निर्भेळ…

  • ॲलेक्स मच्याडो, नंदाखाल, वसई

ऑफीसमध्ये पाऊल ठेवताच मुग्धाला एकदम बरं वाटलं. एवढ्या गर्दीमधून हा ऊकाडा सहन करत ऑफीसमध्ये पोहोचेपर्यंत जीव नकोसा होऊन जाई. आता अेसीमध्ये किती छान वाटत होतं.

मुग्धाने हातातली बॅग टेबलावर ठेवली. खूर्चीत बसल्या बसल्याच तीने थोडं पुढे झुकत समोरचा कॉम्प्युटर ऑन केला आणि तो बुट होतोय तोवर आपल्या पर्समधून मोबाईल काढला. ही तिची नेहमीची सवय. सकाळी कामाला सुरूवात करण्यापूर्वी एकदा मॅसेजेस वगैरे काय असतील तर बघायचे. एकदा कामाला सुरूवात केली की संध्याकाळपर्यंत वेळच नसायचा.

पहिलंच नाव वाचून ​ती जरा चमकली. ऊर्मिला सरदेसाई.  किती दिवसानंतर, नव्हे महिन्यानंतर तीचा मॅसेज आला होता… गेल्या सप्टेंबरमध्ये मुग्धाला बर्थडे विश करण्यासाठी तिने मॅसेज केला होता, तो शेवटचा. मुग्धाला जरा नवलच वाटलं. कारण एवढ्या वर्षात दिवाळी, नविन वर्ष किंवा वाढदिवसा व्यतिरीक्त ऊर्मिचा मॅसेज कधी आला नव्हता. आज काय झालं असावं अचानक?

समोरच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर सहज एक नजर टाकून मुग्धाने मोबाईलमधला मॅसेज ओपन केला.

“शेखर हॉस्पिटलमध्ये आहे. कंडीशन खूप क्रिटीकल आहे. ऊपचार सुरू आहेत, पण डॉक्टर्स तेवढे आशावादी नाहीयेत.”

मॅसेज वाचून मुग्धाला काही सुचेनासं झालं. तिच्या हृदयाची घालमेल सुरू झाली. मन एकदम अस्वस्थ झालं. तिने क्षणभर आपले डोळे गच्च मिटून घेतले.

ऊर्मि, ऊर्मिला सरदेसाई, मुग्धाची कॉलेजमधील एकदम जिवलग मैत्रिण. शेखर तिचा भाऊ. वयाने तिच्याहून दोन वर्षांनी मोठा. तो देखिल त्याच कॉलेजमध्ये. त्यांना दोन वर्षांनी सिनीअर. ऊर्मिनेच तिची आणि शेखरची ओळख करून दिली होती एक दिवस. पहिल्या भेटीतच तिला शेखर आवडला होता. देखणा होता, हुशार होता, बोलघेवडा होता. त्याच्या सहवासात वेळ कसा मजेत जाई. शेखर कॉलेजच्या कल्चरल कमिटीचा प्रमुख होता. तो स्वतः नाटकामध्ये वगैरे कामं करायचा. मुग्धाला सुध्दा नाटकात काम करण्याची खूप हौस. दोघांची मस्त गट्टी जमली. एकमेकांच्या सहवासात त्यांचा वेळ मजेत जात होता. कधी एकत्र नाटकाला जाणे, पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे, इंटर कॉलेज इव्हेंट्स अटेंड करणे असं चाललं होतं. कधी कधी ऊर्मी आणि इतर मित्र मैत्रिणीसुध्दा सोबत  असायचे. पण बऱ्याचशा वेळेला ते दोघेच एकत्र असायचे.

बघता बघता दोन वर्षे भुर्रकन ऊडून गेली. शेखरचं शेवटचं वर्ष संपलं. खूप चांगले मार्क्स मिळवून त्याने डिग्री मिळवली. रिझल्ट लागला त्याच दिवशी तो कॉलेजमध्ये आला होता. मुग्धाला भेटण्यासाठी. तिला सुध्दा खूप आनंद झाला होता. खूप दिवसानंतर दोघे एकत्र भेटले होते. दोघं संध्याकाळी बाहेरच जेवायला गेले. मस्त गप्पा मारत जेवण आटोपलं.  निरोप घेण्याच्या वेळेस शेखर मुग्धाला म्हणाला,

” मुग्धा एक विचारू?”

