पाकीट गेले, पण कॅमेरा मिळाला, आणि मुलगीही!
काही परदेशानुभव
- दीपक मच्याडो, पाली
जुलै २०२४ या महिन्यात मी आणि पत्नी युरोपच्या दौऱ्यावर होतो. त्यापैकी आमचा दहा दिवसांचा दौरा जर्मनीत होता. जर्मनीला इतका वेळ देण्यामागचे कारण म्हणजे डोईचबान (जर्मन रेल्वे) ह्यांची एक योजना होती ज्यायोगे ४९ युरो (अंदाजे ४४०० रुपये) भरून महिनाभर अख्ख्या जर्मनीमध्ये तुम्ही रेल्वेने कुठेही प्रवास करू शकत होता. (सुपरफास्ट आईस (ICE) ट्रेन वगळून) इतकेच नव्हे, एखाद्या शहरात गेल्यावर तेथील ट्राम, मेट्रो आणि बस प्रवाससुद्धा त्यात तुम्ही करू शकत होता. अर्थात माझ्या मुलाने जर्मनीच्या उल्म ह्या शहरात वास्तव्य केल्यामुळे आणि जर्मनीभर केलेल्या भ्रमंती मुळे त्याला तेथील सर्व गाड्यांची आणि स्थळांची इत्यंभूत माहिती होती. आम्ही त्याच्याबरोबरच प्रवास करत होतो.
डुसेलडॉर्फ, आखेन, ट्रीअर, कोलोन, मानहाइम अशी ऐतिहासिक शहरे पाहिल्यानंतर आम्ही उल्म या शहराकडे जात होतो. उल्म हे स्टुटगार्ट-म्युनिक मार्गावर वसलेले एक छोटेखानी शहर आहे. जर्मन रेल्वेचे जाळे विस्तीर्ण आहे परंतु त्या यंत्रणेला सध्या मात्र एका त्रुटीने ग्रासले आहे. ते म्हणजे अनेक गाड्यांना विलंब होत असतो. आम्ही मानहाइमहून गाडी पकडली आणि कार्ल्सरुहे ह्या स्टेशनवर आम्ही स्टुटगार्ट मार्गे उल्मकडे जाणारी दुसरी गाडी पकडणार होतो. परंतु आमची गाडी जवळ जवळ वीस मिनिटे उशिरा धावत होती. कार्ल्सरुहे स्टेशनवर आम्ही जी गाडी पकडणार होते ती सुटायची वेळ झाली होती. आमच्या गाडीतले बहुतेक प्रवासी तसेच होते. सर्वांनी या गाडीतून उतरून धावत जिना उतरून आणि शेजारच्या फलाटावर चढून जाण्याची तयारी केली होती. आम्ही उतरलो. हातात बॅगा घेऊन धावपळ करीत जीना चढणे उतरणे जरा जिकिरीचे होते पण धापा टाकत आम्ही ती दुसरी गाडी पकडली. आता संध्याकाळी उल्मला पोहोचून माझ्या मुलाच्या मित्राच्या घरी निवांत तीन दिवस काढायचे होते. गाडीतून जर्मन ग्रामीण भागाच्या रमणीय भूप्रदेशाचे अवलोकन करता करता मी माझ्या पॅन्टच्या मागील खिशाला हात लावला आणि एकदम धस्स झाले. माझे पाकीट गायब झाले होते. सीटखाली वगैरे शोधले पण नाही सापडले. आता ते गाडी बदलण्याच्या घाईगर्दीत पडले की खिसेकापूने मारले ते समजण्याचा मार्ग नव्हता. पण एक आठवले. गाडीच्या दाराजवळ तीन पुरुष आणि एक स्त्री, गाडीत बसायची जागा असून देखील सतत उभे होते ते आम्ही पाहिले होते. ती पाकीटमारांची टोळी असावी का? मुलांने सांगितल्याप्रमाणे आम्ही लागलीच पुढच्या स्टेशनवर उतरलो.
