गोष्ट आर्थिक साक्षरतेची
- ब्रिनल सेल्वीन क्रास्टो, नंदाखाल (परसाव)
अद्वैत हा इयत्ता चौथीमध्ये शिकणारा मुलगा. खेळणे, खाणे, मोबाईल, टीव्ही हे त्याला फारच आवडे. कधी हातात पैसे येतील व आवडीचा खाऊ खाईन असं व्हायचं त्याला. कधी अचानक घरी कोणी नातेवाईक आले की ह्याची फार मज्जा, जाताना ५०-१०० ठरलेलेच ना. पट्ठ्या कधीकधी प्रार्थनाही करे की, आज एक तरी नातेवाईक येऊ दे रे देवा.
कधीकधी आईकडे हट्ट करूनही पैसे मिळवी आणि एकदा का पैसे आले की जवळच्या दुकानात जाऊन ते कधी फस्त करायचे ह्याची घाई त्याला लागे. दुकानदारही ह्याला चांगलाच ओळखून होता. ह्याला हिशोबात काय कळतं? हेही छान ठाऊक होतं. त्यामुळेच लहान समजून दुकानदार ह्याला चांगलंच लुटायचा. भाव तर हा कधी विचारायचा नाही त्यामुळेच त्याचंही छान फावलं होतं.
असंच एकदा आईने ह्याला २० रुपये दिले व एक हिंगाची डबी आणायला सांगितली. हा गेला व २० रुपये देऊन डबी घेतली व घरी आला. डबी आईला दिल्यावर वरचे पैसे विचारले असता हा मात्र कोड्यात पडला. कारण वस्तूचा भाव विचारून खरेदी करणं त्याला ठाऊकच नव्हतं. आता पर्यंत जी नोट असेल ती देऊन हा वस्तू घेई. आईने मात्र खूप राग भरला, ती तातडीने त्याला घेऊन थेट दुकानात पोहोचली. दुकानदारास रागे भरून हिंगाच्या डबीचा भाव विचारला.
दुकानदार म्हणाला, “१५ रुपये बाई.”
“मग तुम्ही अद्वैतला ५ रुपये परत का नाही दिले ?”
“अहो बाई, मी त्याला ५ रुपये देणार तोवर तो निघून गेला.”
आपली बाजू दुकानदाराने मांडली व ५ रुपयांचा कॉइन आईच्या हाती ठेवला. आईला फार राग आला होता परंतु काही ना बोलता ती घरच्या दिशेने चालू लागली. अद्वैतला असं कुणीही कधीही फसवेल ह्याची तिला जाणीव झाली होती परंतु फार काही चर्चा न करता ती घरी पोहोचली. जेवणं आटपली. बाबा घरी आले, आईने घडलेला प्रसंग सांगितला व अद्वैतला बडबडू लागली. बाबा म्हणाले, “त्याला रागावण्यापेक्षा व्यवहार कसा करायचा हे शिकविणे योग्य आहे. व्यवहार कसा करायचा, पैसे कसे वाचवायचे, बचत हे त्याला शिकविले पाहिजे असं म्हणून बाबांनी विषय संपवला.
आज १ तारीख, सकाळी उठल्यावर बाबांना युक्ती सुचली. त्यांनी ५० रुपये घेतले व अद्वैतच्या हाती टेकवले व म्हणाले, “हा तुझा पॉकेटमनी. आजपासून तू ह्यातूनच खर्च करायचा व कुठे कसे खर्च केले हे सांगायचं.” ठरलं तर मग….
अद्वैतही मागच्या प्रकरणापासून जरा सावध झाला होता. त्यामुळं जरा शहाणपणही आलं होतं. आता दिलेल्या पैशातून भाव विचारून तो खरेदी करू लागला. शिवाय नातेवाईक व इतरांनी खाऊसाठी बक्षीस दिलेले पैसे तो साठवू लागला. पैशाची नोंद करू लागला व हळूहळू त्याला व्यवहार समजू लागला. आता मित्रांवर पैसे उधळायचे नाहीत हे देखील त्याला उमगले. वेळ प्रसंगी आपल्या पिगी बँकमधील पैसे गरजेवेळी वापरू लागला.
आता मात्र आईला त्याचा फार अभिमान वाटू लागला. बाबांनाही त्याच्यावर विश्वास वाटू लागला. आता तर त्याला बँकेत चेक टाकणे, पैसे जमा करणे, पासबुक प्रिंट करणे वगैरे जमायला लागलं. आई त्याच्या बरोबर दुकानात गेली नसती तर अद्वैत कधी आर्थिकदृष्ट्या साक्षर झाला असता का ?
आज काळ बदलला आहे, मुलं ऑनलाईन गेम, कॉम्पुटर , इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरण्यात दंग झाली आहेत. जीवनकौशल्य (Lifeskiils) विकसित होणे फार गरजेचे आहे. मुलगा इंजिनीअर झाला आहे परंतु १ किलो टोमॅटो आणायला बाजारात पाठवलं तर त्याला मात्र विचार पडतो. मुलगी फार्मसी मधून पदवीधर आहे परंतु आपले शेजारी कोण हे नक्की माहित नाही. पुढे आयुष्यात किती तरी आव्हानं असणार त्यावेळी आपल्या मुलांकडून आपण काय अपेक्षा धरणार.
प्रत्येक पालकांची ही नैतिक जबाबदारी आहे कि आपली पाल्य आर्थिक दृष्ट्या साक्षर आहेत कि नाही हे तपासून पाहणं. आज समाजातील किती तरी होतकरू तरुण पैशाच्या गैरवापरामुळे जाळ्यात ओढवले गेले आहेत. आपला कॅश inflow, outflow हे बालपणीच कळायला हवं. पैशाची योग्य किंमत, कदर हि जाणीव व्हायलाच हवी. प्रगत समाजाचे हे ही एक लक्षण आहे.