ख्रिस्ताचे सामाजिक राजकारण –  फादर मायकल जी

ख्रिस्ताचे सामाजिक राजकारण

  •  फादर मायकल जी., वसई

ख्रिस्ताचे राजकारण हे महात्मा फुलें-आंबेडकरांसारखे होते. त्यांना जसे ब्रिटिशांपासून देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची घाई नव्हती, तशी ख्रिस्ताला रोमन साम्राज्यापासून इस्रायलच्या स्वातंत्र्याची घाई नव्हती. पण-.

   बऱ्याचवेळा असे ऐकीवात येते की ख्रिस्ताने राजकारणात भाग घेतला नाही. त्याने रोमन साम्राज्याच्या गुलामगिरीतून इस्रायलची मुक्तता करण्यासाठी चळवळ केली नाही. तो केवळ धार्मिक गुरु होता. तसे नाही. ख्रिस्ताचे राजकारण हे महात्मा फुलेंसारखे होते. महात्मा ज्योतिराव फुले यांना ब्रिटिशांपासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची घाई नव्हती. उलट ब्रिटिशांच्या आमदानीत ब्राह्मणांपासून दलितांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मदत झाली. समाजात समता, बंधुत्व आणि न्याय आणण्यासाठी ब्रिटिश राज्याची मदत झाली.

तशाच प्रकारची परिस्थिती येशूच्या काळामध्ये होती.  येशूला रोमन साम्राज्यापासून इस्रायलचे स्वातंत्र्य मिळविण्याची घाई नव्हती आणि म्हणून तो त्या राजकीय स्वातंत्र्यासाठी झटला नाही. त्यासाठी बराब्बस हा नेता झटत होता. त्यासाठी कायदेत होता. जेव्हा पिलातासमोर येशूला ज्यू धर्माधिकाऱ्यांनी उभे केले आणि त्याला देहांताची शिक्षा मागितली, तेव्हा पिलात म्हणाला, “मला ह्याच्या ठायी काही दोष दिसत नाही. तुम्हीच तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” परंतु ज्यू लोकांनी येशूला तो कैसराच्या विरुद्ध आहे, तो स्वतःला राजा करतो, असा आरोप करून रोमन साम्राज्याच्या हस्ते त्याला मारून घेतला! पिलाताने येशूला सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यापैकी एक प्रयत्न म्हणजे तो लोकांना म्हणतो, “तुमच्या सणानिमित्त मी कोणाला सोडू बराब्बासला की येशूला?” तेव्हा ते ओरडून म्हणाले, “बराब्बसला सोडा आणि येशूला क्रुसावर खिळा!” (यो. १८.४०) अगदी महात्मा फुलेंसारखी येशूची गत झाली. ब्राह्मणांनी महात्मा फुलेंना शिक्षा दिली; त्यांच्या पत्नीवर चिखल फेकला पण जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडत होते त्यांना सोडून दिले.

     बाबासाहेब आंबेडकरदेखील महात्मा गांधींबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय झाले नाहीत. त्यांना दलितांना ब्राह्मणांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावयाचे होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ‘चवदार तळे’, मनूस्मृती जाळणे सारख्या चळवळी केल्या. लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन हिंदू धर्मातील जातीयता व कर्मकांडापासून मुक्तता दिली. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला असे एक संविधान दिले की जे आज सर्व प्रजेला बंधुत्व आणि समता देते.

     येशूने सामाजिक राजकारण केले. समाजात समता व बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी आणि उच्चवर्णीयांपासून दलितांची सुटका करण्यासाठी तो झटत होता. म्हणूनच त्याला ‘ब्राह्मणांनी’ उच्चवर्णीयांनी ख्रूसावर खिळले. ख्रिस्त शास्त्री-परुषांबरोबर झगडला आणि त्यांच्या विळखयातून गोरगरीब श्रध्दावंतांची सुटका करण्याचा त्याने प्रयत्न केला (लूक ४.१८-१९). धर्माधिकाऱ्यांवर ते मेंढपाळ असून मेंढरांची लूट करत आहेत, विधवांची घरे खात आहेत, असे त्यांनी आरोप केले आहेत. (लूक १२.३८-४०). वेश्या, पापी, अशा बहिष्कृत जनांना तो जवळ करतो. त्यांच्यात तो बसला, खाल्लं, पिलं आणि म्हणूनच त्याच्यावर धर्मबुडव्या असा आरोप ठेऊन शेवटी शास्त्री-परुषांनी आणि याचकांनी त्याला ठार केले.