आणि आम्ही पोहोचलो जर्मन पोलीस स्टेशनमध्ये
परंतु आपल्या येथील स्टेशन्स सारखी तेथील छोट्या स्टेशन्सवर चोवीस तास कर्मचारी तैनात नसतात. दुपारच्या एक वाजेपर्यंतची वेळ होती आणि आम्ही दोन वाजता पोचलो होतो. शेवटी स्टुटगार्ट शहराच्या हद्दीत तो विभाग असल्यामुळे पुढच्या गाडीने स्टुटगार्ट येथे गेलो. तिथे रेल्वेच्या “लॉस्ट अँड फाउंड” विभागात पाकीट हरवल्याची नोंद करून घेतली. परंतु पाकिटात फक्त पैसेच नव्हते तर माझे भारतीय क्रेडिट कार्ड आणि दोन डेबिट कार्ड होते. त्या करता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे आवश्यक होते. स्टुटगार्ट स्टेशनच्या जवळ असलेल्या पोलीस स्टेशनचा पत्ता मुलाने जीपीएसद्वारे शोधला आणि आम्ही निघालो. पर्यटन करताना पोलीस स्टेशनची वारी करण्याचा हा पहिलाच अनुभव होता.
येथे पहिल्यांदा ‘कल्चर शॉक’ काय असतो तो नजरेस आला. बाहेर पानाच्या पिचकाऱ्या टाकीत आणि “काय काम आहे” असे खोचकपणे विचारणारा कोणी हवालदार बसला नव्हता. बंद दाराच्या बाहेर आपण बेल दाबल्यावर दारावरच्या स्पीकरफोन वरून आपले काम काय ते विचारले जाते. नंतर रिमोट कंट्रोलने तो दरवाजा उघडला जातो. आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्हाला बसण्यास सांगितले गेले. महत्त्वाचे म्हणजे सर्व पोलिसांना इंग्रजी भाषा समजत होती आणि चांगली बोलताही येत होती. थोड्याच वेळाने साधारण २५ ते ३० वर्षे वयाची एक स्मार्ट आणि सुंदर अशी महिला कॉन्स्टेबल आली आणि तिने सर्व काही वृत्तांत लिहून घेतला. पासपोर्ट मागितला आणि काही वेळाने तुमचा रिपोर्ट जनरेट करते असे आश्वासन देऊन आतमध्ये गेली. साधारण वीस मिनिटांनी तिने बाहेर येऊन तो एफआयआर फॉर्म दाखवला. त्या वरचे नावाचे वगैरे तपशील बरोबर आहेत की नाही याची माझ्याकडून खात्री करून घेतली. आणि मग पाच मिनिटात इन्स्पेक्टरची सही घेऊन दोन प्रती मला दिल्या. या सर्व सोपस्कारांदरम्यान तिचे बोलणे अत्यंत नम्र होते. चेहरा हसतमुख होता आणि कोणत्याही वांशिक भेदभावाचा लवलेशही नव्हता. आमच्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे परत बाहेर जाण्याचा दरवाजा उघडला गेला आणि एक अविस्मरणीय असा अनुभव घेऊन त्या पोलीस स्टेशनमधून आम्ही बाहेर पडलो. होय, पाकिट, पैसे आणि इतर ऐवज गेल्याचे दुःख जरूर जाणवत होते पण शेवटी तो देखील एक अनुभवच होता. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी स्टुटगार्ट स्टेशनच्या “लॉस्ट अँड फाउंड” विभागामध्येही टाकणार नोंदवली होती. परंतु त्यानंतर एक दोन महिन्यांपर्यंत वाट पाहून सुद्धा (अर्थात मुलाद्वारे) पाकिटचा शोध लागला नाही.
पण हरवलेला कॅमेरा मात्र सापडला.
त्या अगोदरच्या काळात गोथेनबर्ग, स्वीडन, येथे मुलगा पदव्युत्तर शिक्षण घेत होता तेथे पत्नीसह जाऊन आलो. गोथेनबर्ग, हे स्वीडनचे दुसऱ्या मोठ्या क्रमांकाचे शहर! गोथेनबर्गहून डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगेन फक्त काही तासांवर आहे म्हणून तेथे एक दिवसाचा दौरा काढायचे आम्ही ठरविले. एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी परतायचे असा आमचा बेत होता. फ्लिक्सबस ह्या जर्मन प्रवास कंपनीच्या बसने आम्ही दोन्ही वेळचा प्रवास आरक्षित केला होता. ठरलेल्या दिवशी सकाळी सातला आम्ही मुलासोबत निघालो आणि कोपेनहेगेन येथे दुपारी बाराच्या सुमारास पोहोचलो. हॉटेलमध्ये चेक इन करून आम्ही त्यानंतरचा संपूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सारी प्रेक्षणीय स्थळे बघण्यात घालवला. जगप्रसिद्ध “लिटल मरमेड”, आमालीएनबोर्ग राजवाडा, नीहवेन कालव्याचा परिसर आणि ह्या सर्वाची छायाचित्रे आम्ही आमच्या कॅनन एसएलआर कॅमेऱ्यात टिपत होतो, एका रम्य प्रवासाची आठवण म्हणून.
