ख्रिस्ती साहित्याची नवी वाटचाल – पौलस वाघमारे

ख्रिस्ती साहित्याची नवी वाटचाल

  • पौलस वाघमारे, अहमदनगर

अध्यक्ष, मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद, महाराष्ट्र.

         ख्रिस्ती साहित्य परंपरा प्रामुख्याने फादर थॉमस स्टीफन्स यांच्या पासून सुरू झाली असे मानले जाते. ख्रिस्ती साहित्याची ही परंपरा आजतागायत सुरू आहे. सुरूवातीच्या काळात बायबल, आणि परदेशी मिशनऱ्यांनी लिहिलेल्या साहित्याचे भाषांतर इतकेच मर्यादित साहित्य लेखन होते. स्वयंप्रतिभेने लिहिलेल्या साहित्याचे प्रमाण अत्यंत अल्प होते. यात बायबलमधील गोष्टी आणि येशू ख्रिस्ताची शिकवण यावर आधारित हे साहित्य होते.

         पुढे १८४२ मध्ये मराठी ख्रिस्ती साहित्यात क्रांती घडली. अमेरीकन मराठी मिशनने ज्ञानोदय ह्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकातून ख्रिस्ती साहित्याला नवी दिशा मिळाली. नवनवीन लेखक तयार झाले. आपापले विचार मासिकातून मांडू लागले. अनेकांना यातून प्रेरणा मिळाली आणि लेखनाची ही परंपरा वाढत गेली. याआधी नारायण वामन टिळकांचे ख्रिस्तायन प्रसिद्ध झाले होते. बायबलमधील नव्या करारावर आधारित लिहिलेले ते एक खंडकाव्यच होते. नारायण वामन टिळक यांच्याकडून हे खंडकाव्य पूर्णत्वास गेले नाही तेव्हा पत्नी लक्ष्मीबाई टिळक व पुत्र देवदत्त यांनी ते पूर्णत्वास नेले. ख्रिस्तायनाचाही मराठी ख्रिस्ती साहित्यावर फार मोठा प्रभाव आहे.

         ख्रिस्ती लेखकांसाठी ज्ञानोदयाने दिलेल्या व्यासपीठामुळे ख्रिस्ती लेखकाची संख्या वाढली. लेखक सातत्याने लिखाण करू लागले. पर्यायाने लिखाणाचा दर्जा वाढला. भाषांतरीत किंवा धार्मिक लिखाण तसेच कथा, कविता, सामाजिक लेख असे बहूअंगी लेखन करू लागले. ज्ञानोदयामुळेही मराठी ख्रिस्ती साहित्यात खूप मोठी क्रांती घडली. ख्रिस्ती लेखकांबरोबरच ख्रिस्तेतर लेखकही ज्ञानोदयात लिहित असत.

         १९२७ मध्ये एक उल्लेखनीय गोष्ट घडली. रेव्ह. निकल मॅक्नीकल यांच्या अध्यक्षतेखाली पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक येथे संपन्न झाले. त्यानंतर अंतराअंतराने ख्रिस्ती साहित्य संमेलने भरत गेली. १९७१/७२ मध्ये काही ख्रिस्ती लेखक एकत्र भेटले आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनाला पुनरुज्जीवित करण्याचे ठरले. तत्कालीन सिद्धहस्त लेखक, साहित्यिक, किर्तनकार, आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन भरविले गेले. या संमेलनात प्रोटेस्टंट व कॅथोलिक असे दोन्ही पंथातील लेखक साहित्यिक उपस्थित होते. पुण्यात पार पडलेल्या या साहित्य संमेलनामुळे मराठी ख्रिस्ती साहित्य चळवळीला खरी चालना मिळाली. आणि येथूनच सध्याच्या मराठी ख्रिस्ती साहित्यिकांना चालना मिळाली.

         अनेक ख्रिस्ती लेखकानी ख्रिस्ती साहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न प्रामुख्याने मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी केला. अध्यक्षीय भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ख्रिस्ती साहित्याची व्याख्या असे. जे साहित्य देवाविषयी आणि मानवी अस्तित्वाबद्दलचे आहे याबद्दलची माहिती देण्याचे काम करते, ते ख्रिस्ती साहित्य असे ढोबळमानाने म्हणता येईल. परंतु यामुळे साहित्य लेखनाला खूपच मर्यादा आल्या. असे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक आणि साहित्य मर्यादित राहिले.