ख्रिस्ती समाजवाद.

प्रेषितांपासून आजतागायत मिशनऱ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन केवळ धर्मप्रसार केला नाही तर तेथील जनतेला उच्चवर्णीय व स्थानिक राज्यकर्त्यांपासून प्रेम, बंधुता आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रवृत्त केले. जगाचा इतिहास पाहिला तर सामाजिक अन्यायाविरूध्द संघर्ष चालवण्यात ख्रिस्ती देशांचा (यूरोपियन) पुढाकार दिसतो. ख्रिस्ती माणूस सत्यासाठी, न्यायासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात मिशनरी म्हणून गेला नि झगडला आहे. खुद्द आधुनिक भारतात स्त्रीमुक्ती, सतीसारख्या अन्यायी व अनिष्ट चलीरीतीविरूध्द -मनूस्मृतीविरूध्द- चळवळी ख्रिस्ती विचाराने (लॉर्ड विलियम बेंटिंग) सुरू झाल्या. ख्रिस्ती युरोपमध्येच फ्रेंचक्रांती घडून आली आणि तीची झळ खुद्द ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनादेखील लागली. दक्षिण आफ्रिकेतील काळे-गोरे ह्यांना समता शिकवणारे नेल्सन मंडेला हे ख्रिस्तीच होते. आधुनिक भारताचे उदाहरण घ्यायचं तर मुंबईतील गोदीकामगार नेते डिमेलो आणि त्यानंतर रेल्वेट्रॅकवर झोपलेले जॉर्ज फर्नांडीस हेदेखील आग पाखड करणारे, खरोखर क्रांतिकारक नेते ख्रिस्तीच होते. गोव्यात गोवामुक्तीसाठी ख्रिस्ती आंदोलक होते.

आपणही तोच कित्ता गिरविला पाहिजे. अगदी पुरोहितांनीदेखील केवळ पुजारी बनून चर्चमध्ये बंदिस्त न राहाता समाजात स्वातंत्र्यासाठी झटले पाहिजे.

वसईच्या चळवळी

आज तरी भारतीय ख्रिस्ती समाज शांतिप्रिय, ‘सुशेगात’ वाटतो. अल्पसंख्यांक असल्यामुळे तो  भितो का? गरीबी, बेकारी, जात-धर्माच्या टेढी इत्यादी नागरी जीवनाचे प्रश्न सुटले नाहीत तरी आंदोलन, मोर्चे, राजकीय किंवा सामाजिक सभासंमेलने यामध्ये तो निष्क्रिय राहतो. मला आठवतं १९९२ साली मी नंदाखाली असताना पॉल डिमेलो यांचा खून झाला होता. पोलीस खुन्याचा तपास लावत नव्हते. म्हणून आम्ही खुद्द चर्चमधून एके रविवारी एक मोर्चा विरार पोलीसस्टेशनवर आयोजित केला. जवळजवळ दहा हजार लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले होते, परंतु रस्त्यावर एकही पोलिसाची गस्त दिसत नव्हती. मोर्चा पोहोचल्यानंतर मी इन्स्पेक्टरना प्रश्न केला, “बंदोबस्तासाठी एकही पोलीस तुम्ही पाठवला नाही?” त्यावर त्यांचे उत्तर होते, “आम्हाला माहित आहे की तुमच्या मोर्चामध्ये काही अनिष्ट घडणार नाही; कारण तुम्ही शांतिप्रिय लोक आहात!” खरंच, आमचे मोर्चेकरी जणू एखाद्या ‘आदरेसांव’ला साजेसे  चालत होते. आपल्याला बऱ्याचदा विसर पडतो की येशू म्हणाला आहे, “मी शांती नाही तर आग टाकण्यासाठी, वाद निर्माण करण्यासाठी, आपसात सत्य-असत्यामधला संघर्ष निर्माण करण्यासाठी आलो आहे.” “तुझ्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे कर” हे शब्द ख्रिस्ताचेच आहेत; पण पिलातासमोर जेव्हा एक शिपाई त्याला चपराक मारतो तेव्हा त्याला ‘विनाकारण मला का मारतोस?’ असा जाब विचारणारा ख्रिस्तच आहे!

