कसं बोलतात…!
- जॉन कोलासो, गिरीज, वसई
टेकाडे आमचा मित्र. अगदी घनिष्ठ. स्वभावानं साधा, सरळ. कुठे दुखावला वा सुखावला की, भेटून तो आपलं मन मोकळं घरी येतो. घरी आला की, त्याच्या चेहर्यावरून ओळखायला येतं की, आमच्या या मित्राचं मन आज कुठेतरी दुखावलं आहे की, सुखावलं आहे ते!
तर, त्या दिवशी हा आमचा परममित्र घरी आला आणि सांगू लागला, अरे मी बर्याच दिवसांनी, त्या आपल्या सुनीलच्या घरी गेलो होतो, दरवाजा उघडताच समोर वहिनी दिसली, म्हणून मी विचारले… विचारले, म्हणजे बर्याच दिवसांनी एखादी व्यक्ती भेटल्यावर आपण सहज विचारपूस करतो तशी विचारपूस केली, ‘‘काय वहिनी, कशा आहात, प्रकृती कशी आहे…?’’
माझ्या तोंडून हे अगदी वाक्य बाहेर पडलं, आणि ते खाली पडू न देताच वहिनीनं ते झेलले आणि माझ्या अंगावर ते भिरकावून देत, खेकसली, “मला काय झालं आहे, माझ्या प्रकृतीची चौकशी कशाला करता… तुमच्या मित्रानं माझ्याबद्दल काहीतरी खोटंखोटं सांगितलं असणार, प्रत्येकाला ते तसंच सांगत असतात… मला काहीतरी मानसिक झालं आहे म्हणून, म्हणूनच तुम्ही इतक्या दिवसांनी आमच्या घरी उगवलात, माझी तब्येत बघायला…’’
‘‘तसं काही नाही हो, वहिनी… बर्याच दिवसांत तुमच्याकडे यायला जमलं नाही, सुनीलही फोन करीत नाही म्हणून मलाच वाटलं, आज सुट्टी आहे, तर तुमच्या घरी जाऊन यावं म्हणून… पण तुम्ही म्हणता, तसं मला सुनीलने काहीही सांगितलेलं नाही, तुमचा गैरसमज झालेला दिसतोय…’’
‘‘अहो, कसला गैरसमज… मी ऐकते ना, फोनवरून काय बोलतात ते… सांगत सुटल्यात, माझ्या भावाला, माझ्या बहिणीलाही मानसिक आहे, आता हिलाही… तुमच्या मित्राला सांगा, मला नाही, तुम्हाला आणि तुमच्या आईला झालं असेल मानसिक. ते तपासून घ्या…’’
हा सर्व वृत्तांत सांगताना आमचा मित्र टेकाडेला अगदी रडूच कोसळले होते… सुनीलच्या पत्नीने एकदम असा हल्ला केल्याने तो कावराबावरा झाला होता. टेकाडेला दिलासा देण्यासाठी मला आलेला एक अनुभव मी त्याला सांगितला…
अरे, टेकाडे हे तर काहीच नाही, मी आमच्या ओळखीच्या घरी गेलो होतो… गेलो होतो, म्हणजे माझ्या कामानिमित्त मी एके ठिकाणी गेलो होतो, तेथे जवळच आमच्या या ओळखीच्या कुटुंबाचं घर आहे, म्हणून विचार केला, त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो, त्यानंतर तीनचार वर्षांत त्यांच्या घरी जाणं झालं नाही, म्हणून म्हटलं, चला जवळच आहे, तर जाऊन खबरबात विचारू या…! बसलो… इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सहज विचारणा केली, ‘‘अहो, मुलाचा संसार कसा चालला आहे… छान ना… सूनबाईपण नोकरी करते ना…?’’
अरे टेकाडे, काय सांगू तुला, हा विषय काढताच त्या कुटुंबातील सर्वांच्या चेहर्यावरील हावभाव असे काही बदलले की, ते पाहून मीच गोंधळलो… तेथून उठून पळून जाऊ की काय, असा विचार माझ्या मनात एका क्षणात आला… तरी मी संयम राखत, मला काही समजलंच नाही, असं दाखवत बसून राहिलो. थोड्यावेळानं ते कुटुंबही सावरलं आणि या मुलीनं… म्हणजे सुनेनं आमच्या घराची कशी वाताहत लावली, याचे एकेक पाढे वाचण्यास सुरुवात केली…
‘‘अहो, काय सांगू, मुलाने आमच्या घरी अशीकशी मुलगी शोधून आणली ते समजत नाही… आम्ही त्याला आपल्याकडच्या कितीतरी चांगल्या मुली दाखविल्या, सुचविल्या होत्या. शिकलेल्या, नोकरी करणार्या… पण प्रत्येकवेळी नकार देतच राहिला. त्याला कॉलेजचीच मैत्रिण करायची होती ना… एक दिवस आम्हाला दाखवायला तिला घरी घेऊन आला… सर्वांची ओळख करून दिली आणि सांगितलं… मी हिच्याशीच लग्न करणार म्हणून…
‘‘लग्नापूर्वी हिरवी वसई आवडली. बंगला आवडला. आता लग्नाला वर्ष होत नाही, तोच सांगू लागली, रोज वसई-विरारहून मुंबईला जाणंयेणं मला शक्य होत नाही. थकायला होतं म्हणून मुंबईला राहायचे म्हणते… माझ्या मुलाने तिला स्पष्ट सुनावले, लग्नाच्या निमित्ताने नवं घर बांधलं, आता मुंबईत फ्लॅट घ्यायला कसं जमेल… शिवाय त्या फ्लॅटमध्ये आमच्या कुटुंबासह सर्व कसे राहू शकणार? या गोष्टीवरून दोघांत वाद झाला… ती रागाने माहेरी निघून गेली, येतच नाही. याचा फोनही घेत नाही. मुलाने निरोप पाठविला आहे… तू येथे राहायला येणार नसेल तर आपण घटस्फोट घेऊ… तर तिने उलटे उत्तर दिले, घटस्फोट हवा असेल तर मला एक कोटी रुपयांची भरपाई पाहिजे, तरच घटस्फोटाच्या कागदावर सही करीन…! आता इतके पैसे आणायचे कोठून…?’’
