ती काळीकुट्ट मध्यरात्र – आणि ती बाळंतीण!
- दीपक मच्याडो, टेल : ९९६७२३८६११
ई मेल : deepak.machado@yahoo.com
“बारक्या, ह्या सगळ्या फाइल्स ठेव आणि कपाट लॉक कर.”
“होय साहेब” बारक्या म्हणाला, “पण साहेब, आज लई लेट झाले बघा. तुम्ही आज येथे गावातच थांबा. बंटूशेटच्या बंगल्यावर तुमची झोपायची सोय करतोय. एवढ्या थकल्याभागल्या अवस्थेत रात्रीच्या वेळी तुम्ही गाडी चालवणे धोकादायक आहे.”
“नाही रे बारक्या,” डॉक्टर सुदर्शन म्हणाले, “तू म्हणतोस ते बरोबर आहे पण आज मला घरी गेलंच पाहिजे.”
डॉक्टरांनी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे दहा वाजून गेले होते. ते जेथे आले होते त्या सारणगावापासून त्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे कनकपुर हे जवळजवळ तीस किलोमीटर दूर होते. सरळसोट रस्ता असता तर गोष्ट वेगळी होती परंतु अरुंद आणि अनेक वळणे असलेला हा रस्ता घाटावरून जात होता. त्यातील बऱ्यापैकी मार्ग निर्जन आणि दाट झाडीतून मार्गक्रमण करीत होता. डॉक्टर सुदर्शन आठवड्यातून एक दिवस सारणगावला भेट घ्यायचे. इथल्या गावातील लोक बहुदा आदिवासी आणि गरीब शेतकरी होते. गावाच्या लोकांना जवळपास वैद्यकीय सुविधा नव्हती. अनेक कोसापर्यंत कुणी डॉक्टर उपलब्ध नव्हता. डॉक्टर सुदर्शन हे कनकपुर येथे व्यवस्थित प्रॅक्टिस असलेले डॉक्टर होते. पैशाअडक्याची कमी नव्हती परंतु एक समाजसेवा म्हणून ते स्वेच्छेने सारणगावात वैद्यकीय सेवा देण्यासाठी दर शुक्रवारी यायचे. म्हणून त्या गावातील लोकांचे ते एक दैवतच होते. गावातील रुग्ण तपासणी आणि उपचार तीन-चार तासात आटोपले की दुपारी डॉक्टर सुदर्शन चारपर्यंत आपल्या घरी कनकपूरला पोहोचायचे असा नित्यक्रम होता. आज मात्र का कुणास ठाऊक, रुग्ण इतक्या प्रचंड संख्येने आले होते की डॉक्टरांना संध्याकाळ कधी झाली हे कळलेच नाही.
आयत्या वेळी एका वृद्धाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आणि तो रुग्ण डॉक्टरांकडे येण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे डॉक्टर सुदर्शन यांना एका डोंगरापलीकडील गावात पायी जावे लागले. शेवटी त्या कार्यातून सुटका होऊन ते सारणगावात परत आले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. डॉक्टर स्वतःची कार घेऊन सारणगावात यायचे. कदाचित बारक्याने सुचवल्याप्रमाणे डॉक्टर राहिले देखील असते परंतु दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा अन्वयची मेडिकल प्रवेश परीक्षा होती आणि त्याला तेथे घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांना घरी जाणे भाग होते.
डॉक्टर गाडीत येऊन बसले व ती सुरू केली. बारक्याने त्यांची बॅग गाडीत ठेवली. त्याच वेळी थोडासा गडगडाट झाला होता आणि वीजही चमकली होती. बारक्या चिंताग्रस्त नजरेने पहात होता.
“बघा पुन्हा एकदा विचार करून डॉक्टर साहेब, उद्या सकाळी गेला असता तर…?”
