पिंपळोबा – फेलिक्स डिसोजा

पिंपळोबा

  •  डॉ. फेलिक्स डिसोजा, भुईगाव

          माझ्या आत असलेला एक  झोका, चिमण्याचा चिवचिवाट,  सुगरणीचा खोपा, निवांत शीतल छाया, माझ्या एकटेपणातला सोबती, एकांतातला हवाहवासा आवाज म्हणजे उंच डेरेदार पिंपळ. माझ्या आजोबालाही कधी सांगता आलं नाही या वृक्षाचं नेमकं वय किती. आजोबाचे आजोबा म्हणायचे हा पिंपळ माझ्यापेक्षा मोठा. तो कधीपासून येथे आहे हे कोणालाच माहिती नाही, गावातील सर्वात प्राचीन जाणता जीव. हा हिरवागार पर्णसंभार म्हणजे माझ्या लहानपणीचं जंगल. आजूबाजूला दाट झाडी, अंगावर चढलेल्या वेली, मागे असलेले बावखाल, बावखालात असलेली गोलाकार विहीर, बावखालाच्या कडेकडेला उभी असलेली नारळ, आंब्याची झाडे. ही  हिरवीगार जागा म्हणजे झाडांची जागा, झाडांनी आपापली जागा शोधून आपलं स्वत:चं उभं केलेलं गाव, झाडांचं गाव. हिरवं गाव. लोक त्याला पिंपळाचं जंगल म्हणत.

          आम्ही मुलं खेळता खेळता चेंडू या पिंपळामागे असलेल्या जंगलात गेला की आणण्यासाठी त्या झाडीत जाण्याची कोणाची हिंमत होत नसे, मग मोठी मुले भीत भीत जाऊन चेंडू शोधून आणत असत. इतकं दाट होतं पिंपळाचं  जंगल. पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून झाडाकडे पाहिले तर तोही आपल्याला वाकून पाहत आहे, आपल्याशी  बोलत आहे असे नेहमीच  मला वाटत असे. गावातील सर्व मुले या झाडाखालीच खेळायचे. खेळ रंगात आला की पिंपळाच्या पानांचा सळसळ आवाज सतत ऐकू यायचा. शाळेत जात असताना आम्हा मुलांना पाहून पिंपळ टाळ्या वाजवत आहे असे मला वाटायचे. मुलांना पाहून त्या झाडाला आनंद होत असावा आणि तो आपले दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवत आहे असं वाटत रहायचं, नंतर पुढे कितीतरी दिवस मी त्या झाडाखाली एकटा बसून त्या झाडाचं गाणं ऐकलं आहे, उंच आणि आपला पर्णसंभार डौलाने मिरवत उभा असलेला पिंपळ सगळं बघत आहे, त्याला सगळं ऐकू येते, त्याला सगळं दिसते, समजते असे मला वाटायचे, मुलांना पाहून सळसळणारा आनंदाने बेभान होत टाळ्या वाजवणारा पिंपळ जसा दिसत असे तसा गावात कुणी मेल्यावर झाडा- समोरून प्रेतयात्रा जात असताना किंवा नवरी मुलगी लग्नानंतर सासरी जात असताना दु:खी होऊन स्तब्ध उभा असलेला शांत पिंपळही मी पाहिला आहे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी कित्येकदा त्याला विचारलं आहे, “तुला सर्व समजते, सर्व कळते, या गावाच्या सुखदु:खात तू सहभागी असतोस, मला माहिती आहे कुणीच न सांगता तू स्वत:हून या गावाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहेस, तुझ्या पानाच्या सळसळीतून होणारी ही पिवळ्या पानांची उधळण म्हणजे गावासाठी आशीर्वाद आहेत.”

