— मॅटिल्डा डिसिल्वा, मर्सेस
“यावेळी जाताना मत्स्यगंधा एक्स्प्रेसने गेलो तरी येतानाची तिकिटे नेत्रावती एक्स्प्रेसची काढ.”
आमच्या अहोंची आज्ञा झाली. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आमची मुलगी उडुपीला मणिपाल युनिव्हर्सिटीत शिकत होती. मुलीला एवढ्या लांब शिकायला ठेवल्यामुळे आमचे; विशेषतः माझे तेथे खूप वेळा जाणे होत असे. आम्ही बरेचदा मत्स्यगंधा एक्स्प्रेसनेच प्रवास करायचो. कारण दुपारी दोन वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनस वरुन सुटायची. त्यामुळे ऑफिसमधून थोडे लवकर निघालो की चालायचे. एक दिवसाची सुट्टी वाचवायचा पर्याय! दुसरं काही नाही. त्यावेळेस ऑनलाईन बुकिंग हा प्रकार फारसा अस्तित्वात नव्हता किंवा मला तरी ते जमत नव्हते. पण नेहमी रेल्वेचे बुकिंग मीच करायचे. चर्चगेटला ऑफिसला जाण्याचा हा एक फायदा! तेथे महिलांसाठी एक राखीव खिडकी असायची. त्यामुळे गर्दीत उभे रहावे लागत नसे. रितसर फॉर्म भरून तिकिटे काढावी लागत.
मुलीची युनिव्हर्सिटी, तिथला परिसर तसा सुंदर होता. म्हणून नेहमी आमच्याबरोबर तेथे जाताना आमच्या नातेवाईक किंवा मित्र परिवारांपैकी कुणीना कुणी तरी सोबत असायचेच. यावेळी माझी एक जाऊ आणि एक पुतण्या आमच्याबरोबर येणार होते. आम्ही दोघे, आमचा मुलगा व ते दोघे असे पाच जणांचे मला बुकिंग करायचे होते. जाऊ शिक्षिका होती. तिची शाळा सुरू होईल त्या हिशेबाने तिकिटे काढायची होती.
दिवाळीच्या सुट्टीत ५ तारखेला जाऊन १० तारखेला परत यायचे असा आमचा बेत होता. त्याप्रमाणे मी ५ तारखेची जायची आणि १० तारखेची यायची तिकिटे काढली. सगळी तिकिटे एकाच ठिकाणी मिळाली म्हणून मी स्वतःवरच खुश झाले.
५ तारखेच्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसने आम्ही निघालो. कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे नजरेला आल्हाददायक असणारा प्रवास ! डोंगर दऱ्या, झरे आणि ओढे.. आजुबाजुला हिरवीगार शेते पाहूनच डोळे सुखावतात. तेथे पोहोचल्यावर मुलीला भेटण्याचा आनंद आणि आजुबाजुला फिरण्यात पाच दिवस कसे निघून गेले ते समजलेही नाही. शेवटी घरी परत यायचा दिवस; म्हणजे १० तारीख उजाडली. सकाळी उठल्याबरोबर सर्व सामान वगैरे बॅगेत भरणे आमचे चालू होते.
“गाडीची तिकिटे बघू दे जरा… कुठला डबा आहे ते तरी पाहून ठेवूया.” मिस्टरांनी फर्मान सोडले.
मी माझ्या पर्स मधून तिकिटे काढून दिली. त्यांनी ती पाहिली आणि ते एकदम ओरडले.” अगं गाडी गेली आपली..”
मला काही कळेचना.”तिकिटे १० तारखेचीच तर काढली आहेत…” अगदी ठासून सांगितले मी.
“हो बरोबर… पण आज पहाटे दीड वाजता ती गेली…” अहोंचा आवाज चढला.
नंतर सगळी गडबड माझ्या लक्षात आली. या वेळेस पहिल्यांदा मी नेत्रावती एक्स्प्रेसची तिकिटे काढली होती. ती एक्स्प्रेस उडुपीला पहाटे दीड वाजता येत होती. मला खरी ११ तारखेची तिकिटे काढायला पाहिजे होती, पण मी १० तारखेची रात्रीची समजुन तिकिटे काढली होती. आता आली का पंचाईत !! आता आम्हाला दुसरी परतीची तिकिटे मिळतील की नाही याची चिंता लागली; तर जाऊबाईंना शाळेचा पहिला दिवस बुडतो की काय याची काळजी.. त्यात ह्यांचा तोफखाना चालूच होता.