डॉक्टरांनी फक्त हाताने काही चिंता करू नकोस असे सुचवले आणि ते मार्गाला लागले. त्यांनाही झालेल्या गडगडाटामुळे पाऊस रस्त्यात गाठेल की काय म्हणून चिंता होती. त्यामुळे त्यांच्या प्रवासास आणखी विलंब होण्याची शक्यता होती. सारणगाव सोडून वीसेक मिनिटे झाली नसतील एवढ्यात डॉक्टरांची शंका खरी ठरली. कारच्या समोरच्या काचेवर पावसाचे थेंब पडू लागले आणि त्यानंतर थोड्याच वेळात आभाळाला ठिगळ पडले. धो धो पाऊस कोसळू लागला. आता डोंगरपट्टीचा भाग लागला होता. अजून दहा किलोमीटरपर्यंत तरी पुढचे गाव लागणार नव्हते. कारच्या वायपर्सनी काही क्षणांसाठी पाऊस-पाण्याला सारवून काचेवर केलेल्या पंखारुपी झरोक्यातून हेडलाईट्सच्या झोतात पावसाच्या फक्त उभ्या रेषा तितक्या दिसत होत्या. पावसाच्या सरी जमिनीवर पडून उडताना शेकडो बेडके उड्या मारताहेत असा भास होत होता. अशा परिस्थितीत अगदी कूर्म गतीने आपली गाडी डॉक्टर चालवीत होते. हेडलाईट्सच्या प्रकाशात जेवढे दिसत होते त्यापलीकडे फक्त दाट झाडी आणि काळोखाचे विश्व पसरले होते.
गाडी चालवताना दुतर्फा असलेले झाडांचे बुंधे जणूकाही सलाम मारणार्या हुजऱ्यांसारखे उभे असल्याचा भास जाणवत होता. काही वेळा जांभळाची किंवा सागाची झाडे येत असत त्यांचे बुंधे सफेद दिसायचे तर बहुतांश झाडांचे अस्तित्व काळोख आणि पावसाच्या धारांमध्ये विलीन झाले होते. पावसाचा जोर आता थोडा कमी झाला होता आणि तो संपूर्ण थांबल्यास आपल्याला लवकर घरी पोहोचता येईल अशी आशा डॉक्टर बाळगून होते. रस्त्याच्या बाजूने बहुतेक कापलेल्या झाडाचा सफेद बुंधा डॉक्टरांच्या नजरेत आला. परंतु गाडी साधारण त्यापासून पंचवीस फुटावर आली असता तो बुंधा हलल्यासारखे डॉक्टरांना जाणवले. कदाचित आपल्या थकलेल्या मनस्थितीत तसा भास झाला असेल असे वाटून डॉक्टरांनी आपली मान दोन्ही बाजूंनी हलवली आणि लक्ष देण्याचा प्रयत्न केला. परंतु जवळ आल्यावर जे काही दिसले त्यामुळे डॉक्टर नुसते दचकलेच नाही तर त्यांना मनोमन हादराही बसला.
तो झाडाचा बुंधा नसून अंगात सफेद सदरा परिधान केलेली एक व्यक्ती होती. इतक्या रात्री निर्जन ठिकाणी ही व्यक्ती काय करीत असावी बरं? आपल्या जिवाला असलेल्या संभाव्य धोक्याची घंटाही त्यांच्या मनात वाजली आणि त्यांनी पटकन आपल्या गाडीमध्येच संकटसमयी वापरण्याच्या हाथोड्यावर हात ठेवला. धोका असल्यास पाऊसपाण्याची पर्वा न करता गाडी तेथून भरधाव पळवायची तयारीही त्यांनी केली. डॉक्टरांची गाडी जवळ पोहोचली. पहातो तर एक सत्तरीच्या आसपासचा वृद्ध मनुष्य हातवारे करून गाडी थांबवण्याची विनंती करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीतीची भावना स्पष्ट दिसत होती. घातपाताचा संभाव्य धोका पत्करून देखील आपल्या कर्तव्याला जागायचे डॉक्टरांनी ठरवले. त्यांनी गाडी उभी केली आणि काच खाली केली.
