न्यूड
देशांच्या नकाशांतून
दृग्गोचर झालेलं तुझं शरीर
विश्वपुरूष असणं
सिद्ध करेल काय?
नद्या-कालव्यांच्या जंजाळातून
स्वच्छ पाणीच वाहतंय
याची खात्री आहे तुला?
जागतिक तापमान वाढीत
तुझ्या अंगावरची लव अद्याप
शाबूत राहिली आहे का?
श्वासांच्या दोन नळकांड्यातून
फुफ्फुसात काय जमा होतंय
हे माहिती आहे का तुला?
मल-मूत्र-वीर्यातून
काय फेकतोयस तू शरीराबाहेर
सतत
याची कल्पना आहे का तुला?
काय सांगू बाबा-
नग्नता हाच एक मोठा पोशाख असतो.
असो.
तुझी नग्नता पक्व होवो,
ही सदिच्छा.
आमिन.
– अक्षय शिंपी, कल्याण, मुंबई