घरं का पहावी बांधून ? – संदीप राऊत

घरं का पहावी बांधून ?

  •  संदीप राऊत, वसई (९१५८९४८२००)

वसईत स्वतःचे बंगले बांधण्याची परंपरा आजही इतकी शाबूत आहे, की अनावश्यकरित्या घरे म्हणजेच बंगले बांधले जातात. मी वसईतील हिंदू, ख्रिश्चन समाजाबद्दल जरी बोलत असलो तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात असूया नाही परंतु आपल्या संपत्तीचे असे तिरस्करणीय प्रदर्शन जिथे होते तिथे मी सर्वाचा आदर आणि मान ठेवून काही बोलू इच्छितो.

पु.ल. देशपांडे, ग. प्र. प्रधान, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर असे अनेक साहित्यिक आणि विचारवंत एका खोलीत रहायचे. माझा हा कदाचित चुकीचा आक्षेप असेल परंतु तो खरा आहे. वसईत अक्षरशा: कोट्यावधींची घरे बांधली जातात. ती कुणासाठी बांधली जात आहेत हे मी इथे सांगू इच्छितो. ‘कुणी घर देतं का​​ घर’ असे पंचवीस वर्षांनी इथला बाहेरून आलेला मुलगा-मुलगी सांगेल आणि कोट्यावधी पैशाचे घर एखाद्या परप्रांतीयाने बळकावलेले असेल, तो सांगेल, “तुम्ही कोण? चालते व्हा.” मग ह्यावर आताची तरुण पिढी काय बोलणार? सात-बारा सकट तो नवीन बंगला परप्रांतीयांनी बळकावलेला असेल.

मित्रहो, ही सत्य घटना आहे. वसईत अशा घटना घडायला आता सुरुवात झाली आहे. वसईच्या उत्तरेकडच्या भागात विशेषतः ख्रिस्ती लोकांच्या बंगल्यांमध्ये हा शिरकाव व्हायला आता सुरुवातही झाली आहे. स्पष्टच बोलायचे तर ही परप्रांतीय माणसे म्हणजे प्रामुख्याने उत्तरप्रदेश, बिहार, कलकत्ता येथील असतात. बऱ्याचदा त्यांच्या हातात शस्त्रेदेखील असतात. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आता वसईतील किनाऱ्यालगतच्या दोन-तीन कि.मी.वरील भूमीपुत्रांनी आता सावध राहिले पाहिजे.

आता प्रश्न राहिला तो वसईतील कोट्यावधी खर्चाच्या आलिशान बंगल्यांचा. ह्या बंगल्यात इन मिनविन फार फार म्हातारे आई-वडिल अशी कुटुंबं राहतात. त्यातील काही कुटुंबातील तरुण मुले परदेशात राहतात. हे सारं ह्या परप्रांतीयांना त्यांच्या टेहळणीतून व्यवस्थित समझते. त्यानुसार ते नेमके घर हेरतात आणि आपले काम साधतात.

काही वर्षापूर्वी उमेळे गावातही रात्री एकच्या सुमारास असा प्रकार घडला होता आणि त्या परप्रांतीयांनी उमेळे गावातील एका ज्येष्ठ नागरिकाला मारून टाकले. असे प्रकार वसईत स्थानिक भूमीपुत्रांच्या गावातच घडतात असे नाही. आता तर वसई ग्रामीण भागात तसेच स्टेशन परिसरातील फ्लॅटमध्येही ह्या लोकांचा शिरकाव सुरु झाला आहे. वसईत स्थानिक भूमीपुत्रांकडे पैसा अमाप झाला आहे. मुंबईत, भारतात किंबहुना जगातही मोठमोठ्या सेलीब्रिटीजचे बंगलेसुद्धा फिके पडतील असे आलीशान बंगले वसईत आहेत. वसईला बंगल्यांचे शहर म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. हे जरी खरं असलं तरी वसईतील अशा सुखवस्तू घरातील ८०% मुलं-मुली आज कॉर्पोरेट ऑफीसमध्ये उच्च पदावर काम करीत आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान होतात. त्याचप्रमाणे जगभरातील शासकीय कार्यालयात अनेक भारतीय वंशाचे लोक उचपदस्थ आहेत. यावरूनच भारतीय माणसाची प्रतिभा लक्षात येते. आदरणीय डॉ. जयंत नारळीकर यांनी आईन्स्टाईन यांच्याबरोबर काम केले आहे. अशी कित्येक उदाहरणं देता येतील.

खरं तर ही एक बाजू झाली. परंतु भारतात उच्चभृंच्या राहणीमानाचं अंध अनुकरण निम्न वर्गातील लोकं करतात. आज माझ्याकडे पंधरा हजाराचा स्मार्टफोन आहे. परंतू माझ्या घरासमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांकडे विशेषत: मुली-बायकांकडे वीस पंचवीस हजारांचा स्मार्ट (खरं तर स्मार्टचा बाप) फोन असतो. ही सारी मंडळी गावकुसाबाहेरच्या पाड्यावर राहणारी आहेत… ह्या लोकांचे सरकारनेच लाड केले आहेत. रेशन अत्यल्प दरात, हेच लोक हेच रेशन गावातील लोकांना विकतात. मला इथे कुणाचीच निंदानालस्ती करायची नाहीये. परंतु आपल्या एकूणच समाजाची स्थिती चिंताजनक आहे.

आपल्यासारख्या लोकांबद्दल मी बोलत नाही. वर म्हटल्यानुसार गावकुसाबाहेरच्या पाड्यावरील लोकांबद्दल मी बोलत आहे. मी एक दिवस माझ्या घरासमोरून जाणार्‍या स्मार्टफोनवाल्या बाईला विचारले की “तुला मुलं किती?” ती म्हणाली, “दोन मुली” मी म्हटलं,” शिकतात का? ती म्हणाली, “शिकतात काहीबाही.” आता याला काय म्हणावे? समाजातील सदर वर्गातील लोकांना शिक्षणाचं, आरोग्याचं महत्व वाटत नाही. त्यांना सधन वर्गाच्या छानशौकीचं अंध अनुकरण करायला आवडते. त्यासाठी ते कर्जबाजारीही होतात.

मी हे थोड स्वैर लिहितो आहे, परंतु माझे हे स्पष्ट मत आहे की, बर्थ डे, बारसे, एंगेजमेंट, लग्न या सार्‍यांत वारेमाप खर्च करण्यापेक्षा ते पैसे मुलांच्या शिक्षणाभोवती खर्च करा. किंवा गरजू अनाथ लोकांना त्यातील काही भाग द्या. त्या बाबतीत सुधा मूर्ती, नारायण मूर्ती यांचा आदर्श ठेवला पाहिजे, लोकांसाठी जगातील काही सेवाभावी लोक स्वतः त्याग करून किती मोठी कामे करतात त्याचं भान आणि जाणीव सर्वानीच ठेवली पाहिजे, इति.