देह माझा वेगळा !
- सौ. फ्लॉरी विल्यम रॉड्रिग्ज, ओरभाट, पापडी
मोबाईल – 9764163495
जोनाथन अवघ्या चार वर्षांचा असताना त्याला ताप आला. क्षणाक्षणाला त्याचा ताप वाढत होता. औषधोपचार चालू होते. त्याची आई त्याच्या उशाजवळ बसून त्याच्या कपाळावरच्या मीठापाण्याच्या घड्या बदलत होती. डॉक्टरांनी औषधं दिली होती, पण ताप उतरण्याची चिन्हं काही दिसत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी इंजेक्शनचा कोर्स चालू करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू जोनाथनचा ताप उतरला पण त्याचा डावा हात व डावा पाय अधू झाला. खरं तर तो पोलिओचा अॅटॅक होता ! जोनाथनची अवस्था पाहून त्याची आई हताश झाली होती. तरीही ती त्याला रोज फिजिओथेरेपीस्टकडे नेऊन व्यायाम व मसाज देऊन त्याच्या आजारावर त्याला मात करता यावी म्हणून दिवसरात्र मेहनत घेत होती.
जोनाथनचे बाबा एका इंग्लिश कंपनीत काम करीत होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. ते जोनाथनसाठी शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. हळूहळू जोनाथन स्वतःची काळजी घ्यायला लागला. कारण त्याची काळजी घेणारे त्याचे आईवडील त्याच्यासोबत आहेत हे त्याला उमगलं व तो स्वतःला भाग्यवान समजू लागला. वडिलांनी त्याच्यासाठी व्हिलचेअर आणली होती. पण त्याला दोन्ही पायांवर चालण्याची प्रबळ इच्छा होती. एका संस्थेच्या मदतीने त्याच्यासाठी स्पेशल बूट मागविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला थोडा थांबत का होईना तो हळूहळू चालू लागला. तब्बल सहा महिन्यानंतर तो परत शाळेत जाऊ लागला.
जोनाथन शरीराने अधू असला तरी बुद्धीने भयंकर तीक्ष्ण होता. त्याने सहा महिन्यात वर्षभराचा अभ्यास पूर्ण करून चांगल्या मार्कांनी तो पहिलीच्या वर्गात गेला. पाहता पाहता त्याने शालेय शिक्षण पूर्ण करून कॉलेजमध्ये बी. कॉम. ची डिग्री देखील डिस्टींक्शनमध्ये पास झाला. त्याच्या आईचं मातृहृदय आनंदाने उचंबळून आलं. जवळच्या नातेवाईकांना तिने स्वतः जाऊन पेढे दिले. सर्वांनी त्याच्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी एका बँकेमध्ये क्लार्कच्या पदासाठी व्हॅकेन्सिज असल्याचं तिला कळलं. तिने जोनाथनला ताबडतोब अॅप्लिकेशन करायला सांगितले. बँकेत भरती सुरू झाली. कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा सवलत न घेता स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व आईने दिलेल्या आत्मविश्वासावर जोनाथन लेखी परीक्षा व मुलाखतीत पास झाला व क्लार्क म्हणून घरापासून दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बँकेच्या शाखेत कामाला लागला. पुढच्या परीक्षा देऊन तो काही वर्षातच कॅशियरदेखील झाला. त्याची आई मुलाची प्रगती पाहून खूष होती.
जोनाथन जसा मोठा होत गेला तसं त्याचं लग्नाचं वय होत होतं म्हणून आईचं काळीज गलबलून जात होतं. आता त्याच्या मित्रांचीही लग्नं होत होती. खरंतर त्याचा एक पाय सोडला तर तो निरोगी आणि सुदृढ होता. दिसायलाही गोरापान आणि हॅण्डसम होता. आई आता थकत चालली होती. वडीलही रिटायर्ड झाले होते म्हणून जोनाथन त्याची तीन चाकी स्पेशल स्कूटर घेऊन ऑफिसमधून घरी येताना बाजारात जाऊन भाजी व फळे घेऊन येत असे. तेवढीच त्या माऊलीला मदत.
