जानू
- बेर्नादेत रुमाव, गास
गाठीगाठीच्या उंबरापाशी विहिरीजवळचा कोपरा पकडून शंकर म्हणजे दत्तू मिस्त्रीचा बिगारी, छोट्या लोखंडी पिंपातील सिमेंटपाण्यात लाल गेरू कालवित होता. त्याच्या कामात तो मग्न होता. अधनंमधनं पायाजवळचा मोठा दांडा उचलून बुडाशी घट्ट बसलेले सिमेंट तो जोर लावून ढवळत होता. तेव्हा त्याच्या काटकुळ्या दंडातून दोन छोटी बेडकं उड्या मारून वर येत. ओटीच्या जोतावर, मेढीजवळ त्याचा कुडमुड्या अंगाचा मालक सिमेंटच्या माखलेल्या हाताने मजेत विडी ओढत बसला होता. आपल्या विडी ओढण्याच्या कामात जराही व्यत्यय येऊ न देता तो ‘हूं,’ ‘हा’ करीत होता. मध्येच पेद्रू फरेलच्या बोलण्यातील अलिकडचे पलिकडचे दोन शब्द घेऊन बोलत होता. म्हटलं तर जाड्या पेद्रुच्या प्रश्नांचीच उत्तरे देत होता. पेद्रूसमोर कसं दबून राहावं. जपून बोलावं हे दत्तूने चाणाक्षपणे हेरलं होते. कधी नाकपुड्यांच्या दोन भोकांतून तर कधी तोंडाच्या चिमणीतून धुराची नळकांडी सोडण्यात त्याला मज्जा येत होती, हे त्याच्या डोळ्यांतून स्पष्टपणे जाणवत होते.
बिडीचे दोन चार झुरके मारताच त्याची सारी मरगळ झटकून गेली. थकवा दूर झाला आणि आलेली तरतरी त्याच्या ताणलेल्या चेहऱ्यावर रेंगाळू लागली. तरी त्याचे सारे लक्ष शंकरच्या, ‘शेठ, माल तयार हाय.’ या वाक्याकडे लागले होते. ती हाळी कानी येताच नेहमीच्या शिरस्त्याने तो उरलेली विडी जोतावर कच्कन दाबून लेंगा झटकून लगोलग उठणार होता. त्याच बेतानं एक पाय मोकळा आणि एक पाय मुडपूनच तो मेढीजवळ बसला होता. आज कसंही करून त्याला इकडचं काम आटोपतं घ्यायचं होतं. त्याचबरोबर पेद्रूसारख्या बेरकी विखारी माणसाच्या तडाख्यातून लवकर सुटायचं होतं. बराच वेळ शंकरची हाक येत नाही हे पाहून दत्तू म्हणाला, ‘अरे शंकर, हात चालव जरा. माल तयार झाला की नाही? जरा सिमेंट पाण्याचा रंग दाखव’.
आपला लडबडीत हात वर उचलून शंकरने मालकाकडे नजर टाकली. ‘थोडा गेरू घाल अजून. रंग कसा लख्ख दिसायला हवा, पेद्रूशेटचा ओटा कसा लख्ख मस्त लालभडक टॉमेटोसारखा उठून दिसायला हवा.’ पिंपात चिमूट चिमूट गेरू टाकत तो ढवळत बसलेल्या शंकरवर दत्तू उगाचच डाफरला. बारा गावचं पाणी प्यालेला दत्तू आणि त्याचा बिगारी शंकर यांना धंद्यातील बारीक खाणाखुणा माहीत होत्या आणि मालकाची नाडी कशी बरोबर सांभाळायची हे देखील ठाऊक होते.
ओटीवर उजव्या हातावर ठेवलेल्या भरभक्कम फलाटीवर पेद्रूशेट ऐसपैस पसरले होते. हाडापेराने धट्टेकट्टे असलेल्या शेटचा काळासावळा तुंदिलतनू उघडा देह फलाटीत विसावल्यामुळे आधीच भक्कम असलेली फलाटी गरत्या बाईसारखी आता गच्च भरल्यासारखी वाटत होती. गावातील सगळेजण पेद्रू फरेलला ‘जाड्या पेद्रू’ या नावानेच ओळखत होते. अंगातील बंडी उजव्या हाताने गोलगोल फिरवित ते वारा अंगावर घेत होते. बाहेर ऊन रणरणत होते. वारा पडला होता. झाडाचं पानही हलत नव्हतं. चिमणी पाखरे झाडापानांच्या आडोशाला निवांत बसली होती आणि आगवठीआधीच पेद्रू फरेलनी बेड्याचं, घराचं काम काढलं होतं. बारीक कपाळाखालच्या डोळ्यांच्या खोबणीतून त्याची भेदक बेरकी नजर दत्तूवर रोखल्यासारखी वाटत होती आणि तो गुरगुरल्यासारखा दत्तूशी बोलत होता.
