नितळ निर्मळ अर्थात  ‘फादर संजीवप्रसाद परेरा’ – प्रा. नेहा सावंत

नितळ निर्मळ अर्थात  ‘फादर संजीवप्रसाद परेरा’

  •  प्रा. नेहा सावंत, दहिसर

मोबाईल- 9920180183

कल करेसो आज कर, आज करेसो अब असं कबिराने म्हटलंय, आपल्याला ते कळतं पण अंगी वळत नाही, हेच खरं. माझ्याबाबत अनेकदा असं घडलंय, घडतंय. आणि मग पश्चाताप करण्याखेरीज हाती काहीच उरत नाही. असच काहीसं झालं. गेला महिनाभर फादर प्रसाद परेरांना फोन करीन म्हणत एकेक दिवस पुढे ढकलत राहिले आणि अचानक  झकेरिया तुस्कानोंचा फोन आला रविवारी सकाळी “फादर प्रसाद परेरा पहाटे ३ वाजता गेले.” क्षणभर काय बोलावं तेच कळत नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी फादरांनी स्वतःच फोन करुन, माझ्या संशोधन प्रबंधाची चौकशी केली होती. बोलता सहज म्हणाले, “मी आता पार्ल्यात नाही रहात, बांद्र्याच्या चर्चमध्ये शिफ्ट झालोय.” मी का असं विचारताच अगदी सहजपणे म्हणाले, “नेहा, आता कॅन्सरने मा गस्पाट धरलॅ. नेहा, मला कॅन्सर झालाय, इथे राहून ट्रीटमेंट करणं सोयीचं जातंय.” इतक्या असाध्य आजारावर असा विनोद केलेला पाहून मीच अस्वस्थ झाले. मलाच काही बोलता येईना. तर ते मलाच धीर देत म्हणाले, “मला तॉ परमेश्वर हांभाळदॅ”. परमेश्वराविषयीचा असीम श्रद्धाभाव हीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती. त्यांना कॅन्सर झालाय हे ऐकल्यावर मला धक्का बसला, पण ते अगदी शांत होते, स्थितप्रज्ञासारखे. मी म्हटलं, “फादर, मी तुम्हाला भेटायला येऊ शकते का ?”

त्यावर ते म्हणाले, “तसं बाहेरच्यांना भेटण्याची परवानगी नाही. इथले नियम वेगळे आहेत “

मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून केवळ फोन वरून त्यांची चौकशी करूया असं ठरवलं. शांतच असायचे. आता ते सगळंच संपलं होतं. फादर आता कधीही दिसणार नाहीत, त्यांचं ते लहान निरागस मुलाप्रमाणे चेहऱ्यावर उमटणारे हसू कधीच दिसणार नाही, या जाणिवेने गलबलून येत होतं. मनात फादरांसोबत झालेल्या भेटी आठवत होत्या.

