​खतरनाक प्राणी – अशोक बा. डिब्रिटो

खतरनाक प्राणी

  •  अशोक बा. डिब्रिटो, नंदाखाल

मोबाईल – ९६८९७८१३०९

सोन्याचं अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपण सर्वांनीच ऐकली आहे, वाचली आहे. ह्या गोष्टीचा शेवट वाचताना, ऐकताना आपण सर्वच जण म्हणत असतो, “काय मुर्ख माणूस, रोज सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीला आपल्या हावेपोटी मारून हातचं गमावून बसला”. ह्या गोष्टीत लोभ आणि हाव आपली अवस्था “तेल गेले,तुप गेले हाती आले धुपाटणे” ह्या आशयाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपल्या प्रत्येकाला विधात्याने दिलेली  सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणजे हे विश्व ज्यात आपल्याला जीवंत राहण्यासाठी ज्या श्वासाची गरज आहे, तो श्वास विधात्याने आपणासाठी विश्वातील निर्सगात, पर्यावरणात भरून ठेवलेला आहे, तो मानवनिर्मित नाही, आपली तहान भागविण्यासाठी नदी आणि झऱ्यात शुध्द आणि निर्मळ जल सोडलं आहे, आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी वसुंधरेच्या पोटात अन्न धान्य साठवलेलं आहे, डोंगरदऱ्या आणि रान वन आपल्या सुखसमुध्दीसाठी आणि आरोग्यासाठी सज्ज ठेवलेले आहेत आणि हे सर्व घटक आपली विनाशुल्क सेवा करत आहेत, हे सर्व घटक जितके स्वस्थ राहतील तितके आपण स्वस्थ आणि सशक्त राहू. आपलं अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून आहे,त्यांच्याशी आपण कसे वागलं पाहिजे आणि आपण कसे वागतो हा चिंतनाचा विषय आहे.

आपला विधाता आपणास ह्या विश्वात पाठवताना अगदी रिक्त हाताने पाठवत असतो. आपल्या जीवन प्रवासासाठी लागणारी कोणतीच गोष्ट तो आपल्या शिदोरीत देत नसतो कारण आपण ह्या जगाचे प्रवासी आहोत आणि आपल्या ह्या प्रवासात आपणास आवश्यक असणाऱ्या गोष्टीची तजवीज आधीच  त्याने करून ठेवलेली आहे आणि म्हणूनच बायबलमधील एका दाखल्यात विधाता आपणास आपल्या आयुष्याविषयी चिंता करू नका म्हणून समजावताना म्हणतो, “आकाशातील पाखरांकडे पाहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ती कोठारं साठवित नाही, तरी स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही”.

जिथे खुद्द आपला विधाता आपली काळजी घेतो, तिथे आपण चिंता न करता समाधानी राहायला पाहिजे. मात्र आपल्यातील लोभ आणि हाव आपल्याला अस्वस्थ बनवते. आपला जीवन प्रवास कधी, कुठे आणि कसा संपणार हे आपणास ठावूक नाही. आपण  कितीही चिंता केली तरी आपलं आयुष्य क्षणानेही वाढवू शकत नाही आणि आपल्या जाण्याने जगातील कोणताही क्रम थांबत नसतो. म्हणूनच कवी भा. रा. तांबे सतत चिंता करणाऱ्या चिंतातूर जंतूला आपल्या कवितेतून समजावताना म्हणतात,

“जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जाता राहील कार्य काय ।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील । तारे अपुला क्रम आचरतील ।। असेच वारे पुढे वाहतील । होईल काहि का अंतराय ।।”

मानवाला हे कळतंय पण वळत नाही कारण स्वार्थाचा आणि अहंकाराचा मोतीबिंदू त्याच्या इतका अंगवळणी पडलाय की डोळ्यात सलत असूनही तो काढण्यास मानवाचा मीपणा आडवा येतो.

ह्या सुंदर विश्वाची निर्मिती करून त्याची देखभाल करण्यासाठी, त्याला जोपासण्यासाठी आणि ह्या विश्वातील प्रत्येक जीवजंतूला न्याय देण्यासाठी विधात्याने आपल्या सर्वात विश्वासू एकमेव मनुष्यप्राण्यास विशेष बुध्दीचं वरदान देवून त्याच्या हवाली केलं. आपल्याला लाभलेल्या बुध्दीमत्तेच्या  जोरावर ह्या मनुष्यप्राण्याने असे काही  खतरनाक आविष्कार केलेले आहेत की ज्याने ह्या जगाचे स्वरूप बदलून टाकले आहे. मात्र मानवाने जसे खतरनाक आविष्कार आणि उत्क्रांती घडवून आणली आहे, तितकाच हा मनुष्यप्राणी खतरनाक बनलेला आहे.

