मुलीनं मांडलेल्या सवसारात
मुलीनं मांडलेल्या सवसारात
असते वाळक्या पानाची चटणी
लुसलुशीत गवताच्या पालेभाज्या
मातीची पत्ती अन पाण्याचे दूध
ती म्हणत असते माझ्या हातचा चहा पिऊन पहा एकदा
ती खाऊ घालते तिच्या बाळाला
काऊ चिऊचा घास
आईबाळाच्या या अतुल्य वात्सल्याच्या
प्रेमकहाणीचा खेळ चलतो तेव्हा
जगातल्या समस्त काऊ चिऊच्या डोळ्यात
तरळते हृदयंगम पाणी
ती अंघोळ घालते तिच्या बाळाला
करून मांडीचा झुलवा
तिचे बाळ भलताच गोड छोकराये
किती गोड असते तिची इवली दुनिया
तिच्या खेळात नसतो समावेश
लाखमोलाच्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा
खेळाच्या या नात्यात असते ती
प्रेमदात्री
ती सतत देत राहते प्रेमाचे पावसाळे हर क्षणाला
तिच्या या सवसारात नसतो कोणत्याच
सुखादुःखाला थारा
तिच्या या सवसारात नसतो
कोणासोबतही हेवादावा
ती तिच्या सवसारात असते तटस्थ
एखाद्या ध्यानमग्न साधूसारखी
ती तिच्यातच असते मग्न
मुलीनं मांडलेल्या सवसाराच्या स्वप्नांना आभाळपंख
मुलीनं मांडलेला हा सवसार
खरंच असता प्रत्येक मुलीचा तर
जगातल्या प्रत्येक मुलीनं मारल्या असत्या
प्रकाशवेगानं गगनभराऱ्या
खेळून झाल्यावर तिनं सारा पसारा गुंडाळून ठेवून दिला थैलीत
तेव्हा मनात विचार आला
सवसार मोडून टाकणं इतकं सहजसोप्पं कुठाय
एकदा वर चढलो की कापल्या जाते दोर
नसतो परतीचा रस्ता
की नसते अनडू चे ऑप्शन
अन् मुली तुला हे कसं सांगू
सवसार म्हणजे एकदा मोडून परत थाटायचा खेळण्याचा खेळ नाहीये
– अमोल विनायकराव देशमुख, महेंद्र नगर,परभणी
संपर्क – 7620949985