जनक (मी जोसेफ बोलतोय)
- सुनील सायमन डिमेलो, गास वाडी
मी जोसेफ, पवित्र मरीयेशी ज्याचा वाङ्निश्चय झाला होता तोच मी जोसेफ. या वयात सर्वसामान्य तरुणाप्रमाणे मीही माझ्या संसाराची स्वप्ने रंगवली होती. मरीयेसारखी सुंदर ,नम्र, धार्मिक आणि प्रेमळ मुलगी माझ्या आयुष्यात येणार, माझं जीवन सुखी होणार.
होतो मी एकटा निष्पर्ण झुडूपासारखा, मरीयेच्या येण्याने बहरलो पारिजातासारखा, नवी पालवी फुटणार, बहार येणार पण तिच्या गरोदरपणाची बातमी कानी येताच हृदय तुटून गेले. वाटलं सर्व संपलं आता…. रात्रभर झोपलो नाही आणि विचार केला गुपचूप वाङ्निश्चय मोडून टाकावा…
पण स्वप्नात देवदूत आले आणि त्याने जे सांगितले त्यामुळे तर माझी अवस्था पहिल्यापेक्षा अधिक गंभीर झाली. देवदूत म्हणाला कि जोसेफा…… अजरामर संदेश कानी पडला. प्रत्यक्ष देवपुत्राची माता होणार माझी मरिया. हो, माझीच पण आता देवमाता होणार. सर्वंसमर्थ परमेश्वराची ही योजना आहे. आता ती माझीही माताच नव्हे काय ? आणि मग बेथलेहेम, नाझरेथ, जेरुसलेम असा जीवनाचा प्रवास सुरु झाला माझा.
एके दिवशीचा प्रसंग आठवला. मी माझ्या सुतारकामात व्यस्त होतो. मरिया स्वयंपाकघरात दुपारचे जेवण बनवीत होती. लहान येशुबाळ मला मदत करीत होता. नाझरेथमधील शेतकरी श्री. याकोब नाझ्ररेथकर यांच्या नांगराचे काम सुरु होते आणि त्यावेळेला येशुबाळाचा हात एका लाकडाच्या तुकड्यावर अर्धवट ठोकलेल्या खिळ्यावर पडणारच होता, तितक्यात माझे लक्ष गेले आणि मी जोरात ओरडलोच, “अरे येशूबाळा, सांभाळ, लागला असता ना तो टोकदार खिळा !”
मी असे म्हणताच माझ्याकडे पाहून येशू बाळ हसू लागला. मला फार आश्चर्य वाटले. माझा आवाज ऐकताच मरिया स्वयंपाक घरातून धावतच आली. तिला घाम फुटला होता भीतीने. ती थरथरत होती, “अहो काय झाले ? लागलं का आपल्या बाळाला.अरे देवा, मला इतकी मोठी जबाबदारी देवपित्याने दिली आहे ! आणि मी…” असे बोलून मरिया रडू लागली. आईच ती… जगातली कोणतीही आई आपल्या बाळाला लागले तर अस्वस्थ होणारच. पण जगाला आईची अस्वस्थता दिसते, बापाचा ताण सहन करून चेहऱ्यावर आलबेल असल्याचा केलेला आविर्भाव दिसत नाही.
भीतीने मीही गांगरलो होतो. पण मी तिला म्हटलं कि काहीही लागलं नाही आपल्या येशुबाळाला. जगाचा मालक आहे आपलं बाळ. मग मी येशुबाळाला पुढे म्हटलं, ”अरे बाळा, तुझा जन्म झाल्यापासून बारा वर्षाचा होईपर्यंत खूप ताण सहन केला. तुझा जन्म झाला ती रात्र मी कदापि विसरणार नाही. पुढे भविष्यात जगासाठी ती नाताळची ख्रिसमसची उत्सवाची रात्र असणार आहे, पण आम्हा दोघांसाठी ती कसोटीची रात्र होती. तुझी आई नऊ महिन्याची गरोदर, मध्यरात्रीचा सुमार, अनोळखी गाव आम्हाला कुठेही उतरावयास जागा मिळत नव्हती. तुझ्या जन्माची वेळ जवळ आली होती, किती लोकांची दारे ठोठावली, आर्जवे केली, हात जोडले… अरे, निदान माझ्या सोबत असलेल्या ह्या गरोदर असहाय्य स्रीकडे तरी पहा !”
येशूचा जन्म झाल्यानंतरही त्याला ठार मारण्यासाठी टपलेला हेरोद नवजात बालकांना दयामाया न दाखवता त्यांना ठार मारणारे त्याचे ते निर्दयी सैनिक ह्यांच्या पासून बचाव करण्यासाठी बेथलेहेम ते नाझरेथ हा जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास आणि तो बारा वर्षांचा झाल्यानंतर येरुशलेम नगरीत प्रवासात तो हरवला आणि मग महामंदिरात तीन दिवसानंतर सापडला. त्या लहान वयातही येशूचे ते उदगार, “मी माझ्या पित्याच्या घरात होतो.” काळीज चिरून गेले.
लहानपणी हाताला खिळा लागेल म्हणून सावध करताना येशुबाळाचे ते कोड्यात टाकणारे स्मित आणि आता हरवल्यानंतर येरुशलेमच्या महामंदिरात तीन दिवसानंतर त्याचे हे सापडणे आणि तेही चेहऱ्यावर कसलीही भीती न वाटता दैवी अधिकारवाणीने त्याचे हे बोलणे… सर्व मनाचा गोंधळ उडवणारे होते.. का कोण जाणे, पण मला तर असं वाटत होतं कि मरियेला ह्या सर्व गोष्टी ठाऊक होत्या की नाही ? पण तिने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या.
माझे वयही होत आलं होतं. आयुष्यभर केलेली अंगमेहनतीची कामे आणि ताणतणाव, भीती यामुळे माझे शरीर व मन दोन्ही थकले. माझा या पृथ्वीवरील कार्यकाल संपत आल्याची मला जाणीव होऊ लागली. मरिया आणि येशू या माता व पुत्र यांना एकांतात सोडून मला जावे लागणार होते. ‘हे देवा, काय ठरवलं आहेस रे ?’ असेही विचारले पण त्याचे उत्तर आले नाही. परमेश्वराच्या योजना माणसांच्या योजनेपेक्षा वेगळ्या असतात. खूप दु:ख वाटत होते, असे अर्ध्यावरती सोडून जाताना, पण काय करू ? येशूला मोठं करायचं होतं, त्याच्याबाबतीत स्वर्गीय पित्याची काय इच्छा होती हे ही जाणून घ्यायचं होतं.
बालपणी हेरोदाच्या तावडीतून सोडवलं पण शास्त्री, परुशी यांच्यापासून धोका होताच येशूला. काही काम अपूर्ण ठेवून चाललो याची फार मोठी खंत आहे मला…
जाता तुम्हा सर्वांसाठी एक संदेश, हाताचा पाळणा करून वाढवलेली मुले, मुली वयात आली की आपल्या आईवडिलांना उलट बोलतात, त्यांचे ऐकत नाहीत, त्यांचे विचार अशा मुलांना जुने वाटू लागतात, तेव्हा त्या आईवडिलांना किती दु:ख वाटत असेल, त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील याचा विचार ही मुलं करतात का ?
खुप छान !!!