गरिबांवरील प्रेम –  फा. असिस रॉड्रिग्ज

गरिबांवरील प्रेम 

  •  फा. असिस रॉड्रिग्ज (जेज्वीट) 

(पोप लिओ यांचे पहिले परिपत्रक Dilexi Te च्या प्रकाशात नाताळ चिंतन) 

         नाताळचा सण म्हणजे देव प्रेमाचा (१ योहान ४:८) सत्य आणि जिवंत अनुभव. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा आपण “शब्द देह झाला, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली” (योहान १:१४) या अद्भुत रहस्यात प्रवेश केला आहे.

         पोप लिओ यांच्या परिपत्रकात दिल्याप्रमाणे (Dilexi Te “गरिबांवरील प्रेम”) “नाताळचा आत्मा पुन्हा प्रकट होतो: देवाचे प्रेम हे केवळ भावना नसून, ते कृतीत उतरलेले प्रेम आहे. प्रेम देह धारण करते आणि गरीबांपर्यंत पोहोचते.”

         या परिपत्रकाचे शीर्षकच “मी तुझ्यावर प्रेम केले आहे.” या प्रभुशब्दांची आठवण करून देते. 

         पोप लिओ सांगतात की, ख्रिस्ताने देह धारण करताना मानवी गरिबीचा, दुर्बलतेचा, वेदनेचा स्वीकार केला. ख्रिस्ताचा गोठ्यातील जन्म हा फक्त इतिहास नाही, तो देवाच्या प्रेमाचे जिवंत रूप आहे. नाताळ आपल्याला शिकवतो की देव श्रीमंतीत नव्हे, तर साधेपणात, तुटपुंजेपणात आणि करुणेत अनुभवायास मिळतो. हे परिपत्रक आपल्याला आठवण करून देते की, चर्च जेव्हा गरीबांकडे झुकते तेव्हा ते आपली सर्वोच्च ओळख प्रकट करते. गोठ्यातील बालकाकडे नतमस्तक होणे, म्हणजेच आपल्या समाजातील गरिब-दुर्बळांमध्ये देवाला ओळखणे.

नाताळातील गरिबी

         पोप लिओ म्हणतात की गरिबीचे अनेक प्रकार आहेत. ते म्हणजे भौतिक गरिबी, सामाजिक गरिबी, आध्यात्मिक रिक्तता, सांस्कृतिक गरिबी. नाताळच्या उपासनेच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभूला सर्वप्रथम ज्या लोकांनी पाहिले, ते म्हणजे गरीब मेंढपाळ, परके आणि नम्र लोक (लूक २). देवाने त्यांनाच पहिले आमंत्रण दिले. म्हणून आपले नाताळ साजरे करणे हे फक्त प्रकाश, सजावट, झगमगाट नसून‌ आपल्या परिसरातील एकाकी, वयोवृद्ध, स्थलांतरित किंवा दुर्लक्षित लोकांना प्रेमाने सामावून घेणे आहे.

नाताळ: आनंदाचा आणि आव्हानाचा सण

         नाताळ आपल्याला आनंद देतो. गीत, प्रार्थना, सामूहिक जेवण, भेटवस्तू हे सर्व देवाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. पण Dilexi Te सांगते की श्रद्धा आणि गरीबांवरील प्रेम यांची ताटातूट होऊ शकत नाही.‌ नाताळचा उत्सव म्हणजे न्याय, करुणा आणि एकात्मतेचा उत्सव. देव गरीब झाला, जेणेकरून आपण श्रीमंत होऊ-प्रेमात श्रीमंत! पोप लिओ आठवण करून देतात की अन्यायकारक रचना ओळखून त्यांना चांगुलपणाच्या शक्तीने तोडले पाहिजे.

         नाताळ म्हणजे देवाची उपस्थिती गरिबांमध्ये आहे ; याचा पुरावा. Dilexi Te आपल्याला खात्री देते की चर्चची खरी ओळख म्हणजे गरीबांच्या जवळ असणे. नाताळच्या या पवित्र काळात आपण Dilexi Te च्या संदेशाने आपली अंत:करणे खुली करू या. देवाचे प्रेम हे गोठ्यात उतरले आणि आपल्याला प्रेमात जगण्याचे धडे दिले. आपण दिवे लावताना, कॅरल सिंगिंग करताना आणि भेटवस्तू देताना हे लक्षात ठेवू या कि खरा नाताळ तेव्हाच साजरा होतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणतो.

         यंदाचा नाताळ आपल्यासाठी देवाचे प्रेम प्रत्यक्षात उतरलेले ठरो. याद्वारे आपणही आपल्या कृतीतून म्हणू शकू –

         “प्रभू, मी तुझ्यावर प्रेम केले आहे, कारण तू आधी माझ्यावर प्रेम केलेस.”