धर्माची भिंत – फ्रँक मिरांडा

धर्माची भिंत

शाळेच्या त्या पहाटसरशीतल्या वाटेवर
तो नेहमी तिच्या नजरेत हरवून जात असे.
त्याच्यासाठी ती नजर साधनेसारखी होती,
आणि गालातल्या मंद हास्यातून
शब्दांविना उमलणारी कविता त्याला दररोज ऐकू येत असे.

वर्गाच्या गोंधळातही
तो तिच्या सान्निध्याचा कोपरा शोधत असे.
पुस्तकांच्या पानांतून झिरपणाऱ्या प्रकाशासारखी
तिची एक कटाक्ष-दृष्टी
त्याच्या हृदयात शंभर स्वप्नांना रंग देऊन जात असे.

शाळेच्या अखेरच्या दिवशी
क्षणभर त्याला स्वप्न सत्य झाल्यासारखं वाटलं.
तिच्याशी झालेला संवाद
विश्वाची सारी संपत्ती लाभल्यासारखा भासला.
पण शब्द उमटण्याआधीच
नशिबाच्या कठोर हाताने
त्याचं विश्व तुटून कोसळलं.

त्याचं प्रेम निर्मळ होतं, निरागस होतं,
त्यात भेदभावाचा लवलेशही नव्हता.
पण तिच्या आणि त्याच्या मध्ये
धर्माची अटळ भिंत उभी राहिली,
जिने दोन अंत:करणं निर्दयतेने वेगळी केली.

काळ पुढे सरकला, ऋतू बदलले,
तरी ती भिंत आजही अढळ उभी आहे.
आणि त्याच्या मनात एकच प्रश्न
आजही ताजा आहे—
प्रेमापेक्षा धर्म मोठा का ठरतो?

— फ्रँक मिरांडा, उमराळे