अरे, आपला कॅमेरा कुठेय?
दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता आम्ही गोथेनबर्गला परत येणारी बस पकडली. ही बस हॅम्बर्ग, जर्मनी येथून आली होती आणि कोपेनहेगेन मार्गे गोथेनबर्गला जात होती. प्रवास निर्विघ्नपणे पार पडला आणि आम्ही रात्री दहा वाजता गोथेनबर्गला पोहोचलो. ते भले मोठे बस स्थानक पार करून आम्ही मुलाच्या राहण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्राम मध्ये बसलो आणि मला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. आणि माझ्या छातीत धस्स झाले. आमचा कॅमेरा! आमचा कॅमेरा बसमध्येच राहिला होता. प्रश्न नुसता पन्नास हजारांचा ऐवज गमावल्याचाच नव्हता. गेल्या दहा दिवसाचे आमचे स्वीडन आणि ऑस्ट्रिया मधले फोटो आणि आता हे कोपेनहेगेनचे, सगळ्या आठवणींचा चुराडा झाला होता. शेवटी मोबाईल मधले फोटो आणि एसएलआर चे फोटो ह्यात फरक असतोच की. आम्ही त्वरित ट्राम मधून उतरलो. उलट दिशेची ट्राम घेऊन परत बस स्टॅन्ड वर आलो. तोवर अर्धा तास निघून गेला होता. स्टॅन्ड वरच्या हेल्प काउंटरवर मी तक्रार नोंदवली पण माझ्यात मुलाच्या मते त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता. तीन महिन्यांनी, तुमचा ऐवज मिळाला नाही असे उत्तर येण्याची शक्यताच जास्त होती. आम्ही बस ज्या फलाटाला लागली होती तेथे गेलो. बस तर तेथे नव्हती. बस उलट दिशेने परत जर्मनीच्या मार्गाला गेली असेल तर संपलेच सारे म्हणून मी सारी आशा सोडून दिली. मुलाने चौकशी केली असता ती बस शहरात असलेल्या त्यांच्या पार्किंगच्या जागी गेली असावी असेही सांगण्यात आले. कारण त्यावेळेला फ्लिक्सबसची कुठलीही रात्रीची ट्रिप नव्हती असे आम्हाला कळले.
त्या रात्री अत्यंत विमनस्क अवस्थेत आम्ही झोपी गेलो. आता फक्त एक आशेची तार राहिली होती. आम्ही ज्या सकाळच्या ७.०० च्या बसने कोपेनहेगेनला गेलो होतो त्याच ट्रिप वर दुसऱ्या दिवशी ती बस जाणार असेल तर निदान बसमध्ये विचारता आले असते. पण हाती लागलेल्याने तो कॅमेरा सोडला असेल तरच ना? दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच माझा मुलगा आपली सायकल काढून बस स्टॅन्ड वर गेला. हात हलवीत तो परत येईल ह्याची वाट बघत असतानाच, पावणे सातला मुलाकडून “तो” व्हॉट्स ऍप मेसेज आला. कॅमेरा सापडला! आमचा जीव एकाच नव्हे तर शंभर भांड्यांत पडला.
झाले होते ते असे. तो कॅमेरा बस कंडक्टरला मिळाला होता. माझा मुलगा त्याला सांगायला गेला तेव्हा असे दिसले की जर्मन आणि तुर्की सोडून त्या बिचाऱ्याला कुठलीच भाषा येत नव्हती. बसमध्ये चढणाऱ्या आणि तुर्की भाषा येणाऱ्या एका युवतीच्या साहाय्याने त्याची समज घालावी लागली. कॅमेऱ्यामधील माझ्या मुलाचे असलेले फोटो पाहून तो कॅमेरा आमचाच होता ह्याची ओळख पटली. शेवटी, जवळजवळ ज्याची आशा सोडूनच दिली होती अशी अनेक दृष्टीने मौल्यवान अशी वस्तू परत मिळाल्यामुळे आमच्या दौऱ्यावर जे निराशेचे सावट आले होते ते दूर झाले आणि आम्ही तो दिवस व्यवस्थित “सेलेब्रेट” केला.
