ख्रिस्ती साहित्याची स्थिती आणि गती
सन २००० सालानंतरची कादंबरी
- पौलस वाघमारे, पुणे
संपर्क: ९८६०८३६५४६
ख्रिस्ती साहित्याला फार मोठी परंपरा आहे. एकूणच मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे काम ख्रिस्ती साहित्याने केले आहे. वसईच्या पुण्यभूमीत वास्तव्यास असलेले फादर थॉमस स्टीफन्स हे मुळचे इंग्लंडचे. इ. स. १५७९ मध्ये ते भारतात आले. भारतात आलेल्या मिशनरींना अभिव्यक्तीसाठी मराठी भाषा शिकणे गरजेचे होते, यासाठी मिशनन्यांना इथली भाषा बोलता आणि लिहिता यावी म्हणून स्टीफन्स यांनी कोंकणी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक लिहिले. ही फारच अनन्यसाधारण गोष्ट आहे. १६०८ मध्ये ख्रिस्तपुराणाचे लिखाण पूर्ण झाले असावे असे मानण्यात येते. काही तज्ज्ञांच्या मते ते १६१४ मध्ये पूर्ण झाले असावे परंतु १६१६ मध्ये ख्रिस्तपुराणावर विविध संस्कार होऊन मुद्रित प्रत भाविकांच्या हातात आली असे मानण्यात येते. सन १६११ ते १६१२ या वर्षभराच्या कालावधीत फादर स्टीफन्स यांचे वास्तव्य वसई प्रांतात होते.
ख्रिस्तपुराण मुख्यत्वेकरून ओवी ह्या पद्य प्रकारात लिहिलेले आहे. वेगवेगळ्या संतकवींनी ओवी हा काव्य प्रकार आपल्या पद्य रचनांसाठी वापरलेला आपणास दिसतो. फादर स्टीफन्स यांनीही ख्रिस्तपुराणासाठी ओवी हा काव्य प्रकार वापरलेला आहे. फादर स्टीफन्स यांनी केलेली ओवी रचना साडेतीन चरणांची आहे. कधी कधी ह्या ओव्या चार चरणांच्याही आढळतात. ह्या ओव्या अभंग छंदात लिहिल्या आहेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. इ.स. १६१९ मध्ये याच भारतभूमीत या महाकवीने देह ठेवला. फादर क्रुआ यांनी महापुराणाची रचना केली. १८५७ मध्ये बाबा पद्मनजी यांनी मराठीतील पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीला मराठी साहित्यातील पहिलेपणाचा मान मिळाला. पहिली सामाजिक कादंबरी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मान ख्रिस्ती लेखकास मिळतो ही समाज बांधवांस अभिमानाची गोष्ट आहे.
१८४२ मध्ये अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर येथे ज्ञानोदय मासिकाची सुरूवात केली. आणि त्या मासिकाने साहित्य क्षेत्रात इतिहास घडवला. तब्बल १७५ वर्षे म्हणजे आजतागायत हे मासिक सुरू आहे. या मासिकाचे जुने अंक चाळले तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीचा सहज मागोवा घेता येतो. आता हा ऐतिहासिक वारसा मरणासन्न अवस्थेत असून अखेरच्या घटका मोजत आहे ही गोष्ट अलाहिदा.
कांदबरी प्रकारात हिंदू कादंबरी, जैन कादंबरी, मुस्लीम कादंबरी किंवा ख्रिस्ती कादंबरी असे म्हणता येणार नाही. कारण साहित्य हे साहित्यच असते. हे साहित्य कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे. त्याच्या धर्मानुसार त्यावर विचार करता येईल. कारण लेखकाचे प्रतिबिंब त्या साहित्यात उतरलेले असते. तसेच लेखकांनी मांडलेले कथानक, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या कथानकात जर ख्रिस्ती वातावरण असेल तर वरवर आपल्याला ती ख्रिस्ती कादंबरी म्हणता येईल. परंतु एकूण विचार करता साहित्यात धर्माची लेबलं लावता कामा नये. त्यामुळे साहित्य लेखनास मर्यादा येऊ शकतात.
