पालखी
- अतुल काटदरे, मुंबई
आयुष्यात काही क्षण अविस्मरणीय बनतात; ते पुन्हा पुन्हा येत नाहीत. पण काही फिरून पुन्हा येतात आणि दर खेपेला नुतन अनुभूती देऊन जातात. भटकंतीची हीच तर गंमत आहे. गतवर्षीप्रमाणेच या वेळेसही हा अविस्मरणीय अनुभव पुन्हा मिळाला तो वज्रेश्वरी देवीच्या पालखी उत्सवात. यंदा पालखीचा मान होता अर्नाळा गावाचा. वसईच्या किल्ल्यातल्या वज्रेश्वरी मंदिरातून निघालेली पालखी अर्नाळ्याच्या राम मंदिरात येणार होती.
मगं काय, ठरल्याप्रमाणे आम्हा भटक्या मित्रांचं टोळकं संध्याकाळी विरार स्टेशनात भेटलं. चहाच्या तलफी मंडळींच्या आग्रहाखातर नवभारत मध्ये चहा आणि मिसळ-पाव हाणला आणि विरार स्टेशनहून अर्नाळ्याला निघालो. बोळिंज सोडलं तसं हवेतला गारवा चांगलाच जाणवायला लागला. पुढे दूरवर पसरलेल्या नारळीच्या बागा दिसू लागल्या. नारळी आणि केळीची वनं म्हणजे या प्रांताला मिळालेलं निसर्गाचं देणं! या उंच ताड-माड वनराईला छेदणारा अथांग असा समुद्र किनारा, काळसर चिकट वाळू, त्यावर सुरूची बाग, नजर जाईल तिथवर पसरलेल्या दर्यासारंगांच्या होड्या अन् नजरेत भरणारा; मदमस्त लाटांचे तडाखे लीलया परतवणारा अर्नाळ्याचा किल्ला!! अर्नाळ्याचं हे मोहक रूप मी अनेकदा अनुभवलंय. त्यामुळे येणारा अनुभव हा नक्कीच काहीतरी खास असणार ह्याबद्दल मी साशंक नव्हतो.
एव्हाना रस्त्याच्या दुतर्फा सु़ंदर बंगल्यांच्या रांगा लागल्या होत्या. काही जुनी, कौलारू बैठी घरं तर काही नवी, सुबक दुमजली. घराबाहेर येशूख्रिस्ताच्या जन्माचे सुरेख देखावे दिव्यांच्या प्रकाषात उजळत होते. चौकाचौकात ख्रिस्ताच्या, मदर मेरीच्या पुतळ्यांपढे रोषणाई केली होती. नाताळच्या पूर्वसंध्येपासून ते नववर्षाच्या सुरूवतीपर्यंत हा परीसर केवळ पाहून घ्यावा. गुलाबी थंडीत, झोंबणारा वारा अंगावर घेत या गावातल्या आळ्या, जुने वाडे, बंगले, चर्चेस, च्यापेल्स, चौकाचौकात बसवलेले क्रुस अन् ख्रिस्ती देवतांचे पुतळे पाहात फिरणं एक वेगळीच् मुशाफिरी आहे. या दिवसांत ख्रिस्तजन्माचे देखावे बोलके होतात अन् रोषणाईचे तारे सुद्धा खरे भासतात.
आगाशीला पोहोचेस्तोवर चांगलाच अंधार पडला होता तेव्हा आगाशीच्या स्पेशल पोहा भुजिंगचा मोह आवरून जुन्या कोळीवाड्यातल्या राम मंदिरात जिथे पालखी थांबली होती त्या दिशेने निघालो. रस्त्यांवर पडलेले रांगोळ्यांचे सडे आणि घरादारांवर गुढीसमान उभारलेले भगवे झेंडे दिशा दाखवत होते. जसं जसं राम मंदिर जवळ येऊ लागलं तसं कोळी बाजाचे सूर कानावर पडू लागले अन् इतक्या आतुरतेने ज्या क्षणाची वाट पहात होतो तो क्षण आला. पालखीत विराजमान झालेल्या वज्रेश्वरी देवीचं दर्शन! देवीचा चेहरा, तीची आयुधं, अलंकार सर्व काही नजरेत साठवत मनोभावे डोकं टेकलं. आणि तीचा भंडारा माथी मिरवत मिरवणुकीत सामील झालो.
पालखी उत्सवाचा मानकरी ठरलेल्या या गावाचा थाट काही औरच होता.
“दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती।”
हे वर्णन या छोट्याश्या गावाने सार्थ केलं! घरांबाहेर, रस्त्यांवर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या, ठिकठिकाणी रोषणाई केली होती; जणू दिवाळसणच् आला होता. पताका, तोरणांनी पडव्या-दारं सजली होती. चौकाचौकात पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची आणि प्रसादाची सोय केली होती. लेझीमच्या तालात, झेंडे नाचवत, मशालींच्या प्रकाशात, शिवछत्रपतींच्या आणि नरवीर चिमाजी आप्पांच्या जयघोषात पालखी गावभर फिरवण्यात आली. आणि कोळीवाडा म्हटलं की बाजा आलाच्.. मग् काय! दर्यावरी आमची डोले होरी.. पासून वेसावची पारू नेसली गो, नेसली गो नवा सारा पर्यंत ‘लाइव्ह परफॉरमन्स’ आणि एकच् कल्ला!!
