नाशिक-गुलशनाबाद-नाशिक
- मुक्ता अशोक टिळक, नाशिक
१८८०-८१चा सुमार. नाशिकला गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या पटांगणात भारतीय ख्रिस्ती मिशनरी सुवार्ता प्रसार करीत प्रवचन देत. नारायण वामन टिळक हा तरुण त्यांच्याशी वाद घाले आणि त्याची मित्रमंडळी मिशनरींची खिल्ली उडवीत. हा तरुण नाशकात इंग्रजी शिकला. त्याने बायबल विषयी थोडे बहुत ऐकले वाचले. का तर त्यावर टीका करता यावी म्हणून. पण दैवी योजना त्याला उमगली नाही. खरे तर परमेश्वरानेच त्याला ‘निवडले’ होते! आपल्या ख्रिस्तांगीकारानंतर पणजोबा म्हणतात, ‘सुमारे दोन सव्वा दोन वर्षांपूर्वीच मी ह्या ख्रिस्ताचा व त्याच्या अनुयायी जनांचा हाडवैरी नव्हतो का? त्यावेळेस हा ख्रिस्ती होईल असे कोणाला स्वप्नात तरी वाटले होते का? पहा, मीच चालता बोलता चमत्कार आहे. मी आता येशूचा शिष्य बनलो आहे.’
पणजोबांचे मार्गक्रमण ‘स्मृतिचित्रे’ आणि ‘चालता बोलता चमत्कार’ या दोन ग्रंथात सविस्तर वर्णिले आहे. ख्रिस्तांगीकारानंतर त्यांचे वास्तव्य, कार्य, सेवा सारे काही मुंबई, अहमदनगर, सातारा, वाई या परिसरात झाले. ‘बीज’ मात्र नाशिकमध्येच पेरले गेले होते!
९ मे १९१९ रोजी पणजोबांना देवाज्ञा झाली. त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक (माझ्या पणजी) मुलगा देवदत्त, सून रूथ आणि नातवंडांसह नाशकात १९२४ मध्ये स्थायिक झाल्या. नाशिक त्यांचे माहेर. एवढेच नाही तर टिळक गोखले परिवार नाशिक परिसरातीलच राहणारा. २४ फेब्रुवारी १९३६ रोजी माझ्या पणजीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कबर नाशिकच्या ख्रिस्ती कब्रस्तानात आहे. अनेक जाणकार, साहित्यिक, आप्तेष्ट, स्नेही तेथे जाऊन आदरांजली अर्पण करतात. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने पणजीबाईंची कबर बांधली. पणजोबांची कबर अहमदनगरला आहे. अगदी त्याच धर्तीवर ही कबर बांधलेली आहे. त्यावर कुसुमाग्रजांनी जो शोक संदेश आजोबांना पाठविला होता तो कोरला आहे.
पणजीबाईंनी नाशकात आपले महत्त्वाचे स्थान प्रस्थापित केले. नाशकातील आपल्या एक तपाच्या वास्तव्यात पणजीबाईंनी अनेकांशी नाती जोडली. जाती-धर्माचा भेदभाव त्यांना कधी भावला-शिवला नाही. साहित्यिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, वैद्यकीय प्रत्येक क्षेत्रात त्यांचा मनोभावे सहभाग आणि सेवा असे. पशुपक्षी, वृक्षवेलींसह जनसेवाला त्यांचे प्राधान्य असे. १५ डिसेंबर १९३५ रोजी नाशिककरांनी पणजीबाईंचा जंगी नागरी सत्कार केला. अध्यक्ष आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘साहित्यलक्ष्मी’ हे बिरूद प्रदान करून गौरविले. आपल्या भाषणात अत्रे शेवटी म्हणाले, ‘उतार वयात आपण पूर्ण विश्रांती घ्यावी आपले आयुष्य अत्यंत आनंदात विसाव्यात जावो अशी मी प्रार्थना करतो.’ पणजीबाई उत्तरल्या, ‘ज्या दिवशी मला पूर्णविराम मिळेल त्याच दिवशी माझ्या स्मृतीचित्रांना पूर्णविराम मिळेल. लक्ष्मीबाईंचा फुल स्टॉप अजून झालेला नाही.’