ती जरा गोंधळली. हा असा हडबडलाय कशासाठी ? असा काय विचारतोय हा ? किती मनमोकळेपणे आपण बोलतो नेहमी ? तिला जरा हसूच आलं.

“हो, विचार ना.” त्याच्याकडे पाहात, स्मित करत ती म्हणाली.

तो थोडासा थांबला. बोलावं की बोलू नये ह्याचा जणू तो विचार करत होता. मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत, तो तिच्या डोळ्यात पाहात  म्हणाला,

“मुग्धा तु मला आवडतेस. खूप आवडतेस.” एक क्षण थांबून तो म्हणाला, “मुग्धा, माझ्याशी लग्न करशील ?”

मुग्धाला काय बोलावे सुचेना. तिला हे सगळं अनपेक्षित होतं. तिच्या मनात हा विचार कधी आलाच नव्हता. शेखर तिला आवडत होता किंबहुना कोणालाही आवडावा असाच तो होता. त्याचा सहवास तिला खूप आवडायचा. पण त्याच्याबरोबर लग्न करून संपूर्ण जीवन घालविण्याची कल्पना तिने कधी केलीच नव्हती. तो तिच्याकडे अपेक्षेने बघत होता. त्याच्या डोळ्यात तिला आत्मविश्वास दिसत होता. त्याला दुखावणं तिच्या खूप जीवावर आलं.

“शेखर, तू मला आवडतोस. तुझी कंपनी मला खूप आवडते, एक मित्र म्हणून. आय एम सॉरी शेखर, पण तू म्हणतोस तसं… तसा विचार कधी आलाच नाही रे माझ्या मनात. मी तुझ्याकडे त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही.”

शेखरच्या चेहऱ्याकडे पाहायची हिम्मत तिच्यात राहीली नव्हती. त्याच्या डोळ्यात जाणवलेली प्रचंड निराशा आणि त्याचा ऊदास चेहरा जणू तिचं काळीज चिरत गेला होता.

त्या प्रसंगानंतर शेखरने जणू काही तिच्या जीवनातून स्वतःला पूर्णपणे बाजूला केलं. ना भेट ना संपर्क. मुग्धाने शेखरला दिलेला नकार ऊर्मिच्या देखिल अगदी जिव्हारी लागला होता. तीने देखिल मुग्धाशी आता अगदी औपचारीक संबंध ठेवले होते.

कॉलेज संपलं. थोड्याच दिवसात मुग्धाचं लग्न झालं. राजन तीला मनापासून आवडला होता. जीवनाचा साथीदार म्हणून तीच्या मनात जी काही प्रतिमा होती अगदी तसाच. राजनचा जॉब बँगलोरला. मुग्धा सुध्दा त्याच्याबरोबर बँगलोरला शिफ्ट झाली. काही दिवसांनी तिला देखिल तेथे चांगला जॉब मिळाला. दोघं तेथे चांगलेच रूळले.

कधी कधी मुग्धाला शेखरची आठवण यायची. शेवटच्या भेटीतले त्याचे ते निराशेने भरलेले डोळे आणि ऊदासवाणा चेहरा आठवलला की ती अस्वस्थ व्हायची. आपणच ह्या सगळ्याला कारणीभूत आहोत अशी सल तिच्या मनाला खात राहायची.

आज मुग्धाचा सगळा उत्साहच संपला होता. काम सुरू करावंसंच वाटत नव्हतं. मनात एक बेचैनी, खिन्नता भरून राहीली होती. अशा वेळी तिला एकाच व्यक्तीचा आधार वाटायचा…

तिने टेबलावरील मोबाईल ऊचलला आणि एक ठराविक नंबर दाबून मोबाईल कानाजवळ धरला.

“हा, बोल मुग्धा” समोरून आश्वासक स्वर.

“राजन, आज जरा लवकर येशील घरी?”

“काय झालं मुग्धा ? आर यू ओ के ?” त्याच्या आवाजात काळजी होती.