ख्रिस्ती साहित्य लेखनात ख्रिस्तवासी सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांनी सर्वाधिक पंधरा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यात १९४९ मध्ये लिहिलेली काटेरी फुलवेल या कादंबरीचा पहिला क्रमांक लागतो. त्यात त्यांनी पंकज, पत्र्याची चाळ, गोड कारली, गोल देऊळ, धर्मशाळा, काल आणि आज, बेंजी, घरकुल, लालराज्य, क्रांती या कादंबर्यांची भर घातली. जीवन वचन प्रकाशनाने त्यांच्याकडून जीवनकथा माला लिहून घेतली. या मालेत त्यांनी चंदनाचे झाड, कविराज, अक्का, हिवाळे पप्पा या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. लुई फर्नाडिस हे मूळतः कथा लेखक परंतु त्यांनी हिमालयाचे काव्य काळजाचे ही कल्पनाशक्तीने रंजक बनवलेली कादंबरी लिहिली.
त्यानंतर वसईचे कैतान दौडती यांनी सावट, वनसोयरे, सरावन, अनोळखी माती, संस्कार तसेच शापित संपदा या कादंबर्या लिहिल्या होत्या. नंतर देवदत्त हुसळे यांनी धुरपी, दरारा, वाघूर, धुरपती, सारजा या कादंबऱ्या लिहिल्या. तसेच खुशालभाऊ घोरपडे यांच्या विश्वास, संघटना, दिव्य आत्मयज्ञ, सौ. आनंदीबाई एम. दामले यांची ख्रिस्ती तारुण्य ही एक छोटी कादंबरी होती. भा. पां. हिवाळे यांची हरवलेला बाबू ही अनुवादित कादंबरी, अशोक टिळक यांची चालता बोलता चमत्कार, राजन पाटोळे यांची पांगुळगाडा, श्यामला भोरे यांची पराभव, जयंतकुमार त्रिभुवन यांची अबोली, शांता हरी यांची वैशाली, अनिल दहिवाडकर यांची काळा सूर्य, भाऊ धर्माधिकारी यांची मानवाचा पुत्र येशू, इंद्रसेन डोंगरे यांची निराली व प्रेमतृष्णा, रॉक काव्हालो यांची योगिनी, जॉन गजभिव यांची असा हा तुझा भरवसा व एक गाफील क्षण, सनी पाटोळे याची सुताराचा पोर, योहान- जगाचा अंत प्रगत करणारा येशूचा शिष्य, मुक्तीदाता मोशे, सतीश रणदिवे यांची वापसी, इंदुमती नणदीकर यांची जॉयसी, श्याम भरांदे यांची दुसरा सूर्यास्त, योद्धा प्रेषित, जॉन रॉड्रीग्ज यांची आई एक अगम्य गूढ, घटस्फोट पालकांचा बळी बालकांचा, रेमंड मच्याडो यांची कोपात या कादंबर्यांची भर पडली.
मूळचे अहमदनगरचे असलेले शांताराम कांबळे या लेखकाचा उल्लेख फारसा कुठे आढळत नाही परंतु या साहित्यिकाने मराठी साहित्यात पाच कादंबऱ्यांची भर घातलेली आहे. त्यात कटुसत्य, वळणाचे पाणी, अपराध मुक्ती, अपराध सावली, चालबाज या कादंबऱ्यांचा उल्लेख करावा लागेल, त्यांच्या अनेक कथा सत्यकथातून नियमित प्रसिद्ध होत होत्या. शिवाय चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवादलेखन अशा सर्व आघाड्यांवर त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांनी निर्मित केलेला एक मराठी चित्रपट अर्धवट राहिला असे ऐकिवात आहे. शांताराम कांबळे यांच्यावर संशोधन व्हावे असे यानिमित्ताने सांगावे वाटते. कादंबरी लेखनात त्यांचा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात शिक्षणाचा प्रसारही वाढला. यामुळे मध्यमवर्गीय समाजाची प्रगती होऊ लागली. खेड्यातील तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे येऊ लागले. शहरातील गर्दीमुळे सोईसुविधा तुटपुंज्या पडू लागल्या. आणि शहरातील समस्या वाढू लागल्या. शहरात आलेल्या प्रत्येक तरुणाला नोकरी मिळालीच असे नाही. त्यामुळे आर्थिक तफावत वाढत गेली. आर्थिक तफावतीमुळे विषमतेविरुद्ध आंदोलन होऊ लागली. या आंदोलनामुळे, विविध समस्यांमुळे कादंबऱ्यांना नवनवी कथानके मिळू लागली. नव्या कादंबर्या वाचकांच्या हाती पडू लागल्या.
कादंबरी लेखनात ख्रिस्ती लेखकांची फारशी भर पडली नाही असे फार खेदाने म्हणावे लागते. ख्रिस्ती समाजातील पायओढीच या समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली असे म्हणावे लागते. १९२७ साली नाशिक येथे पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन भरविल्याचा उल्लेख आढळतो तर २०१५ साली २५ वे साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न झाले म्हणजे गेल्या ८८ वर्षात केवळ २५ साहित्य संमेलने भरविण्यात आली. ख्रिस्ती समाजाकडे पैसा नव्हता, किंवा ख्रिस्ती लेखकांकडे प्रतिभा नव्हती असे म्हणता येत नाही. मग ही दुरावस्था का ? हा प्रश्न उरतोच.
