स्पीकरवर प्रल्हाद शिंदेचे भजनं
मृदुंग टाळ्याच्या नादगजरात
दर्शन घेणाऱ्याचा घनघन घंटानाद
कुठंतरी फजर
गायीच्या घंटीच्या आवाजात कालवण
आंगणात रांगोळी सड्याची रपरप
गोठ्यात चुळचुळ
गायीच्या स्तनांना लुचनारी कारवड
– चाटत गाय चटचट
दुष्काळाच्या नाकावर टिच्चून
झाड बहरलेय बांधून पावसाचे घरटे
त्याखाली थुईथुई नाचतोय फुलांचा मोर
झाडाच्या सळसळीवर
आनंदाच्या पाखरायचे कवीसंमेलन
हिरवीगार श्रावणाची गझलओवी
इवल्याशा गवतफुलांना सारून
चमकतात दवबिंदू
पाकुळीच्या आभाळपंखांची करत फडफड
मुंग्याच्या कानगोष्टी परस्परांना
जिद्दीच्या काहान्या रातंदिस
तोंडात इवलासा प्रचंड दाणा
गिरणीचा पट्टा करतोय घरघर
भुकेचा पट्टा करायला शांत
सकाळच्या चुलीतल्या धुराचा आसमंतात
गोतावळा
थपथप भाकरी थापत
किणकिणीसोबत
चांगईत म्हशकीने पाणी भरणाऱ्यांचा
गोंधळ घाई गडबड लगबग
गंग्याच्या दुकानावर गर्दीचा गोंगाट
चिमनचाऱ्या हातांचा इवलुसा मोठा बाजार
इथे मी पायऱ्यांवर ऐकत पृथ्वीनाद
घेतोय शाळत प्रार्थना
पाखरं गणवेशात ठेऊन उद्याची सावधानता
मिटून डोळे जोडून कोवळे हात
जणू बसलीयत पाखरं लाईनच्या तारंवर
” या प्रसन्न आवाजात मिसळू नये कोणतेच
वेडेवाकडे आवाज
सीमेवर उगवावी शांततेची हिरवळ
आमने सामने असलेल्यांना व्हावा
प्रेमाचा कावीळ
बॉम्बच्या कारखान्यावर पडावा फुलांच्या सुगंधाचा पाऊस
युद्धाची भाषा पावावी लोप
द्वेषाच्या हृदयाला होऊ नये रक्तपुरवठा
अन् मुर्खांच्या वस्तीला लागो भयंकर आग
एवढी एक प्रार्थना पूर्ण कर विधात्या
पक्कं सांगतो
तुझे गीत गाण्यासाठी शब्दांकडे अहोरात्र मागेल भिक होऊन जलमाचा भिकारी”
- अमोल विनायकराव देशमुख, महेंद्र नगर,परभणी
संपर्क – 7620949985