चारोळ्या – ब्रायन मेंडिस

चारोळ्या

स्वप्न मोडलं  म्हणून

जागेला  दोष  नको

दिवस  उजाडला  म्हणून

सूर्याला  रोष  नको

कसं  वागायचं  हे बरेचदा

समोरच्या  चेहऱ्यावरून  ठरते

स्वभाव  अन व्यक्तिमत्व

मग  आपल्यापर्यंत  उरते

पानगळीत तुटलेली  पानं

झाडायलाच हवीत  का

झाडल्यानंतर ती जाळायलाच  हवीत  का

सुकलेली  पानं राखे पेक्षा सुंदर  नाहीत  का

मुख  दर्शन  हा ही

दर्शनाचाच  एक प्रकार

नाहीतरी  देवाला

कुठे  देता येतो नकार

माणसाला  मन  दिलय

गरजेपुरत कळायला

त्याचं  आपण  वाळवंट केलंय

क्षण  क्षण  जळायला

कोसळणारा  पाऊस

अन उफळनारा समुद्र

भिजलेले  किनारे

अन ओहोटीचा  चंद्र

प्रार्थनेची  व्याख्या आता

बदलायला  हवी

जिभेची  कामं आता

हाता पायांनी घ्यावी

तूझ्या डोळ्यात पाहताच

तुझ्या पापण्या झुकल्या

तुझ्या डोळ्यांचा खोलपणा

माझ्या उथळ नजरेला मुकल्या

लिफ्ट मध्ये लोक कसे

बावरल्यासारखे असतात

आजूबाजूलच्यांना टाळण्यासाठी

मोबाईल चाळत बसतात

सूर्यापेक्षा चंद्र 

थोडा  मंद प्रकाशतो

अन मग  निर्बंध  चांदण्याचा

छंद  जोपासतो

मनासारखं घडेपर्यंत

देव असतो

थोडंसं बिनसलं  की

शनी देव असतो

मी कविता  करत  नाही

मी माझ्या मनाशी  भांडतो

काही  टाळ्या, शिट्या वाजतात  दरम्यान

नाइलाजाने काही ओळी मांडतो

  • ब्रायन मेंडिस, बोळींज

1 Comment

  1. खूप छान लिहिल्या आहेत चारोळ्या. कमीत कमी शब्दांत, अगदी मोजक्या ओळींत लेखकाने आपल्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

Comments are closed.