“साहेब,” पावसात ओलाचिंब होऊन कुडकुडत असलेला तो इसम म्हणाला, “माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या आहेत. ती अत्यंत नाजूक परिस्थितीत आहे. तिला कनकपुरला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहे. आपल्या गाडीमध्ये तिला जर कनकपुरला घेऊन गेलात तर फार उपकार होतील.”
डॉक्टरांनी एक उसासा टाकला. “हे बघा काका, मी डॉक्टर आहे. चला बघू या काय करता येईल ते.” डॉक्टर आपली वैद्यकीय बॅग घेऊन गाडी बाहेर उतरले. रस्त्यापासून दहा-पंधरा पावले आत चालत गेल्यावर त्यांना एक फाटक दिसले. आत मध्ये एक कौलारू परंतु ऐसपैस असा बंगला दिसत होता. फक्त एका खोलीमध्ये दीवा जळत होता. ते घरात शिरले. रूममध्ये बेडवर साधारण तिशीतील एक स्त्री वेदनेने कळवळत असलेली त्यांना आढळून आले.
“डॉक्टर, ही माझी मुलगी गौरी. कृपया तिला वाचवा.” डॉक्टरांनी त्वरित तपासणी सुरू केली. प्रसूतीची वेळ झाली होती. इतकेच काय बाळाचे डोकेही दिसू लागले होते. आता तिला कुठेही हलवण्यात काहीही साध्य होणार नव्हतं. डॉक्टरांनी त्या इसमाला पाणी गरम करायला सांगितले. पाणी उकळल्यावर त्यामध्ये सुरी घालून ती जंतू निरोधक करण्याचाही सल्ला दिला. आपल्याकडे आलेत ते डॉक्टर आहेत ते समजताच त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर देखील थोडेसे समाधान दिसू लागले होते. विमनस्कतेच्या जागी आशा दिसू लागली होती. दहा मिनिटांच्या प्रयत्नाअंती बाळ सुखरूप बाहेर आले होते. निर्जंतुक केलेल्या सुरीने नाळ कापून बाळाच्या अंगावरचा ओलावा एका चादरीने हळुवारपणे पुसून त्यांनी ते बाळ अलगद आईच्या अंगावर ठेवले होते. थोड्याच वेळात आईच्या अंगच्या उबेने सचेतन होऊन ते बाळ स्तनपान करू लागले होते. डॉक्टरांनी एका पानावर तारीख आणि बाळजन्माची रात्रीची ११.५६ ही वेळ नोंद करून ठेवली.
दिवसभराच्या कामाने आणि आता केलेल्या श्रमामुळे पुरते शिणलेले असलेले असून देखील डॉक्टरांना हायसे वाटले. मृत्यू संकटातनं दोन जीवांचे प्राण त्यांच्या येण्यामुळे वाचले होते, त्याचे त्यांना अपार समाधान होते. बाळ बाळंतीण सुखरूप होते याची खात्री करून डॉक्टरांनी तिच्या बाबांना, तिला सकाळी सार्वजनिक आरोग्य केंद्रावर नेऊन तिच्या शुश्रुषेचे बाकी सोपस्कार करण्याचा सल्ला दिला. अश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी आभार मानीत असलेल्या तिच्या बाबांना त्यांनी सावरले. हे सगळे विधात्याच्या इच्छेप्रमाणे होत असते, आपल्या हातात काही नसते असे त्यांनी समजावून सांगितले.
डॉक्टर त्या घरातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते. नेटवर्क नसल्यामुळे घरी काही कळवणे शक्य नव्हते. घरातली मंडळी चिंताग्रस्त झाली असतील याची त्यांना जाणीव होती परंतु आपण आपले कर्तव्य चोखपणे बजावले ह्याचा त्यांना अभिमान होता. त्याचे फळ म्हणूनच की काय, बाहेर आल्यावर पाऊस तर ओसरला होताच, ढगाआडून चंद्रही डोकावू लागला होता. या भागातून पुढे गेल्यावर दोन किलोमीटरवर पारडोली घाट लागत होता. रस्त्याच्या एका बाजूला उंच कडा आणि वळणावळणाचा रस्ता म्हणून येथे तुंबळ पावसात आणि अंधारात गाडी चालवणे जिकिरीचे आणि धोक्याचे असायचे. आता चंद्रही आल्यामुळे मार्गक्रमण सुकर होणार होते.