 तरीदेखील १९व्या शतकातच वसईत ख्रिस्ती समाजात समाजवादी पक्ष फोफावला त्याचे नवल वाटायला नको. सायकलमहर्षी श्री. जॅक डिमेलो, साथी झेवियर मच्याडो, रस्तेसम्राट डॉमनिक घोन्सालवीस आदि समाजवादी नेते निर्माण झाले. तसे मनवेल तुस्कानो जरी मुळात ‘संडे ख्रिश्चन’ असले, ख्रिस्तासारखे ‘चेपलेला बोरूदेखील न मोडणारे’ अशा खाक्याचे असून एक जहाल आंदोलक बनले! आपला जीवदेखील धोक्यात घालेपर्यंत कणखर बनले! त्यांच्या जीवनावरून मला लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेलेल्या रामदास स्वामींची आठवण येते. संतवृत्तीचे रामदास, पण मनात दुष्टांचा नायनाट करण्याची जबरदस्त इच्छा असल्यामुळेच ते ‘देऊ कासेची लंगोटी अन नाठाळाच्या माथी काठी!’ अभिर्वावात त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली. मार्कुस डाबरे आदी नेत्यांनी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध आणि सुशोगात ख्रिस्ती समाजरीतींविरुद्ध जाऊन १९८०-९०च्या घरात वसईच्या हरीतपट्ट्याच्या रक्षणासाठी सरकार आणि माफियांविरूध्द कडक भूमिका घेतली आणि शारीरिक व मानसिक त्रास सहन केला आहे (पहा: हरित वसईचा लढा)!

निर्भयजन मंच   

१९८९ साली मी नंदाखाली प्रमुख धर्मगुरु म्हणून आलो व काही चळवळी मंडळी माझ्या भोवती जमली. आम्ही उत्तर वसईत  ‘निर्भय जनमंच’ची स्थापना झाली. त्या काळात वसईतील भाई ठाकूर माफियाच्या भीतीने नंदाखाल नाक्यावर संध्याकाळी सातनंतर कोणी फिरकत नसे. जनतेला निर्भय बनविण्याची गरज होती. सुदैवाने पोलिस इन्स्पेक्टर उल्हास जोशी ह्यांची वसईत नेमणूक झाली. जोशी ह्यांच्या उपस्थितीत आब्राहाम नाक्यावर जंगी सभा झाली आणि वातावरण सैल झाले! निर्भयजनमंचची नंदाखाली किती आवश्यकता होती, हे लक्षात येईल. तेव्हापासून त्या भागात जोरदार जाहीर सभा होऊ लागल्या. मला आठवतं, नंदाखालचर्च कंपाऊंडमध्ये एकदा निर्भयने निखिल वागळे यांची सभा लावली होती. त्या काळात ते शिवसेनेच्या विरोधात बोलत असत. म्हणून त्या सभेमध्ये सभा उधळण्याच्या उद्देशाने शिवसैनिक गुपचूप येऊन बसले होते. पोलिसांनी त्यांना वेळीच पकडले आणि अनर्थ टळला होता! त्या सभेचे अध्यक्षस्थान माझ्याकडे होते. त्यानंतर एकदा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये निर्भयची अशी एक  गरमागरम सभा झाली होती. ती शरद पवारांच्या विरोधात होती आणि त्या वेळचे म्युनिसिपल कमिशनर गो. रा. खैरनार हे वक्ते होते. त्याही सभेचे अध्यक्षस्थान माझ्याकडे होते. कोणत्याही क्षणी पोलिस खैरनारना ताब्यात घेतील, अशी आणीबाणीची स्थिती आयोजक ह्या नात्याने श्री. मनवेल तुस्कानो झेलत होते. तसेच त्यांनी परांजपे बिल्डराच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढा लढवून विजय मिळवला होता. अर्थात त्यासाठी आंदोलकांनी जीवाच्या धमक्या पचवल्या आहेत.

