फादर फ्रान्सिस दिब्रिटो – एक दीपस्तंभ
- ख्रिस्तोफर रिबेलो
वसईचे नाव साहित्यिक क्षेत्रात सर्वदूर पसरविणारे फा. फ्रान्सिस दिब्रिटो हे वसईचे भूषण आहेत, आमच्या सारख्या साहित्यिक आणि सामाजिक चळवळीत चंचु प्रवेश करू इच्छिणाऱ्या अनेकांचे प्रेरणास्थान, वसईच्या इतिहासात त्यांचे नाव नक्कीच फार वरचे आहे, त्यांनी आपल्या धर्मगुरू पदाचा सुवर्णमहोत्सवही साजरा केला आहे, त्यांचे कार्य फक्त चर्च पुरते सीमित न राहता ते वैश्विक पातळीवर जाऊन पोहोचले, वसईच्या धार्मिक वाटचालीत त्यांचा सिहांचा वाटा आहेच पण मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त लेखक, ज्येष्ठ संपादक, एक निष्ठावान पर्यावरण वादी, वसईच्या हितासाठी लढणारा एक तळमळीचा निडर कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आणि यापुढेही राहील.
फादर दिब्रिटो यांनी ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून वसईभर पर्यावरणविषयक जागृती केली. फादर दिब्रिटो यांनी १९८३ ते २००७ अशी २४ वर्षे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’चे संपादक म्हणून धुरा वाहिली. ‘सुवार्ता’चा अंतर्बाह्य कायापालट करण्यात फादर दिब्रिटोंचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी व्याख्यानमाला, लेखन कार्यशाळा, चर्चासत्रे, सुवार्ता साहित्य मेळावा आदि उपक्रमांद्वारे या नियतकालिकाला धार्मिक वार्तापत्राकडून एक उत्कृष्ट साहित्यिक मासिक तसेच समाज प्रबोधनाचे एक साधन बनविले. त्यांनी वसई परिसरात अनेक ख्रिस्ती युवक-युवतींना लिहिते केले. फादर दिब्रिटोंनी ख्रिस्ती लेखकांव्यतिरिक्त अन्य समाजातील लेखकांनाही सहभागी करून घेतले तसेच त्यांनी अनेक साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवले. वसईतील साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान कदापि विसरता येणार नाही.
फा. दिब्रिटो यांनी १९९२मध्ये पुणे येथे झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. ९३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा होता. पत्रकारिता, संपादन, समाजसेवा व लेखन आदि क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. महाराष्ट्र शासनाने पहिली ते आठवीच्या
मराठी विषयासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यार्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ , ‘बालभारती’ या संस्थेच्या भाषासमितीवर त्यांची नेमणूक केली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने पैठण येथील संतपीठाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी असलेल्या अभ्यासगटाचे सदस्य म्हणूनही फादर दिब्रिटो यांची नियुक्ती केली होती.
२०१६ साली ‘फेसबूक’वरील एका लेखामध्ये मी वसईतील साहित्य आणि कला क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींविषयी ऊहापोह केला होता आणि त्या लेखात फादर दिब्रिटो हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. खूप जणांनी त्यावेळी ही अशक्य गोष्ट आहे असे मला सांगितले होते, पण मी पाहिलेले हे स्वप्न सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाली आणि माझा स्वप्नांवर विश्वास बसला. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही जीवन विकास मंडळाचे काही कार्यकर्ते जीवन दर्शन केंद्रात गेलो होतो त्यावेळी त्यांनी स्वत:हून मला कोणीतरी हे त्यांच्या कानावर घातल्याचे सांगितले व माझे सर्वांसमोर आभार मानले. जानेवारी २०२० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून धाराशिव (उस्मानाबाद) येथील संमेलन स्थळ ते परत हा संपूर्ण प्रवास एक भारावलेला मंत्रमुग्ध काळ होता. आम्ही बोलत असलेली ‘कादोडी’ भाषा हीच फादरांची सुद्धा भाषा आहे ह्याचे महाराष्ट्रातील इतर भागातील साहित्यप्रेमींना सांगितल्यावर त्यांना वाटणारे अप्रूप विशेष आनंद देणारे होते.