नाशकात त्यांचे चार मानसपुत्र होते. रावबहादुर वंडेकर, भा.ल.पाटणकर, सोपानदेव चौधरी आणि भाऊराव गायकवाड म्हणजे दादासाहेब गायकवाड. ते माझ्या पणजीबाईंविषयी लिहितात, ‘आई मला समाजसुधारणेबद्दल तासचे तास धडे देत असे. मी म्युनिसिपल कौन्सिलवर असताना वारंवार आईचा सल्ला घेत असे.’ माझे आजोबा ॲडवोकेट देवदत्त टिळक आणि पद्मश्री दादासाहेब गायकवाड अगदी जवळचे स्नेही-बंधूच! आजोबा नाशिक नगरपालिकेचे वाईस प्रेसिडेंट, स्कूल बोर्ड आणि नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पदाधिकारी होते. त्यामुळे या दोघांचे समाजकार्य एकोप्याने आणि प्रभावीपणे चालत असे. आजोबांचा नाशिकच्या जडणघडणीमध्ये मोठा सहभाग होता. याशिवाय रिमांड होम, कुष्ठरोग सहाय्य व पुनर्वसन, जनावरांचा दवाखाना याविषयी परदेशी ख्रिस्ती मिशनरींनी द्विशतकापूर्वी नाशकात येऊन अनेक कामे केली. त्यांना मदत करणे, भविष्यकाळात आलेल्या नवख्या मिशनऱ्यांना सर्वतोपरी पाठिंबा आणि सहकार्य-मार्गदर्शन करणे हे आजोबांचे स्वभाव विशेष म्हणता येतील.
गुलशनाबाद हे नाशिकचे जुने नाव. तीन विभाग – गोदावरीच्या पूर्वेला पंचवटी, पश्चिमेला नवी वस्ती आणि मध्य नदीच्या घाटावरची मुख्य वस्ती. नाशिकला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. बौद्ध त्रिरश्मी आणि जैन चामर लेणी फार पुरातन काळात नाशिक परिसरात खोदली गेली. काही शतकांपूर्वी मुघलांनी नाशिक हे नाव बदलून गुलशनाबाद केले. कारण इथली हिरवाई. आपल्या काळात मराठ्यांनी ते पुन्हा पूर्ववत नाशिक ठेवले. अनेक धर्माचा इथल्या इतिहासात उल्लेख आहे.
१८६१ मध्ये अमेरिकन मिशनचे ख्रिस्ती मिशनरी रेवरेंड गार्डन हॉल नाशकात आले. त्यावेळी इथे कॉलऱ्याने थैमान घातले होते. धर्मसंदेश, आजारांची शुश्रुषा आणि औषधोपचार हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. दुर्दैवाने कॉलऱ्याचा संसर्ग होऊन मृत्यूने त्यांचा घास घेतला. त्यानंतर १८३०-३५ पर्यंत अनेक मिशनरी नाशकात आले. अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांना हवा, पाणी आणि विविध आजारांना तोंड द्यावे लागले. काही परतले तर काहींनी इथेच देह ठेवला. इथे राहिलेल्यांनी हर प्रकारे सेवा कार्य केले. सामाजिक कार्याच्या बरोबरीने १८३२मध्ये मिसेस फेरर यांनी मुलींची शाळा सुरू केली. प्रगती संथ गतीने होत होती. १८३५ मध्ये मुलींची संख्या वाढली. वस्तीगृह ही सुरू झाले. शाळेत धर्मज्ञान, इतिहास-भूगोल-खगोलशास्त्र, भाषा व व्याकरण, वैद्यकशास्त्र, गणित या विषयांचा अंतर्भाव होता. हळूहळू चांदोरी, गंगापूर, देवळाली, मखमलाबाद येथेही शाळा सुरू झाल्या.