‘यंदाचा वैशाख कडक आहे. गरमीनं जीव हैराण झालाय…. त्यात या घामोळ्यानं…. मायला त्याच्या…. अंगाची नुसती काहिली झाली…’ भिरभिरती बंडी काखेखाली घेऊन पेद्रूने काखेखालील, पोटावर ओघळणाऱ्या घामांच्या धारा पुसल्या व तो पुढे म्हणाला, ‘पण यंदा मृग वेळेवर पडणार. कावळ्यांनी घरटी बांधून झाली बघ झाड़ावर.’ उत्तरांची अपेक्षा न ठेवता स्वतःशीच म्हटल्याप्रमाणे तो बोलला. पेद्रू फरेल कधी शाळेची पायरी चढले नव्हते. पण, निसर्गाचे उघडे पुस्तक मात्र त्याला बिनचूक, न अडखळता वाचता येत होतं. भिजलेल्या कोंबडीगत विडी फुंकीत बसलेल्या दत्तूनं पेद्रू फरेलच्या दिशेने मान वळवली आणि धुराचा एक लोट सोडला. त्या लोटात पेद्रूच्या धूसर चेहऱ्याकडे पाहत त्याने मान डोलावली, हा मध्ये हा मिसळला. मग जाड्या पेद्रूला मध्येच तोडत कुडमुड्या दत्तू चाचरत म्हणाला, ‘आज काम संपेल तेव्हा संध्याकाळी पैसे लागतील.’
‘हूं …’ पेद्रू फरेल गुरगुरला.
‘त्याचं काय आहे नं…’ दत्तू मिस्त्री चाचरत बोलू लागला पण त्याचं वाक्य पुरतं बोलून होण्याआधीच पेद्रूशेठ वैतागले.
‘होss होss माहित आहे. मी कुठे पळून जात नाही की घर टाकून जात नाही. गावातच आहे. मिळतील पैसे’ पेद्रू बेफिकीरपणे म्हणाला. पण त्याच्या ‘मिळतील’ या एका शब्दावरदेखील विश्वास ठेवायला दत्तू राजी नव्हता. म्हणून चिकाटी न सोडता अजिजीने संवाद दामटत तो म्हणाला, ‘तुम्ही गावचेच हो. पण शंकर उद्या गावाला जायचं म्हणतोय. गावाकडच्या घराची डागडुजी करायची आहे म्हणतो.’ पुढचं वाक्य बाहेर पडण्याआधी पेद्रूच्या करड्या धारदार नजरेने दत्तूचा आरपार वेध घेतला. दत्तूचे शब्द तोंडातच राहिले.
‘मालक sss’ शंकरची हाक आली. लेंगा सिमेंटसह झटकीत दत्तू उठला पण आता त्याच्या मनात दुविधा निर्माण झाली. संध्याकाळी पैशांचा सगळा हिशोब नीट होईल याची त्याला खात्री नव्हती. दत्तू मिस्त्रीच्या पैशांच्या मागणीमुळे पेद्रू फरेल कावला होता.
‘ए… तुझ्या मायला घामोळ्या फोडतेस की चेष्टा चाललीय, साली xxxx आईच्या वळणावर गेलीय…. आळशी… बिनडोक… टच् टच् फोड घामोळ्या. हातात जीव तरी आहे की नाही?’ पेद्रू फिस्कारला. त्याबरोबर पाठीवरचे घामोळं फोडणारा तो इवला जीव दचकला. कावराबावरा झाला आणि पुन्हा झटपट वेगाने कामाला लागला: आपल्या कठोर पाषाणहृदयी बापाची वरवंट्यासारखी दिसणारी काळी कुळकुळीत पाठ आणि त्यावरील घामोळी फोडण्याचं काम खरं तर, त्या छोट्या जीवाला नको होतं. त्या कामाचा तिला कंटाळा आला होता. पण बापासमोर उभं राहून तोंड उघडून बोलायची तिची हिंमत नव्हती. पण या कामाऐवजी गोठ्यातील शेण गोळा करण्यात, गोवऱ्या थापण्यात, विहिरीतून पाणी शेंदून आणण्यात, घर सारवण्यात, गोठ्यात गाईम्हशीचं खुराकपाण्याचं बघण्यात तिला कंटाळा येत नसे.