एका कुपारी महोत्सवात मी ‘लिवीती वाशीती ओबाय माजी’ हे गीत ऐकलं. मला ते पारंपरिक लोकगीत आहे असं वाटलं. पण चौकशी केल्यावर कळलं हे गीत फादर संजीवप्रसाद परेरा यांनी रचलेले आहे. म्हणजे हा ‘लौकिक गीता’ चा प्रकार आहे, याची जाणीव झाली. लौकिक गीत म्हणजे विशिष्ट व्यक्तीने त्याची रचना केलेली असते, परंतु त्या गीताचा बाज लोकगीतासारखा असतो, तसेच कालांतराने या गीताचा प्रचार, प्रसार एखाद्या लोकगीतासारखा होतो. या गीताबाबत असेच झाले होते. अशी आणखी गीतेही फादरांकडून मिळू शकतील, त्यांना भेटलंच पाहिजे असं मनोमन वाटू लागलं. चौकशी अंती वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. कुणी म्हणालं ‘फादर कुर्ल्याला असतात.’ कुणी म्हणालं ‘फादर आजारी असतात.’ कुणी म्हणालं ‘फादर पार्ल्यात असतात ‘  मी त्यांचा नंबर मिळवला. पण ते आजारी असतील या समजुतीने फोन करण्याची टाळाटाळ करू लागले. आणि कुर्ल्यात असतील तर, इतक्या लांब कसं जायचं या विचाराने मी आळस करत होते. पण एक दिवस अगदी ठरवून फोन केला. तेव्हा त्या पहिल्या फोनवरून फादरांचा आवाज आणि सूर खूप प्रसन्न आणि आश्वासक वाटला. ते पार्ला स्टेशनजवळच्या चर्चमध्ये रिटायरमेंट होममध्ये राहतात, हे कळल्यावर मला खूप हायसं वाटलं. आता दिरंगाई करायची नाही, असं मनाशी ठरवून दुसऱ्याच दिवशीची त्यांची भेटीची वेळ निश्चित केली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजची लेक्चर्स संपवून साधारण २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. ‘फादर’ या उपाधीचं, पदाचं नाही म्हटलं तरी मनावर दडपण होतंच. पार्ल्यातल्या चर्चमधल्या धर्मगुरूंच्या निवासस्थानी जाण्याची माझी तशी पहिलीच वेळ होती. पहिल्या मजल्यावर गेले. डाव्या बाजूला एक समुपदेशन कक्ष होता. त्याला लागूनच मोठा डायनिंग हॉल होता, त्याच्या शेजारी स्वयंपाकघर. आणि स्वयंपाकघरासमोर उजव्या बाजुला एका रांगेत दोन तीन केबीनवजा खोल्या. पहिल्या केबिनमध्ये फादर होते. आत शिरताच मोठ्या टेबलसमोरच्या खुर्चीत फादर प्रसाद परेरा बसले होते. त्यांच्या टेबलाच्या मागच्या बाजूला बाथरूम होतं, एका बाजूला छोटासा पलंग वजा बैठक होती. मधोमध लांबलचक पडद्याचं पार्टीशन होतं. अगदी छोटीशीच परंतु स्वच्छ आणि अगदी नीटनेटकी खोली होती ती.  त्यांनी छान हसून माझं स्वागत केलं. त्या स्वागताने माझं दडपण कमी झालं.

फादर काहीतरी लिखाणाचं काम करीत होते. त्या टेबलावरच्या काचेच्या खाली फादरांचे वेगवेगळ्या वयातले, वेगवेगळ्या रुपातले भरपूर फोटो हारीने लावलेले होते. त्या फोटोंवरून फादरांच्या रसिकतेची आणि कलासक्त वृत्तीची कल्पना येत होती. त्यातील एका फोटोने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनयाचा शहेनशहा, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या शेजारी बसून गप्पा करत असलेले फादर पाहून मला आश्चर्य वाटलं. मी त्याबद्दल विचारताच ते म्हणाले, कुर्ल्याच्या चर्चमध्ये असताना, एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून अमिताभ बच्चन यांना बोलावलं होतं. कुर्ल्याच्या चर्चमध्ये त्यांनी बरीच वर्ष सेवा दिली होती, खूप वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले होते. त्या उपक्रमांचे बरेच फोटो त्या टेबल वरच्या काचेखाली होते. काही फोटो नाटकात अभिनय करतानाचे होते. एका फोटोत तर फादर प्रसाद परेरा यांनी चक्क स्त्रीवेश धारण केलेला होता. तो फोटो अर्थातच त्यांच्या तरुणपणातला होता. एका मराठी नाटकात त्यांनी स्त्री भूमिका केली होती म्हणे. मला हे सगळं ऐकून गम्मत वाटली. वसई, विरार परिसरातील चर्चमध्ये सेवा देत असताना त्यांनी इथल्या तमाम रसिक लोकांसाठी अनेक मराठी नाटकांचे प्रयोग करून घेतले होते. ते रसिकवृत्तीचे होते हे त्या फोटोंवरून लक्षात येत होतं. जवळजवळ प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने काढलेले फोटो, त्या टेबलवरच्या काचेखाली होते. म्हणजे ७५ पर्यंत त्यांच्या व्यक्तीमत्वात आणि शरीरयष्टीत काय बदल होतोय किंवा झालाय हे पाहण्याचं त्यांचं कुतूहल असावं. कारण ते कुतूहल सतत त्यांच्या नजरेत जाणवायचं, एखाद्या निरागस बालकासारखं.