एकेदिवशी दुपारी ऑफिस सुटल्यानंतर तो बाजारात फळे आणण्यासाठी गेला होता. फळे घेत असताना त्याच्या कानावर शब्द पडले, “साहेब, भाजी घ्या. दुपारचे दीड वाजत आले तरी अजून सगळी भाजी विकली गेली नाही. घ्या ना साहेब.” जोनाथनला त्याच्या आईच्याच वयाची एक बाई हाका मारीत होती. हातानेच ‘थांब’ अशी खूण करून फळं घेऊन झाल्यावर तो त्या बाईजवळ गेला व म्हणाला, “मावशी, आज मला भाजी नको होती.” तेव्हा ती काकुळतीने म्हणाली, “साहेब, एक दुधी व थोडी वांगी उरली आहेत. तेवढी घेऊन जा. घरी माझी मुलगी उपाशी असेल. घ्या ना.” जोनाथनला त्या जोडकरणीची दया आली. त्याने तिच्याकडची उरलेली सगळी भाजी विकत घेतली व फळांच्या पिशवीत ठेवली. त्याने तिला विचारले, “मावशी, तुम्ही कुठे राहता?” तिने तिच्या गावाचं नाव सांगितलं. ते त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर होतं. तो तिला म्हणाला, “मावशी, चला मी तुम्हाला घरी सोडतो.” त्याच्या स्कूटरला जोडलेल्या कारसीटवर त्याने त्या भाजीवाली मावशीला बसवलं व तो तिला घेऊन तिच्या घरी सोडायला गेला.
तिचं घर आल्यावर त्याने तिला कारसीटमधून उतरायला मदत केली व तिची टोपली तिच्या घराच्या ओटीवर ठेवली. तेवढ्यात घरातून कण्हण्याचा आवाज आला. ती बाई धावत धावत घरात शिरली. तिच्यापाठोपाठ जोनाथनही घरात शिरला. पाहतात तर तिची मुलगी पलंगावरून खाली पडली होती. पाण्याचा तांब्या तिच्या बाजूला खाली पडून जमिनीवर घरंगळत होता. त्या मुलीला गुडघ्यापासून दोन्ही पाय नव्हते. ती खाली पडल्यामुळे तिला लागलं होतं. जोनाथनला तिची अवस्था पाहून दया आली. तिला बेडवर चढवण्यासाठी त्याने तिच्या आईला मदत केली. तशाही परिस्थितीत ती त्या मुलीने त्याला ‘थँक यू’ म्हटले. तिच्या बोलण्यावरून ती चांगली सुशिक्षित वाटली. त्याने घरी न्यायला घेतलेली फळे त्या बाईच्या हवाली केली व प्रथम तिला प्यायला पाणी द्या व मग फळं खायला द्या, असं सांगून “मी संध्याकाळी डॉक्टरांना घेऊन येईन” असं म्हणत त्याने त्यांचा निरोप घेतला.
जोनाथन घरी गेला पण त्याचं खाण्यापिण्यावर मुळीच लक्ष नव्हतं. तो मन शांत करण्याचा प्रयत्न करीत होता, पण मनाचे दरवाजे बंद केले म्हणून विचारांना प्रवेश बंद करता येत नाही, त्याप्रमाणे त्याला त्या बाईची गुडघ्यापासून पाय नसलेली मुलगी एकसारखी डोळ्यासमोर येत होती. ती मुलगी चोवीस-पंचवीस वर्षांची तरुणी होती. मग तिचे पाय तिने कधी व कसे गमावले? एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोळ्यांसमोर पिंगा धरून नाचत होते. संध्याकाळी तो त्याच्या फॅमिली डॉक्टरांना घेऊन तिच्या घरी पोहोचला. ती मुलगी बऱ्याच अंशी आता सावरली होती. तिच्या आईने त्यांचे स्वागत केले. डॉक्टरांनी तिची तपासणी करून सांगितले की, ‘मुका मार बसला आहे. दोन दिवस गोळ्या घेतल्या की दुखावा कमी होईल. मात्र काहीतरी खाल्ल्यानंतरच गोळ्या घ्या व पुन्हा पडणार नाही ह्याची काळजी घ्या.”