विमानातली ती मुलगी आमची ?
त्या अगोदर चार दिवसांसाठी मी व माझी पत्नी व्हिएन्ना-साल्झबर्गचा दौरा करून आलो होतो. व्हिएन्नातून परत गोथेनबर्गला जाताना आम्हाला फ्रॅंकफर्टला फ्लाईट बदलायला लागली. विमानात आमच्या रो मध्ये, मी, माझी पत्नी आणि खिडकीला एक सुन्दर पंचविशीतली युवती बसली होती. नेहेमीच्या सवयीप्रमाणे माझ्या पत्नीच्या हातात एक रोजरी होती. (प्रवासात आपत्ती येऊ नये म्हणून तिचे नेहमीचे अस्त्र) त्या युवतीच्या गळ्यात सोन्याची रोजरी होती. गप्पागोष्टीच्या ओघात कळले की ती मूळची लेबॅनॉन देशातील होती आणि तिचे आईवडील स्वीडन मध्ये स्थायिक झाले होते. ती भारतातही येऊन गेली असल्यामुळे गप्पा रंगल्या. थोड्यावेळाने ती गाढ झोपी गेली. एअर हॉस्टेसने नाश्ता आणून दिला. ती युवती झोपली असल्याचे पाहून तिला न उठवता तिच्या वाट्याचा नाश्ता माझ्या पत्नीच्या हातात देऊन ती उठल्यावर तिला दे, असा प्रेमळ आणि साळसूद सल्ला देऊन गेली. तेव्हा मला एक शंका आली. मी पत्नीला म्हटले, बहुतेक त्यांना ती आपली मुलगीच वाटली असावी. माझी शंका खरी ठरली.
विमान गोथनबर्गला उतरल्यानंतर, आमच्या सीट्स सर्वात मागे असल्यामुळे बाकीचे प्रवासी उतरेपर्यंत, मी त्या एअर हॉस्टेसशी बोलत होतो. तू इजिप्शियन वाटते असे मी तिला म्हटल्यावर, मी मोरोक्को-ट्युनिसिआ-जर्मनी अशा मिश्र भट्टीची निर्मिती आहे असे ती हसत हसत म्हणाली. ती कबुल झाली की त्यांना ती आमची मुलगीच वाटली होती. परंतू नंतर मग तिच्या पोलिश असलेल्या पर्सरबरोबर विचारविनिमय करून (तो पोलंडचा असे चर्चेअंती समजले होते.) त्यांनी आमच्या चेहेऱ्याशी त्या मुलीच्या चेहेऱ्याची तुलना केली होती आणि निष्कर्ष काढला होता की बहुदा ती आमची मुलगी नसावी. आम्हाला दोन मुलगेच आहेत आणि दोन तासांकरिता का होईना तुम्ही आम्हाला एका मुलीचे आईवडिल बनवले त्याबद्दल मी एअर हॉस्टेसचे आभार मानले. ह्या विषयावरून आम्ही खूप हसलो. आम्ही गोथनबर्गला का चाललोय ह्याचीही तिने आवर्जून चौकशी केली. आणि मुलाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीयच धावले मदतीला
काही वर्षांपूर्वी आम्ही हाँगकाँग आणि मकाऊच्या दौऱ्यावर गेलो होतो. आम्हा कुटुंबियांपुरती कस्टमाइज्ड दौरा आमच्या टूर ऑपरेटरने मॅनेज करून दिला होता. सकाळी हाँगकाँगच्या विमानतळावर उतरलो. ठरल्याप्रमाणे त्या कंपनीने नेमून दिलेला माणूस आम्हाला घ्यायला येणार होता. पण आम्ही पोहोचलो तरी त्या माणसाचा पत्ता नव्हता. त्या विशाल विमानतळावर आम्ही त्या माणसाची शोधाशोध करत होतो. अस्वस्थ होऊन येरझारा घालत होतो. तिकडचं सिमकार्डही आमच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्या माणसाला फोनही करता येत नव्हता. तितक्यात आगमनकक्षातच कोणाच्या तरी प्रतिक्षेत असलेल्या एका भारतीय तरुणाने आम्हाला पाहिलं. त्याने आमच्याकडे येऊन चौकशी केली. आमची अडचण जाणून