हे सर्व ऐकून मी आपलं त्यांना समजावण्याच्या सुरात कसंबसं सांगितले… ‘‘आताच्या पिढीला लग्न म्हणजे काय हेच समजलेलं नाही… त्यामुळे हे असं होतंय…!
माझं हे बोलणं ऐकून टेकाडेही सावरला. त्यांनी मला आजच्या पिढीचे लग्नासंबंधी काय विचार आहेत, हे केरळ हायकोर्टाचा हवाला देत सांगितलं.
टेकाडे म्हणाला, ‘‘अरे चक्क केरळ हायकोर्टानेच एका घटस्फोटाच्या खटल्यात म्हटलं आहे, सध्याची लग्नं म्हणजे ‘युझ अँड थ्रो’ संस्कृती बनली आहे. लग्न हाही एक चंगळवादाचा भाग बनला आहे. एखाद्या उपभोग घेणार्या वस्तू सारखा… असा निष्कर्ष नमूद केला आहे. लग्न म्हणजे एक संस्कार असं म्हणलं जातं. अग्नीला साक्षीला ठेवून सातफेरे घातले जातात किंवा चर्चमध्ये वेदीवर देवाच्या व अनेकांच्या साक्षीने एकनिष्ठ राहून, एक दुसर्याला आजन्म साथ देण्याची शप्पथ घेतली जाते, पण आज दोन वर्षातच या शपथांचा आणि सातफेर्यांचा विसर अनेक दाम्पत्यांना पडत आहे.’’
टेकाडेच्या या माहितीत मी आणखी भर टाकत त्याला सांगितले, टेकाडे, मी तुला मघाशी सांगितले नाही, त्या मुलीने घटस्फोटासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे, हे तर काहीच नाही, काही तरुणी तर केवळ पैसेच मागत नाहीत तर, नवरा परदेशात वा बोटीवर नोकरीस जाणारा असला तर त्याचे घर आपल्या स्वत:च्या नावावर करण्याचा हट्ट धरतात, तर काही तरुणी, नवर्यावर व त्याच्या कुटुंबियांवर मारहाण केल्याचा आरोप करून ‘डोमेस्टिक व्हायलन्स’खाली गुन्हा दाखल करतात आणि त्याला वरती सुनावतात, बस आता घरी माशा मारत…’’
इतक्यात माझ्या सौ.नेही आमच्या संभाषणात भाग घेत, तरुणीवर होणारे आरोप फेटाळत सांगितले, ‘‘अहो, टेकाडे भावजी, केवळ तरुणीमुळेच लग्न मोडीत निघतात असं काही नाही हो…, त्यास काही तरुणही जबाबदार असतात. एकतर नोकरीनिमित्त परदेशात राहून तेथे प्रेम प्रकरणात गुंततात आणि येथे आल्यावर पुन्हा बोहल्यावर चढतात, लग्न करतात आणि मुलींना फसवतात, त्याचं काय, अशावेळी भरपाईची रक्कम मागायलाच हवी आणि फसवणूक केली असेल वा छळ करण्यात आला असेल तर गुन्हाही नोंदविलाच पाहिजे… तुम्ही केरळ हायकोर्टाच्या निकालाचा दाखला दिला ना, पण याच निकालात हायकोर्टाने म्हटले आहे की, पूर्वी ‘वाइफ’ म्हणजे ‘वाइज इन्व्हेस्टमेंट फॉरएव्हर’ असं समजलं जात असे, आता ‘वाइफ’ म्हणजे ‘वरी इनव्हायटेड फॉरएव्हर’. थोडक्यात काय तर लग्न करून एकत्र राहणे म्हणजे उगाच पत्नीची जबाबदारी घेणे त्यापेक्षा अशी जबाबदारी टाळून तारुण्याची मौजमजा करण्यात या तरुणांना रस असतो. सध्याच्या परिस्थितीचे किती अचूक व मार्मिक विश्लेषण केरळ हायकोर्टाने केलं आहे.’’ आमच्या सौ.ने पुढे आणखी पुस्ती जोडली.
सौ.ची ही शेरेबाजी ऐकून आम्हीही एकूण बदलेल्या परिस्थितीबद्दल, कालाय तस्मै नम: असे उसासे टाकून चर्चा आवरती घेतली. टेकाडेही चहा घेऊन आमच्या घरातून निसटला…