कविता –  संगीता अरबुने

जगण्याचा चिखल गाळ

अवघे जन्म

पोटात घेऊन पुन्हा नव्याने जन्माला येतो आपण 

उभा  जन्मच गहाण असतो आपला

तरीही माझं तुझं करत

 मारत राहतो आपण  संबंधावर उभ्या आडव्या रेषा 

आणि नात्यांची लक्ख कोरी पाटी करत राहतो 

 गीचमिड  

 खुडत राहतो सुखाचे कोंब

त्याला पालवी फूटण्या आधीच

भय, गील्ट,

 नी  कसले कसले गंड पोसतो स्वतः त 

 करत राहतो जगण्याचा चिखल गाळ

आणि धसत जातो खोल खोल आत

चाळणीतून सांडलेला सूर्य

उघड्या डोळ्यांनी पाहू नये म्हणतात 

म्हणून  चाळणीतून पाहू लागले   ग्रहणातला सूर्य

तर तो

चक्क  पुढ्यात विखुरलेल्या कागदांवरच सांडला

कण कण होऊन

वाऱ्यावर उडून जाऊ नये  भुरभूर 

म्हणून मी  मळून घेतलं त्याला 

 छान मऊसर

आणि 

लाटली एक  कविता 

 सवयीप्रमाणे….

‘चाळणीतून सांडलेला सूर्य’

एकतर कवी आधीच बदनाम 

त्यात सूर्याचं हे कण कण होणं

तेही कुणा कवीसाठी

भीती वाटतेय

 उद्याच्या दिवसाची

  •  संगीता अरबुने, वसई