“काही नाही रे. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. महत्वाचं.”

“कशाबद्दल?”

मुग्धाने क्षणभर विचार केला.

“शेखरबद्दल, शेखर सरदेसाई.”

राजन एक क्षण काहीच बोलला नाही. 

“ठिक आहे. हे बघ मुग्धा आता बारा वाजता माझी एक मिटींग आहे. दोनेक वाजेपर्यंत मी निघतो. ओ के ? टेक केअर.”

मुग्धाने दुपारपर्यंत आपल्या टेबलावरचं काम पटापट आटपलं आणि अर्ध्या दिवसाची रजा टाकून ती दोनच्या सुमारास ऑफीसमधून बाहेर पडली.

                  ……….

मुग्धाने दरवाजावर बसवलेल्या पितळी चौकटीमध्ये अडकवलेल्या कागदावरचं नांव वाचलं ‘शेखर सरदेसाई’

पुन्हा एकदा त्या कागदी तुकड्याकडे पाहात ती क्षणभर थांबली आणि दरवाजावर हलकेच टकटक केलं. थोडा वेळ गेला आणि दरवाजा ऊघडला.

मुग्धाला पाहून ऊर्मिला एकदम आश्चर्यचकीत झाली. तीला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. मुग्धाची सुध्दा स्थिती तशीच झाली होती. किती वर्षानंतर तिच्या मैत्रिणीला ती पाहात होती. तिची दयनीय अवस्था बघून खूप दया आली तिला. मधला कटू काळ जणू वाहून गेला होता त्यांच्या ह्या भेटीने. मुग्धाने आवेगाने तिला मिठी मारली. ऊर्मीदेखिल तिच्या कुशीत शिरून मुसमूसत रडायला लागली. मुग्धाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. मुग्धाची नजर कोपऱ्यातल्या बेडवर गेली. तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. हा शेखर असेल ? काय अवस्था झाली आहे त्याची. तिने हळूच ऊर्मिला आपल्या मिठीतून बाजूला केलं आणि कॉटजवळ गेली. अस्थिपंजर झालेला एक मानवी देह त्या बिछान्यात पडला होता. हाच का एकेकाळचा राजबिंडा शेखर. तीने डबडबल्या डोळ्यांनी ऊर्मिलाकडे पाहिलं.

“त्याचा जगण्यातला ऊत्साहच संपला होता. यांत्रिकपणे चाललं होतं त्याचं सगळं. स्वतःच्या तब्येतीकडे एकदम दुर्लक्ष. स्वतःला होणारा त्रास त्याने कधी सांगीतलाच नाही.” तिचा स्वर रडवेला झाला होता.”

“माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी त्याला जबरदस्तीनेच डॉक्टरकडे घेऊन गेले. सगळ्या टेस्ट्स झाल्या. पण खूप ऊशीर झाला होता गं, मुग्धा.”

ऊर्मिला हमसून हमसून रडू लागली. मुग्धाने तिच्या पाठीवर हात टाकून तिला जवळ घेतले.

बराच वेळ मुग्धा शेखरच्या बाजूला बसून राहीली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला रडू येत होतं. त्याने एकदा आपल्याकडे पहावं, हसावं असं तिला वाटत होतं. 

“तू निघ आता मुग्धा. तुला जायचं असेल ना परत. ऊशीर होईल.”

मुग्धा ऊठून ऊभी राहीली. ऊर्मिचा हात हातात घेऊन जरासा दाबल्यासारखं केलं आणि काही न बोलता ती त्या खोलीतून बाहेर पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेली पाहून ऊर्मिला नवल वाटलं. ही गेली नाही परत ?

मुग्धा आतमध्ये येऊन सरळ शेखरच्या कॉटजवळ गेली. थोडा वेळ ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत ऊभी राहीली. खाली वाकून तीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. 

“शेखर बघ कोण आलंय तुला भेटायला. डोळे ऊघड शेखर. बघ मी काय घेऊन आलेय?”

तीने बरोबर आणलेल्या बॅगमधून एक अल्बम बाहेर काढला. एक एक फोटो पालटत ती स्वतःशीच बोलू लागली. मध्येच ती शेखरकडे पाहात होती.

