काळू-लालूची खिल्लारी जोडी.
- जोसेफ तुस्कानो
ए-1402, क्लबलाइफ, आहुजा टॉवर्स, एक्सर रोड, बोरीवली (प),
मुंबई – 4000091 मोबाईल – 9820077836
घरापासून मैलभर दूर असलेली ती एक एकरची वाडी गेली साठ-सत्तर वर्षे आम्ही कसत आहोत. गावच्या दुर्गादेवी देवस्थानाकडून बाबांनी ती जमीन तेव्हा कुळाने घेतली होती व दरवर्षी रीतसर वार्षिक हशील भरून आम्ही त्यात शेती करत आहोत. केळी आणि अन्य भाजीपाल्याचे उत्पादन घेत आलो आहोत. माझे सारे बालपण, आमच्या त्या ‘पंगाडा’ वाडीत गेले. आज मी शहरवाशी झालेलो असलो आणि साठी ओलांडली असली तरी अधूनमधून गावात जातो तेव्हा वाडीत जातो. त्या हिरव्याकंच वाडीतल्या मोकळ्या ऑक्सिजनचा भरभरून श्वास घेतो, त्यावेळी सारे बालपण मयूरपिसार्यासारखे नजरेसमोर फुलारून येते नि आठवण येते ती माझ्या जिवाभावाच्या मित्रांची आणि डोळे आपोआप भरून येतात.
शिंगापासून शेपटापर्यंत काळाभोर होता आमचा काळू. ‘बाप्पा‘ ने(आजोबाने) त्याला ते नाव ठेवले होते. काळू उंच नि मजबूत होता. काय त्याचा तो रुबाब ! आजूबाजूच्या कुटुंबातील सगळी जनावरे त्याला टरकून असायची. एकदा तर कॉमन गोठ्यातील दावणीला बांधलेल्या काकांच्या कुटुंबातील एका बैलाने काळूसमोर टाकलेल्या पेंढ्यात तोंड खुपसले. मग, काय विचारता? हा गाडी बिथरला. आपल्या लांब लांब शिंगांनी दिली धडक आणि त्याच्या शिंगाची सालटीच काढून टाकली. काळूला आजूबाजूचे मारकुंडा म्हणायचे अन तेही लांबून. त्याच्या जवळ जायची कुणाची बिशाद होती? पण… माझा मात्र तो यार होता.
लालूचं एकदम उलटे होते. लालसर रंगाचा आमचा हा बैल एकदम साधाभोळा होता. ना कुणाच्या अध्यात की मध्यात. समोर टाकलेला चारा नि पेंढा गुमान खाणारा, अंगाखांद्यावर लोळू देणारा, समोर ठेवलेली पाण्याची बादली निमूट संपविणारा; मात्र शेवटचा घोट घेतला की फुर्रsर्र करत माझ्या अंगावर पाण्याचा शिंतोडा उडविणारा. ती त्याची काय खोड होती, मला काळतच नसे. मग, मीही लडिवाळपणे त्याच्या मानेवरच्या मांसल भागावर अलगद ठोसा मारीत असे. त्यालाही ते बरे वाटे. आमच्या त्या संयुक्त कुटुंबाच्या गोठ्यातील एखादे जनावर लालूच्या वाटेत आले तर त्याची मात्र गय नसे कारण काळू आपली मोठाली शिंगे उगारत त्या दुसर्या ढोराला सळो की पळो करी. त्या दोघातला तो बंधुभाव म्हणजे अजब मासला होता.
या दोन बैलाव्यतिरिक्त आमच्या घरात एक गाय नि तिचे वासरू होते. आमच्या कुटुंबाची दूधदूभत्याची गरज ती भागवत असे. दररोज शाळेतून आल्यावर गाईला गावच्या तळ्यात चरायला घेऊन जाणे हे माझे ठरलेले दैनिक काम होते. कातरवेळ झाली की आपल्या पाडसाच्या आठवणीने व्याकुळ होऊन ती हंबरायला लागायची, ते आठवले की कवी ग्रेस यांच्या ओळी मनसरोवरात हेलकावतात:
‘गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रहरी अलगद भरून यावे:…’
मात्र, शनिवार-रविवार व सुटीच्या दिवसात बैलांना तळ्यात पाण्याला नेणे, चारा-पेंढा घालणे ही कामे माझ्यावर सोपवली जात. त्याकाळी भरल्या कुटुंबात कामांच्या अशा वाटण्या होत असत. अशाच काही दिवसात पंगाडा वाडीत केळी शिपण्यासाठी जावे लागे. ती मज्जा काही औरच ! कारण आम्ही बैलगाडी जुंपून वाडीत जात असू. ती गाडी आमचा माणक्या गडी चालवत असे. माणक्या आमचा विश्वासू गडी होता. तो कामाचा ढाण्या वाघ होता. मी त्याच्या मांडीवर बसून ‘है,चल रे…’ असे तोंडाने चित्रविचित्र आवाज काढीत काळू-लालूना पिटाळीत असे. अन तेही भराभर चालत बैलगाडी वाडीच्या दिशेने नेत. वाडीत त्यांना आळीपाळीने रहाटाला जुंपले जाई, तेव्हा त्यांना हाकण्याची जबाबदारी माझ्यावर असे. डोळ्यावर कापसाच्या कपड्याचे ‘डोपेंडे’ बांधून एक बैल गोलगोल फिरत रहाटाची जड जड लाकडी चाके फिरवी. मातीच्या ‘बांड्यां’ची माळ पत्र्याच्या ‘पोंदाळा’त पाणी ओती.. तो पाण्याचा ओहोळ जमिनीवर खणलेल्या खोलगट ‘दांडा‘तून केळीच्या बागेकडे वळविला जाई. आम्ही काळू आणि लालूला आळीपाळीने रहाटाला जुंपत असू. मी त्यांना हाकीत असताना, माणक्याकाका केळी शिंपत असे. मध्येच येऊन रहाटाचा बैल बदलत असे. मग, रिकाम्या झालेल्या बैलाला मी दांडावर नेऊन पाणी पाजी. वाडीत निगराणीचे काम करणार्या ‘बय’(आजी) नि ‘दादी’ (आई)ने गोळा केलेला ओला चारा त्याच्या पुढ्यात टाकी. खांद्यावरील जू मुळे त्यांच्या शिणलेल्या मानेवर हळुवार गोंजारी. मधल्या काळात काका, बय, दादी यांच्याकडून मला पिकलेली किवा भाजलेली कच्ची केळी, ताडगोळे, पिकलेली पपई, चवळीच्या शेंगा यांचा खुराक मिळत असे.
