ख्रिस्ती सासुरवाशिणीच्या जात्यावरच्या ओव्या – डॉ.अनुपमा निरंजन उजगरे

ख्रिस्ती सासुरवाशिणीच्या जात्यावरच्या ओव्या

  •  डॉ.अनुपमा निरंजन उजगरे, ठाणे

         कोणे एकेकाळी घरोघरी जात्यावर रोजचं दळण दळलं जात असे. त्या काळात हातात खुंटा घेतलेल्या सगळ्याच समाजातल्या स्त्रियांची जीवनशैली पळसाला पाने तीन ह्या म्हणीसारखी म्हणण्यापेक्षा घरोघरी मातीच्या चुली ह्या म्हणीसारखी होती असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.

         अमेरिकन मराठी मिशनच्या मिशनरीनी शैक्षणिक आणि आरोग्य ह्या बाबींना प्राधान्य दिल्यामुळे ख्िस्ती कुटुंबांतल्या स्त्रिया अध्ययन-अध्यापन करू लागल्या होत्या आणि नर्सिंगकडेही वळल्या होत्या. तरीही कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत. त्यातून त्यांना सुटका अशी नव्हतीच. पूर्वी आपलं मन मोकळं करायला माजघर आणि त्यातलं ‘जातं’ ही स्त्रीची हक्काची जागा असे. जात्यावरच्या ओव्यांमधून स्त्री आपल्या मनातलं सुख-दुःख निःसंकोचपणे व्यक्त करत असे. भरल्या घरात अश्रू ढाळणं अवलक्षण मानलं जात असे. त्यामुळे एकीकडे जात्यातून पीठ गळत असे आणि दुसरीकडे डोळ्यांतून धारा राहत असत. तिचं राबणं आणि तिचं रडणं फारसं कुणाच्या लक्षातही येत नसे आणि आलंच तरी त्याची दखल घेण्याची गरजही कुणाला वाटत नसे.

         त्या काळात पिठाच्या गिरण्या अगदीच श्रीमंतांसाठी असत. सुनेने भल्या पहाटे किंवा दुपारच्या निवांतवेळी आडवं न होता जात्यावर बसणं हे गृहीतच धरलं जायचं. तिला जाग आली नाही तर सासू-सुनांमध्ये असा संवाद जात्यावर व्हायचा-निदान ओवीतली पहिली ओळ तर हमखास कानावर आदळलीच पाहिजे-

                 काय गं भवाने आताशी उठली!

                 व्हय सासूबाय रातच्याला पाठ लै तुटली

         जात्यातून मऊ पीठ पडलं नाही तर तिच्या सात पिढ्यांचा उद्धार सासूकडून झालाच म्हणून समजा. त्यामुळेच ती सखीला सांगते,

                 धर सखे नीट जात्याचा खुट्टा

                 पडो मऊ पीठ, लागू नये बट्टा

         माहेरचा उद्धार म्हणजे आईचा उद्धार ! आईचा उद्धार केलेला कोणत्याच स्त्रीला सहन होणं शक्य नाही. कारण-

                 पहिली माझी ओवी माझ्या ओवीचे चौदा फेर

                 सर्व गनगोतामध्ये आई माझी ती आहे थोर

         ही सार्वत्रिक भावना. माहेरी जायचं तर एकत्र कुटुंबातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांचीच नव्हे तर धाकट्या दीर-नणंदांचीही परवानगी तिला काढावी लागे. न्यायला आलेला भाऊ तेवढा वेळ ताटकळत बसे. सासूबाईंना अचानक सगळी ‘पेंडिंग पडलेली’ कामं आठवत. ती पूर्ण केल्याशिवाय तिची सुटका नसे. माहेरच्या ओढीने तीही अंगात बळ आणून सगळं आटोपे. माहेरहून आल्यानंतर माहेरचा वानवळा शेजारच्या सखीला राजरोसपणे तिला देता यायचा नाही म्हणून ती गुपचूप तिला म्हणते,

                 वाटीत दिला तुला माहेराचा वानवळा

                 सईबाई सांगू नको कुणा, पेटल वणवा

         एकत्र कुटुंबात माणसांच्या राबत्याला ओहोटी नसायची. त्यामुळे दळण मोजकं दळून चालायचं नाही.

पाव्हण्यांचा बाई राबता संपेना

जातं मागतं घासावर घास त्याची भूक भागंना

         तेव्हाच्या पुरुषांची भूकही जबरदस्त असायची. भाकरी थापताना बाईची मनगटं दुखायची. बरं, थापताना आणि भाकर तव्यावर टाकताना बाहेर आवाज जाणार नाही, ह्याची तिला काळजी घ्यावी लागे. नाही तर भिंतीला तुंबड्या लावून बसलेल्या पाहुण्याला किती भाकरी थापल्यात ह्याचा अंदाज येत असे.

         ख्रिस्ती समाजात सणवार तसे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच. त्यामुळे त्या दिवसांचं अप्रूप असतं. येशूजन्माच्या पूर्वी गर्भवती मरीयेचे ओव्यांमध्ये आलेलं वर्णन किती सुरेख करतेय पाहा-

                 पहिली: मरिया गव्हाळी झाली पिवळी पिवळी

                 चोळी अंगिचि गं तिच्या दाटू लागली।।

                 दुसरी: चंद्र आकाशामध्ये वाढू लागला

                 बाळ उदरी गं तिच्या खेळू लागला।।

         सण म्हटला की पंचपक्वान्नं नसली, कितीही गरिबी असली तरी गोडधोड करणं आलंच.