“हा बघ आपल्या गॅदरिंगच्या वेळचा फोटो आणि हा आपल्या ॲन्युअल स्पोर्ट्सच्या वेळचा.”

ऊर्मि गोंधळून तिच्याकडे बघत होती. ही असं काय करतेय? 

“हा बघ आपल्या नाट्यस्पर्धेतला फोटो. आपण फायनल मारली होती, आठवतंय तुला? काय काम केलं होतंस तू शेखर? ते तुझं शेवटचं प्रदिर्घ स्वगत. मला अजून पाठ आहे ते.”

एवढं बोलून तीने अल्बम बाजूला ठेवला, त्याच्या अगदी समोर ऊभी राहीली आणि डोळे बंद करून नाटकी हावभाव करत तीने ते स्वगत म्हणायला सुरुवात केली. ऊर्मी तिला थांबवण्यासाठी पुढे झाली. तेवढ्यात तिची नजर शेखरकडे गेली आणि ती खिळल्यासारखी जागच्या जागीच थांबली. शेखर डोळे ऊघडून एकटक मुग्धाकडे बघत होता. ऊर्मीच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. आज किती दिवसानंतर तिच्या दादाने डोळे ऊघडले होते. तीने पुढे होऊन मुग्धाच्या खांद्याला हळूच स्पर्श केला. मुग्धाने डोळे ऊघडले. शेखर आपल्याकडे पाहतोय हे दिसताच तिला खूप आनंद झाला.  तीने तो अल्बम ऊचलला आणि त्याच्याजवळ जाऊन ऊभी राहीली. त्याच्यातला एकएक फोटो शेखरला दाखवू लागली. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत होते. ऊर्मिलासुध्दा बाजूला येऊन ऊभी राहीली. थोड्या वेळाने मुग्धाने अल्बम बाजूला ठेवला आणि ऊर्मिशी गप्पा मारायला सुरूवात केली. मुद्दामच कॉलेजच्या जीवनाच्या आठवणी काढत होती. शेखर कान देऊन ऐकतोय, त्याच्या डोळ्यात एक निराळीच चमक दिसतेय हे तिला जाणवत होतं. काही वेळाने शेखरला ग्लानी येऊ लागली. त्याचे डोळे पुन्हा बंद झाले. त्यादिवशी मुग्धा खूप वेळ थांबली हॉस्पिटलमध्ये. संध्याकाळी ती ऊर्मिचा निरोप घेऊन निघाली. ऊर्मिला तिच्याबरोबर दारापर्यंत आली. मुग्धाचा हात हलकेच हातात घेत म्हणाली,

“थँक्स”. मुग्धा फक्त जराशी हसली.

” मुग्धा, तू आलीस मला खूप बरं वाटलं.”

जरासं थांबून ती म्हणाली, “पण मला एक भिती वाटते गं.”

मुग्धाने प्रश्नार्थक चेहर्याने तिच्याकडे पाहीले.

“लोक ऊगाच वाटेल ते…”

मुग्धाने हातानेच तिला थांबवलं. 

“हे बघ ऊर्मी, शेखर माझा एकदम जिवलग मित्र. त्याने माझ्या जीवनात खूप आनंदाचे क्षण मला दिले. आज त्याला ह्या परिस्थितीत मी थोडे आनंदाचे क्षण देऊ शकत असेन तर तसं करणं हा गुन्हा आहे का?”

“तसं नाही गं. पण ऊद्या तुझ्या घरी समजलं…”

मुग्धाने तिला मध्येच थांबवून तिचा हात धरला आणि रूमच्या बाहेर आली. बाहेर पॅसेजमध्ये बसण्यासाठीं खूर्च्या ठेवलेल्या होत्या. मुग्धा एकदम कोपऱ्यातल्या खूर्चीजवळ जाऊन थांबली.

“राजन”

खूर्चीत पुस्तक डोळयांसमोर धरून बसलेल्या व्यक्तीने मान वर केली आणि मुग्धाला पाहून ऊभी राहीली.

“निघायचं?”