आपली बुध्दी वापरून ह्या जगाला कुत्रीम रंगरंगोटी करून सजवत असताना  विधात्याने ह्या विश्वाला जे संरक्षण कवच दिलेलं आहे, त्यास नख लावत आहे, ओरबाडत आहे आणि त्यामुळे सर्व सुखसुविधा आपल्या पायाखाली आणूनही, जगातील सर्वात बुध्दीमान असलेला मनुष्यप्राणी सर्वात अशांत, असमाधानी, अस्वस्थ आणि दु:खी आहे. तर मग आपल्याला लाभलेली बुध्दी आणि त्याव्दारे आपण केलेली शैक्षणिक प्रगती हा आपणासाठी शाप आहे की वरदान हा चिंतनाचा विषय आहे.

विचार करण्याची शक्ती नसलेले, बऱ्यावाईटाचे ज्ञान नसलेले निर्जीव झाड आपली सावली देताना गरीब-श्रीमंत, उच्च-निच्च हा भेदभाव पाळत नाही. तहानलेल्याची तहान भागवताना पाणी कधी जाती-पातीचा विचार करत नाही, परंतु ज्याला विधात्याने बुध्दी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, भावभावना दिलेल्या आहेत, तो त्याचा प्रिय मनुष्यप्राणी माणसामाणसातच नाही तर अगदी आपल्या कुटूंबातही भेदभाव करत असतो. ‘हे विश्वची माझे घर’ ह्या संत ज्ञानेश्वराच्या शिकवणीला बदलून ‘हम दो हमारे दो, हेच माझे घर आणि माझे घर हेच माझे विश्व’ ही भावना मूळ धरू लागल्याने कौंटूंबिक आणि सामाजिक जीवनाला घरघर लागली आहे. आपल्या विश्वासू मनुष्यप्राण्याने विकासाच्या नावाखाली चालवलेला निर्सगाचा आणि नितिमत्तेचा विध्वंस पाहून विधात्यालाही प्रश्न पडला असेल की मनुष्यप्राण्याला बुध्दी देवून मी चूक तर नाही केली ना?

आज ह्या विश्वात ज्या समस्यांचं जाळं पसरलं आहे, जी संकटं, दु:ख, जी विषमता, दुष्काळ, पूर आणि जीवघेण्या आजारांचा वणवा पसरत आहे, तो ​​काही ईश्वर निर्मित नाही, ती कोणा पशूपक्ष्यांची चूक नाही, तर मानवाच्या स्वार्थी आणि मतलबी ठिणगीने पेटलेला आहे, हे कटू आहे पण सत्य आहे.

१. विश्वावर आग ओकणारं ग्लोबल वाँर्मीग विधात्याचा प्रकोप आहे की मानवाने तोडलेल्या आणि वणवा पेटवून भस्म केलेल्या रानावनाची धगधगती आग आहे ?

२. सुनामी तथा पूराचा तडाखा मनुष्याला उध्वस्त करत आहे, हे ईश्वरी संकट आहे की मानवाने नदी आणि सागरावर केलेल्या अतिक्रमणाचा निर्सगाने प्रकट केलेला राग आहे ?

३. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूतील अनियमितपणाला जबाबदार ईश्वर की निर्सगाला नख लावणारा व पर्यावरणात प्रदूषणाचे धूर सोडणारा मानव ?

४. जमिनीत क्राँक्रीटचे विष ओतून सुपीक जमिनीला नापीक करण्याचे पाप ईश्वराचे की मनुष्याचे ?

५. विधात्याने विश्वातील सकल जीवासाठी निर्माण केलेली साधन संप्पती आपल्या तिजोरीत साठवून जगात गरीबी, भूक आणि दारिद्र्य वाढविणारी वाटणी कोणी पशूपक्षी नाही तर मनुष्यप्राणी करत आहे.

६. आपली तहान भागविण्यासाठी विधात्याने दिलेल्या नैर्सगिक विहिरी, बावखालं आणि तळी कचराकुंडी बनवून रोगराईला आमंत्रण देणारा आणि आपल्या पुढच्या पिढीला पाण्यासाठी रांगेत उभा ठेवणारा प्राणी एकमेव मनुष्यप्राणी आहे.

७. एकमेकांवर अण्वस्त्रे सोडून लाखो निरपराध जीव घेवून लाखो कुटूंबाची राखरांगोळी करणाऱ्या लढाईला केवळ माणसाचा स्वार्थ आणि अहंमपणा आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. मात्र आपण जर वेळीच आपल्या स्वार्थ आणि अहंमपणाचा मोतीबिंदू दूर सारला नाही आणि सदविवेकबुध्दी जागृत करून प्रगतीच्या वाटेवर चालत असताना पर्यावरणाचा ऱ्हास वेळीच थांबवला नाही, आपल्या बुध्दीचा वापर करताना नितिमत्ता आणि सामाजिक समता पाळली नाही तर विश्वाच्या विनाशाला कारणीभूत असणारा खतरनाक प्राणी हा मनुष्यप्राणी ठरेल.

1 Comment

  1. एक मनुष्य जन्म त्यात आपण सदसदविवेक जागृत ठेवायला हवा संत तुकाराम महाराज म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” खरोखर विधात्याने आपली सोय केली आहे त्यासमोर दुजे काही नाही

Comments are closed.