शेवटी आम्ही दोघेही धावतपळत उडुपी स्टेशनला गेलो. तिथल्या बुकिंग खिडकीवर एक तरुणी होती. तिला आम्ही सगळी परिस्थिती सांगितली.
“नाही ही तिकिटे चालणार नाहीत…” ती म्हणाली. म्हणजे आता दोन हजार रुपयांचा फटका. (त्यावेळी दोन हजारालाही किंमत होती)
“मग आता आम्ही काय करु ? आम्हाला आजची… (परत चुकले) म्हणजे उद्याची पहाटेची तिकिटे द्या..” मी अजिजीने सांगितले.
“मॅडम सॉरी.. बाहेर जाणाऱ्या गाड्या या स्टेशनला थांबतात ;पण येथुन त्यांचे तिकिट बुकिंग होत नाही..” तिला बहुतेक आमची दया आली असावी.
“मग आता ?” ह्यांच्या स्वरातही चिंता होती.
“तुम्हाला पुढच्या म्हणजे भटकल स्टेशनवर तिकिटे मिळतील.” ती खेदाने म्हणाली.
“म्हणजे आम्हाला आता त्यासाठी पुढच्या स्टेशनवर जावे लागेल ?” मी आश्चर्याने विचारले.
“तसेच नाही काही… इथे बरेचशे एजंट आहेत. त्यांच्याकडे चौकशी करा..” तिने पर्याय सुचवला. आम्हालाही आता दुसरं काही सुचत नव्हते. आम्ही जड मनाने परत फिरलो. इतक्यात तिने आम्हाला परत बोलावले.
“मॅडम.. मला माहित आहे तुमची गाडी सुटली आणि पैसेही गेले. मलाही खुप वाईट वाटते. एक फॉर्म मी तुम्हाला देते. तो भरुन तुम्ही कोकण रेल्वेच्या मुंबई ऑफिसला देऊन बघा. कदाचित तुम्हाला पूर्ण नाही पण काही तरी भरपाई मिळेल… एवढेच मी करु शकते तुमच्यासाठी…” तिच्या त्या चांगुलपणाने माझे डोळे भरुन आले.
आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो. मुलीकडे चौकशी केली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी ज्या एजंटकडे तिकिटे काढत असत त्याच्याकडे पोहोचलो. त्याने सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या. तोपर्यंत आमचा जीव टांगणीला लागला होता. बऱ्याच वेळाने त्याने सांगितले.
“हो जाएगा… तिकिटे मिळतील. पण आता लगेच नाही… संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सांगतो..” आमचा जीव भांड्यात पडला.
“हां पण एक गडबड आहे. तिकिटे भटकल पासून मिळतील…” तो पुढे म्हणाला.
“पण मग तिथपर्यंत आम्ही कसे जाणार ?” परत एकदा पंचाईत.
“काही नाही होणार.” तो अगदी आत्मविश्वासाने बोलला.” मी नेहमी अशीच तिकिटे देतो मुलांना. काय करायचे; इथुन भटकल पर्यंत चालू तिकीट काढायचे. चढायचे मात्र आपल्या रिझर्व्ह डब्यातच ! पुढे मग पक्क तिकीट असतेच की आपल्याकडे…”
शेवटी हो ना करता आम्ही तिकिटाचे आणि त्याचे चार्जेस असे सगळे पैसे जड अंतःकरणाने त्याला दिले.
आता संध्याकाळच्या पाच वाजायची वाट बघत बसलो. धड जेवणही त्यादिवशी झाले नाही. त्या एजंटचे ऑफिस कॉलेजच्या कॅम्पसमध्येच होते त्यामुळे आम्ही पाच वाजताच त्याला विचारायला गेलो. पण “अभी तक नहीं हुवा…” ची धुन ऐकावी लागली. अर्ध्या अर्ध्या तासाने आम्ही फेरी मारत होतो. शेवटी सात वाजता आमची तिकिटे आमच्या हातात पडली. देवाच्या कृपेने आणि नशिबाने आताही पाचही तिकिटे एकाच ठिकाणी मिळाली होती. देवाचे आभार मानून; व्यवस्थित जेवण करून (दुपारी धड जेवण झाले नव्हते; भुकेची आता जाणिव झाली) परत एकदा सगळी बांधाबांध केली. गाडीला वेळ होता म्हणून थोडावेळ झोपेची आराधना केली पण तीही आज रूसली होती.
