टिल्लू महादेव
- प्रा. जगदीश संसारे,
सेंट जोसेफ महाविद्यालय, विरार
‘टिल्लू महादेव’ हे नाव वाचल्यावर तुमच्या मनात ताबडतोब मी आता तुम्हाला काहीतरी धार्मिक गोष्टी सांगणार असे धर्मविचार आले असतील, बरोबर ना? म्हणजे ‘खड्या हनुमान’ सारख्या एखाद्या जागृत देवस्थानाविषयी मी काहीतरी सांगणार (अर्थात लिहिणार) असे तुम्हाला नक्की वाटले असेल ना ? ‘टिल्लू महादेव’ हे कुठल्यातरी शंकराच्या देवस्थानाचे कोण्या पुण्यवानाने नामकरण केले असेल असे तुम्हाला नक्की वाटले असेल! बरोबर यातले पण यातले काही नाही टिल्लू महादेव म्हणजे नेमके काय असेल याविषयी कितीही ताण दिला तरी, तुमच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही.
टिल्लू महादेव हे नाव उकळलेल्या चहाचे आहे! आहे की नाही गंमत? त्याचं असं झालं, गिरगावमधील खाडिलकर रोडवर असणाऱ्या वैश्य समाजाच्या हॉलमध्ये मी अभिनय प्रशिक्षण देण्यासाठी अगदी वेळेवर म्हणजे संध्याकाळी चार वाजता दाखल झालो. बघतो तर काय सगळे मोठे मोठे आर्टिस्ट अजून पोचलेच नव्हते! म्हणून आयोजकांची परवानगी घेऊन चहाची तल्लफ भागवायला बाहेर पडलो.
चहावाले आणि बारवाले नाक्यानाक्यावर असतातच कारण व्यसनी माणसांची या देशात काही कमी नाही. अर्थात आयोजक असलेल्या आमच्या वहिनीसाहेब चहा देणारच होत्या. पण आयत्या मिळणाऱ्या चहापेक्षा टपरीवर सुरका मारत चहा पिण्यात बेवड्यांना बिन सोड्याची पिताना येते तितकीच मजा आम्हा चवय्याना येते. खाडिलकर रोडवर मस्त टपरी दिसली बिन लग्नाची मेव्हणी दिसल्यावर खुश होणारा चेहरा माझा झाला होता. कळकट, मळकट तिचं रूप पाहून मन मोहरले.
चहा फलक वाचू लागलो ‘तुफान’, ‘टिल्लू महादेव’ अशी चहा नामे वाचून चहा पिण्याची तलफ अजून वाढली. माझं मूळ गाव साखरपा! पण जन्मभूमी व कर्मभूमी दुसऱ्या टोकाची (रत्नागिरी जिल्ह्याच्या) म्हणजेच मंडणगड! तेथील पाटरोडवरील घाग चहावाले आहेत, त्यांच्या चहांची नावे आठवली. ‘मंडणगड’, ‘म्हापळ’ आणि ‘रत्नागिरी’! मी दुकानात गेलो की आमचे महेंद्र लोखंडे दादा आवर्जून ओरडून सांगायचे “घाग, एक रत्नागिरी पाठव.” कोणी ऐकलं तर एसटीचे तिकीट मागतोय असंच वाटेल.पण ‘रत्नागिरी’ चहाचे नाव होते. म्हणजे अजुनही आहे! घागांचे गाव म्हाप्रळ म्हणून साधी चहा म्हणजे म्हाप्रळ! स्पेशल चहाचे नाव ‘मंडणगड’ कारण मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण. तर व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणजे फक्त दूध आणि वेलची मारके अर्थात चहा! तिचं नाव रत्नागिरी! कारण जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरी! घागांच्या प्रतिभाशक्तीला त्रिवार अभिवादन!
सांगण्याचा मुद्दा हाच टिल्लू महादेव हे चहाचे एक नवीन नाव मला गिरगावात कळले. चहा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत! अर्थात प्यायलो नाही तर जगण्याचा अर्थच काय ? चहा म्हणजे ऊर्जा! चहा म्हणजेच असणारे चैतन्य! आणि चहा म्हणजे आम्हाला लागलेलं मरेपर्यंत न सुटणार व्यसन! त्या कळकट, मळकट, पण दणकट चहावाल्याला विचारले टिल्लू महादेव काय आहे? त्यावर तो हसत हसत म्हणाला “नवीन आहात की काय?” माफ करा मंडळी. मुंबईच्या भाषेत म्हणाला “नये हो क्या टिल्लू महादेव मतलब इतने से कप मे मिलने वाली चाय!” बघून मला हसायला आलं! पण खरं सांगू चीनूशी कटिंग पिताना एक वेगळाच फिल येत होता. टिल्लू महादेव नावाचं चांगभलं! तुम्ही एकदा पहा पिऊन टिल्लू महादेव! परत परत घ्यावीशी वाटेल! चला दुसरा टपरीवाला वाट पहातोय!