तरीपण निर्भयजनमंच निर्मितीचे प्रकरण माझ्यावर शेकलेच. नंतरच्या माझ्या निर्भय चळवळीतील सहभाग धर्माधिकाऱ्यांच्या आणि खुद्द काही माझ्याच सहकाऱ्यांच्या डोळ्यात सलण्यासारखा झाला. त्यांनी माझी बदली करण्यासाठी बिशपकडे तक्रारी केल्या. त्यात तत्कालीन आमदारकीचे उमेदवार विवेक पंडित (भाऊ)देखील सामील होते. विरोधक यशस्वी झाले आणि माझी नंदाखालहून बदली झाली. बदली कार्डीनल पिमेंटा वसईबाहेर अंधरीला करणार होते. पण मी पिमेंटांना पटवून दिले की ‘मी वसईत नको म्हणून मला मुंबईत टाकून कुजवण्यापेक्षा बंगळूरला पाठवा. नॅशनल सेंटरला मझी गरज आहे.’ त्यांनी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी माझी दहा वर्षांची ‘हद्दपारी’ बंगळूरला वळवली आणि त्या हद्दपारीचे सोने केले! माझा सर्जनशील उपासनेच्या कार्यशाळांचा (Seminars on Creative Catechetics and Liturgy) झेंडा मी सगळ्या जगात फडकवला!  मात्र त्या ‘हद्दपारीच्या’ काळात समाजवादी निर्भय परिवाराने मला भक्कम साथ दिली! माझे प्रश्न धार्मिक होते. तेव्हाचे ‘निर्भयजनमंच’ अध्यक्ष श्री. मनवेल ह्यांनी कसलीही भाडभीड न बाळगता मुकाबला केला! त्यांचे ते उद्गार मला अजून आठवतात, “मला जरी चर्चने पुरण्यासाठी जागा दिली नाही तरी हरकत नाही; पण मी माझा समाजधर्म सोडणार नाही!”

माझे सामाजिक राजकारण    

 माझ्या राजकिय प्रचाराला सुरुवात १९९६पासून झाली. माझे राजकारण सामाजिक उद्दिष्टांसाठीच होते. मी कधीच कोणत्या एका पक्षाचा बांधील राहिलो नाही. जो पक्ष ती सामाजिक उद्दीष्टे पूर्ण करील त्या पक्षाला माझा पाठिंबा असे. माझी भूमिका मांडणारा एक लेख जनपरिवार  साप्ताहिकात ८/४/९६ रोजी प्रसिद्ध झाला. त्यात मी स्वधर्मीयांच्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे शीर्षक होते: “ख्रिस्त धर्मगुरू की समाज सुधारक?” त्या लेखांमध्ये मी म्हटलं आहे: येशू ख्रिस्त हा पुरोहित वंशाचा नव्हता. तो एक साधासुधा सुतार (वैश्य) होता आणि जे काही त्याने समाजात कार्य केले ते एक समाजसुधारक व धर्मसुधारक म्हणून केले आहे. आणि म्हणूनच त्याने प्रसंगी धर्मगुरूंना ढोंगी म्हटलं आहे नि धर्मपंडितांना अंतरंगात घाणीचे ढीग लपवणाऱ्या संगमरवरी कबरांची उपमा दिली आहे (मत्तय २३.२७). केवळ देवदेव म्हणणारे मुक्ती पावणार नाहीत तर जे शुद्ध चारित्र्य बाळगतील तेच देवाचे आवडते बनतील, असा इशाराही दिला आहे. एकदा तर त्याने मंदिरात बाजार भरवणाऱ्यांना झोडपून बाहेर काढले (यो.२.१३-१६) धार्मिक व्रत वैकल्ये उपासतापास करणाऱ्यांची त्यांनी टर उडवली आहे.

लेखाचा शेवट मी पुढील प्रमाणे केला आहे: येशूने सुरू केली ती चळवळ, संस्था नव्हे.  संस्था उभारली ती त्याच्या प्रेषितांनी, विशेषतः संत पॉलने. या ख्रिस्ती धर्माच्या संस्थेत (चर्च) जर आज ख्रिस्ताची चळवळ दिसली नाही तर त्यात ख्रिस्त नसेल, चळवळ्या व्यक्तींना स्थान नसेल, उलट त्यांना तडीपार केले जात असेल, धर्मबहिष्कृत केले जात असेल तर ख्रिस्ताला पुन्हा अवतार घ्यावा लागेल, असेही मी म्हटलं होतं.

