निराशा – पेट्रेशिया गोन्सालवीस

निराशा

  •  पेट्रेशिया गोन्सालवीस,

                                      बोरीवली पश्चिम

         “हॅलो ममी, मी मॅसेज केला आहे सकाळी तुम्हांला, तुम्ही वाचला नाही म्हणून मग मी फोन केला.”

         “बोल ना काय सांगतेस? “

         “माझी टेस्ट पॅाझीटीव्ह आली आहे.”

         “बापरे ! आता… १४ दिवस क्वॅारांन्टाईन राहावे लागेल. अरेरे, हा कोरोना कधी सोडणार आपल्याला.”

         “मम्मी, ऐका नीट पुढचं. कोरोनाची नाही. मी सकाळी प्रेगन्सी टेस्ट केली ती पॅाझीटीव्ह आली आहे. तुम्ही आजी होणार…”

         “खरंचsss wow… what a lovely news.” तिला विश्वास बसला नाही कारण मागे हटकले तेव्हा सून म्हणाली की आम्हाला अजून वेळ हवा आहे. मग तीही गप्प बसली होती.

         “आता सांभाळ हं, मेट्रो पकडताना घाई नको. एस्केलेटरवरून सावकाश… धावपळ नको… बरं खायला काय बनवू तुला…”

         “मम्मी थांबा… मी घरी आल्यावर बोलू. ठेवते फोन…”

         फोन बंद झाला होता तरी तीचा फोन कानाशीच आणि सल्ल्याची सरबत्ती चालूच होती. नंतर लक्षात आल्यावर फोन ठेवून ती घरातल्या जीजसच्या स्टॅच्यूजवळ गेली आणि आभाराची प्रार्थना केली आणि एक मागणेही मागितले देवा, एक गोंडस मुलगी माझ्या घरी येऊ दे रे… मला दोन मुलगेच.. मुलीची मला भारी हौस…आता नातीच्या रूपाने भरून निघू दे रे.

         सुनेचे कोडकौतुक करण्यात किती रमली ते सांगताच येत नाही. तिला गोडधोड, तिखट चटपटीत खाऊ घालणे, विश्रांती, ॲाफीसला जाताना जास्तीचे डबे, डोहाळे पुरवण्यात इतकी रमली की घरात इतर सदस्य आहे याचे भानच नाही. विणकाम येत होते मग येणार्‍या बाळासाठी मोजे टोपडी विणायला घेतली.

         लेक म्हणाला, “ममी, हल्ली बाजारात छान छान हवे तसे warm cloths मिळतात. तू कशाला मेहनत करतेस इतकी.”

         “तुला नाही कळायचं.. स्वतः विणलेल्या स्वेटरचा आनंद काय असतो.”

         बेबीशॅावरचा कार्यक्रमही ऊत्साहाने पार पाडला. आजूबाजूच्या बायका नात्यातल्या बायांना बोलावून शिस्तबद्ध असा बेबीशॅावर कार्यक्रम केला. रिटर्नगीफ्ट सुद्धा थोडे हटकेच दिले. सगळ्या आलेल्या बायकांनी तोंडभरून कौतुक केले. आणि प्रथेप्रमाणे सुनेला पहिले बाळंतपण म्हणून माहेरी बोलावून नेले.

         सुनेचे दिवस भरले आणि एके सकाळी तिच्या ममीचा फोन आला.. “तिला दुखतंय आम्ही हॅास्पीटलला नेतोय तुम्ही या. मुलांसोबत सगळे घरचे हॅास्पीटलला दाखल झाले. दुपारच्या सुमारास सुनेला लेबररूममध्ये घेतले. ३ वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज आला तसे सगळेच आतुरतेने लेबररूमच्या बाहेर थांबलेले सगळेच पुढे धावले. डॅा.नी हातातले बाळ दाखवले… मुलगी झाली… कानात कोणीतरी सनई चौघडे वाजवत आहे असा भास सासूला झाला. तिने आनंदाने स्वतः भोवती एक गिरकी घेतली….म्हणाली तीस वर्षे तुझी वाट पाहात होते… मला नाही पण नातीच्या रूपाने तू आलीस माझ्या घरी… thank you Jesus… praise the lord… Thank you Mother Mary.