नाशिकच्या मध्यवस्तीच्या पश्चिमेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर १८५५ मध्ये ख्रिस्ती वसाहत वसवायला सुरुवात झाली. अनाथ, गरजूंसाठी धर्मपुरी हा निवारा, धान्याचे भांडार-कोठार, प्रार्थनागृह, आटोपशीर घरे आणि व्यवसाय शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा उभारल्या गेल्या. १८५७ मधील एक वृत्तांत आहे – ‘शालेय शिक्षणासह उपयुक्त धंदे शिक्षणाची आवश्यकता भासल्यामुळे सुतार- लोहार काम, टांगे व छकड्यांची निर्मिती, छपाई काम व पुस्तक बांधणी, विणकाम वगैरे कामात मुले वाकबगार झाली. शिक्षकांसाठी प्रशिक्षण ही सुरू केले. १८६५ मध्ये नागपुरात भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात शरणपूरच्या कारखान्यात तयार केलेल्या टांग्याला पहिले बक्षीस आणि पदक मिळाले. या टांग्यांना इतर देशातूनही मागणी असे आहे.’
विशेष म्हणजे आफ्रिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढा देणाऱ्या डॉ. डेव्हिड लिविंगस्टनचा ही १८६०-६५ मध्ये शरणपूरशी संबंध आला होता.
नाशिक १८१८ पासून इंग्रजांच्या अंमलाखाली आले. मुंबई प्रांताचा एक भाग म्हणून. १८६४मध्ये नाशिक नगरपालिका आणि १८६९मध्ये नाशिक जिल्हा म्हणून जाहीर झाला. हा भाग मुंबई प्रांताच्या जवळ असल्याने नाशिकला विशेष महत्त्व मिळाले.
१८९२ मध्ये शरणपूर भागात रेव्हरंड रॉबर्ट्स यांची देखरेख, मार्गदर्शन आणि देशी-विदेशी ख्रिस्ती बांधवांची आर्थिक मदत यामुळे संत आंद्रिया (ॲंड्र्यूज) देवालय उभे राहिले. दगडी बांधकामाचे हे देवालय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १२ डिसेंबर १८९३ रोजी मुंबईच्या बिशपांच्या हस्ते देवालयाचा समर्पण विधी झाला. या देवालयाव्यतिरिक्त १९२३-२४ मध्ये मध्यवस्तीमध्ये संत थॉमस देवालय बांधले. नाशिक रोडला हे देवालयाचे समर्पण १ मे १९३८ रोजी झाले. देवळाली परिसरामध्ये ख्राईस्ट चर्च, गॅरीसन चर्च ही देवालये आहेत. याशिवाय रोमन कॅथोलिक चर्च नासिकला होली क्रॉस, देवळालीला सेंट पॅट्रिक चर्च आहेत. सेंट पॅट्रीक चर्च १८७९ मध्ये तत्कालीन मिलिटरीतील ख्रिस्ती मंडळींसाठी सुरू केले. नाशिक रोडचे संत ॲना चर्च १९४२ मध्ये सुरू झाले. १९७८पासून या चर्चला कॅथेड्रल म्हणून मान्यता मिळाली. नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताची स्थापना १९८७मध्ये झाली. बिशप हाऊस मधून काही वर्षै ‘निरोप्या’ हे मासिक प्रकाशित होत असे. निरोप्याचा १९०३ मध्ये पहिला अंक राहुरी येथे प्रसिद्ध झाला. डिसेंबर १९७५ मध्ये फादर प्रभुधर यांनी ख्रिस्तजयंती विशेषांक प्रकाशित केला. मुखपृष्ठावर भारतीय शैलीतले बाळ येशू आणि आई मरियाबाई यांचे रेखाटन आहे.
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘बाल येशू मंदिर – द इन्फंट जिझस श्राईन’ नासिक रोड येथे १९७० मध्ये बांधले. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात लाखो भाविक देश विदेशातून या मठामध्ये प्रार्थनेसाठी येतात.