                 तूप, साखर, मैदा उधार देई विसापूरवाला

                 करंज्या लाडू करू आता नाताळाला

         १९४७ च्या फाळणीत विस्थापित झालेल्या सिंधी समाजासाठी तारकपूर ह्या ख्रिस्ती कॉलनीजवळ निर्माण झालेल्या सिंधी कॉलनीतल्या एका किराणा दुकानदाराचं इथे विसापूरवाला हे नाव ओवीत येतं. विस्थापित असूनही कष्टाने उद्योगधंदा करून गरजूंना उधार देण्याची ऐपत कमावणारा सिंधी समाज आणि ऋण काढून सण साजरा करण्याची मराठी (ख्रिस्ती) समाजाची वृत्ती हे सामाजिक वास्तव लक्षात येते.

                 आयांनो बायांनो तुम्ही देवळाला चला

                 येशूजन्माचा आनंद माझ्या मनी झाला।।

         असे आनंदाचे क्षण वर्षातून एकदाच येणारे पण अडीअडचणी आणि इतर प्रश्न कायमचेच भेडसावणारे. त्यातून सोडवण्यासाठी देवाचा धावा करताना बायबलच्या २३व्या स्तोत्रातील ‘परमेश्वर मला वाळवंटातून हिरव्यागार कुरणात वसवतो’ हा आशय ख्रिस्ती स्त्रीच्या ओवीत अगदी सहज येऊन जातो-

                 ख्रिस्ता, तुझे कुठे आहे हिरवे कुरण ?

                 मी निराधार, धरिते तुझे चरण

         वर्षातून एकदा मिशनरींच्या बंगल्याच्या मोठ्या आवारात ‘सेल’ भरायचा. त्यात निरनिराळ्या जीवनोपयोगीवस्तू आणि ताजे खाद्यपदार्थ माफक दरात विक्रीला असत. ते विकून येणारी रक्कम गरिबांच्या मदतीसाठी मिशनरी खर्च करीत. त्यामुळे स्त्रिया आपापल्या खर्चाने वस्तू आणि पदार्थ करून आणत. त्यासंदर्भातली ही ओवी-

                 पापड लाटा ग बायांनो पातळ नि गोल

                 देऊ प्रभूला तयाचे मोल

किंवा

                 सेल लाविला साहेबाच्या बंगली

                 नीट विका माल करू नका ग दंगली

         मुलींनी शाळेत जाऊन शिकणं आणि मास्तरकी करणं ही त्यावेळी किती कौतुकाची बाब वाटावी-

                 गावची पोर मास्तरीण झाली

                 बाया बाप्यांनी धुळवड साजरी केली

         धुळवड हा हिंदूंचा सण. पण म्हणून त्याचा उल्लेख ख्रिस्ती स्त्रीने आपल्या ओवीत करणं निषिद्ध मानलं गेलं नाही. उलट तो उल्लेख केल्याने आनंदाचं किती उधाण गावकऱ्यांना आलं, ते चित्र डोळ्यांसमोर उभ राहतं. ह्या पार्श्वभूमीवर मला इथे एक अनुभव सांगावासा वाटतो की, ‘सांगी’ ह्या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहातल्या ‘लक्षात ठेव बाई माझे’ ह्या गाजलेल्या कवितेत पारंपरिक शिकवण नातीला देताना आजी म्हणते,

                 लक्षात घे बाई माझे,

                 बासरी कृष्णाच्याच हातात असते

                 राधेच्या हाती फुंकणीशिवाय काहीच नसते.

         खरं तर ह्या ओळी समाजातील स्त्री-पुरुष असमानतेकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या आहेत. कृष्ण आणि राधा ही स्त्री-पुरुषांची प्रतीकं आहेत. सदर कविता २००३ साली प्रकाशित झाली. त्यानंतर ह्या ओळींवर हरकत घेणार एक निनावी पत्र मला आलं. निनावी पत्राला उत्तर देणार तरी कसं? ह्या कवितेला आता बाबीस वर्ष झाली. आता तरी ह्या समाजाच्या मानसिकतेत काही परक फडला आहे काय-तर नाही. २०२५ सालच्या महिलादिनी ऑन लाईन चर्चच्या एका ग्रुपवर माझ्या सादरीकरणातल्या ह्या ओळी गाळून पुढच्या ओळी ऐकवण्यात आल्या. म्हणजे तिचा अर्कच गाळून टाकण्यात आला! त्याविषयी ना माझी परवानगी घेण्यात आली, ना मला कल्पना देण्यात आली. ह्या पार्श्वभूमीवर जात्यावरच्या ओवीतून व्यक्त होणारी ख्रिस्ती स्त्री ही लोकसाहित्यात धर्म-जातिभेद न पाळणारी, अशी अधिक विशाल मनाची म्हणायला हवी.

         दारूपायी उद्ध्वस्त होणारे संसार पाहून ख्रिस्ती स्त्री पदर खोचून उभी राहत म्हणते-

                 उचला ईडा पळवा पीडा

                 सटव्या दारूला जिमिनीत गाडा