आताही तिची नजर पिंपळाखाली चिकट पिवळीधम्मक राजण, काळीभोर करवंदं आणि गोड सुवासाच्या पिवळी केसरी काजूची बोंडं असला सगळा रानमेवा टोपल्यात घेऊन बसलेल्या बायांकडे लागली होती. काल दुपारी वालाच्या बिरड्यासाठी म्हणून टोपलीतील वाल घेताना तिने थोडे वाल बाजूला काढून ठेवले होते. आणि आता त्याच्या बदली तिला तो रानमेवा घ्यायचा होता. सकाळपासून तिचं लक्ष पिंपळाखाली लागलं होतं आणि जेव्हा पिंपळाखाली धावायची वेळ आली तेव्हा तिच्या या हैवान, तारवटलेल्या बापानं नेमका घरात प्रवेश केला होता.
‘बाय कडे हाय?’ त्याने मेरीच्या नावाचा पुकारा केला. मेरीला तो लाडाने बाय नावाने हाक मारीत असे तेव्हा आभाळात ढग गडगडल्याप्रमाणे त्याचा आवाज त्या बंगलीत घुमला. दुसऱ्यांदा त्याची गर्जना होण्याआधीच मेरीच्या हातातील काम लगबगीने काढून घेत जानू, मेरीची आई दबकत दबकत म्हणाली, ‘जाय. लवकर पळ. राक्षस आलॅ वाटते. त्याला का पाय ता बगॉन ये. (त्याला काय हवं ते बघ) हातात उचललेलं आंगाठ / खॉलॉ (केळीचं पानं) तसंच ‘पाणेरी’ वर (स्वयंपाकघरातील पाण्याची भांडी ठेवण्याची जागा) ठेवित मेरी धावत पळत ओटीवर आली. आणि आता ती हे कंटाळवाणं काम निपटीत बसली होती. समोर पाठ करून बसलेल्या आडदांड
बापाविषयी तिच्या कोवळ्या मनात ना प्रेम होतं ना आदर. होता तो प्रचंड राग आणि तिरस्कार. असल्या कोपिष्ट, व्यसनी बापाबरोबर आईनं लग्न कसं केलं? का केलं? हे न सुटणारं कोडं तिच्या समोर होतं.
सार्या गावानं पेद्रू फरेलला ओवाळून टाकलं होतं. ‘त्याच्या हाताखाली जानूच दिवस काढू जाणे शेजारीपाजारी, गावकरी, पैपाहुणे नेहमी म्हणत. पेद्रू म्हणजे जमदग्नीचा अवतार. त्याचा भडका कसा उडेल याचा नेम नव्हता. त्यामुळे जानू नेहमीच धास्तावलेली असायची. नातेवाईकांकडील लग्नांत, कार्यक्रमांत जरा कुठे खुट्ट झालं की जानूच्या काळजात धस्स् व्हायचं. भेदरलेल्या सश्याप्रमाणे ती अख्ख्या सोहळ्यात खालमानेनं वावरायची. कसायाच्या दावणीला आजोबानं आईसारख्या गरीब गाईला आणून का बांधलं असे तिच्या वयापेक्षाही मोठे प्रश्न मेरीला अलीकडे कायम पडू लागले होते. सहा भावांची ती एकमेव बहिण होती. सगळेजण लाडाने तिला ‘बाय’ म्हणत. तिचे लाड करीत पण तिच्या वयातील इतर मुलींच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्फुल्ल खेळकर भाव तिच्या चेहऱ्यावर कधी या बापामुळे दिसला नाही. लहान वयातच ती प्रौढ झाली.