या भारतभूमीत ख्रिस्ती मिशनरींनी घट्ट पाय रोवल्यानंतर शिक्षणाचा प्रसार वाढला. ख्रिस्ती लेखकांच्या प्रतिभेला चालना मिळाली. साहित्य निर्मिती होऊ लागली. मिशनरींच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वाखाली १९२७ मध्ये नाशिक, १९३० मध्ये मुंबई, १९३२ मध्ये निपाणी, १९३३ मध्ये नागपूर, १९५४ मध्ये केडगाव, पुणे, १९५५ मध्ये पुन्हा पुणे, आणि १९५६ मध्ये पुणतांबा अशा सात ठिकाणी ख्रिस्ती साहित्य संमेलने भरवल्याचा इतिहास आहे. नोव्हेंबर १९७२ मध्ये पुण्यातील डी. नोबीली कॉलेज येथे आचार्य स. ना. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्जिवित झालेले पहिले तर क्रमवार आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यावेळी आचार्य दिनानाथ पाठक पुणे संघाचे अध्यक्ष असल्याने ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
या संमेलनाने साहित्य क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडून आली. ख्रिस्ती लेखक लिहिते झाले. साहित्य निर्मिती होऊ लागली. साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. ख्रिस्ती लेखकांनी ख्रिस्तेतर साहित्यात मुशाफिरी केली. तेथेही आपली छाप उमटवली. त्यानंतर टप्प्याने ख्रिस्ती साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरविली जाऊ लागली. महाराष्ट्रातील प्रतिभावंत व नवोदित ख्रिस्ती लेखक या संमेलनात भाग घेऊ लागले. कॅथोलिकांमध्ये प्रतिभावंत लेखक अधिक आहेत हे अमान्य करता येत नाही. आतापर्यंत संपन्न झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची अध्यक्षीय भाषणे पाहिल्यास त्यांची सुरूवात प्रासंगीक विषयावर असते आणि पुढे ज्यावेळी इतिहास नमुद करावयाचा असतो तेव्हा जुन्या भाषणातील रकानेच्या रकाने शब्दांचा फेरफार करून जसेच्या तसे जातात. त्याच त्याच साहित्यिकांचा पुनर्उलेख येतो. ही भाषणे जेव्हा ख्रिस्तेतर वाचक वाचतील तेव्हा ख्रिस्ती समाजात नवलेखक निर्माण झाले नाहीत काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच उभा राहत असेल. ही पायओढी ख्रिस्ती समाजाला अधोगतीकडे नेईल यात शंका बाळगण्याचे कारण नाही.
इ.स. २००० मध्ये एक अनोखी गोष्ट घडली. कवी म्हणून सर्वपरिचित असलेले निरंजन उजगरे यांची एक साहित्यकृती प्रकाशित झाली. जाएंट व्हील हे तिचे नाव. जाएंट व्हील ही एक कादंबरी होती. कवी निरंजन उजगरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली. ही कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केली होती. प्रदर्शनाच्या जगात वावरणाऱ्या माणसांची सुखदुःखे, आणि संघर्षमय जीवन यांचे वास्तववादी चित्रण कवी निरंजन उजगरे यांनी या कादंबरीत केलेले आहे. अशा पद्धतीचे वास्तववादी चित्रण करणारी मराठी साहित्यातील ही पहिलीच कादंबरी मानली जाते.
मराठी साहित्यात फारशा प्रसिद्ध नसलेल्या परंतु इंग्रजी साहित्यात ज्यांच्या नावाचा बऱ्यापैकी दबदबा असलेल्या अहमदनगरच्या सरला बार्नबस यांचाही उल्लेख करणे गरजेचे वाटते. वेव्हरलेची हवेली, स्वप्नमाला, द विंग्ज ऑफ द मॉर्निंग (ई), साद किंगफिशची, डार्क पेंशन (ई), वेकअप ऑफ किंगफिशर (ई), द प्रॉमिस ऑफि स्प्रिंग (ई), मर्मबंधातली ठेव. सरला बार्नबस ह्या सुप्रसिद्ध अहमदनगर महाविद्यालयाचे संस्थापक भास्कर पांडुरंग हिवाळे उर्फ पप्पा हिवाळे यांच्या सुविद्य कन्या. त्यांनी ज्या ताकदीने इंग्रजी कादंबऱ्या लिहिल्या त्याच तोलामोलाचे त्या कादंबरींचे मराठी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. ही मराठी साहित्याला मिळालेली मोठी देणगीच मानावी लागेल.