पहिल्या भेटीतच त्यांनी त्यांची २ पुस्तकं मला भेट दिली. त्यातील एक पुस्तक म्हणजे बायबल मधील छोट्या छोट्या गोष्टींचे संकलन. आणि दुसरे पुस्तक म्हणजे  ‘रविवारची देवशब्द पेरणी’. परदेशदौरा हे प्रवासवर्णनही प्रकाशित झालं आहे. सुखी जीवनाचा मार्ग, माझी क्रुसाची वाट, माझ्या बालकविता, देवपिता मुलांशी बोलतो अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. काही पुस्तकं अनुवादित केली होती त्यांनी. शिवाय एका पुस्तकाच्या अनुवादाचं काम सुरू होतं. एकूण ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, पण म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही असं मला वाटतं. याखेरीज छोट्या चुटक्यांचे संकलन हसा आणि हसवा या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले दाखवले, यावरूनही त्यांच्या मिश्किल स्वभावाचा अंदाज येत होता. हसणे आणि हसवणे या दोन गोष्टी तणावरहित जीवनाचा मंत्र आहे, यावर त्यांचा विश्वास होता. प्रत्येक भेटीत ते काहीना काही जुन्या गोष्टी सांगून वातावरण हसतं ठेवत. त्यांना मी कधीही उदास, हताश पाहिलं नाही. त्यांना भेटायला जायची माझी वेळ १.३० ते २.०० या दरम्यानची असे. खरंतर मला त्यावेळी जाताना थोडं अपराधी वाटत असे, कारण साधारणपणे ही वेळ वामकुक्षीची असे. पण फादरांना माहीत होतं, की मी कॉलेज आटपून तडक येते, त्यामुळे माझ्या सोयीसाठी ते एक दिवस त्यांचा दिनक्रम थोडा बदलत असावेत. मला अपराधी वाटू नये म्हणून मला म्हणत,”मी दुपारी झोपत नाही. जेवून झाल्यावर वाचत बसतो”. आणि खरोखरच मी ज्यावेळी जात असे तेंव्हा ते छान इस्त्री केलेला शर्ट पँट घालून मोठ्या टेबलाजवळ खुर्चीत बसून वाचत असत. टेबलवर नेहमीची दोन चार पुस्तकं असायचीच. एखाद्या नव्या विषयावर काही सुचेल ते लिहायचे, कधी भाषांतर करायचे, कधी प्रवचनाच्या मुद्द्यांची मांडणी करायचे किंवा एखादं छानसं पुस्तक वाचून, ते तुम्हीही वाचा असा आग्रह मला करायचे. एकंदरीत सतत कार्यमग्न राहण्याचा त्यांचा स्वभाव होता.

वेगवेगळ्या भाषा बोलण्याची कलाही त्यांना अवगत असावी. कारण ते ज्या चर्चमध्ये राहत होते, तिथे स्वयंपाक करणारी बाई गोवन ख्रिश्चन होती. ती फादरांशी कोकणी भाषेत बोलायची.  फादर तिला कोकणी भाषेतूनच विचारायचे, “आज किते रांधला ?” मग ती काहीतरी उत्तर द्यायची त्यावर फादर मजेशीर काहीतरी बोलायचे की ती हसतहसत तिच्या कामाला निघून जायची. दुपारच्या वेळी काही जोडपी सुद्धा मार्गदर्शनासाठी यायची, अशावेळी मी स्वतःहून बाहेरच्या कोरिडॉरमध्ये थांबायची. पाच दहा मिनिटातच ते जोडपं हसतहसत बाहेर पडायचं, मघाशी आत शिरताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तणाव दूर झालेला असायचा.

फादरांच्या बोलण्यातून जाणवायचं की त्यांनी अनेक आजारांचा सामना केला असावा. पण सकारात्मक दृष्टिकोन आणि परमेश्वरावरील असीम श्रध्दा यामुळेच ते नव्या उमेदीने पुन्हा उभे राहायचे. माझी त्यांची भेट झाली त्याच्या वर्षभर आधीच ते एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे गेले होते. माझी त्यांची भेट झाल्यानंतर त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया झाली होती. तसे ते शारीरिक दृष्ट्या थकले होते, पण मनाची उभारी मात्र तशीच होती. काहीतरी लेखन करीत राहण्याचा उत्साह कायम होता.