आताही बापाच्या पाठीवर हात फिरविताना तिला त्याचे मोठे अक्राळविक्राळ पंजे दिसत होते. त्याच हाताने त्यांनी अनेकदा आईला लाथाबुक्क्यांनी तुडवले होते, मारले होते. त्याच्या रागाचे निमित्त काय तर भाजीत मीठ नाही, भात कच्चा कसा, भाकरी करपली तर लक्ष कुठे होते, शेतात वेळेवर चहा का पोहचला नाही, म्हशीला का धुतले नाही, एक ना अनेक. न संपणारी अशी ती यादी होती. परवा तर याच बापाने चुलीवरील सगळा स्वयंपाक भांड्यासह परसदारी भिरकावून दिला. आणि मग दुखऱ्या डोळ्यांनी चुलीत फुंकर घालून जाळ करीत बसलेल्या आईचा शेंडा आपल्या राकट पंज्यात कचकचून पकडून याच राक्षसाने तिला फरफटत दाराबाहेर काढलं होतं. ते काही पहिल्यांदा नव्हतं. असं किती तरी वेळा झालंय, आपलं सगळं बालपण या बापामुळे करपून गेलंय. अकाली पडणाऱ्या पावसामुळे सारा मोहर करपून जावा तस्सा! प्रत्येक आठवणीबरोबर मेरीच्या मनातील बापाविषयीची कटूता वाढत होती. आणि खालमानेनं सगळं सहन करणाऱ्या आईचाही तिला हल्ली राग येत होता. त्यामुळे असेल कदाचित पण आता मेरीच्या कामाला वेग आला होता आणि बाप सुखावला होता.
पदरात निखारा बांधून जानू आला दिवस ढकलीत होती. पदर जळता कामा नये आणि निखाराही विझता नये. रोजचीच तारेवरची कसरत होती. माजघरात (गय) बसून जानू केळीचं बोंड (केळफूल) साफ करत होती. कालच शेतातून येताना त्याने ते आणले होते. आणि ओटीवरच्या फलाटीखाली चीक निथळत ठेवलं होतं. पुढचं काही बोलण्याची जरुरी नव्हती. बायकोने काय ते समजून घ्यावं ही रीत होती. आता त्यांचा संसार तेवीस वर्षांचा झाला होता. त्यामुळे ‘शब्दावाचून कळले सारे शब्दापलिकडलं’ ही गत होती. त्यात प्रेम, आपुलकीचा गिलावा होता का? देव जाणे. पण पेद्रूला आपल्या नवऱ्याला ‘बोंडाआ ढेस्का’ खाण्याची इच्छा झालीय, हे जानूला कळलं होत.
‘ए ss माझ्या मरे ss ऐकलंस का?’ माजघराच्या दारातूनच त्यांची तिरसट हाक आली. पण बोंडावरील थंडगार गोड गुलाबी मऊसूत पाकळ्या हलक्या हाताने काढण्यात जानू मग्न झाली होती. माजघरात अंधार, उकाडा आणि धूर याचं साम्राज्य होतं. पण त्या राज्याचीच जानू अनभिषिक्त मालकीण होती.
मुख्य हाताला सहावं बोट फुटावं तसं माजघर (गय) मुख्य घराच्या एका अंगाला होतं आणि सर्व घरातील रिवाजाप्रमाणे तेथे पुरुषाचा वावर जवळजवळ नगण्य होता. म्हणून घरातील सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारं माजघर कायम दुर्लक्षित होतं.
‘ऐकलंस की कान फुटले तुझे.’ मुख्य दारातून माजघरात डोकावत पेद्रुनं डरकाळी ठोकली. त्या डरकाळीने जानू मोरलीवरून (विळीवरून) धडपडत उठली. घांजीपिंजी (घाबरीघुबरी) होऊन पेद्रूसमोर आ वासून उभी राहिली. त्यामुळे आधीच छोट्या चणीची फिकुटशी जानू वाघासमोर भेदरलेली शेळी दिसावी तशी दिसू लागली. आणि ह्यांना काय सांगायचंय याकडे कानात प्राण आणून ती ऐकू लागली.