          त्या झाडाखाली बसून मी खुपदा बोललो आहे, मनातलं सारं, मला वाटायचं तो ऐकतोय, ऐकतोय सारं. आणि प्रतिक्रिया म्हणून मला ऐकू यायची पानांची  सळसळ आणि कधीतरी जाड, लांब देठ असेलेलं भलं मोठं पान येऊन बसायचं माझ्यासोबत. अशी अनेक पानं मी जमवली होती, पुस्तकाच्या पानात. त्या पुस्तकात ठेवलेल्या पानांचा हिरवा रंग उडून जायचा, आणि एक जाळीदार पान उरायचं. अशी कितीतरी जाळीदार पानं मी जपून ठेवली होती, जी झाडाने मला भेट दिली होती. या झाडामुळेच मी कधी एकटा नसायचो. माझ्या सोबत झाड होतं, झाडांनी दिलेलं पान होतं, सूर असलेली पानांची सळसळ होती, सावली होती, सूर्य मावळताना काहीतरी निसटत असल्याच्या भावनेने कातर होत जाणाऱ्या संध्याकाळच्या   नाजूक क्षणी बसून राहण्यासाठी झाडांचा बुंधा होता. या बुंध्यावर बसूनच मी कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेला कुहू कुहू करून चिडवले आहे, माझा कुहू कुहू ऐकून ती चिडून अधिक जोराने, त्वेषाने कुहू कुहू करायला लागायची. या झाडाच्या फांदीवर बसून झाडाखाली असलेल्या विहिरीच्या आत डोका-वताना मला गोलाकार आरसा दिसला आहे, त्या आरशात आपलं प्रतिबिंब उतरवून स्वत:ला न्याहाळणाऱ्या लता वेली मी पहिल्या, या झाडावरील घरट्यात राहणारी साळुंकी, ती आई झाल्यावर मला खूप प्रेमळ वाटू लागली होती, अचानक पाणीदार झालेल्या तिच्या डोळ्यात चमकणारी काळजी मला दिसली होती.

          अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेली पिसं नसलेली उघडीनागडी सतत तोंड उघडं ठेवून खाऊ मागणारी पिल्लं आणि त्यांच्या चोचीत काहीतरी खाऊ टाकण्यासाठी धडपडणारी साळुंकी, मला या झाडानेच दाखवली.  अशा असंख्य जीवांचं घर म्हणजे हा पिंपळ होता. या पिंपळाने निसर्ग दिला, हिरवेपणा दिला. माझ्या कवितेत या निसर्गाचे अनेक आवाज मिसळले. या आवाजाने माझ्या कवितेला सौदर्य  दिले, आशय दिला, अर्थ दिला. असा हा निसर्ग अनेकांच्या कवितेत कधी सौदर्य घेऊन अवतरला आहे, तर कधी जीवनाशय. निसर्ग आणि माणूस, त्यांचे जिव्हाळ्याचे  नाते संत तुकोबा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या शब्दात सांगतात. “मिनमिन आला वारा / कोन कोनाशी बोलली / पानं झाडाची हलली” बहिणाबाईच्या कवितेची भाषा निसर्गाची भाषा आहे. ऊन वारा, पाऊस, शेती, पाखरं त्यांच्या कवितेत बोलू लागतात, प्रेमशंकर शुक्ल यांच्या कवितेत ‘समुद्र पानी का / सबसे बडा बर्तन है / सुरज जिस से पानी पीता है !” किंवा “झरना पानी के बचपन का आवाज है” असा तरल, मौलिक अनुभव देणारा निसर्ग आहे. तर चंद्रकांत  देवताले यांना तोच ‘समुद्र आकाशाच्या पिंजऱ्यात डरकाळी फोडणारा वाघ म्हणून दिसतो. तर आणखी एका कवीच्या कवितेत हा समुद्र पांढरी आयाळ असलेला डरकाळी फोडणारा सिंह बनून येतो.

          ना. धो. महानोर “या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे / कोणती पुण्ये अशी येती फळाला / जोंधळ्याला चांदणे लगडून जावे अशी प्रार्थना निसर्गासाठी करतात. अनेक कवींच्या अनेक कवितेत निसर्गाचे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. जे कवीने निसर्गाच्या सानिध्यात राहून हृदयाचे कान करून ऐकलेले असतात. अशा अनेक कवींच्या कवितेतील निसर्ग निसर्गात दडलेले अनेक अर्थ सांगत राहतो. निसर्ग माणसाला भरभरून देतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागवतोच पण अनेक अनुभवातून, घटितांतून सौदर्यानुभव देत असतो. जीवनाशय पुरवीत असतो.

