पवित्र भूमी दर्शन

  •  पौलस वाघमारे, अहमदनगर

(अध्यक्ष, मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद)

आटपाट नगरात एक राजा राज्य करीत होता. राजा फार हुशार होता. असा तो स्वतःच समजत असे. परंतु त्याचे हुशारीचे अनेक नमुने जनतेने अनुभवले होते. त्यामुळे प्रत्यक्ष तोंडावर ते त्याला काहिही म्हणत नसत. मात्र त्याच्या माघारी ते त्याच्या हुशारीचे किस्से चघळून चघळून चर्वित चर्वण करीत असत. राजा उत्तरेला शिकारीला निघाला की राज्यभर दवंडी पिटायची की राजा शिकारीला दक्षिणेला निघालेला आहे. सर्व जनतेत एकच चर्चा असे की, राजा दक्षिणेला शिकारीला गेला आहे.​ याला राजाची मुत्सद्देगिरी मानली जात असे. मुत्सद्देगिरीत राजा इतर राजांपेक्षा अती विद्वान आहे अशी मान्यता होती.

एकदा असेच राजाने दवंडी पिटवली की तो दक्षिणेवर कूच करणार आहे. शिकारीत फत्ते करूनच माघारी येईन. राजाच्या कर्तबगारीवर जनतेचा मोठा विश्वास होता. जनतेने वेशीपर्यंत राजाला सोबत केली आणि वाटे लावले. तेथून पुढे राजा आणि काही निवडक सैनिक मोहिमेवर गेले. परंतु पुढे जाऊन राजाने दिशा बदलली आणि तो उत्तरेकडे गेला. हे अंधविश्वासू जनतेला ठाऊक झाले नाही.

काही दिवस उलटून गेले असतील. आणि आकाशात आभाळ भरून आले. ढगांनी दाटी केली. कधीही ओघळून खाली पडेल अशी स्थिती होती. जोराचा पाऊस होईल. असे जो तो म्हणत होता. आणि झालेही तसेच. पावसाला सुरूवात झाली. धो धो पाऊस कोसळू लागला. इतका की, तो थांबायचे नावच घेईना. पाणी वाहू लागले. सुरूवातीला ओढ्यांची पोटे फुटून पाण्याने पात्रे सोडली. नंतर नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परंतु राजा दक्षिणेकडे गेल्याचे सर्वांना ज्ञात होते. त्यामुळे सर्व जनता निर्धास्त होती. पावसाच्या बातम्या उत्तरेकडून येत होत्या. पावसाने हाहाकार माजवला होता. नदी नाले ओसंडून वाहत होते. घरेदारे, शेतीबाडीचे अतोनात नुकसान झाले होते. नदीवरचे पूल, ओढ्यावरचे पुल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. त्यामुळे दळणवळणावर परिणाम होऊन जनता आपापल्या गावात अडकून पडली होती. राजाही एका गावात अडकून पडला होता. परंतु कोणाला सांगणे, कळवणे, किंवा मदत मागवणे शक्य नव्हते. तसे करावे तर आपण जनतेची फसवणूक केली आहे. हे उघड होईल अशी भिती राजाच्या मनात होती. आणि राजा दक्षिणेकडे गेला आहे. पावसाचे संकट उत्तरेवर आले आहे त्यामुळे राजा सुखरूप आहे या भ्रमात जनता होती. जनतेला फसवणे राजाच्या अंगलट आले होते. राजा मनोमनी वरमला होता. परंतु काहीतरी करावे असे राजाच्या हाती उरले नव्हते. परंतु राजाने धीर सोडला नाही. पाऊस ओसरायची वाट त्याने पाहिली. पाऊस ओसरत्यानंतर त्याने आपल्या राज्याकडे प्रस्थान ठेवले.

दक्षिणेची मोहिम फत्ते करून राजा राज्यात परतला म्हणून जनतेने आनंदोत्सव केला. राज्यातील घराघरावर गुढ्या उभारल्या. अनेकांनी राजाला हार तुऱ्यांनी मढवले. आम्हीच राजाचे हितचिंतक आणि निष्ठावंत आहोत हे दर्शविण्यासाठी अनेकांनी उड्या घेतल्या. राजानेही मोहीम फत्ते करून आल्याचा सत्कार मोठ्या गर्वाने स्वीकारला.

परंतु आपला निर्णय चुकला होता. जनतेशी दगलबाजी करून आपण स्वतःच संकटात सापडल्याची खंत राजाला वाटत होती. म्हणून राजा काही दिवस आपल्या महालातून बाहेर आला नाही. महालातच काही तथाकथित विद्वांनाशी गुळगुळीत विषयांवर चर्चा करीत बसला.

