर बसवलं. नाम्या एकदम खूष. ढवळ्या पण खूषीने पुन्हा एकदा थरथरला आणि चालू लागला. त्याला बरोबर ठाऊक होतं कुठे जायचं आहे.

त्याने समोर पाहिलं. दूर शेताच्या बांधावरून पार्वती हसत हसत त्यांच्या दिशेने येत होती. आज खूपच सुंदर दिसत होती तानाजीला ती….

त्याच्या मनात आलं. सगळंच काही संपलं नव्हतं.

तानाजीने डोळे भरून बैलाच्या पाठीवर बसलेल्या निरागस नाम्याकडे पाहीलं.

किती मोठ्ठी चूक करत होतो आपण. इवल्याश्या नाम्याने सावरलं आज मला… नाम्या… माझा सावरिया…