          माझ्या वाट्याला निसर्ग आला तो ह्या पिंपळाच्या रुपात. गावचा इतिहासाला साक्षी असलेला हा अतिप्राचीन पिंपळ. गावाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा एखादी महत्त्वपूर्ण घटना सांगायची असेल तर या पिंपळाच्या झाडाला वगळून ती सांगताच येणार नाही. गावात भरलेली पहिली जत्रा या पिंपळा-खाली भरली होती, मृणाल गोरे यांची पहिली सभा, हरित वसईच्या लढयाची गावात झालेली सभा, गावात आलेल्या चोराला गावातील लोकांनी पकडून या पिंपळाच्या झाडालाच बांधले होते, अशा अनेक गोष्टीला हा पिंपळ साक्षी  होता. मुलांचे खेळ या झाडाखालीच व्हायचे, मोठ्याच्या गप्पा या झाडांच्या बुंध्यावरच रंगायच्या, अनेकांच्या भेटण्याची आवडती जागा म्हणजे पिंपळाचे झाड, गावातील अनेक महत्त्वाच्या सभा, सण-उत्सवासाठी पिंपळाचे झाड, शेतात काम करून थकल्या भागल्या मजुरांची विसाव्याची जागा म्हणजे पिंपळाचे झाड, हा अतिप्राचीन पिंपळ माणसाच्या हसण्याचा, खिदळण्याचा, प्रेमाचा, द्वेषाचा, मैत्रीचा, हुंदक्याचा, भीतीचा, काळजीचा आवाज अतिप्राचीन काळापासून ऐकत आहे. गावाच्या पाठीवर असलेला हा हिरवागार ठिपका म्हणजे गावाची ओळख होती, त्याच्या पानांची उत्साही सळसळ गावात चैतन्य होऊन वाहत होती.

          गावात सर्वात मोठा कोण तर हे पिंपळाचे झाड. असंच एकदा मित्रांच्या गप्पात मी सहज म्हणालो, पिंपळोबा… सगळ्या  गावाचा  आजोबा पिंपळोबा. आणि तेव्हापासून आम्ही सर्वच मित्र या आमच्या सगासोयरा असलेल्या पिंपळाला ‘पिंपळोबा’ म्हणू लागलो. ‘पिंपळोबा’ ज्याच्या सावलीचा स्पर्श झाला नाही असा गावात एकही माणूस नव्हता. ‘पिंपळोबा’च्या पर्णसंभारात नुकताच उगवलेल्या कोवळ्या लुसलुशीत तांबूस  पानावर संध्याकाळी मावळत्या सूर्याची पिवळसर नारिंगी किरणे पडली की ध्यानस्थ बसलेल्या ‘पिंपळोबा’च्या मुकुटावर साक्षात्कारी तेजोमय वलय दिसू लागते. हा ‘पिंपळोबा’ वयाने इतका मोठा आणि उंच होता की त्याच्या छायेत माणसाला स्वत:च्या खुजेपणाची जाणीव व्हावी. सगळा अहंकार गळून जावा, या डेरेदार वृक्षाखाली स्वत:ला छोटं छोटं पाहत स्वत:पर्यंत पोहोचता यावं, ‘पिंपळोबा’ एक ध्यानस्थ आदिम साक्षात्कारी वृक्ष. सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणारा.

          पण याच पिंपळोबाच्या झाडाखाली दोन भावांमध्ये जमिनीच्या वाटणीवरून भांडण झाले, याच पिंपळोबाच्या झाडाखाली दोन भावांमध्ये पंचानी जमिनीची वाटणी करून न्याय केला. लहान भावाच्या वाटणीला पिंपळोबाची जागा आली, तर थोरल्या  भावाला गावाबाहेर हायवेलगतची. पिंपळोबाचा न्याय झाला नाही. कितीतरी वर्ष मातीत मुळ रोवून उभा असलेला पिंपळोबा त्या दिवशी भूमिहीन झाला. लहान भावाने एका बिल्डरला ही जागा विकून टाकली आणि तो आपल्या कुटुंबाला घेऊन परदेशात गेला. पिंपळोबाच्या पायाखालची माती त्याची राहिली नाही.  पिंपळोबाच्या नावे कोणताच सातबारा नव्हता. लहान भावाच्या जमिनीत  उभा असलेला पिंपळोबा त्या बिल्डरला अडगळीचा वाटू लागला. अतिप्राचीन पिंपळोबाची माती हिरावून घेतली गेली. पिंपळोबा जमीनदोस्त झाला. माती मोकळी झाली. ते आले करवत, कुऱ्हाडी  घेऊन. सगळा गाव हे पाहत होता. पाहून न पाहिल्यासारखे करीत होता. अनेकांना दु:ख झाले,  त्या दिवशी अनेकांच्या घरी चूल पेटली नाही, अगदी नाहीच असे नाही  गावातून पिंपळोबाच्या बाजूने आवाज झाला. बिल्डरला विरोध करण्यात आला. पण सत्ता, संपत्ती, आणि बळाचा वापर करून पिंपळोबाचा जीव घेतला गेला. मी हे सारे पाहत होतो. मोठमोठ्याने रडावसं वाटत होतं. नरेश सक्सेनाच्या कवितेतील झाडासाठी असलेलं रुदन कितीतरी दिवस मला ऐकू येत राहिलं –

