- संगीता अरबुने, वसई
कविते खूप बोलतेस.
ऐकूणही घेतलं तुझं खूप
आनंदाचं साधन आहेस तू, मान्य
पण जगण्याचं साधन
नाही होऊ शकत तू
नाही थांबवू शकत तू
माझ्या अस्तित्वाची धूप
आणि देऊही शकत नाहीस
प्रियकराच्या स्पर्शाचं सुख
नाही खेचू शकत तू
विश्वाच्या आदिम बिंदूतून
माझ्या आयुष्याची तार
कविते, नाहीच जमणार तुला
आपलंच गर्भाशय
आपल्याच हातांनी खरवडणं
आणि मातृत्वाच्या दोरीवर
वेदनांची फडकी सुकत घालून
त्यातून स्वत:च ठिबकत राहणं
आणि तो इगोईस्टिक धूर!
नको असतानाही आत येऊन
थेट रक्तात मिसळलेला
कविते नाहीच जमणार तुला
जगण्याची चाळण होऊ न देणं
आणि न ठसकता समेवर येणं
संवेदनांचा उसळणारा लाव्हा
पिऊन टाकतेस तू,
नाही असं नाही
पण आतला हा धगधगता ज्वालामुखी!
आणि त्याच्या तोंडावर वसलेलं हे आख्खं शहर!
त्याचं नाही करता येणार तुला पुनर्वसन
कविते खूप बोलतेस.
ऐकूणही घेतलं तुझं खूप.