मी संपादित करत असलेला ‘ख्रिस्तायन’ एकमेव ऑनलाईन नाताळ अंक आणि कुपारी समाजाच्या बोली भाषेतील एकमेव ‘कादोडी’ अंकासाठी फादरांचा सदैव आमच्या पाठीवर कौतुकाचा आणि प्रोत्साहनाचा लाभत असलेला हात आम्हाला सतत नवीन हुरूप देत असायचा. कित्येक वेळा स्वत: फोन करून त्यांनी काहीक सूचना आणि मार्गदर्शन केले आहे. प्रथितयश लेखक-कवी तसेच नवोदितांनाही वेगवेगळ्या विषयांद्वारे लिहिते करण्याची प्रेरणा त्यांनीच मला दिली होती, त्यासंबंधी अनेक मुद्दे ते प्रकर्षाने अधोरेखित करत असत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाची तयारी करत असताना त्यांनी ‘ख्रिस्तायन’ व ‘कादोडी’ ह्या दोन्ही अंकांची इत्यंभूत माहिती घेतली होती आणि नंतर त्यांनी भाषण त्रोटक करावे लागल्यामुळे ते समाविष्ट न करता आल्याचे फोन करून सांगितले होते. इतका मोठा साहित्यिक इतका नम्र कसा काय होऊ शकतो ह्याचे कोडे मला आजही उलगडले नाही.
संमेलनावेळी उठलेले पाठीचे दुखणे त्यांना आज त्यांच्या अंतापर्यंत सोबत राहिले, ‘मल्टीपल मायलोमा’ सारखा विकार जडला आणि त्यातच त्यांची अखेर झाली. मला ते सतत एका दीपस्तंभासारखे भासत होते, स्वत:चा प्रकाश इतरांना देत त्यांचा फक्त प्रवासच त्यांनी उजळवला नाही तर तो प्रकाशही इतरांना देण्यास त्यांनी उद्युक्त केले.
‘मुलांचे बायबल’ लिहून ‘ख्रिस्ताची गोष्ट’ सांगत ‘ख्रिस्ती सण आणि उत्सव’ यांची माहिती देऊन ‘परिवर्तनासाठी धर्म’ कसा असावा यासाठी ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ करणार्या तसेच ‘कृतघ्न’ समाजमनावर आपल्या संयत शैलीत ‘आनंदाचे अतरंग’ उमटवत ‘मदर तेरेसा’ यांच्या पथावर ‘पोप जॉन पॉल दुसरे’ यांचा आदर्श ठेवत ‘तेजाची पाऊले’ टाकीत ‘पथिकाची नामयात्रा’ करून ‘सृजनाचा मळा’ उभारणार्या व त्यात ‘सृजनाचा मोहर’ फुलविणार्या तरीही अजून ‘ओअॅसिसच्या शोधात’ असलेल्या आणि वसईच्या हरित लढ्यात ‘पर्वतावरील प्रवचन’ द्वारे जनमानसात अन्यायाविरुद्ध लढण्याचे ‘तरंग’ उमटविणार्या, त्यातूनच हितचिंतकांचा ‘गोतावळा’ जमा करणार्या म्हणूनच अगदी अभिमानाने ‘नाही मी एकला’ म्हणत लोकांच्या मनावर आपल्या संवेदनशील वृतीने राज्य करणार्या आणि महाग्रंथ ‘सुबोध बायबल’द्वारे ख्रिस्तेतर समाजात बायबल पोहोचविणार्या फा. दिब्रिटोंचे मराठी सारस्वतात मानाचे स्थान सदैव अबाधित राहील.
२५ जुलै ह्या दिवशी माझा वाढदिवस आणि ह्याच दिवशी फादर दिब्रिटोंचे देहावसान हा संयोग म्हणावा की काय हा संभ्रम मनात निर्माण झाला आहे. कदाचित त्यांच्यासह असलेले ऋणानुबंध कायम राहावे, माझ्या मनात त्यांची आठवण कायम राहावी म्हणून म्हणून असे झाले असावे.
प्रिय तात्या फादर, प्रत्येकाला एक दिवस ह्या जगाचा निरोप घेऊन जायचे आहे, पण आपण चर्चिलेली पुढील कामं राहून गेली, ‘ख्रिस्तायन’चा एक प्रकाशन सोहळा तुमच्या अध्यक्षतेखाली घ्यायचा राहिला आणि आपल्या ‘कादोडी’ भाषेतील संमेलन व माझ्यासारख्या साहित्य क्षेत्रात थोडीबहुत मुशाफिरी करणार्या नवोदित साहित्यिकांचा मेळावा तुमच्या उपस्थितीत घ्यायचा राहून गेला. फादर, तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचा माझ्यावर असलेला लोभ सदैव आठवणीत राहील.