***** ***** *****
त्यानंतरच्या आठवड्यात डॉक्टर सुदर्शन पुन्हा सारणगावच्या विजिटसाठी निघाले. पारडोली घाट पार केल्यानंतर त्यांना अचानक आठवण झाली. आपण गेल्या आठवड्यात ज्या बाळाला जन्माला आणण्यास मदत केली त्याची आणि त्याच्या आईची खबरबात विचारावी म्हणून त्यांनी त्या भागात तो बंगला शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळेला रात्रीची वेळ असल्यामुळे नक्की कुठे गाडी थांबली होती याचा बोध लागत नव्हता. शेवटी रस्त्यापासून जरा दूरच असलेला तो फाटक त्यांना दिसला. ते उतरून फाटकाकडे गेले. आतमध्ये तो जुना परंतु एकेकाळी शानदार असावा असा तो बंगला त्यांना दिसला. फाटकाबाहेर एक वॉचमन उभा होता.
“साहेब, तुम्हाला कोण हवंय?” वॉचमनने डॉक्टरला विचारले.
“गेल्या गुरुवारी येथे एका बाळाचा जन्म झाला, त्या बाई आणि तिचे बाबा कुठे आहेत? बाळ बाळंतीण सुखरूप आहेत ना?” वॉचमनच्या चेहऱ्यावर थोडेसे आश्चर्य आणि कुतूहलाचे भाव तरळले.
“साहेब, या बंगल्यात गेले सहा महिने झाले कोणीच राहत नाही.” आता आश्चर्यचकित होण्याची पाळी डॉक्टर सुदर्शन यांची होती.
“अहो,” ते वॉचमनला म्हणाले, “मी डॉक्टर आहे. मी स्वतः त्या बाईची प्रसूती हाताळलीय. मुलगा झालाय त्यांना. तुम्ही काहीतरी लपवत आहेत का?”
डॉक्टरना काहीतरी काळंबेरं घडले असल्याचा संशय येऊ लागला होता.
“साहेब, येथे गौरी मॅडम आणि तिचे वडील रमाकांत काका राहायचे. गौरी मॅडम गरोदर होत्या. त्यांचे मिस्टर परदेशी कामाला असतात. सहा महिन्यांपूर्वी रात्री साडेअकरा वाजता त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या कारमध्ये घालून कनकपुर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी प्रयाण केले.” वॉचमन बोलता-बोलता थांबला. एक आवंढा गिळून तो पुढे म्हणाला, “परंतु पारडोली घाटावर त्यांच्या गाडीला अपघात होऊन तीनशे फूट खोल दरीमध्ये ती कोसळली. त्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.”
डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली होती. आपल्या चेहऱ्यावरचा घाम टिपत ते म्हणाले, “पण मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहिले त्यादिवशी….!”
“साहेब,” वॉचमन म्हणाला, “मी पूर्वी चोवीस तास येथे ड्युटी करायचो. परंतु दररोज रात्री अकरा ते बारा वाजता ह्या बंद असलेल्या घरातून स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू येत असत. म्हणून मी येथे आता फक्त दिवसाची ड्युटी करतो.”
डॉक्टर हडबडलेल्या स्थितीत त्या बंगल्या कडे पहात उभे होते. प्रसूती सुखरूप झाल्यानंतर त्या बाळंतिणीच्या चेहऱ्यावर आलेला तो सुटकेचा निश्वास, बाळाने स्तनपान सुरू केल्यावर विलसलेला तिच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचा ओलावा आणि अनंत उपकार झाल्याच्या भावनेने सद्गदित झालेले तिचे बाबा, सर्व काही त्यांच्या मनचक्षूसमोर एखाद्या चित्रपटातील वारंवार रिवाइंड केलेल्या सीनसारखं पुन्हा प्रदर्शित होत होतं.