राम मंदिरापासून ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या मिरवणूकीतला अनुभव अलौकिक होता! घराघरांतून पारंपारीक पोषाख करून, टोप्या चढवून, फेटे बांधून पुरूष मंडळी दर्शनाला येत होती, पालखीचे भोई बनत होती. त्यापेक्षाही स्त्री वर्गाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. नऊवारी साड्या, अंगावर पारंपारिक दागदागिने, हातात देवीच्या पूजेची थाळी, त्यात खणा-नारळाची ओटी अन् मनात अपरंपार भक्तिभाव! हाताशी असलेल्या पोराला पालखी खालून काढत दूर समिंदरात ‘म्हावरं’ पकडायला गेलेल्या आपल्या साथीदाराच्या खुशालीचं साकडं घालायला त्या रात्री उशिरापर्यंत गर्दी करून होत्या.
रात्रीच्या मुक्कामाला पालखी विठ्ठल मंदिरात उतरणं म्हणजे ‘वारी’ या संकल्पनेची पूर्ती. माझ्या आडवाटेवरच्या भटकंतीत मी पाहिलेल्या काही खूप सुंदर मंदिरांपैकी एक असं हे विठ्ठल मंदिर पहाताक्षणी भावणारं. सुंदर मूर्तींनी सजलेलं; केवळ गाभाऱ्याच्या आतंच् नव्हे तर गाभाऱ्याबाहेरही. गाभाऱ्यात कर कटे वरी ठेवून विठ्ठल रखुमाई विटेवर उभे, गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर सुरेख पितळी कासव. त्याबाहेर उजव्या हाताला देवी शारदा तर डाव्या हाताला गणपती गजानन. प्रदक्षिणा केल्यास गाभाऱ्याच्या तीन बाजूंना तीन संत विभूती – ज्ञानोबा, तुकोबा आणि चोखामेळा. आणि सगळ्यात भारी म्हणजे विठ्ठलाच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावर ‘गरूड हनूमंत पुढे उभे राहती!’ पहाटे पालखी केळव्याला रवाना होईस्तोवर या सुंदर देवस्थानात रात्रीचा मुक्काम.. यापेक्षा आनंद म्हणतात तो वेगळा काय असतो? थकलेला जीव लागलीच निद्राधीन झाला.
सकाळी पालखी केळव्याच्या शितलादेवी मंदिराकडे जायला निघाली आणि आमचा अर्नाळ्याचा मुक्काम हलला. या दरम्यान दोन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात;
एक म्हणजे, मला आपलं सहज वाटलं… प्रचंड मेहनती, रांगड्या पण दर्यासारख्याच दर्यादिल, मनमोकळ्या स्वभावाच्या कोळ्यांचं देवांपेक्षा देवीवरच् प्रेम अधिक. मग ती कार्ल्याची एकवीरा आई असो किंवा विरारची जिवदानी. वसईची वज्रेश्वरी, केळव्याची शितलादेवी, माहीमची महिकावती, किंवा अगदी दातिवऱ्याच्या समुद्रात वसलेली आशापुरा देवी. सगळा कारभार देवीच्या हातात. म्हणूनच मला मुंबई सुद्धा मातृसत्ताक वाटते. कारण मुंबईचे मूळचे रहिवासी कोळीच. त्यामुळे सिद्धीविनायक, बाभूळनाथ किंवा वाळकेश्र्वर हे एखाद दोन अपवाद सोडल्यास मुंबादेवी, प्रभादेवी, काळबादेवी, धारावी, महालक्ष्मी, जोगेश्वरी आणि अनेक गावदेवी.. एवढंच कशाला, असं म्हणतात की वांद्र्याची माऊंट मेरी किंवा भाईंदरची वेलंकन्नी यांचा उगमही समुद्रातलाच! सर्व मातृसत्ताच!!
आणि दुसरं म्हणजे या प्रांतातील ‘शिवाजी’ या नावाचं गारूड! यंदाच्या अर्नाळ्यापासून ते मागल्या खेपेस पालखीचा मान असलेल्या दातिवऱ्यापर्यंत कित्येक घरांच्या प्रवेशदारावर आजही छत्रपतींची समर्थांसोबत असलेली तस्बीर लावलेली दिसते. पण इथे महाराज लोकनेत्यांसारखे किंवा महात्म्यांसारखे केवळ भिंतींवर नाही तर लोकांच्या मनात देखील आढळतात. विशाल सागरात स्वतःला झोकून देण्याचं धाडस आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावाने समोरच्याला झटक्यात मित्र बनवण्याचं कर्तब, हे राजस गुण महाराजांचीच देणगी असावी! म्हणूनच ‘राजे’ या एका शब्दात ईथे उत्सव साजरा होतो!!
अर्नाळ्यातला पालखी उत्सव कायम स्मरणात राहील, अन् त्याहीपेक्षा गावकऱ्यांचा प्रचंड उत्साह आणि प्रेमळ आदरातिथ्य!
चतुर्थीत गणपती पोहचवताना जसं दुःख होतं तसं पालखीला निरोप देताना वाईट वाटतं; ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असं वचन घेत जसं वर्षभर त्याची वाट बघतो तसं काहीसं पालखीबाबतही होतं. वज्रेश्वरी देवीची पालखी केवळ उत्सवाचा आनंद देत नाही तर देते दुर्गसंवर्धनाचा वसा. गडकोट ही जर राज्यलक्ष्मी असेल तर दुर्गसंवर्धन हीच तीची पूजा. येत्या वर्षी अनेक दुर्गभ्रमण अन् संवर्धन मोहिमा घडाव्यात अन् त्यात आपल्याला खारीचा वाटा उचलता यावा हिच् देवीच्या चरणी प्रार्थना!