         काही ख्रिस्ती लेखक परिघाबाहेर जाऊन सामाजिक आशयाच्या कथा, कविता, लेख लिहू लागले.  समाजातील विविध समस्या आणि प्रश्न आपल्या लिखाणातून मांडू लागले. समाजाचा इतिहास लोकांसमोर येऊ लागला. आणि ख्रिस्ती लेखकाची संख्या वाढू लागली. हळूहळू ख्रिस्ती साहित्याची व्याख्या बदलली जाऊ लागली. ख्रिस्ती लेखकाने निर्माण केलेले साहित्य म्हणजे ख्रिस्ती साहित्य असे मानले जाऊ लागल्याने नव्याने लिखाणात नाविण्य आले. नवोदित लेखक साहित्यिक निरनिराळ्या प्रकारचे साहित्य लिहू लागले. त्यात कथा, कादंबऱ्या, वाचावयास मिळू लागल्या. ख्रिस्ती लेखकांच्या साहित्याला वाइमय पुरस्कार मिळू लागले. ते ख्रिस्त केंद्रित साहित्याला कधीच मिळाले नसते. ख्रिस्ती लेखक गुणात्मक दृष्टीने इतर प्रस्थापित साहित्यिकांशी बरोबरी साधू लागला.

         आणि याचमुळे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, देवदत्त हुसळे, सिसिलिया कार्व्हालो अशा दिग्गज साहित्यिकांनी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. साहित्याची हीच री पुढे ओढत नवीन लेखक, आधुनिक मराठी ख्रिस्ती साहित्य वाचकांसमोर आणू लागले. त्या साहित्याचे स्वागतही होऊ लागले.

         मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची अध्यक्षीय भाषणे वाचली तर त्यात ख्रिस्ती साहित्यिकांची नावे वाचावयास मिळतात. कादंबरी लिहिणारे लेखक, कथासंग्रह असलेले लेखक, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, आत्मकथन असे वाडमय प्रकार हाताळणाऱ्या लेखकांची जंत्री वाचावयास मिळते. निरनिराळ्या अध्यक्षांची भाषणे वाचली तरी नावांची जंत्री मात्र तीच. ख्रिस्ती साहित्य प्रवाहात नवीन लेखक साहित्यिक निर्माण झालेच नाहीत का? असा प्रश्न अभ्यासकांना पडू शकतो. हा गैरसमज दूर करण्यासाठी ख्रिस्ती साहित्याचा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ गंगाधर मोरजे यांनी खूप कष्ट पूर्वक १९६० पर्यंतच्या ख्रिस्ती साहित्यिकांचा मागोवा घेतलेला आहे. त्यानंतरच्या काळात डॉ सुभाष पाटील यांनी ख्रिस्ती साहित्याचा इतिहास लिहिण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ लेखक अनिल दहिवाडकर यांनी देशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची साहित्य संपदा यांची सुची करून मराठी ख्रिस्ती साहित्य दालनात खूप मोठी भर घालून ख्रिस्ती साहित्य अभ्यासकांना मोठा खजिना उपलब्ध करून दिला आहे.

         ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन’ हा ख्रिस्ती साहित्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा साहित्यिकांना एकत्र येण्याची संधी मिळते. १९७२ पासून अशी साहित्य संमेलने नियमित भरत आली आहेत. या संमेलनातून नवनवीन लेखक आणि त्यांचे नवनवीन साहित्य वाचकांसमोर येत आहे. ख्रिस्ती साहित्य चळवळीला नवीन झळाळी मिळू लागली आहे. काही ठिकाणी ख्रिस्ती साहित्यिकांचे निरनिराळे गट निर्माण झाले आहेत. त्यांनी त्या गटांना आपापली नावे देऊन वेगळ्या चुली मांडल्या आहेत. चुली वेगळ्या झाल्या तरी त्यातून साहित्य निर्मितीच होणार आहे आणि पर्यायाने ख्रिस्ती साहित्यात भरच पडणार आहे. या सकारात्मक भुमिकेतून आम्ही याकडे पाहतो.

         ख्रिस्ती साहित्य चळवळीचे ध्येय आणि उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून काही साहित्यिकांनी नव्या दमाचे साहित्यिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नव्या साहित्यिकांना लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुढील काळात ख्रिस्ती साहित्याचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा साहित्यिकांच्या नावाची जंत्री बदलली जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो.