निर्णय
- बॅप्टिस्ट एम वाझ. दारसेंग, गोम्सआळी
मो. 9970650757
एलीस आज खूप खुश होता. त्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. खूप हलकं वाटतं होतं त्याला! त्याचं फार दिवसाचं स्वप्नं आज पुर्ण झालं होतं. खूप संघर्ष करुन, कष्ट उपसून त्यानं ते स्वप्नं सत्यात उतरवले होते. पण का कोण जाणे त्याला आज आईची राहुन राहुन आठवण होत होती. त्याचं एक मन सांगत होतं की आई आज आपल्यात असायला हवी होती. पण दुसरं मन सांगत होतं की आई आपल्याला सोडून पैलतीरी गेली हे चांगलेच झाले. नाही तर आई या नवीन घरात घुसमटली असती.
नव्या कोऱ्या घरात भिंतीवरील आईच्या तसबिरीकडे पाहून त्याचं मन गलबललं. आईच्या आठवणीने डोळे पाणावले. अश्रू गालांवर ओघळले. त्याला कौलारू घरातील आपले बालपणीचे दिवस आठवले. शेणाने लिंपलेली भिंत आठवली. सारवलेली जमीन आठवली. बाबांच्या मृत्यूनंतर आईचे कष्ट आठवले. स्वतःचा संघर्ष आठवला. बहिणींची लग्ने, मुलांचे संगोपन व शिक्षण यांत डोक्यावरचे केस पांढरे कधी झाले हे त्याला कळलेच नाही. एलीस जून्या आठवणीत रमून गेला. एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याचं आयुष्य त्याच्या डोळ्यासमोरून उलगडत गेलं.
एलीस आपल्या दोन काकांसहीत एकाच घरात राहत होते. चुलत भाऊ-बहिणी बरोबरचे त्याचे संबंध खेळीमेळीचे होते. एलीसची आई घरातील मोठी सून असल्यामुळे सर्व घर तीच सांभाळत होती. काकांची मुलं एलीसच्या आईला मोठी आई म्हणत तीच्या अवतीभवती फिरत असत. आईसुद्धा त्यांना काय हवं नको ते पाहत असे. तीनं त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यामुळे घरात आईचा शब्द प्रमाण मानला जाई.
एलीसचे बाबा मुंबईत भाजीपाला घेऊन जात असे. दूर्दैवाने रस्ता क्रॉस करतांना बाबांचा अपघात झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मग आईने आपलं सगळं आयुष्य सगळ्या कुटुंबासाठी खर्ची घातलं. काळ पुढे सरकत होता. मुले मोठी झाली. शिकली, सवरली, नोकरीला लागली. त्यांची लग्न झाली. त्यांनाही मुलं झाली. आईने सगळ्या सुनांची बाळंतपणे हौसेने पार पाडली. सगळ्या जावा, सुना, दीर, त्यांची मुलं, नातवंडे आईचा आदर राखत असत. आई खूश होती. त्यांच्या संसारात रमली होती.
त्यातच कुटुंब वाढत होते. जागा अपुरी पडू लागली. घरातील सोयीसुविधा कमी वाटू लागल्या. आधुनिक विचारांच्या मुलांना कुडाच्या घरात राहणे कमीपणाचे वाटू लागले. मोठ्या काकांच्या मुलांनी नवीन घर बांधण्यासाठी आपल्या वडिलांच्या मागे लकडा लावला. परंतु घर बांधण्यासाठी जागा पाहिजे होती. रस्तेच्या कडेला घर बांधण्याएवढी जागा होती. आईला कसं विचारावं या विवंचनेत काका पडले होते. शेवटी मनाचा हिय्या करून काका आईकडे गेले व मुलांची इच्छा बोलून दाखविली. आईने मोठ्या मनाने जागा देऊ केली परंतु नातवंडे आपल्या पासून दूरवणार हे जाणून आईला खूप वाईट वाटले. पुढे काकांचे घर पुर्ण झाले. गृह प्रवेशच्यावेळी आईच्या हस्ते फीत कापून नव्या घराचे उद्घाटन करण्यात आले.
