जागर मराठी / वसई आकाशवाणी
- संतोष गायकवाड, वसई, 9821426038
मी संतोष गायकवाड, जागर मराठी वसई आकाशवाणी. आम्ही वसईमधील राजकीय, सामाजिक, साहित्य घडामोडी, नामांकित चर्चेतले चेहरे मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत. खरं तर हा प्रवासा सोपा नव्हता. अंबेजोगाईमधील योगेश्वरी महाविद्यालय मधून विज्ञान शाखा पदवीधर परीक्षा पास झाल्यावर मुंबईचा रस्ता पकडला आणि मुंबईमध्ये मामाकडे चुनाभट्टी इथे राहण्यासाठी आलो.
तब्बल ३५ दिवस नोकरीसाठी भटकंती करून शेवटी चकाला, अंधेरी येथील येथील हॉटेल सामराजच्या मॅनेजर श्री. दौलत गुलीयना यांना माझी दया आली आणि त्यांनी मला कॅशियर म्हणून नोकरी दिली. हे 2003 साली मुंबईमध्ये आणि पगार होता महिना १६०० रुपये पण लग्न नव्हते झाले त्यामुळे अनुभव म्हणून आणि गरज म्हणून ती नोकरी स्वीकारली.
मुंबई मायानगरीमध्ये अनेक अनुभव आले, या मायानगरीचा झगमघाट पाहीला. नोकरी सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत. रात्री १२ वाजता घरी, मामाकडे पोहचायचो. खूप वैताग यायचा. आपण विज्ञान पदवीधर आणि काय जॉब करतोय. मला नाटकात काम करायचे होते, मला पत्रकारिता करायची होती पण तसे पोषक वातावरण नव्हते. आमच्या हॉटेलमध्ये बाजूला अल्फा टीव्हीचे कार्यालय होते. सर्व कलाकार पार्टीसाठी आमच्या हॉटेलमध्ये यायचे, आमच्या हॉटेलच्या मालकाचा जावई, राजू सिंग जे ‘चांदणी बार’ ह्या हिंदी सिनेमाचा संगीत दिग्दर्शक होते, त्यांना मी मुंबईमध्ये फिल्म लाईनमध्ये प्रयत्न करतोय, तुम्ही मला मदत कराल का? अशी विचारणा केली. माणूस छान स्वभावाचा होता. त्यांनी ‘झी’च्या अजय भालवणकर ह्यांच्याकडे पाठवलं. पण माझे प्रायोगिक नाटक एकांकिका मध्ये मुंबईमध्ये काही काम नसल्याने गाडी पुढे गेली नाही.
२००६ ला Claris Lifesciences मध्ये मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव्ह(MR) म्हूणन लागलो. त्यावेळी मी बेलापूरला राहत होतो. माझा मित्र ब्रुनो थॉमसने मला वसईमध्ये घरं घे म्हणून सूचना केली आणि मग मी विचार करून वसईमध्ये घर घेतले आणि वसईकर झालो. आमच्या अंबेजोगाई मध्ये यशवंतराव चव्हाण समारोह मध्ये वसईमधील साहित्यिक, फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे भाषण मी दहावीमध्ये असताना ऐकले होते. वीणाताई गवाणकर यांचेही भाषण मी अंबेजोगाईमध्ये ऐकले होते. अशा ज्ञानी लोकांच्या नगरीमध्ये राहण्याची संधी मिळाली. यामध्ये वसईमधील बँसीन कॅथॉलिक बँकने मला कर्ज दिले, त्यांचा खूप आभारी आहे. जवळपास १२ वर्ष नोकरी केली, मग कला क्षेत्रात वाचन आणि प्रेक्षक या भूमिका पार पडल्या. पण कुठे तर आंतरिक इच्छा (नाट्यकला, अभिनय) ज्वालामुखी सारखी उफाळून यायची पण वेळ मिळत नसे.
इच्छा ते स्वप्नपूर्ती, तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही बदल घडवू शकता, मला वृत्त निवेदनाची आवड होती. आणि मी एक वर्ष प्रयत्न करत होतो की आपले एक यूट्यूब चॅनेल असावे, यासाठी तांत्रिक सहयोग फार महत्वाचे आहे. तो योग् जुळून आला आणि २७ फेब्रुवारी २२ रोजी जागतिक मराठी भाषा दिनी आमच्या वाहिनीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रवासामध्ये श्री. अनिलराज रोकडे, अध्यक्ष, वसई विरार महानगर पत्रकार संघ, आणि आमचे स्नेही वॅटिकन रेडिओचे माजी निवेदक तथा जाना कुमारी या कादंबरीचे लेखक श्री. रेमंड मचाडो यांची खंबीर साथ होती तसेच आमच्या जागर मराठी वसई आकाशवाणी टीमच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ शिल्पा परुळेकर पै आणि सर्व महिला सदस्य यांनी आपला अमूल्य वेळ दिला. त्यामुळे हा ‘जागर मराठी वसई आकाशवाणी’चा प्रवास शक्य झाला.
आजपर्यंत जागर मराठी वाहिनीवर विज्ञान लेखक श्री. जोसेफ तुस्कानो यांच्या विविध विषयांवर मुलाखत घेतल्या तसेच वीणाताई गवाणकर, माजी आमदार डॉमनिक गोन्सालवीस, अवयवदान चळवळीमध्ये काम करणारे श्री. पुरुषोत्तम पवार असे अनेक नामवंत यांना वाहिनीवर बोलते करण्याची संधी मिळाली.
आपण सर्वांना नाताळ निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
जागर मराठी /वसई आकाशवाणी