जाणीव
- दुर्गाप्रसाद खांडाळेकर, 9969347106
पावसाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे ऑफिसला निघतेवेळीच पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. घरात बसूनच मस्तपैकी पावसाची मजा घ्यावी असा एक उनाड विचार मनाच्या कोपर्यात येत होता. पण ऑफिसमध्ये ऑडिट चालू असल्याने कामाचे काळे ढग नजरेआड करता येत नव्हते. शिवाय सौ. देखील तीच्या ऑफिसला निघून गेल्याने पाऊस एकट्यानेच एन्जॉय करण्यास मजा आली नसती या सर्व विचारांती मोठ्या नाखुशीनेच घराबाहेर पडलो.
घर स्टेशनपासून तसे लांब नाही. पण पावसामुळे रीक्षाची जरुरी होती. पावसात रीक्षाची वाट पहाणे म्हणजे देवाची वाट पाहाण्यासारखेच होते. त्यामुळे डोक्याला छत्रीचा आधार या विचाराने छत्री घेऊनच स्टेशनात पोहोचलो. तेव्हा गाड्या सुमारे ३० मिनीटे उशीराने धावत असल्याची उदघोषणा ऐकली. स्टेशनवर गर्दीचा महापूर उसळला होता. दोन तीन गाड्या सोडल्या. नंतरच्या गाडीत शिरण्यास यशस्वी ठरलो व अस्सल मुंबईकराच्या चापल्याने सुरक्षित कोपरा पकडून उभा झालो. आता दादर येईपर्यंत पाउणतासाची निश्चिंती होती. पुढे मधेमधे ‘रुकावट’ घेत गाडी एकदाची दादरला पोहोचली. तेथे देखील थोडाफार पाऊस चालूच होता. आलिया भोगासी म्हणून पाण्याचे खड्डे चुकवत ऑफिसमधे पोहोचलो.
या सर्व प्रकाराने ऑफिसला जाईपर्यंत डोके सोडता मी बर्यापैकी भिजलो होतो. त्यामुळे हातपाय कोरडे करुन शिपायाला लगेच उत्साहवर्धक अशा गरम चहाची ऑर्डर दिली. चहा घेण्याआधी थोडे पाणी प्यावे म्हणून बघितले तर ऑफिसमधे पाणीच नव्हते. बाहेर एवढा पाऊस पडत असताना ऑफिसमधे साधे पाणी पिण्यास मिळू नये याबद्दल संताप व्यक्त होत होता. मी देखील त्यात सामील झालो. मी माझा मित्र अजयला म्हणालो, “सरकारने मुंबईत Water harvesting सक्तीचे करावे.” आमच्या नंदा मॅडम म्हणाल्या “सरकारने छोटी धरणे बांधली पाहिजेत, म्हणजे कमी खर्चात सर्वत्र पाणी उपलब्ध होईल.” तेवढ्यात नाडकर्णी साहेबांचे आगमन झाले. पाऊस, गाड्यांचा विलंबाने वेळ वाया गेला म्हणून ते आधीच कावले होते त्यामुळे आल्याआल्याच त्यानी एकेकाला बोलावून कामाविषयी सूचना देण्यास सुरवात केली. तेवढ्यात शिपायाने ऑफिसमधे पाणी नसल्याचे सांगितल्याने त्यांच्या वैतागात आणखीच भर पडली. त्यांनी महानगरपालिकेला दोष देण्यास सुरवात केली. सर्व नगरसेवक कुचकामी असल्याचे सांगितले.
एकूणच ऑफिसमधे पाणी नसल्याने जणू राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणे सरकार, महापालिकेने काय करावे याबद्दल जो तो सूचना करीत होता. चर्चा रंगात आली होती. या सर्व गडबडीत पाणी का येत नव्हते याचा मात्र कोणीच शोथ घेतला नव्हता. अकाउंटस डिपार्टमेंटने पाणीपट्टी भरली का याचीही खात्री करण्यात आली. तेवढ्यात खालच्या टाकीतील पाणी वर चढविण्यासाठीचा पंप बंद पडल्याचे कोणाच्यातरी लक्षात आले. तेव्हा पंप दुरूस्त करणार्याला बोलवण्यात आले नंतर तासाभरात पंप दुरुस्त झाला व पाणी पूर्ववत चालू झा़ले. तेव्हा सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
एवढा वेळ या गोंधळात गेल्याने थोड्याच वेळात लंच टाइम झाला. लंचमधे मात्र वेगळेच चित्र दिसले. केवळ तासाभरापूर्वी पाणी साठविण्याच्या गोष्टी करणारे आम्ही जेवणाचे डबे व तोंड धुण्यासाठी प्रत्येकी किमान ६/७ लिटर पाणी वापरत होतो. आमच्या ऑफिसमधे सुमारे ३० जण आहेत. केवळ डबा व तोंड धुण्यासाठी आम्ही खूपच पाणी वापरत होतो व त्याची आम्हाला जाणीवच नव्हती. परत घरी जातानाचा फेस वॉश वेगळाच! सरकारी यंत्रणेने काय केले पाहिजे हे आम्ही जोराने सांगत होतो. पण सुजाण नागरीक म्हणून आमची कर्तव्ये आम्ही साफ विसरलो होतो.
आमच्याच ऑफिसमधील शिपाई नथू नवरे यानी नम्रपणे पण हसतच ही गोष्ट आमच्या नजरेला आणून दिली. कारण पाण्याची टंचाई काय असते याचा त्याला रोजचाच दाहक अनुभव होता. त्याचे घर पालघर येथील एका वाडीत आहे. त्यांची जुनी विहीर आटून गेली होती. नव्या विहीरीला फारसे पाणी लागले नव्हते. त्यामुळे त्यांच्या ६/७ जणांच्या कुटुंबाला कसेबसे ३/४ बादल्या पाणी मिळते. उरलेली पाण्याची गरज गावातील दुसर्या विहीरीवरून अथवा टॅंकरच्या पाण्याने भागवावी लागते. त्यासाठी मोठ्या कष्टाने डोक्यावर हांडे ठेवून पाणी आणावे लागते. याची जाणीव असल्याने त्यांच्या घरात पाण्याचा वापर खूपच काळजीपूर्वक होतो.
त्याच्या हसण्यानेच त्याने आम्हा सर्वांच्याच डोळ्यात जणू अंजन घातले होते व आमच्या बोलण्यातील व वागण्यातील तफावत आमच्या लक्षात आणून दिली. थोडा वेळ पाणी आले नाही म्हणून आम्ही, सरकारवर महानगरपालिकेवर दोषारोप करून मोकळे झालो होतो. भरीसभर म्हणजे दोष ऑफिसच्या यंत्रणेतच होता. परंतु पाणी किती अमूल्य आहे व ते किती काळजीपूर्वक वापरले पाहिजे याचा आम्हाला विसरच पडला होता. किंबहुना याबाबतीत आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीवच आम्हाला राहिली नव्हती.
आता मात्र हे लक्षात आल्यावर ऑफिस मधील सर्वांनी पाणी काळजीपूर्वक वापरण्याचा निर्धार केला. वाईटातून चांगले होते ते असे!