“राजन, ही ऊर्मिला. माझी फ्रेंड. शेखरची बहीण. ऊर्मि, हा राजन.”

दोघांनी एकमेकांना हॅलो केलं.

“ऊर्मि, जेव्हा तुझा मॅसेज मिळाला तेव्हा मी राजनशी बोलले. शेखरविषयी लग्नापूर्वीच मी राजनला सगळी कल्पना दिली होती. ह्या स्थितीत मी शेखरजवळ असायला हवं असा त्याचाच आग्रह होता. एवढंच नव्हे तो स्वतः रजा टाकून माझ्या सोबत येथे, मुंबईत आला. मी मुद्दामच त्याला शेखरजवळ नेलं नाही.”

ऊर्मिलाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिचा निरोप घेऊन मुग्धा आणि राजन निघाले.

त्यानंतर मुग्धा आणि  राजन रोज हॉस्पिटलमध्ये येत होते. राजन मात्र बाहेरच थांबत होता. मुग्धा रोज दिवसभर ऊर्मिलाच्या बरोबर शेखरजवळ थांबत होती. शेखर सुध्दा तिच्या वाटेवर डोळे लावून बसायचा. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली. शरीराची सगळी हालचाल मंदावत चालली होती. डोळे फक्त हल्ली त्याचे ऊघडे असायचे. मुग्धा ऊर्मिलाशी बोलताना जुन्या आठवणींना ऊजाळा द्यायची. शेखरला ह्या आठवणी आवडतात, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात हे तिने ओळखलं होतं. 

आज शेवटचा दिवस होता मुग्धाचा. रजा संपली होती. संध्याकाळीच त्यांना निघायचं होतं. सकाळपासून तिला ऊदास वाटत होतं. ऊर्मिला सुध्दा ऊदास होती. मुग्धा बळेबळे जुन्या आठवणींवर गप्पा मारत शेखरला काही आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न करीत होती. 

जायची वेळ जवळ आली. मुग्धा रूमच्या बाहेर गेली. थोड्या वेळाने ती परत आली तेव्हा तिच्याबरोबर राजन देखिल होता. ती तशीच राजनला घेऊन शेखरच्या बेडजवळ गेली.

“शेखर, हा बघ. हा माझा राजन. शेखर आम्ही निघतोय आता.” मुग्धाने मोठ्या कष्टाने आपलं रडू आवरून धरलं होतं.

शेखरने एकदा मुग्धाकडे आणि राजनकडे पाहिले. त्याच्या नजरेत कृतज्ञता आणि समाधान दिसत होतं. मोठ्या कष्टाने तो आपल्या ओठांची हालचाल करण्याचा प्रयत्न करत होता. जणू त्याला काहीतरी बोलायचं होतं.  पण त्याच्यात तेवढं देखिल त्राण नव्हतं.

मोठ्या कष्टाने त्याने आपला ऊजवा हात हळूहळू थोडा वर केला. राजनच्या आणि मुग्धाच्या दिशेने आपला हात हालवण्याचा मोठ्या कष्टाने तो प्रयत्न करत होता. जणू काही तो त्यांचा निरोप घेत होता. त्याच्या ओठांवर सौम्य हसू ऊमटले होते. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या दोन कोपऱ्यातून निघालेले अश्रूंचे थेंब त्याच्या कानापर्यंत पोहोचले होते. मुग्धाला रडू आवरत नव्हते. राजन तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेऊन तिला धीर देत होता. ऊर्मिला तोंडावर हात ठेऊन हुंदका दाबून ठेवायचा प्रयत्न करीत होती.

अचानक शेखरचा हात निर्जीवपणे खाली पडला. मान एका बाजूला कलली आणि डोळे निर्जीव झाले.. ‘दादा’ असा टाहो फोडत ऊर्मिला शेखरच्या निर्जीव देहावर कोसळली होती.

मुग्धा शेखरच्या खांद्यावर मान टाकून हुंदके देत होती. तीचा मित्र निघून गेला होता, कायमचा. पण जाताना काही आनंदाचे क्षण सोबत घेउन गेला होता.

एका निर्भेळ नात्याचा अंत झाला होता…….