विधानसभा निवडणूक २०२४

२० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली. वसईत प्रामुख्याने महायुती (शिंदे-शिवसेना व भाजपा) आणि महाविकास आघाडी (कॉंग्रेस, राष्ट्रवादी व उध्द्व-शिवसेना) मध्ये चुरस होती. मी महाविकास आघाडीच्या वतीने प्रचारात भाग घेतला होता. माझी राजकीय भूमिका अशी आहे: महायुतीचा मोदी सरकारला पाठिंबा आहे आणि मोदी सरकार आपल्या भारताची राज्यघटना मोडीत काढत आहे. ती राज्यघटना वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे, असा माझा प्रचार चालू होता. काही कॅथलिकांचा मला विरोध आहे, ते म्हणतात: धर्मगुरूने राजकारणात भाग घेऊ नये. एकाने तर म्हटल आहे की ह्या फादरला जर एवढी राजकारणाची आवड असेल तर त्याने झगा उतरवून आमदार व्हावे!”

माझी काही हरकत नाही कारण तशाने मी ख्रिस्ताच्या जीवनाला किंवा कोणत्याही मूल्याला किंवा तत्वाला बाधा आणत नाही. पण तसं न करता मी चर्चमधून बाहेर निघून समाजमंदिरात उतरून भ्रष्टाचाऱ्यांना झोडपून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ख्रिस्ताचे मंदिरशुध्दीकरणाचेच ते काम आहे. जर मी बाहेरून राजकारण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते आमदार होण्यापेक्षा अधिक चांगले असेल, म्हणून मी प्रचारात भाग घेतो.

     माझे राजकारण सत्तेसाठी नाही; राजकारणशुध्दीसाठीच आहे. गेल्या १ नोव्हेंबर रोजी वसईच्या काँग्रेस भवनात महाआघाडीची सभा अकरा वाजताची जाहीर झाली होती. मी अकराला दोन मिनिटे असताना तेथे पोहोचलो आणि सरळ हॉलमध्ये जाण्यासाठी जिना चढू लागलो. तेवढ्यात एक कार्यकर्ता मला म्हणाला, “फादर, ऑफिसमध्ये चला, आपले उमेदवार विजय पाटील आले आहेत.” मी म्हणालो, “मी सभेसाठी आलो आहे.” आणि मी वर चढू लागलो. हॉलमध्ये शिरताना आणखीन एक कार्यकर्ता मला म्हणाला, “पुढे बसा.” मी म्हटलं, “मी भाषण करण्यासाठी आलो नाही!” आणि मी तिसऱ्या रांगेत जाऊन बसलो. सभा सुरू होण्याच्या थोड्याशा अगोदर आणखीन एक कार्यकर्ता मला म्हणाला, “तुम्ही स्टेजवर बसा.”  आणि मी म्हणालो, “मी पक्षाच्या वशिल्याने माझी खाजगी कामे करून घेण्यासाठी आलो नाही; मी आलो आहे एक नागरिक म्हणून संविधान वाचवण्यासाठी. महाविकास आघाडी त्या कामासाठी उभी आहे तिला पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे!” 

            शेवटी त्यांनी मला भाषण दिलेच. आणि मी ते घेतलेही -जमलेल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देण्यासाठी!  मी म्हणालो, “मित्रहो! मोदीसरकारकडून रोज आपल्या संविधानावर हल्ले होत आहेत. ताजा हल्ला म्हणजे ईव्हीएम मशीन. जनतेचा त्यावर विश्वास नसून संविधानाविरूध्द्ध त्याचा वापर केला जात आहे. राहुल गांधी तर म्हणतात, इव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे. आज इंडिया गटबंधन ते उद्दीष्ट साद्य करण्यासाठी पुढे आले आहे, आपल्या महाराष्ट्रात महाआघाडी त्यासाठी तयार झाली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी येथे आलो आहे. वास्तविक संविधानाची फार दयनीय अवस्था झाली आहे. इलेक्टोरल बॉंड हे संविधानाच्या विरुद्ध आहेत, असे सुप्रीम कोर्टाने जाहीर करूनसुद्धा त्या संविधानाविरोधी कृतीबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक झालेली नाही! महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टानेच जाहीर केले होते की राज्यपालांनी मोठी चूक करून महायुतीचे सरकार स्थापित केले आहे. तरीदेखील ते बरखास्त न करता तारखेवर तारीख देऊन मराठी सरन्याय्धीश चंद्रचूड ह्यांनी त्यांना अडीच वर्षे महाराष्ट्राच्या जनतेवर अनधिकृत राज्य करू दिले आहे! संविधान बिनधास्त तोडले जात आहे आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टालाही काही वाटत नाही! मोदीसरकारने सगळ्या संविधानिक संस्था आपल्या ताब्यात घेऊन देशात तानाशाही अनित आहे. ते आपल्याला लोकशाही वाचवायची आहे.