         किती कौतुक… तिच्या नवरोबाने बाळाचा फोटो काढण्यासाठी सक्त विरोध केला पण तिने हळुच मोबाईलवर क्लीक केला आणि नवजात परीची छबी आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त केली. सगळ्यांचे अभिनंदनाचे फोन, मॅसेज.. कोडकौतुकाला ऊधान आलेले.. सहा महिन्यासाठी बाळ बाळंतीण तिच्या ममीच्या घरी त्यामुळे बहुदा रोजच सासूच्या फेर्‍या तिकडे होत असत. छकुलीने थोडंसं हसायला सुरूवात केली त्याचे हिला किती नवल. ६ महिने भुरकन कसे भरले कळालेच नाही. सासूने बाळाच्या संगोपनाचे नवनवीन विडीओ पाहून स्वतःला अगदी सज्ज ठेवले होते. अंगाईगीते पाठ केली…. बाळाचा आहार. तिच्याबरोबर बोबडे बोलणं, तिला न्हाऊ घालणे . बडबडगीतांची यादी रंगीबेरंगी झबली, छोटीची खोली सजवणे नानाविध खेळणी जमविणे अशी तयारी चालू होती. छकुली म्हणजे तिचे जग झाले होते.

         आणि एके संध्याकाळी चहा घेत असताना मुलगा म्हणाला, “मम्मी, छोटी येत्या रविवारी आपल्या घरी येणार आहे”. “अरे..बाळंतसण म्हणतात त्याला…थोडे पाहुणे येतील, जेवणाची तयारी…तिच्या मदरीन पदरीनला आमंत्रण”

         “हो मम्मी करू आपण… पण एक महत्त्वाचे सांगायचे आहे… मागे बघ हिच्या सोनोग्राफीच्या दिवशी माझा एक interview होता, त्या कंपनीत माझे सिलेक्शन झाले आहे पण त्यांची एक अट आहे. मला हॅागकॅागला मुव्ह व्हावे लागेल. मी होकार दिला आहे कारण पॅकेज चांगले आहे.” एका दमात तो बोलला.

         “अरे, पण मग आपली छकुली..”

         “मम्मी, आम्ही तिघेही मुव्ह होतोय.”

         “काय sss.”

         “हो मम्मी… म्हणून तर तिचा पासपोर्ट काढला एवढ्या घाईत…”

         स्मशान शांतता….

         “तुझे व्हिसाचे सोपस्कार झाले सुद्धा…”

         “हो मम्मी … पप्पाना माहीत आहे सगळं… तर असं आहे त्यामुळे छोटी आपल्या घरी महिनाभरच राहील. दोनेक महिन्यात आम्ही निघतोय.”

         “कायsss…” तिच्या कानात कुणीतरी गरम शिसे ओतत आहे असं वाटले… हातातला अर्धवट प्यायलेला चहाचा कप खाली पडला..

         “मम्मी तू इतकी का पॅनिक होतेस?? अगं परदेशात जाणे हे आता कॅामन झाले आहे…आणि मी काय दर वर्षी येईनच सुट्टीला… शिवाय फोनमुळे जग किती जवळ आले आहे. सकाळ संध्याकाळ फोन असेलच…”

         “अरे पण… .मी किती स्वप्ने रंगवली आहेत…माझी परीबरोबर खेळण्याची, तिला स्ट्रोलरमधून गावभर फिरवणे, ती जरा मोठी झाली की गायन क्लासला, प्ले ग्रुपला घेऊन जाणार, डान्सला घालणार.. माझ्या साडीला मॅचिग तिचे फ्रॅाक असावेत म्हणून मी नवीन साड्यातले ब्लाऊजपीस तिचे फ्रॅाक शिवण्यासाठी ठेवले आहेत.” तिला पुढे बोलवेना…

         तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. किती सहज बोलतो हा….जसं सांगतोय की मी जरा नाक्यावर जाऊन येतो. घोर निराशा झाली होती… डोळे डबडबलेले जीव घशात अडकला जणू…. तशीच उठली आणि जिझसच्या स्टॅच्यूजवळ गेली… त्याला विचारले हे तर तुझ्याकडे न मागता दिलेस का…. निराशा.. घोर निराशा.. ती रडरड रडली… आणि यंत्रवत बाळंतसणाच्या तयारीला लागली..

पेट्रेशिया गोन्सालवीस.

बोरीवली पश्चिम

सेवानिवृत्त शिक्षिका (M.A., B. Ed.)

सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक   पुरस्कार

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार.