घडत्या कादंबरीचा तुकडा
- प्रसाद कुमठेकर, मुंबई
“संज्या निस्त कोरडं कोरडं या इकडं या इकडं या मननुक तू, तुला बरोबर माहितिय या जल्माला तरी तुझ्या बापाला हा वाडा सुटना, माझी हाडं या इथंच जळणारायत…”
बोलत बोलत मी घोड्याच्या पागत आले. सगळ्या वाड्यात इथंच काय ती चांगली रेंजय.. ऐकू निट येतंय कानाला.“
व्हय हाव सारख्याला वारखेच हाव बस. झालं समादान…. काय? वामांगी रुख्मायी दिसे दिव्य सोभा… संज्या भाड्या लय आरत्या आठीवलाल्यात रे तुला आं..”
संजा पिसाळल्यासारखा हासला. मी रोखलं नाही आणि बोलायचं पण थांबले नाही.
“तुझ्या बापानं होतं तितकं घालून केलेला मळा बी भावायला दिला. आता त्या बरड तुकड्याचं काय नवल हाय…”
आता मी बी बोलताना हसण्यावरच निवलालते… पर काळजात निस्त चर्र चर्र करलाल्त.
“या मंगळवारी तर यांनी शरन्याबरबर सोता हुबारून ही पाग सारवून नीट करून घेतलीय, जुनी खुट्टी काढून नवी मारलीय..”
मी जूनंच गार्हानं नवं असल्यासारकं मांडन्यावर होते. संज्यापण काही बाही शानपणाच्या गोष्टी सांगण्यावर होता.
“आता घ्या त्येंना… मालकाला अन मी सांगू?”
बाई हे पोरगं आजकाल ताल नसल्यावानीच बोल्तय. उग काई सांगायचं मंजी काय. त्येन्ला तर त्येन्ला आता मलाई ईळ रात पंचकल्याणी दिसूलालाय कोण हसलं तरी खिंखाळल्यावनी वाटतंय. आत्ताई मोबाईलवर बोल्लालेव पर ऐकताळा कानात खिंखाळण्याचाच आवाज युलालाय.
“व्हय वामांगी रुख्मायीचय मी अन इटेवर उभे माझे मालक. न्हैतरी ह्येनी मन्तेतच शालीहोत्रात लिव्ह्लयय मनं की घोडा यज्ञ करतांना डोळ्यात आलेल्या पाण्यानंच बनलाय. उजव्या डोळ्यातून आलेल्या पाण्यानं घोडा. अन डाव्या डोळ्यातून आलेल्या पाण्यानं घुडी.”
मी आता मट्या शानपणानं ज्या गोष्टीनं माज समद्यात जास्त डोस्क खवळतय तीच मुरकु मुरकु सांगूलालते लेकरांना. कान गरम गरम हुलालता फोननं तरीपण. “ती वाण्याची येनी लय टोचू टोचू बोलतिय रं, मागावरंच राहती सटवी. जरा एकांद्या मंगळवारी पोरहायला सुट्टी दिली का हिनं काय ना काय निम्मित काडून येणार अन मनणार येवल्याला गेलेत वाटतं घोडबाजाराला, हाळीला, अकलूजला गेल्यात वाटतं घोडबाजाराला? संज्या लोक नीट न्हाई रे.. लय टपून बसतंय टिंगली उडवायला.”
“रडनुक रडनुक मनायला का चाल्लंय तुमचं. इथं युन बगा माजी नै तर नी तात्याची तरी…” आता निस्ता खर खर आवाज युलालता. बोललेलं ऐकू मनुनच जाइना गेलत नीट.
“मला कधी काय सांगतेत इचारल्याशिवाय? या बारीला शाळंत जाऊन आल्यापासून तर कैच म्हंजे कैच बोलना गेलेत. मड बसू दे त्या मोमल्याचं, किडे पडून मरील बघ त्येनं.”
बोलताना नुसता जाळ जाळ हुलाल्ता डोक्यात अन धारा डोळ्याला. मी खसखस पुसले पदरानंच तोंड उगू पाण्यानं मोबाईलचा खराबा नगो व्हायला. मी फोन ठीवला. बोलणं तरी काय नवं होतं.
‘आत्तापरेंत बोल्लेनीं मी आत्ता कसं जमन उगच… ह्येनला मी कशी अन का मानून बोलू व्हय.’ मी रडू रडू संज्याला, रंज्याला, जेचा फोन आला त्येला हेच सांगण्यावर होते.
पोर तिथं हुंटावर बसून दुरुन सांगणार मला कि ‘आई असं कर, तसं कर, बोल तात्याला, इचार तात्याला.’
घ्या आता मजा जल्म गेला यांच ऐकिण्यात, आता बोल मनल्या मनल्या बोलणं कसं जमन मला. अन चूक असलेल्या माणसाला बोलता तरी येईल एक वेळ पण माझ्या निसंग मालकाला काई बोलायला कसं जीब रेटन माझी.
पर हे पन खराय की लय काळजी वाट्लालीय आजकाल मला मालकाची. येडे वाकडे सपनं पडलालेत. परवा तर मला दिसलत की, मालक पंचकल्यानीवर बसलेत अन घोडा जोऱ्यात उधळलाय. हे लामच्या लाम ढांगा टाकीत पळलालाय हेनला घिऊन. अन मागी मी हाका मारीत पळूलालते ‘मालक थांबा मालक थांबा’ म्हणू म्हणू. घोडा ऐकणार थोडीच आहे मला. तो मालकाला लय लय लांब घेवून चाल्लोता. म्या झटमुन्या उठ्लते. निस्त घामानी डबडब झाल्त आंग. पाट्टेपाट्टे पडलेलं सपान. त्या दिशी दिसभर सारकं छातीत लक लक लक करलालं. हे जागीच होते. माझ्याकडं पाहिलं फक्त विचारलं काहीच नाही…
ह्यांना काही झालं तर मी लगी लगी वळखीते. पण यांना काहीच कळलं नाही. पुरुष माणसाला तेवढी पारख कुठ राहतीय. पण आशेवरच चालतोय न सोंसार. आत्ता त्येयला माज टेंगषण कळल मग कळल मनून तर एवढे दिवस कळ काडली. तो पचकल्यान इळ रात सूड घेऊलाल्यावर आखीरला न राहवून सोताहूनच मालकाला सांगितल या पाट्टे पाट्टेच्या सपनाचं. ऐकून घेतल अन मनले,
“पारू तुला कवाबवा दिसलंय हे… मला रोजच दिसतंय की मी सूद-मूद आपल्या किरिष्ण्यासारख्याच पंचकल्याणीवर बसून दौडत निघालाव. घोडं उधळलंय मला घिऊन”
मला कळनाच गेलं आता काय बोलावं ते. मनात मनलं ‘मालक तुम्हाला पायजेल पंचकल्याणी. तुमच्या मर्जीनं तुम्ही त्यावर सवार होणं येगळं, तवा त्याचं उधळनं येगळं. अन मला असं घाबरं घाबरं करून उधळनं येगळं.
मी तोंड उगडून बोलणार होते कैतर तोपरेंत हेनीच तिसरीकडं बगत मला मनले “जरा चहा टाकतीस का ?”
मी सैपाक घरात चहा टाकलालते. अन मालक सैपाकघरच्या दारापाशी उभं ऱ्हाऊन मला त्या ‘ऐतश’ घोड्याची गोष्ट सांगलालते. दिसभरात मी जितके कामं करलालते तितक्या कामाच्या मधी युन त्येनी हेच गोष्ट संगलालते. न्हाई मनलं तरी कमीत कमी दहा बार सांगीटलती ही गोष्ट की, ऐतश म्हणून देवांयचा एक पांडरा पांडरा पांडराशीपट नुक्रा घोडा आकाशामधीच जल्मलता मनं. अन जल्मल्या जल्मल्या हे उधळला मनं. ऐकिनावनी इतका उधळला मन कि समदी दुनिया,ग्रह, तारे समदे तेच्या टापानं हादरून पार आता आपली जागा सोडतीन का काय वाटलालतं मनं.
असं झालं तर का आपली पिरिथवीबिथ्वी समदं संपणार असं झालं असतं. चिंतेत पडलेले समदे देवं मंग इंद्रराजाकडे उपाय द्या कै तरी मनून गेले. मनले इंद्रभगवाण येसण घाला. नै नै माझं सांगण्यात चुकलं. येसन घालायला ती काय गाय हाय का. हां, देव मनले लगाम घाला ऐतश घोड्याला. तवा इंद्रभगवाननं त्या घोड्याला म्हणजे ऐतशला आपले मानसं लावून लगाम घाटला. अन मंग त्या सूर्याला ऐतश दिला जेच्या रथाला आदीच सात घोडे होते. घ्या ज्येला लोकं आधीच सप्तसप्ति मनत होते त्या सुर्व्याला आठवा घोडा ऐतश. अग माय ग! कळनाच गेलंय मला “
आदीच्या आपल्या सातात आठवा ऐतश बांधला तरी कसा आसन ना सूर्यानं?” मला ऐकिनावनी तोंडातून बाहेर पडलेला मजा सवाल ऐकून मालक मनले,
“पारू श्रीकृष्णाला दिक्खील तूज्यावानीच प्रश्न पडला होता बघ.”
मी तवा बोल्लेनी पण जसं मी मालकाचं बोलणं ऐकिते की नै ध्यानानं. तसं त्येनी करनात. आपल्यातच राहतेत, त्येन्ला जे ऐकायचाय त्येच ऐकीतेत. या बी बारीला नीट ऐकायनीत त्येनी. माज म्हणनंच नै समजून घेतलं. खऱ्यानं तर मला इंद्रदेवानं दिल्यावर त्या घोड्याचं काय झालं? कुठं गेला ऐतश? हा सवाल नव्हताच पडला. मला सवाल पडला व्हता.“
देव येवडा शाना तरी त्येनं जेच्याजवळ आधीच सात सात घोडे हायीत त्येलाच आणि पुन्ना आठवा घोडा दिलाच का ? जरूर असणारे पण घोडा घेऊ न शकणारे लोकं शेकड्याने लाखाने असतानासुद्दा?”
मला आजकाल वाटलालयच देव भंजाळलेला माणूस हाय मनून. आधीच ज्या माणसानं कधी पैशाची जोड ठिवायलनी. वतनाची जमीन जेच्यापरेंत यायलनी. हक्काची पेन्शन आनी येवड्या वर्षात मिळायनी. अश्याच माणसाच्या डोस्क्यात, मनात का मनून त्या देवानं नं आवरणाऱ्या पंचकल्याणाची भर का घाटला असन???
देवाच्या रागानं माजी तिडीक उठली. अन तसं लगलगी थोबाडावर थपंथपंथपं हाणून घेतलं. काय दुर्बुद्दी, देवाला भंजाळलेलं मनलं. मी माझी जीभ रगत इ परेंत चावावं मनले. पण नीट जमना गेलं मनून चटमून देवपाटापशी आले अन जिमीनवर लाल हुन हुळहूळेस्तोर नाक घासलं. अन देवाला पुन्ना इनंती केली,
“बाप्पा महादेवा मालकापाशी तोंड उघडीतनी मनून तुझ्याबद्दल वंगळ बोल्ले.. निस्त वानीतून, मनातून कै यायनी बाबा. आतापस्तोर हातीपायी धड ठीवलायस आता उरले तितके दिस बी असंच ठिव तेवढं पुण्य वाटून घे” आन आले भाईर.
मालक पेन्शनचे कागदं पसरून बसले होते वसरीवर. त्येनी तिथूनंच एक्या कागदाकडे बगत मनले “सफर्जेट”
अन मंग मी कळल्यावनी सैपाक घराकडं वळले. चूल पिटीवली. च्याचं भगोनं वर चढवीलं. अन शिजलालेल्या च्याकड बगत तिच इलेक्शनच्या बारीत इद्यार्थ्यायला, शरनप्पाला, यंकटराव भावजीला, मला, सुनीताला माझ्या छोटीनं सांगिटलेलं द्न्यान म्हणून मालकांनी सांगितलेली गोष्ट आठवूलाले.
“सफर्जेट एमिली विल्डिंग डेविसन… तिकडं लांब इंग्लंडमदे डर्बी शर्यत सुरु असताळा भर शर्यतीत घुसून तिथ॒थल्या पंचम जॉर्ज राजाच्या अन्मेर घोड्यासमोर आल्ती. घोडा आडवा झाला जॉकी हिबाळला गेला, तिनं बी टापंखाली आल्ती जून. चार दिवसानं दवखान्यात तिचा जीव गेल्ता. अन येवढा सगळा परपंच तिनं केल्ता ते फक्त महिलांना मतदानाचा हक्क द्या म्हणून. फक्त बाय्कापायी माणसाचे, नाही नाही नराचे सगळे लक्षणं असलेल्या घोड्यापुडे जीव दिलेली ही बाई. अन जीव दिलेलं साल म्हंजी बगा आपल्या शिवाजी महाराजांच्या जल्माच्या दोनशे तीर्व्यांऐंशी सालानंतर म्हंजी १९१३ला…”
मी बसल्या जागी तूराटीनं सैपाकघराच्या सारीवलेल्या जिमिनीवर गणित घाटलं होतं. अन पंचम जॉर्जच्या त्या घोड्याची धडक खाऊन एमिली मेल्यावर बराबर पंधरा वर्सानी बायकायला मतदान करायला मिळालं साल एकोणीसशे आट॒टाविस… तारिक बगा…
स्स्स्सस्स्स! उतू गेला की माय माजा च्या…जर्रा कुटं ध्यान इकडं तिकडं झालं का मातलाच मना की चहा… गेला उतू.
(पंचकल्याणी या आगामी कादंबरीचा तुकडा)