डॉक्टरांना सोडून जोनाथन परत आला तेव्हा त्याच्या हातात जवळच्याच पोळीभाजी केंद्रातून आणलेल्या चपात्या व भाजीचं पार्सल, तसेच बिस्कीटं, फरसाण व सुका खाऊ होता. ते सर्व तिच्या देऊन तिच्या पायांबद्दल तिला विचारले, तेव्हा तिची आई म्हणाली, “साहेब, आमची बाबरा बी. कॉम. च्या शेवटच्या वर्षात शिकत होती. एकदा कॉलेजमधून घरी येताना बसमध्ये चढताना तिचा पाय सटकला व त्याच वेळी ड्रायव्हरने बस चालू केली. तिच्या दोन्ही पायांवरून बसची चाकं गेली. गुडघ्यापासून पाय निकामी झाले म्हणून ते कापून टाकावे लागले. तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी थोडेफार पैसे जमवले होते, ते सर्व ऑपरेशनमध्ये संपले. आपल्या धावत्या-पळत्या एकुलत्या एक लाडक्या लेकीची ही अवस्था पाहून त्यांनी अन्नपाणी सोडलं व झुरून झुरून स्वतःला संपवलं.” सांगता सांगता बाबराच्या आईने पदराने डोळे पुसले व म्हटले, “माझी बाबरा धीराची आहे. अजूनही तिला शिक्षण पूर्ण करण्याची आस आहे. पण अशा अवस्थेत मी काय करू शकते? भाजी विकून थोडेफार पैसे सुटतात त्यातून जेमतेम खाण्यापिण्याचे पैसे मिळतात.” त्याने त्या माऊलीचे हात हातात घेतले व तिला धीर देत त्या मुलीकडे पाहून तो म्हणाला, “बाबरा, तू अजूनही तुझं शिक्षण पूर्ण करू शकतेस! तुझी इच्छा असली तर मी तुला घरबसल्या अभ्यास करून परीक्षा देण्यासाठी मदत करीन. विचार कर. मी दोन दिवसांनी येऊन जाईन.”
बी.कॉम.ची परीक्षा देता येईल ह्या विचारानेच बाबराची कळी खुलली. पुढील दोन दिवसात कॉलेजला न जाता बी. कॉम.ची परीक्षा कशी देऊ शकतात ह्याविषयी जोनाथनने चौकशी केली व त्यासंबंधीचे फॉर्म घेऊनच तो बाबराच्या घरी आला. बाबराला मनापासून आनंद झाला, पण थोडा संकोचही वाटला. शेवटी तो आस्थेने सर्व करीत आहे, हे पाहून बाबरा परीक्षा द्यायला तयार झाली. वह्या, पुस्तके व त्याच्या स्वतःच्या काही नोट्स त्याने तिला आणून दिल्या. काही समजत नसेल, काही अडचण असेल तर तेथे तो स्वतः तिला मार्गदर्शन करू लागला. तोसुद्धा एक स्कॉलर स्टुडंट होता..!
शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला. जोनाथनने तिच्यासाठी खास गाडीची सोय केली. तो स्वतः तिला तिच्या आईच्या मदतीने गाडीत घालून परीक्षाकेंद्रावर नेत असे व आणत असे. त्याने त्यासाठी खास रजा घेतली होती. जोनाथनच्या आईच्या लक्षात आलं की तो कुठेतरी गुंतत चालला आहे. ती त्याची चेष्टा करीत असे. शेवटी त्याने त्याच्या आईला विश्वासात घेऊन बाबराविषयी सांगितलं. एक दिवस ती बाबराला भेटायला गेली. दोन्ही पाय नसून निटनेटकी व दिसायला सुंदर असलेल्या बाबराचा उत्साह, वागण्या-बोलण्यातला नम्रपणा व शक्य झालं तर जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द सर्वच तिला भावलं. तिने बाबराला व्हीलचेअर भेट दिली. आता बाबरा घरात हिंडूफिरू लागली. हळूहळू ती पलंगावरून व्हीलचेअरवर व तेथून सोफ्यावर अगदी सहज वावरू लागली. स्वयंपाकदेखील करू लागली. बी. कॉम. ची परीक्षा ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. जोनाथनने तिला कॉम्प्युटर गिफ्ट केला व एका स्पेशल ट्रेनरद्वरे तिने कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले. जोनाथनने तिला ऑनलाईन काम मिळवून दिले. आता ती घरबसल्या ऑनलाईन नोकरी करून पैस कमवू लागली व आईचा भार तिने हलका केला. जिद्द व चिकाटी असली तर मार्ग दिसतो म्हणतात, तेच खरं!