गृह प्रवेशाचा कार्यक्रम आटपून आई आपल्या कुडाच्या घरी आली. आज मोठ्या दिराची मुलं आपल्या अवतीभवती नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. स्वतःची मुलं जवळ असुनही तिला पहिल्यांदा एकटेपणाची जाणीव झाली. दिवसामागून दिवस जात होते. तसतशी नातवंडे मोठी होत होती. वयाने आणि शिक्षणानेही. त्यांना परदेशात नोकरी करून तेथेच स्थायिक व्हायचे वेध लागले होते. कालांतराने लहान दिराची मुलंही नोकरी निमित्ताने परदेशात गेली व तेथे स्थायिक झाली. आता त्या मोठ्या घरात आईसोबत फक्त मुलगा एलीस व लहान दीर उरले. घरात शांतता पसरली होती, जणू घराने मौन धारण केले आहे असं वाटायला लागलं.
आणि तो दिवस उजाडला. पतीच्या निधनानंतरचा तो सर्वात काळा दिवस! त्याला कारणच तसं होतं. एलीस आपल्या काकासोबत आईकडे गेले व राहतं घर तोडून तेथे बंगलो वजा दोन वेगळी घरं बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव ऐकून आईच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तोंडातून शब्द फुटेना. “आई काय होतं तूला? बरं वाटत नाही का तुला” एलीस बोलला. “पोरा, उद्या बुधवार सूकूर मावलीचा नोव्हेना. मी मिस्सा ऐकून आल्यावर माझा निर्णय तुम्हाला सांगते. आईने धापा टाकत कसे बसे शब्द उच्चारले व जड अंतःकरणाने हिंदोळ्यावरुन उठून ती आत गेली.
रात्री आईला झोप लागत नव्हती. ती या कूशीवरून त्या कूशीवर फिरत होती. पण निर्णय होत नव्हता. अखेर डोळे सताड उघडे ठेवून ती छताकडे पाहू लागली. तीला या घरातील जुने दिवस आठवू लागले. मुला-मुलींची लग्ने, मुलींना सासरी पाठवणी करताना दिलेला निरोप, मूलींची बाळंतपणं, नातवंडे परदेशी जाताना आपल्या अनावर झालेल्या भावना, आपल्या पतीला दिलेला अखेरचा निरोप या आठवणीत रमली असतांना हळूहळू तीच्या कानावर घर तोडायला आलेल्या मजूरांचा आवाज ऐकू येऊ लागला. घराच्या भिंती तोडताना तीच्या डोळ्यासमोर दिसू लागल्या. छतावरील कौलं खाली फेकतांना ती फूटल्यांचा व त्यांचे छिन्नविछिन्न तूकडे होतांना तीला दिसू लागले. कटवणीने घराचे वासे घरापासून अलग होतांना दिसू लागले. ‘मेडी’ कापताना करवतीचा आवाज ऐकून जणू करवत आपल्या शरीराचे अवयव कापून काढत असल्याचा तीला भास होऊ लागला व ती निग्रहाने मी असं नाही होऊ देणार असे बडबडू लागली.
सकाळी आई मिस्साला जाण्यासाठी का उठली नाही हे पाहण्यासाठी एलीस आईच्या खाटेजवळ गेला. त्याने आईला हाक दिली. परंतु आईने हाकेला प्रतिसाद दिला नाही. परंतु आईचे डोळे सताड उघडे होते जणू ती छताकडे डोळे भरून पाहत होती. त्याने तिचा हात हातात घेतला. तो थंडगार पडला होता. तो काय समजायचा तो समजला. दुःखातिरेकाने त्याने आई अशी हाक मारून टाहो फोडला. हे ऐकून काका धावून आले. दोघांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होते. भावना अनावर होऊन एलीसने भरल्या डोळ्यांनी काकांकडे पाहिले. त्यांना आईचा निर्णय कळला होता. पुढे होऊन काकांनी छताकडे पाहत असलेले आईचे डोळे विदीर्ण अंतःकरणाने मिटून टाकले….!