राज्याच्या पश्चिमेकडील प्रांतातील जनतेमध्ये कुरबुरी ऐकायला येत होत्या. राजाने आपल्या दिमतीला काही अष्टप्रधान मंडळ नेमले होते. हे प्रधान मंडळ. वासरात लंगडी गाय शहाणी अशा स्वरूपाने ते बौद्धिक कुवतीप्रमाणे राजाला सल्लामसलत करत असत. आणि अष्टप्रधानातील काही विद्वानांनी दिलेले सल्ले राजा अमलात आणण्याचा प्रयत्न करीत असे. ते किती योग्यतेचे आहेत. त्यामुळे राज्याला किती फायदेशीर ठरतील याचा कोणताही सद्सदविवेक विचार राजा करीत नसे. यामुळे राज्यातील जनतेत कुरबुरी सुरू झाल्या होत्या. राज्याच्या पश्चिमेतील प्रांतातून कुरबुरी ऐकू येऊ लागल्या होत्या. तसेच दक्षितेणतील काही विभागातूनही हालचाली जाणवत होत्या. परंतु अष्टप्रधानातील विद्वानांच्या सल्ल्यामुळे राजा अशा कुरबुरींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे जनतेत असंतोषाचे वारे वाहू लागले होते. हे असंतोषाचे वारे घोंगाऊ लागले तरी तथाकथित विद्वान अष्टप्रधान आणि राजा सुस्तावल्यासारखे गप्प होते. यामुळे व्हायचे तेच झाले. कुरबुरींचे पर्यावसान बंडात झाले.

वेळीच प्रसंगावधान राखत राजाने बंड शमवले. आणि राज्यात स्थिर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका निवांत क्षणी राजा आणि त्याचे विद्वान अष्टप्रधान महालात काही गहन विषयावर चर्चा करीत बसले होते. त्यावेळी कोणी एक गरीब मनुष्य घोडा घेऊन आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एका प्रधानाने त्या घोडेवाल्याला जवळ बोलावले. त्याची चौकशी केली. कोण कुठून आला ?

शेजारच्या अश्वनगरीतून आल्याचे त्याने सांगितले. तो एक गरीब घोडे व्यापारी होता. त्याच्याकडील घोडा विकावा या उद्देशाने तो या राज्यात आला होता. त्याच्याकडील तो मरतुकडा घोडा पाहून राजाने त्याची किंमत विचारली. घोडे व्यापाऱ्याने त्याची किंमत एक लाख रूपये इतकी सांगितली. एका मरतुकड्या घोड्याची किंमत एक लाख रूपये ऐकून राजा आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. घोड्याची किंमत इतकी कशी? असे राजाने त्या घोडे व्यापाऱ्याला विचारले. महाराज हा साधासुधा घोडा नाही. मोठा गुणी घोडा आहे. अनेक गुण याच्या सामावले आहेत. परंतु तुम्ही जसे याच्याशी वागाल तसे तो तुमच्याशी वागेल. माणसांचे स्वभाव तो तत्काळ ओळखतो. इतकेच काय तो माणसांनाही ओळखतो. कोण गैरमर्जी करतो, कोण दगलबाजी करतो, कोण खोटे वागतो. हे हा गुणी तत्काळ ओळखतो. आणि प्रसंगी त्या व्यक्तीला लाथेने उडवतो. हा घोडा घ्या महाराज. तुम्हाला फायदेशीर ठरेल.

पण मला याची काय गरज. याच्यापेक्षा विद्वान लोक माझ्या दरबारी आहेत. मी मुक्या जानवरावर कशाला अवलंबून राहू ? तू पुढच्या राज्यात जाऊन तुझा घोडा विक. आम्हाला याची आवश्यकता वाटत नाही.

राजाचे हे बोलणे ऐकून घोडे व्यापारी जरा खट्टू झाला. तरिही प्रयत्न करावा म्हणून त्याने आपले म्हणणे पुढे रेटून नेले. महाराज, या घोड्याने जर जवळचे खोटे लोक ओळखून बाजूला काढले तर तुम्ही निश्चित सुरक्षित व्हाल. इतकेच नाही महाराज. आणखी एक खासियत आहे. माझ्या घोड्यात. याच्यावर बसल्यावर थेट पवित्र भूमीचे दर्शन घडते महाराज.