हळूहळू आईला जोडकरणीचा व्यवसाय बंद करायला सांगून तिने स्वतःच्या कष्टाने आईचे कष्ट हलके केले. पैसे जमवून तिनेदेखील जोनाथनसारखी तीन चाकी स्पेशल स्कूटर घेतली. जोनाथनने तिला स्कूटर चालवायला तर शिकवलेच पण स्कूटरवर चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्यांना स्लायडरदेखील बसवून घेतले. एखाद्याचं आयुष्य सुखानं भरून टाकणं सर्वांनाच जमतं असं नाही, पण जोनाथनने ते करून दाखवलं. हळूहळू ती स्कूटर चालवण्यात तरबेज झाली.
जोनाथनच्या आईला तिची ही प्रगती पाहून खूप आनंद झाला. एकदा बाबरा व तिची आई जोनाथनच्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. जाताना तिने स्वतः बनवलेल्या अळूवड्या व फ्रेंच पुलाव नेला होता. ते पाहून ती प्रसन्न झाली. बाबराने तिला ते चाखून पाहून काही कमी-जास्त आहे का जरा सांगा, अशी विनंती केली. चाखून झाल्यावर सर्व उत्तम झाले आहे, अशी पोचपावतीही त्यांनी तिला दिली. व्हिलचेअरवर बसून ती घरभर हिंडली. दोघांच्या माताभेटीत सुखदुःखांची देवाणघेवाण होत होती. त्यांना व्यत्यय नको म्हणून तेवढ्या वेळात बाबराने त्यांच्या किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी चहा केला. गरमागरम अळूवड्या व चहाचा आस्वाद घेऊन मायलेकी परत जायला निघाल्या, तेव्हा जोनाथनच्या आईचे डोळे अथांग कारुण्याने भरलेले होते. ती सगळं जणू नजरेनेच बोलत होती. तिच्या ओल्या नजरेत आनंदाच्या निरागस लहरी ओसंडत होत्या. तिच्या नजरेत बाबराविषयी काठोकाठ भरून राहिलेलं प्रेम व माया स्पष्ट दिसत होती.
निघताना बाबरा तिला म्हणाली, “आई, तुमच्यामुळे व जोनाथनमुळे आज मी सक्षम झाली आहे. तुम्हाला कधीही माझी गरज लागली तर फक्त मला हाक मारा.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, माझा जोनाथन खूप लाघवी व प्रेमळ आहे. त्याचं लग्न व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. मनापासून विचारते, तू होशील का गं माझी सून ? माझ्या जोनाथनची अर्धांगिनी ?” लाजून तिने मान खाली घातली व गालातल्या गालात मृदू हसली. त्याच वेळी जोनाथन ऑफिसमधून आला. त्याने त्यांचं संभाषण ऐकलं. खरं तर दोघांनाही एकमेकांविषयी आंतरिक ओढ वाटत होती. पण त्यांना ते उमगत नव्हतं. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी ते कधी एकमेकांजवळ बोलूनही दाखवलं नव्हतं. पण जोनाथनच्या आईने त्यांची मनं ओळखली होती. बाबराची आई तर परिस्थितीमुळे एवढी दबून गेली होती की बाबराचं कधी लग्न होईल, असं तिने स्वप्नातही कल्पिलेलं नव्हतं. मात्र त्यामुळेच ती नेहमी अंतःकरणातून दुःखी राहत असे. मात्र जोनाथनच्या आईचा प्रस्ताव ऐकून तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
जोनाथनचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आयुष्यात पहिल्यांदा त्याला नेमकं काय हवंय ते जाणवलं व नजरेनेच त्याने बाबराला विचारलं, ‘तुझा हात माझ्या हातात देशील का?’ बाबराने मौन न तोडता मानेनेच होकार प्रदर्शित केला. लवकरच पुढाकार घेऊन जोनाथनच्या आईने त्यांना विवाहाच्या गोड बंधनात अडकवलं व बाबराच्या आईला सन्मानाने आपल्या घरात येऊन राहण्यासाठी बोलावून घेतलं. एकमेकांना सुखी करण्यासाठी दोन कुटुंबं आनंदाने विलीन झाली !
(सौ. फ्लॉरी रॉड्रिज यांच्या “मर्मबंधातल्या सरी” ह्या आगामी पुस्तकातून घेतलेली कथा)