मराठी साहित्य आणि मराठी ख्रिस्ती साहित्यात ज्यांनी मोलाची भर घातली ते सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. देवदत्त हुसळे. अहमदनगरच्या शब्दगंध प्रकाशनाने २०११ मध्ये त्यांची सारजा ही कादंबरी प्रकाशित केली. त्यानंतर फिंदरी कादंबरी सन २०१२ साली प्रकाशित केली. सारजा च्या मनोगतात प्रा. हुसळे लिहितात, समाज स्वास्थ्य घडवणारा किंवा बिघडवणारा हा साहित्यिकच असतो. समाजातील जातीय उतरंडी सामाजिक स्थानास कागदोपत्री किंमत राहिली नसताही, माझ्या वाट्याला प्रतिकुलताच अधिक आल्याने मी मध्यंतरी किंचितसा थंडावला गेलो होतो वैचारिक होरपळीने त्रस्थ झाल्याने साहित्य प्रवाहापासून दुरावलो होतो. मला साहित्यात कुणी गुरु मिळाला नाही. मनोमन आण्णाभाऊ साठेंना गुरुस्थानी मानून आम्ही साहित्य निर्मिती केली. प्रा. हुसळे हे अर्ध्यावर डाव सोडून अचानक आपल्यातून निघून गेले, नाहीतर धुरपती नावाची आणखी एक कादंबरी आपणास वाचावयास मिळाली असती.
२०१२ मध्येच औरंगाबादचे साहित्यिक प्रा. हेमंत घोरपडे यांची निर्णय ही कादंबरी प्रकाशित झाली. ख्रिस्ती पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी होती. निर्णयच्या मनोगतात घोरपडे म्हणतात, काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की कोणाचातरी आधार हवासा वाटू लागतो. अशी स्थिती निर्माण होण्यासाठी जीवनात आलेली संकटे, दुःख, आपत्ती, एकटेपणा, अपमान ही कारणीभूत होतात. अशा परिस्थितीतून सोडविण्यासाठी मन मुक्तीदाता शोधू लागतं. त्याला मुक्तीदाता तारणहाराचा ध्यास लागतो. त्या सुपर पॉवरला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नसतं. अशावेळी परमेश्वरावर असलेल्या दृढ विश्वासानं माणसाच्या मनाला दिलासा मिळतो. आपत्तीशी दोन हात करण्याचं बळ मिळतं, बुद्धी कार्यक्षम होते. त्या आपत्तीतून सुटका करण्याचे मार्ग व्यक्ती धुंडाळते. सरदहू कादंबरीमध्ये कौटुंबिक जीवनातील चढउताराचे भावभावनांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी माणूस देवाला शरण जातो हे शाश्वत सत्य आहे.
२०१३ मध्ये वसईचे सुपुत्र असलेले उस्मानाबाद स्थित फादर घोन्सालो डिसिल्व्हा यांची पहाट ही कादंबरी प्रकाशित झाली. खिस्ताचे पुनरूत्थान या विषयावर ही कादंबरी बेतली आहे. वसईचे दुसरे सुपुत्र प्रा. स्टीफन आय परेरा यांनी बायबलवर आधारित बायबल नावाची कादंबरी लिहून प्रसिद्ध केली. तसेच संदीप हळदणकर तथा फादर द्रागो यांनीही कादंबरी लेखन केले आहे. प्रेमाची परिपूर्ती ही कादंबरी त्यांनी लिहिली. व्रतस्थ कॅथोलिक धर्मगुरूंच्या मनातील व्रतस्थ जीवन की प्रेम यामधला संघर्ष यामध्ये चित्रित केला आहे.
मूळच्या कथालेखिका असलेल्या मुंबईच्या मंदिकिनी सिंग यांची नुकतीच एक कादंबरी प्रसिद्ध झाली. ही कादंबरी त्यांनी अठरा वर्षांपूर्वीच लिहून पूर्ण केली होती. ह्या कादंबरीत मंदाकिनी सिंग यांनी ख्रिस्ती कुटुंबाची पार्श्वभूमी रेखाटली आहे. यात उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. एकूणच ख्रिस्ती समाजाची आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थितीचे वर्णन आलेले आहे. ख्रिस्ती कुटुंबात झालेले संस्कार समाजातील दूषित वातावरणावर व विपरीत परिस्थितीवर कसे परिणाम करतात हे मंदाकिनी सिंग यांनी आपल्या कादंबरीत यशस्वीपणे मांडली आहे.