बालपण आणि आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. फादरही त्याला अपवाद नव्हते. किंबहुना फादरांनी आपल्या मनात बाल्य जपलेलं होतं, एक लहान निरागस मुल त्यांच्या हसण्यातून, डोळ्यातून लपलेलं सतत जाणवायचं. फादर संजीव प्रसाद यांनी आपली संज्यावची बाल्यमुर्ती मनात जागीच ठेवली होती. प्रत्येक भेटीत ते त्यांच्या आईची आणि स्वतःच्या बालपणातील एक तरी आठवण सांगायचेच. ती सांगत असताना ते भूतकाळात हरवून जात असत. विशेषतः आईविषयी बोलताना ते ‘फादर’ वाटत नसत तर अगदी लहानगा ‘संज्याव’ डोळ्यासमोर उभा रहात असे, अर्थात फादरांची आठवण सांगण्याची हातोटीच तशी होती. फादरांच्या आईला ऐन तारुण्यातच वैधव्य आलं होतं. पाच सहा मुलांचा कुटुंब कबिला सांभाळण्यासाठी ती दारू बनवून विकत असे. लहानग्या संज्याववर तिचे विशेष प्रेम होते, कारण तो अभ्यासात हुशार होता. तो काळ साधारण ७५ वर्षापूर्वीचा. गावात वीज नव्हती, अशावेळी ही शाळकरी मुलं चर्चमध्ये किंवा धर्मगुरूंच्या खोलीत जाऊन अभ्यास करीत असत. त्यावेळचे अनेक किस्से फादर प्रसाद अगदी रंगवून सांगत असत.

एके दिवशी मी त्यांना माझ्या अभ्यासाबद्दल सांगत होते, त्यांना म्हटलं,”फादर, मला कुपारी बोलीतील कथा, कविता, कादंबरी, ललितलेख, प्रवासवर्णन असे सगळे प्रकार मिळाले आहेत, पण आत्मचरित्रात्मक लेखन कुणीही केलेलं दिसत नाही. अर्थात त्याचवेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘नाही मी एकला’ हे सुंदर आत्मकथन प्रकाशित झालं होतं, पण ते मराठी भाषेत होतं, त्यात कुपारी बोलीचा वापर केलेला होता पण अगदी अल्प प्रमाणात. तेव्हा फादर संजीव प्रसाद मला म्हणाले,”मी तुम्हाला १५ दिवसांनी फोन करतो, काहीतरी लिखाण तुमच्यासाठी तयार ठेवतो.” मला थोडं आश्चर्य वाटलं, पंधरा दिवसात आत्मकथन कसं शक्य आहे ? पण ते वचनाला पक्के होते. त्यांनी बरोबर १५ दिवसांनी मला फोन केला, मी त्यांना भेटायला गेले. “नेहा, मी तुमच्यासाठी एक गंमत ठेवली आहे” असं म्हणून एक हाती शिवलेली त्याला खाकी पुठ्ठ्याचं कव्हर असलेली ५० पानांची वही माझ्या हातात ठेवली. त्या वहीवर मोठ्या ठसठशीत अक्षरात ‘मोन्सेनियर एल. सी. डिसोजायो येदी’ असं शीर्षक होतं. माझ्यासाठी फादरांनी असं लिखाण केलंय पाहून मन सद्गदित झालं.

पण गंमत अशी आपलं लिखाण आपण कधी एकदा वाचून दाखवतो याची घाईच त्यांना झालेली असायची, अगदी एखाद्या निरागस बालकाला आपली एखादी गोष्ट सांगण्याची जशी उत्कंठा लागलेली असते ना! अगदी तशी. फादरांनी साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या म्हणजे स्वतःच्या बालपणातील आठवणी लिहिल्या होत्या. एकेरी ओळीच्या वहीतील दोन ओळ्यांमध्ये जोडून, शाळकरी मूल जसं दुहेरी ओळीत लिहितं तसं अगदी टपोरं ठसठशीत अक्षरात, एका पानावर एक छोटी आठवण, अशा ५० आठवणी लिहिल्या होत्या. या सगळ्याच आठवणी त्यांची आई आणि मोंसेनियर डिसोजा यांच्याशी निगडित होत्या.