स्टेशन तसे फारसे दूर नव्हते. मुलीचा निरोप घेऊन तिला आधीच हॉस्टेलवर सोडून आलो होतो. शेवटी देवाचे नाव घेऊन साडेबाराच्या सुमारास आम्ही निघालो. उडुपीला पोहोचलो तर स्टेशनवर एक दोन कर्मचारी आणि एखादा पॅसेंजर सोडला तर पूर्ण शुकशुकाट होता. त्यात फक्त आमच्या पाच जणांची भर पडली. एजंटने सांगितल्याप्रमाणे मिस्टरांनी उडुपी ते भटकल पर्यंतची चालू तिकिटे काढून आणली. आणि मग आम्ही साधारण आमचा डबा कुठे येईल अशा ठिकाणी; सर्व जण जांभाया देत गाडीची प्रतिक्षा करत बसलो.
पहाटे दीड वाजताच्या सुमारास; पाच दहा मिनिटे इथेतिथे नेत्रावती बाई अवतरल्या. गाडीतील बहुतेक लोक त्यावेळी झोपलेले होते. फक्त एक माणूस आमच्या आधीच्या डब्याच्या दारात उभा होता. बहुधा उडुपीला उतरणारा असावा. आम्ही आमच्या डब्यात चढलो. तिकिटे भटकल पासूनची होती त्यामुळे मनाची तयारी होती की तोपर्यंत कदाचित बसायला किंवा झोपायला मिळणार नाही. तशी गाडी फारशी भरलेली वाटत नव्हती. आम्ही आमच्या सीट जवळ गेलो आणि पाहतो तर काय ! सीट सगळ्या रिकाम्या होत्या. सगळ्यांनाच झोप अनावर झाली होती.
“चला बरे झाले, सीट रिकामी आहेत ते! बॅगा खाली ठेवा आणि झोपून टाका…” मी अगदी हर्षाने म्हटले.
आम्ही सगळ्या बॅगा व्यवस्थित लावण्यात गर्क होतो इतक्यात “तिकीट प्लिज” करून मागुन आवाज आला. मागे वळून पाहिले तर तो तोच माणूस होता जो आम्हाला वाटलं होतं की उडुपीला उतरणारा असेल. त्याने आम्हाला बरोबर पकडले होते. पण आम्ही विदाउट तिकीट तर नव्हतोच !
“अहो.. दाखवा ना त्यांना आपली तिकिटे…” मी ह्यांना सांगितले. मिस्टरांनी तिकिटे काढून टिसी कडे दिली. त्याने तिकिटे पाहिली. “ये टिकटे तो भटकलसे है.”
“हां, हमे मालुम है… म्हणूनच भटकलपर्यंतची ही चालू तिकिटे काढली आहेत आम्ही..” मी अगदी दीनवाणा चेहरा करून सांगितले.
“पण हा डबा रिझर्व्ह डबा आहे. तुम्ही इथे कसे चढलात ?” त्यांचा प्रश्न.
“हो पण एका स्टेशनचाच तर प्रश्न आहे..” आम्ही त्याला समजावू पाहात होतो.
“ते काही नाही… तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल.” त्याचा आवाज चढला. आमच्या डोळ्यातील झोप पार उडाली होती.
“किती दंड भरावा लागेल?” मिस्टर आता सकाळपासूनच्या दगदगीने कंटाळले होते.
“हर एक टिकीट का दो सौ रुपया..” टिसी महाशय उत्तरले.
“काय ?” मी किंचाळलेच एकदम. मनात हिशोब सुरू झाला. तिकिटे वाया गेली त्याचे पैसे, नविन तिकिटे काढली त्याचे आणि एजंटला दिले ते पैसे. चालू तिकिटे काढली त्याचे आणि आता हा आणखी मागतोय. बापरे ! मी ट्रिप फारच महागात पडणार बहुतेक. हे सगळे माझ्या एका चुकीमुळे. मी मनातल्या मनात मलाच कोसले. त्या टिकीट चेकरला सगळी परिस्थिती सांगितली, कळकळीने विनंती केली पण तो काही ऐकेना !
“समजा आम्ही नाही भरले पैसे तर ?” मी जरा चिडूनच विचारले.
“तो आपको ट्रेनसे उतरना पडेगा…”
“कैसे ? ट्रेन तो चल रही है.. कुद पडे क्या हम ट्रेनसे ?” माझा पारा चढत चालला होता.
