ते जिवलग – जिम (फिलीप) रॉड्रीग्ज

​​ते जिवलग

ते जिवलग…

अगदी सहज येतात,​​

कळीचं फुल व्हावं,

तद्वत अलगद उमलतात. 

युगानुयुगे प्रतीक्षेत झुरलेल्या काळोख्या आकाशात

अनाहूतपणे मंदस्मित शुक्रतारा यावा,

तसेच ते आपले सर्वस्व घेऊन प्रकटतात.

विखुरलेले माणिकमोती स्वप्निल जीवनधाग्यात ओवून 

अगदी अभावितपणे ते पाश जुळवतात.

हसत-बोलत, अगदी हळुवार

ते अंतर्मनात दडून बसतात.

ठाऊक नसतानाही सर्द उन्हात,

रिमझिम स्वैर बरसतात.

खरंच, ते जिवलग…

जीव लावतात,

अंतरात्म्याशी असे एकजीव होतात की,

तेव्हा तुम्ही, तुम्ही नसतातच.

पण… ते आलेच नसते तर…

किती बरे झाले असते !

कारण, जितक्या सहजतेने ते येतात,

तितकेच अलगद निघूनही जातात.

घेऊन खूप काही आलेले असतात,

मात्र वादळ तेवढे ठेवून जातात.

त्या जीवघेण्या वावटळीत,

स्वप्निल स्वप्ने सारी उखडतात,

भाव छिन्नविछिन्न होतात,

उरतो फक्त एक देह,

देवावाचुनी देवघर…

बेचैनी… काहूर नि हुरहूर…

तेव्हा, ब्रम्हांडाला कंपित करणारी आर्त आरोळी….

प्रारब्धाधीन आपले जिवलग  

नियतीच्या कवेत विसावत कुठे निघून जातात ?

  •  जिम (फिलीप) रॉड्रीग्ज (बोळींज) – 8237260368.