घेऊन गेले त्याला

जसं घेऊन जातात एखादं बेवारस प्रेत

फरफरफटत

घेऊन गेले त्याला

घेऊन गेले अंगणातील ऊनसावली

सकाळ संध्याकाळ चिमण्यांचा चिवचिवाट

घेऊन गेले ऋतू

आतापर्यंतची साथसोबत सुख दु:ख

सगळं आयुष्य घेऊन गेले ( अनुवाद : चंद्रकांत पाटील )

          पिंपळोबाबरोबर विहीर, बावखाल, झाडे, वेली नाहीशा झाल्या. एक गाव उठवलं गेलं, झाडांचं गाव. पिंपळाचं जंगल कायमचं नाहीसं झालं.  जमीन मोकळी झाली. उघडी नागडी. सूर्य मध्यावर आला की त्या जागेकडे साध्या डोळ्याने पाहू शकत नाही, इतकी उघडी. अतिप्राचीन   पिंपळोबाचे आणि हिरव्यागार  जंगलाचे कोणतेच अवशेष मागे उरले नाहीत.ते घेऊन गेले त्याला आणि असंख्य आवाज नाहीशे झाले. पिंपळोबाची सळसळ, पिवळ्या पानांची उधळण, पक्ष्यांची मधुर किलबिल, विहिरीत पडणाऱ्या नारळाचा डुबुक आवाज, जंगलातून  वाहताना वाऱ्याने घातलेली शीळ, पिंपळोबाच्या बुंध्यावरच्या गप्पांचा आवाज, मुलांच्या खिदळण्याचा आवाज. माझ्या कवितेला अर्थ देणारे हे आवाज नाहीशे झाले. पिंपळोबा गेला आणि जणू  गावचा मूड बदलला. त्या चेपून चेपून गुळगुळीत केलेल्या जमिनीत काही दिवस उत्सवाचे मांडव उभे राहिले, कर्णकर्कश डीजेचा आवाजाने    कोलाहल वाढत गेला. पिंपळोबाच्या हिरव्यागार जंगलाची कत्तल करून अनेक जीवांची वस्ती उठवली. त्या जागेवर माणसांना राहण्यासाठी उंच मनोऱ्यात खुराडी बांधली गेली. माणसांचे आवाज क्षीण झाले. गोंगाट वाढला. ऐकण्याची क्षमता कमी कमी होऊ लागली. कसलीच ओढ शिल्लक राहिली नाही. निसर्गाच्या हाका ऐकू येणे  बंद झाल्या किंवा  निसर्गाची भाषा येणारी माणसेच शिल्लक राहिली नाहीत. मला आता या गावात  स्तब्धता ऐकू येत आहे, स्तब्धता. पिंपळोबा गेला तेव्हा त्याबरोबर गावाचं चैतन्य निघून गेलं आणि त्या जागी ही स्तब्धता आली. गावातील वातावरणातील स्तब्धता.

ही उन्हानं वेढलेली दुपार

एकमेकांत अंतर ठेवून उभी आहेत

घरासारखी दिसणारी निर्जीव खोकी

त्यात आहेत आजच्या वर्तमानात नसलेली

खूप मागे राहिलेली

एक-दोन माणसं शिल्लक उदासीनं भरलेली

खरं तर या मातीची गाणी त्यांनीच गायली होती

आणि हे माहीत असूनसुद्धा

संवादाचे आणि सहवासाचे गरम श्वास

अडकून आहेत त्यांच्या घशात चिकट कफासारखे

त्यांना गाता येत नाही

आणि जे सकाळी भरभर कुठे कुठे

निघून गेले आहेत

ते ओढाताणीच्या आणि स्पर्धेच्या पिंजऱ्यात

अडकले आहेत

त्यांच्या डोळ्यांत भविष्य खातंय हेलकावे

त्यांना गावाकडून उरल्या नाहीत कुठल्याच अपेक्षा

मातीच्या वासाच्या इच्छा

उगवणारा दिवस बाळगू देत नाही

त्यांच्या लयी विस्कटल्या आहेत भाषेच्या युद्धात

त्यांना गाता येत नाही

खरं तर 

स्वतःचे आवाज गमावून मुकी झालेली

पराभूत भाषा आहे ही 

गावातल्या वातावरणातील स्तब्धता…