आता मात्र राजाचे डोळे चमकले. त्याचे कुतुहल जागे झाले. घोड्यावर बसल्यानंतर पवित्र भूमीचे दर्शन घडते हे तो पहिल्यांदाच ऐकत होता. कारण पवित्र भूमी पाहण्यासाठी खूप खर्च येतो हे तो ऐकून होता. परंतु एक लाखाचा घोडा खरेदी केला तर केवळ लाखात पवित्र भूमीचे दर्शन होईल. असा विचार राजाने मनोमन केला. घोडा खरेदी करण्याचे निश्चित झाले. घोडा खरेदी केल्यानंतर काय काय करायचे या मनोमन विचार करू लागला. कारण राज्यातील अनेक लोक राजाशी दुहेरी भूमीकेतून वागत होते. तरीही राजाला ते निश्चित कळत नसल्याने राजा त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता. परंतु हा घोडा खरेदी केल्यानंतर दुधका दूध आणि पाणी का पाणी असे राजाला करता येणे शक्य होणार होते. तरीही राजाने घोडे व्यापाऱ्याला एक अट घातली.

आम्ही तुझा घोडा खरेदी करण्यापूर्वी त्याची परिक्षा घेऊ. जर खरोखरीच आम्हाला या घोड्यावर बसल्यानंतर पवित्र भूमीचे दर्शन झाले तरच आम्ही तुला घोड्याची किंमत अदा करू. यासाठी आमचे विद्वान प्रधानजी प्रथम घोड्यावर बसतील.

जरूर महाराज. प्रधानजींनी जरूर घोड्यावर बसावं. तत्पूर्वी मला काही सांगायचे आहे.

सांग. काय तुझे म्हणणे आहे. तुझे शब्द मागे तर घेणार नाहीस ना.

नाही महाराज. मी अगदी सत्य बोलत आहे. अट फक्त एकच आहे. या घोड्यावर बसल्यानंतर जो सत्य बोलतो. म्हणजे लबाड बोलत नाही. खोटारडा नाही. पवित्र शास्त्र स्वतःसाठी प्रमाण मानतो, त्यांनाच पवित्र भूमीचे दर्शन घडते. महाराज आपण तर सत्यवचनी आहात. उभ्या पंचक्रोशीत सत्य वाचेबद्दन आपली ख्याती आहे. आपणास जरूर पवित्र भूमीचे दर्शन घडेल महाराज.

चला. खात्रीच करून घेऊ. प्रधानजी प्रथम तुम्ही या घोड्यावर बसून बघा. मग आम्ही बसून बघू.

महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानून प्रधानजी घोड्यावर बसले. इकडे तिकडे, खाली वर, लांबवर त्यांनी पाहिले. परंतु दूर दूर पर्यंत काही दिसेना. पवित्र भूमीचा मागमूसही दिसत नव्हता. परंतु नाही म्हणायची सोय नव्हती. जर काहीच दिसत नाही म्हणावे तर आपण सर्वांसमोर लबाड, खोटारडा तसेच पवित्र शास्त्र न मानणारा गणला जाणार. सर्वांसमोर आपली नाचक्की होणार ही भिती होती. मनोमन असा विचार करून प्रधानही अचानक म्हणाले.

व्वा महाराज. काय ती भूमी ! व्वा महाराज पवित्र भूमी चांदीसारखी चकाकत आहे. आहाहा काय ते तेज ! महाराज या तेजाने माझे डोळे दिपले आहेत. तुम्हीही या पवित्र भूमीचे दर्शन घ्या महाराज. असे बोलून प्रधानजी घोड्यावरून खाली उतरले. प्रधानजींनी वर्णन केल्यामुळे राजाचेही कुतुहल वाढले होते. तोही तातडीने घोड्यावर बसला. राजाने पवित्र भूमी पाहण्याचा प्रयत्न केला. दूरवर नजर टाकली. वर पाहिले, डावीकडे, उजवीकडे पाहिले. परंतु कुठेही पवित्र भूमीचे दर्शन झाले नाही. असे जर सांगावे तर आपण लबाड, ढोंगी, खोटारडे ठरणार असे राजाने मनोमन ताडले. आणि तो तात्काळ उग्दारला. व्वा. काय ते दर्शन ! धन्य झालो मी! काय चमकतेय ती पवित्र भूमी ! ख्रिस्ताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी या डोळ्यांनी मला स्पष्ट दिसत आहे. असे म्हणून राजा घोड्यावरून खाली उतरला.

राजाने घोड्याची किंमत ठरवली. आणि घोडा खरेदी केला. कसे बनवले. असे भाव घोडे व्यापाऱ्याच्या मुखावर दिसत होते.

                                                   (एका लोककथेवर आधारीत)