सायंकाळ झाली की आम्ही सारे बैलगाडीत बसून घरी परतत असू. खरेतर घरी परतत असताना ते मुके जीव भराभर पाऊले टाकत असत. त्यांनाही घरची, चारापाण्याची ओढ लागत असावी. पण, आमचा माणक्याकाका बैलांना हाकण्यासाठी ‘पराणी’ वापरत असे. बांबूच्या काठीला टोकदार खिळा ठोकून तयार केलेली पराणी काळू-बाळूच्या कुल्ल्यात खुपसली की ते दोघे कळवळून जायचे. जोरात पळत गाडी ओढायचे. ‘कादो मारता त्यांना?’ मी एकदोनदा कळवळून सांगीतले, पण तो बेखबर राहिला. माणक्याकाकाचे सगळे काही बरे होते, पण त्याचा हा क्रूरपणा माझ्या बालमनाला सहन होत नव्हता. मी बाप्पाकडे तक्रार करून बघितली, त्यांनीदेखील फारशी दखल घेतली नाही. एके संध्याकाळी घरी पोहचल्यावर बैलगाडी सोडली; अन, पाहतो तो काय, काळू-लालूच्या पार्श्वभागावर रक्ताचे लाल लाल थेंब फुटले होते. मला रडूच कोसळले. मी त्यांना गोठ्यात नेले. त्यांच्या पुढ्यात पेंढ्याची मोळी सोडली. पाण्याने भिजलेला फडका आणला नि त्यांच्या जखमावर ठेवला. बय ते दृश्य बघत होती. माझे डोळे पाण्याने भरले होते. तिने तत्काळ माणक्याला हाक मारली नि झापत म्हटले, ”तू बैलांना कादो रॅ ऑडा मारता? मा पॉर रडात्ये बग“. काकाला माझे ते वागणे विचित्र वाटले कारण ते त्याच्या आकलनापलीकडचे होते. त्यानंतर त्याने एक मात्र केले ते म्हणजे मला बैलगाडी हाकण्याचे प्रशिक्षण दिले नि गाडीच्या पागा माझ्या हातात आल्या. मी नुसती चापटी मारली तरी ते जीव भराभर गाडी ओढीत असत इतका त्यांचा माझ्यावर जीव जडला होता.
एकदा तर मोठा बाका प्रसंग उद्भवला होता. घरी बैलगाडी घेऊन परत येताना मी आणि काका दोघेच होतो. बैलगाडी सज्ज करून मी हातात पागा घेऊन बसलो. ‘मी पटकन येतो,’ असे सांगत काका कुठेतरी बाजूला ‘नवटाक’ मारायला गेला असावा. खूप वेळ गेला तरी तो परतेना. काळू-लालू घरी परतायला आतुर झाले होते. मी मनाचा हिय्या केला नि गाडी हाकली. झाडाझुडुपांनी व्यापलेली ती अंधारमय वाट, त्यानंतर येणारा मुख्य रस्ता नि त्यावरील बसगाड्या, सायकली, माणसे यांची वर्दळ आणि मी नवखा हाकार्या. छाती धडधडत होती. मी त्या दोघांनाही चुचकारले आणि तेही काय समजायचे ते समजले. वाटेतले सगळे अडथळे पार करीत त्यांनी गाडी सुखरूप दारापुढे आणून उभी केली. माणक्या मागून धावत धावत आला, तेव्हा बाप्पाने त्याला चांगलेच फैलावर घेतले.
पुढे, काळूला काय उपरती झाली कुणास ठाऊक? तो सारखा बिथरू लागला. आपल्या अंगाला कुणाला हात लावून देइना. गावातल्या दोन-तीन जणांना त्याने ‘ढेम’ मारून उडविले. त्याचे वयदेखील झाले होते. बाप्पाने त्याला विकायचे ठरविले. दोन ‘खारकांडे’ (कसाई) घरी आले नि काळूच्या मुसक्या आवळून त्याला घेऊन गेले. मी रात्रभर बयच्या कुशीत हमसून हमसून रडलो होतो. लालू एकटा पडला होता. काळूला कसायांनी नेले तेव्हा दोन-तीन दिवस त्याने खाण्याला तोंड लावले नव्हते.
नंतर, मलाही शिंगं फुटली होती. मी मुंबईनगरीत कॉलेज शिक्षणासाठी जाऊ लागलो. शेतीला दुरावलो. पण, आज वाडीत ‘विजिट’ला जातो तेव्हा त्या दोन मुक्या मित्रांची खूप सय येते. अश्रूंची एक गरम गरम धार गालावरुन काळ्या मातीत ठिपकते. काळूलालूच्या त्यागाची, त्यांच्या विरहाची नि त्यांच्यावरील निष्पाप प्रेमाची ती साक्ष असते!.