मिस. रोझाली हार्वे या एक अद्वितीय मिशनरी होत्या. १८८४मध्ये त्या नाशकात आल्या. अत्यंत सेवाभावी, जिद्दीच्या, प्रेमळ कार्यकर्त्या, भूतदयाने ओतप्रोत भरलेल्या खऱ्या ख्रिस्तसेविका होत्या. त्यांचे कार्य अनमोल आणि चिरंतन ठरले. ‘बालपूर’ (सध्याचे एच् आर.डी.सेंटर, रामकृष्ण परमहंस रोड) हे अनाथ, नवजात बालकांसाठी हक्कांचे घर. कुष्ठग्रस्तांसाठी आश्रय, औषधोपचार, पुनर्वसन आणि व्यवसाय शिक्षण केंद्र. (सध्याचे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर पंचवटी) पशुवैद्यक चिकित्सालय आणि छत्रछाया (सध्याचा जनावरांचा दवाखाना घरपुरे घाट). नाशिककर त्यांना ‘आई’ म्हणत. याशिवाय कॅनडियन मिशनरींनी चालविलेल्या हॉस्पिटलची उभारणी, खेडोपाडी उघडलेल्या शाळा, महिला-बालकांसाठी मदत केंद्र ही ‘आई’ची कामे अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून इंग्रज सरकारने त्यांना प्रथम ‘रौप्य’ नंतर ‘सुवर्ण’ आणि ‘कैसर-इ-हिंद’ या पदव्यांनी सन्मानित केले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले सेवाव्रत सोडले नाही. ३१ मार्च १९३२ रोजी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांची कबर नाशिकच्या ख्रिस्ती कब्रस्तानात आहे.
सध्याचे पोलीस कमिशनर ऑफीस (शरणपूर) आहे ती इमारत १८७० मध्ये बांधली. ख्रिस्ती तरुणांना धर्मगुरू होण्यासाठी इथे धर्मशिक्षण दिले जात असे. हीच ईश्वरीविद्या प्रशाला म्हणजे डिव्हिनिटी स्कूल. अनेक तरुणांनी इथे प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्रभर वेगवेगळ्या चर्चमध्ये यशस्वीपणे धर्मगुरूपद सांभाळले.
शरणपूर परिसरात कॅनडीयन मिशनरींनी सुरू केलेले हॉस्पिटल सर्व सर्वदूर प्रसिद्ध होते. येथे आलेला प्रत्येक रुग्ण बरा होत असे. उत्तम वैद्यकीय सेवा आणि त्याला आध्यात्मिक जोड याचा हा परिपाक.
ख्रिस्ती लेखन संस्था (के एल एस) आणि वाचनालय सध्याच्या कॅनडा कॉर्नर भागात कार्यरत होते. १९७२पर्यंत वाचनालयात पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू होता. हा अभ्यासक्रम इंग्लिश भाषेत असे. परराज्य आणि परदेशातूनही विद्यार्थी येत. अध्यापक वर्ग इंग्लंडमधील जाणकार, अनुभवी पत्रकारितेतील तज्ञ असत. संत अंद्रिया मराठी शाळा ही फार जुनी शाळा. आज ती जिल्हा परिषदेची शाळा आहे. पूर्वी या शाळेचे वस्तीगृह ही होते. रेव्ह. डी.के.शिंदे यांनी १९१७मध्ये नाशिकच्या मध्यवस्तीत सेंट जॉर्ज शाळा सुरू केली. ही आज पेठे हायस्कूल म्हणून ओळखली जाते. श्रीमती हिराबाई शिंदे (रेव्ह. शिंदेंची कन्या) २४ सप्टेंबर १९४७ रोजी आदर्श मॉन्टेसरी ही शाळा सुरू केली. आज अनंत कान्हेरे चौक (सी बी एस) परिसरात ह्या शाळेने माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण देण्यापर्यंतची प्रगती केली आहे.
‘अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थे’ची स्थापना १ऑगस्ट १९८४ रोजी झाली. मतिमंद, कर्णबधीर, शारीरिक-मानसिक दृष्ट्या अपंगांना मोठा आधार आणि आशा या संस्थेने दिला आहे. विद्यार्थ्यांचे पुनर्वसन आणि पालकांना मार्गदर्शन याबाबत विशेष लक्ष दिले जाते.