कथालेखिका म्हणून सर्वपरिचित असलेल्या अहमदनगरच्याच प्रा. सुजाता लोंढे यांनी साहित्याच्या विविध प्रांतात मुशाफिरी केली आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे यशस्वीपणे मराठी भाषांतर केलेच पण त्यांनी स्वतंत्र मराठी कादंबऱ्यांचे लेखनही केले आहे. विविध नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे. पवित्र बायबल मधील शलमोन राजाच्या जीवनावर देवाला प्रिय शलमोन ह्या कादंबरीचे लिखाण केले. त्यांची ही कादंबरी अत्यंत लोकप्रिय ठरली. या कादंबरीत शलमोनाचे जीवन, त्याला मिळालेले देवाचे वरदान, त्याने केलेले पराक्रम याचे रसभरीत वर्णन या कादंबरीत आढळते. पवित्र बायबलमधील दुसरे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे दाविद राजाचे. दाविद राजाच्या जीवनावर त्यांनी आकडी ते राजदंड या नावाची कादंबरी लिहिली आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखिका सरला बार्नबस यांच्या इंग्रजी कादंबरीचा हा अनुवाद आहे. तसेच स्वप्नमाला ही देखील अनुवादित कादंबरी प्रकाशित आहे. मूळ लेखिका सरला बार्नबस ह्या आहेत.
ख्रिस्ती समाजात वाचकांच्या संख्येची वाणवा नाही पण वाचकांना हवे तसे साहित्य उपलब्ध होत नाही हे खरे वास्तव आहे. समाजातील तथाकथित लेखक साहित्यिक यांनी निर्माण केलेले साहित्य वाचण्याची मानसिकता समाजाच्या वाचकात नाही. मग ख्रिस्तेतर वाचक तरी का वाचतील? ख्रिस्ती साहित्याचा उज्वल इतिहास अभ्यासण्यासाठी बरेच ख्रिस्तेतर लेखक, साहित्यिक, वाचक, अभ्यासक ख्रिस्ती साहित्याचे वाचन करतात, अभ्यास करतात, एवढेच काय ते आशादायक चित्र आहे.
ख्रिस्ती साहित्याचे वाचन व्हावे असे वाटत असेल तर ख्रिस्ती लेखकांनी आपली लेखनाची शैली बदलणे आवश्यक आहे. केवळ ख्रिस्ती आशयाचे आणि विषयाचे लेखन करणे या मर्यादितून बाहेर पडणे गरजेचे आहे. फारच फार वाटत असेल तर बायबलमध्ये कथेचे, कादंबरीचे काव्याचे अनेक विषय सामावलेले आहेत. तेच विषय घेऊन लिखाणाची शैली बदलून, ख्रिस्तेतर वाचकही याकडे आकर्षला जाईल असा प्रयत्न करून साहित्य लेखन केले तर निश्चितच ख्रिस्ती लेखकाला हक्काचा बाचक मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. वसईचे सिद्धहस्त लेखक साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी बायबलचे केलेले रूपांतर हा त्यातलाच एक प्रयोग आहे असे म्हणता येईल. असे प्रयोग इतरही लेखकांना करता येतील. असा विचार करणाऱ्या लेखकांना अवघे अवकाश मोकळे आहे.
ख्रिस्ती कादंबरीचा धांडोळा घेण्यात मला फारसे यश मिळाले आहे असे मी म्हणणार नाही. परंतु आम्ही अधिकाधिक प्रयत्न केला आहे. आपण जाणकार आहात. काही उणिवा आपल्याला आढळल्यास त्या माझ्या दृष्टीस आणून द्याव्या, मी नम्रपणे त्यांची दखल घेईन. हा अभ्यास करताना मला अनेक मित्रमंडळीचे सहकार्य आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले आहे. त्यात फ्रान्सिस वाघमारे नाशिक, डॉ. अनुपमा उजगरे, ठाणे, अनिल दहिवाडकर, पुणे. डॉ. नाझरेथ मिस्किाटा, वसई, संजय आढाव, अहमदनगर, प्रा. सुजाता लोंढे, अहमदनगर, विनोद शिंदे, अहमदनगर, सचिन हुसळे, अहमदनगर, सुनिल गोसावी, अहमदनगर, राजेश्वरी कांबळे, लोणंद, मंदाकिनी सिंग, मुंबई, आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा मी ऋणी आहे.