साधारण ७५ वर्षांपूर्वी धर्मगुरूंना ‘कुर’ असे म्हणत असत. हे फादर डिसोजा त्यावेळी गोव्याहून वसईत आले होते. त्यांच्या हातावर घड्याळ होते, या घड्याळाचे लहानग्या संज्याव आणि त्याचा मोठा भाऊ लोऱ्या यांना होते, म्हणून पहाटे लवकर उठून आईसोबत मिस्साला जाऊन पहिल्या रांगेत बसून फादरांचे प्रवचन कसे ऐकले, त्या प्रवचनापेक्षा मन त्या घड्याळावर कसं खिळलं होतं हे सांगताना ते स्वतःच खुदकन हसत होते, त्या आठवणी ऐकताना खूप मजा वाटत होती. मधेमधे थांबून ते मला कळतंय की नाही याचा अदमास घेण्यासाठी एखाद्या शब्दाचा अर्थ विचारीत असत किंवा एखादी ओळ वाचायला लावीत असत. खरं तर ते आत्मकथन असं नव्हतच, तर बालपणीच्या आठवणी किंबहुना छोटे किस्से लिहिलेले होते. त्यातून ७०-७५ वर्षांपूर्वीची चर्चची स्थिती, फादर डिसोजांनी चर्चची इमारत बांधण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव, काहीसे विक्षिप्त वागणे याचे अनेक किस्से फादरांनी लिहिले होते. ते लिहिण्याचा आणि वाचून दाखवण्याचा त्यांचा उत्साह अचंबित करणारा होता. त्यांच्या गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे मला कधीही कसलंच दडपण कधी आलं नाही.

माझ्याकडून त्यांना फोन करणं राहून जायचं, पण पंधरा वीस दिवसातून एकदा तरी त्यांचा फोन मला यायचा, माझ्यासाठी काहीतरी लिखाण त्यांनी करून ठेवलेलं असायचं. एखादी गोष्ट सांगण्याची खोटी की आठ दिवसात त्यांनी माझ्यासाठी कोडी, उखाणे, एखादं विडंबन गीत किंवा छोटीशी गोष्ट लिहून ठेवलेली असायचीच. आणि ती वाचून दाखवण्याचाही तितकाच उत्साह असायचा.

  एखादी नवीन गोष्ट शिकून घेणं त्यांना आवडत असे. WhatsApp वर संदेश टाईप करुन पाठवणे असो किंवा एखाद्या प्रवचनाची लिंक पाठवणे असो.

मधल्या काळात कोरोनाने थैमान घातलं होतं. त्यावेळी चर्चमध्ये प्रवचने ऑनलाईन, व्हिडिओ शूट करून दाखवली जात. त्या प्रवचनांची लिंक ते मलाही पाठवित असत, त्यातही त्यांचा गोष्टी वेल्हाळपणा दिसून येत असे. या नव्या प्रयोगाने ते खूप खुश झाले होते.

कोरोना काळातील लॉकडाऊन संपल्यावर एक दिवस मी सहजच भेटायला गेले. तेव्हा प्रथमच त्यांनी त्यांच्या बऱ्याच वैद्यकीय तपासण्या करायच्या असल्याचं सांगितलं. “आता माझ्याकडून तुम्हाला काही लिहून नकोय ना ?” असं विचारलं. “आता मी काही दिवस माझ्या पुतण्याकडे थोडे दिवस राहायला जाणार आहे. काही अडचण आल्यास फोन करून विचारा”.  माझं संकलनाचं काम पूर्ण होत आलं होतं, आणि प्रकरण लेखनाला मी सुरुवात केली होती. त्या गडबडीत फादरांना फोन करणं राहूनच गेलं होतं, पण मी त्यांना नक्कीच विसरले नव्हते. आणि अचानक एक दिवस त्यांचा फोन आला आणि शांतपणे त्यांनी कॅन्सर झाल्याची बातमी दिली. त्या त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने मी दिङ्मूढ झाले होते. पण तो फोन त्यांचा शेवटचा असेल असं वाटलं नव्हतं. इतर आजारांना त्यांच्या सकारात्मक आणि उत्साहीवृत्तीने परतवलं होतं, पण या कॅन्सरलाही ते परतवून लावतील असं वाटत होतं. पण नाही घडलं तसं…. आणि अचानक बातमी आली त्यांच्या मृत्यूची.

त्यांचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही याची सल मनात कायमच राहणार. पण मनातलं त्यांचं नितळ, निर्मळ, निरागस रूप सदैव कोरलेलं राहील हे नक्कीच.