‘महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ’ ही संस्था यावर्षी हिरक महोत्सव साजरा करीत आहे. १३ नोव्हेंबर १९६४ रोजी होली क्रॉस चर्चचे फादर ज्योकिम बरांको यांनी ही संस्था स्थापन केली. मुख्य उद्देश ग्रामीणांचे शहरात होणारे स्थलांतर थांबविणे. आर्थिक गोष्टींची हे निगडित आहे. म्हणून शेती व्यवस्थापन, जल-जमीन-बियाणे यांचे परीक्षण याविषयी ही संस्था मार्गदर्शन करते शिक्षण देते. आज ही संस्था पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.
मदर टेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजची एक शाखा ‘प्रेमदान’ हा वृद्धाश्रम पुरुषांसाठी सुरू आहे. यापूर्वी १९७५ मध्ये ‘निर्मला होम फॉर एजेड’ सुरू झाले होते. ‘कृपाप्रसाद’ हा पूर्वी दवाखाना होता. सध्या तिथे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या ग्रामीण मुलींसाठी वस्तीगृह सुरू आहे. ‘देवमाता’ ही संस्था महिलांना आवश्यक ती मदत करते. होली क्रॉस चर्चतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह चालवीत असत. तेथे छापखानाही होता ‘आपण’ हे पाक्षिक तेथे प्रकाशित होत असे. संपादक आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी. सध्या या इमारतीमध्ये कविवर्य टिळक वाचनालय आहे. येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केलेली आहे.
देवळाली परिसरातील निसर्ग रम्य वातावरणामध्ये ‘बार्नस् स्कूल’ ही निवासी शाळा अँग्लोइंडियन संस्थेने १९२५ सुरू केली. जुन्या शाळा म्हणजे सेंट फिलोमिना १९४६, सेंट पॅट्रीक १९५६, सेंट झेवियर्स १९६१, निर्मला कॉन्व्हेंट १९६४ आजही प्रगतीपथावर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुमारे ५० वर्षे, १९७२ पर्यंत माझ्या अमेरिकन आजी शोभना देवदत्त टिळक यांनी इंग्लिश शिकवणी वर्ग चालविले. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषा, व्याकरण, साहित्याचे उत्तम मार्गदर्शन केले. संवाद साधायला पारंगत केले. त्यामुळे अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले. आज त्यांचे विद्यार्थी ७०-८० वर्षांचे असून आवर्जून टिळक मॅडमचे नाव घेतात.
१९६२ मध्ये ‘ऑटोस्किल्स’ या प्रशिक्षण संस्थेची स्थापना अमेरिकन मराठी मिशन तर्फे झाली. पहिले प्रिन्सिपल माल्कम वॉर्नर होते. उच्चशिक्षित तंत्रज्ञ प्रशिक्षक होते. विद्यार्थी भारताशिवाय परदेशातूनही येत असत.
हा आढावा ख्रिस्ती बांधवांनी नाशिक साठी केलेले कार्य, परिश्रम, बलिदान, त्यांच्या प्रयत्नांना-सेवेला मिळालेले यश याचा आहे. त्यांनी चिकाटीने कर्तव्य निभावल्यामुळे आज आपल्याला आजचे प्रगत नाशिक शहर दिसते आहे यात काही शंका नाही.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डिसेंबर २०२१ मध्ये नाशकात भरले होते. तेव्हा नाशिक महानगरपालिकेतर्फे नाशकातील आजी-माजी साहित्यिकांच्या घरावर रोषणाई केली होती. याचा आनंद अनपेक्षित पणे मला लुटता आला. ते चार दिवस जणू ‘ख्रिस्ताच्या आगमना’प्रीत्यर्थ माझ्या घरावर रोषणाई झळकत होती!!
असा हा माझ्या ‘नाशिक-गुलशनाबाद-नाशिक’चा इतिहास.
——————————–
संदर्भ:
*संपूर्ण स्मृतिचित्रें- संपादन- श्री अशोक दे. टिळक .पॉप्युलर प्रकाशन.
*नाशिक व ख्रिस्तसंदेश.
*साहित्य सावना, दिवाळी विशेषांक २०१३.
*श्री. कामिल पारखे.