“वो मुझे नहीं पता… आपको चालू टिकिट लेके जनरल डिब्बेमे ट्रॅव्हल करना चाहिए था.” महाशय ऐकायलाच तयार नव्हते. त्याला रात्रीच्या वेळेस बरोबर बकरा मिळाला होता. पण आता माझी पण सणकी फिरली.
“चला रे.. आपापल्या बॅगा घ्या.. आपण जनरल डब्यात जाऊ या…” मी रागाने म्हटले आणि खरंच आमच्या बॅगा उचलुन चालू लागलो. आता त्या टिसीची तंतरली.
“मॅडम.. ये रिझर्व्ह डिब्बा है. यहासे जनरलमे जाने के लिये रास्ता नही है..” तो आता काकुळतीला आला होता.
“ते मला माहित नाही…” आणि आम्ही दोन पावले अजुन पुढे टाकली. त्या टिसीला आणि मलाही माहित होते की आता पुढे गाडी थांबेल ती भटकल स्टेशनवरच ! आपल्या हातून सावज निसटून चालले आहे हे पाहताच टिसीने आमच्या ह्यांना एका कोपऱ्यात घेतले.
“सर जी, कुछ नहीं तो सौ रुपया तो दे दो..” आता तो दीनवाणा झाला. एवढ्या रात्री आमची झोपमोड करायला आलेल्या टिसीला, तेही सकाळ पासून एवढी दगदग झालेली असताना तसेच लटकवून ठेवावे असे वाटत होते. पण शेवटी आम्हाला त्याची दया आली. मिस्टरांनी त्याला शंभर रुपये काढून दिले. हे सर्व आटोपेपर्यंत गाडी भटकल स्टेशनमध्ये शिरत होती. गाडीचा वेग थोडा कमी झाल्याबरोबर टिसी महाशय लगबगीने उतरून गेले. त्या रात्री आमच्याकडून फारशी कमाई झाली नव्हती. आता भटकल स्टेशनवर आणखी कोणी बकरा सापडतो का ते शोधत असावा बहुतेक !!
हुश्श !! आम्ही सगळ्यांनी मोठा सुस्कारा टाकला. आता यापुढे आम्हाला या जागेवरून कोणी उठवू शकणार नव्हते. आम्ही परत आमचे सामान व्यवस्थित लावले आणि मस्त ताणून दिली.
त्यानंतर परत मात्र कधीही मी त्या नेत्रावतीच्या फंदात पडले नाही. आपली नेहमीची मत्स्यगंधाच बरी असे मानून मग त्यानेच प्रवास करत राहिलो. पण एक मात्र झाले, उडुपी स्टेशनवर त्या तरुणीने दिलेला फॉर्म भरून चर्चगेटला कोकण रेल्वेच्या ऑफिसमध्ये मी नेऊन दिला. आणि काही दिवसांनी चक्क तिकिटाचे अर्धे पैसे मला परत मिळाले. हे ही नसे थोडके !!
मॅटिल्डा ॲंथनी डिसिल्वा
भिमटवाडी, मर्सेस, रानगांव रोड,
वसई पश्चिम, पालघर -४०१२०१
९५४५०९३४३६
matildadsilva50@yahoo.co.in
बॅंक ऑफ बडोदा मधुन सेवानिवृत्त. सुवार्ता , दिवाळी अंक ‘ लिलाई’ आणि गीत, नवकिरण या नाताळ विशेषांकात लेखन. लोकसत्तामध्ये रविवारच्या लोकरंग पुरवणीत बाल मैफल मधे बालकथा लेखन.
अ ) ग्रंथाली प्रकाशन तर्फे ‘निवांत’ कथासंग्रह प्रकाशित. यासाठी मिळालेले पुरस्कार
१) मराठी साहित्य मंडळ- राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार
२) प्रकाश किरण प्रतिष्ठान – श्रीरामपूर – राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२
३) मुक्त सृजन साहित्य पत्रिका – आद्य कथाकार चक्रधर स्वामी मुक्त सृजन कथा पुरस्कार
४) वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ पुरस्कार
ब) दिलीपराज प्राकाशन , पुणे तर्फे प्रकाशित ‘ कासव येता घरा ‘ हा बालकथा संग्रह.
१) प्रकाश किरण प्रतिष्ठान – श्रीरामपूर – राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.