‘मी म्हणतो, चुलीपुढे काही दुरुस्ती करायची आहे का?’ माजघरात बायकांचं राज्य! एवढ्या वर्षांत त्यात कधी घरातील पुरुषांनी लुडबुड केली नाही की आवड दाखविली नाही. नाही म्हटलं तर हे सासऱ्याच्या हातचं जुनं घर पण, भरलं कुटुंब असताना मोठ्या दिरानं लाकडी माळा ‘शिळूण’ (लाकडी फळ्याची जमीन) घेतला. मधल्या काळात फळ्यांचा कूड काढून त्या जागी मोठ्या जाड भक्कम विटेच्या भिंती उभारल्या. सामानसुमान ठेवायला फडताळ केली. लाकडी शिडी जावून त्या ठिकाणी मोठा लाकडी सागवानी जिना बसवला. त्याला चांगला जाड कठडा बनवून घेतला. पण माजघरात (गय) काहीही बदल झाले नाहीत. वर्षानुवर्षे ते आहे तसंच राहिलं.
मध्यंतरीच्या काळात दोन मोठ्या जावा नव्या बंगल्यात राहायला गेल्या. जुनी बंगली पेद्रूच्या वाट्याला आली. त्यामुळे पेद्रूच्या बोलण्यानं जानू एकदम गोंधळून गेली. माजघरात काही गोष्टी बदलण्याची गरज आहे याचा कधी तिने विचारच केला नव्हता. आणि तसा विचार करायला नवऱ्यानं कधी तिला संधीही दिली नव्हती. सारखा हिडीस फिडीस करणारा नवरा मिळाल्यावर याहून वेगळं ते काय होणार? जानू गप्प मख्खासारखी उभी राहिलेली पाहून पेद्रूचा पारा चढू लागला. ‘मी काय बोलतो कळतंय का? डोक्यात जातं की काही?’ तिच्या बावळट ध्यानाकडे कुत्सित नजरेने पाहत तिला खिजवित पेद्रू गरजला. त्यामुळे स्वतःविषयी वाटणाऱ्या जानूच्या कमीपणात आणखीच भर पडली. पण मग स्वतःला सावरत ती म्हणाली, ‘आपली पाणेरी ….. मोडली आहे एका बाजूला’ भेंडीच्या लाकडापासून सासऱ्याच्या काळात बनविलेली पाणेरी आता इतक्या वर्षानंतर सारखी भिजून एका कुसात मोडली होती. ती दगडविटांची बनवली तर ती जानूला हवी होती. ‘तेवढा माल नाही शिल्लक. काय ते पटकन बोल. मिस्त्री जातील निघून. जाण्याच्या आधी बोल’ हात नाचवित पेद्रू गुरगुरला.
‘मग, चुल तरी…’
‘हुं’ घरधन्यानं हुंकार भरलेला पाहून जानूला बरं वाटलं. दर वर्षी ती मातीची नवीन चुल घालायची. पण उंदीर, घुशी रात्री ‘उकॅरॉ’ (उकिरडा) करून ठेवायचे. चुलीपुढील बारमाही ओल तर पाचवीला पुजलेलं. ओटीवर जाताजाता पेद्रू फरेलने शिल्लक दगड, रेती, विटा, सिमेंटचा अंदाज घेतला. चुल बनण्याएवढा माल शिल्लक होता. आणि तो वापरल्याशिवाय पेद्रू फरेलचा पै-पैसा वसूल होणार नव्हता. मनातल्या मनात ताळमेळ बांधत तो ओटीवर आला. त्याने दत्तूला माजघरात पाठवलं. चुलीपुढच्या जीवनाला जानू कंटाळली नव्हती. तो ओटा तिच्या सुखदुःखाचा साक्षीदार होता. जिवाभावाचा मित्र होता. जानूने गाळलेल्या असंख्य दुःखाश्रूंचा तो ओटा एकमेव साक्षीदार होता. घरातल्या त्या एकाच कोपऱ्यावर खऱ्या अर्थाने तिचा हक्क होता.
आणि पेद्रूनं खरंच मनावर घेतलं. संध्याकाळपर्यंत माजघरातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात छोट्या झरोक्याखाली चार बाय तीनचा दोन चुलींचा ओटा दत्तू मिस्त्रीने घाईगर्दीने उरकून दिला आणि आपली थापी खाली ठेवली.
जानू कौतुकाने चुलं न्याहाळत होती. सबंध उभ्या आयुष्यात नवऱ्याने तिच्यासाठी म्हणून केलेल्या एकमेव कामावर ती मनोमन खूष होती आणि जानूची अक्कल चुलीत घालायला आपल्याला आणखी एक कारण मिळाल्याचं समाधान पेद्रू फरेलच्या चेहऱ्यावर रेंगाळत होतं.