घेतल्यावर त्याने त्या एजन्सीचे फोन नंबर आहेत का हे विचारलं. ते दिल्यावर स्वतःच्या फोनवरुन त्या एजन्सीला फोन लावला. इतकंच नव्हे तर हॉटेलकडे घेऊन जाणाऱ्या बस कंपनीच्या काऊंटरपाशी आम्हाला सोडायलाही आला. मी त्याला पैसे देऊ केले. पण त्या भल्या माणसाने नम्रपणे नकार दिला. त्याच्यामुळेच आम्ही सुखरूप आमच्या हॉटेलवर पोहोचलो. त्या एजन्सीने प्रतिनिधी न पाठवल्यानेच हा गोंधळ झाला होता. त्याबद्दल मी परत आल्यावर त्यांची खरडपट्टी काढली. पण त्या भल्या तरुणाने केलेल्या मदतीमुळे आम्ही खरंच गहिरवरुन गेलो होतो. ऐनवेळी, कोणतीही ओळख नसताना केवळ भारतीय या एकाच नात्याने त्याने आम्हाला मदत केली. योगायोगाने मकाऊला फेरीने पोहोचलो तेव्हाही असाच एक प्रसंग ओढवला. जेटी ते हॉटेलपर्यंत मोफत बससेवा असते, असं सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात बसचा पत्ता नव्हता. त्यावेळी जेटीच्या सिक्युरिटी गार्डने आमची हिंदीमध्ये चौकशी करून स्वतःचा फोन वापरू दिला. तो एक नेपाळी होता. त्याने यापूर्वी भारतात काम केलं होतं. फोन केल्यावर कळले कि हॉटेलवर घेऊन जाणारी बस ठराविक वेळेलाच असते. त्या गार्डने आम्हाला टॅक्सी घेण्याचा सल्ला दिला, किती पैसे होतील हेही सांगितले आणि आम्ही हॉटेल कडे रवाना झालो. आधी एक भारतीय आणि नंतर भारताचाच एक शेजारी (नेपाळी) या दोघांनी आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल खूप कृतज्ञता वाटली.
इतरांकडून मिळालेल्या ह्या चांगुलपणाच्या वागणुकीमुळे मी सुद्धा माझ्या परीने अडचणीत असलेल्या पर्यटकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. व्हिएन्ना मध्ये दोन दिवस काढल्यावर मी तिकडच्या वाहतूक पद्धतीशी चांगला समरस झालो होतो. तिकडच्या मेट्रो स्टेशन मध्ये मी प्रवेश करीतच होतो इतक्यात एका इराणी माणसाने मला एक विनंती केली. तो, त्याची पत्नी आणि दोन लहान बालके ह्यांच्या साठी मेट्रोची तिकिटे काढायचा प्रयत्न करीत होता. ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे त्याला ते जमत नव्हते. मी त्याला तिकिटे काढून दिली. परंतु दुसरा सल्लाही दिला. अशा अडचणीत आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करून इकडचे भुरटे मदत करण्याच्या निमित्ताने गंडा घालतात किंवा पाकीट मारतात त्याबद्दल त्याला सावध केले. त्याला स्टेशनवर नेऊन कुठल्या दिशेने जाणारी गाडी घ्यायची तेही दाखवले. तसेच, आदल्या वर्षी रोम मध्ये प्रवास करताना बसची किंवा ट्रामची तिकिटे कुठे मिळतात, ती बसमधल्या मशीनमध्ये व्हॅलिडेट कशी करतात ह्याबद्दल मी अनेक गोऱ्या पर्यटकांनाही मार्गदर्शन करीत होतो. थोडक्यात, आंतरराष्ट्रीय प्रवास करीत असताना “एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” हा मंत्र मी नित्य पाळत असतो.
लेखक : दीपक मच्याडो
(Email: deepak.machado@yahoo.com )
फोन: ९९६७२३८६११