“कर माझे जुळती”
- रिचर्ड नुनीस, मेलबर्न.
सोबतच्या चित्राच्या प्रतिकृती आणि नक्कला आपण अनेक ठिकाणी पाहिल्या असतील. विधात्यासमोर समर्पणाच्या भावनेने जोडले जाणारे हात हे एक धर्मनिरपेक्ष वैश्विक चिन्ह आहे. ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना ही कलावंतांची राजधानी! तेथे कधी गेलात तर तेथील अल्बर्टा म्युझियमला भेट द्यायला विसरू नका. कारण आल्ब्रेख्त ड्युरर ह्या जर्मन चित्रकाराने इ.स. १५०८ मध्ये चितारलेले हे रेखाचित्र ह्या म्युझियममध्ये आहे.
युरोप मधील पुनरुद्भवन काळाने (Renaissance) जगाला अनेक कलावंत दिले. त्यापैकी एक मोठं नाव म्हणजे ड्युरर.
चौदावे ते सतरावे शतक हे युरोपमध्ये नवचेतन युग (renaissance) समजले जाते. ह्या काळात युरोपमध्ये काव्य, शास्त्र साहित्य, तत्वज्ञान, कला आदी ज्ञानशाखांचा झपाट्याने विस्तार झाला, भरभराट झाली. अनेक उत्तमोत्तम कलावंत जन्मले. त्यांनी निर्मिलेल्या कलाकृतींनी जगाला भुरळ घातली. साऱ्या जगाचा सांस्कृतिक असा हा वारसा युरोपमधील सर्व देशांनी जतन करून ठेवला आहे.
फ्रेंच renaistre वरून Renaissance हा शब्द इंग्रजीत प्रचलित झाला. फ्रेंच शब्दाचा शब्दशः अर्थ “पुन्हा जन्म घेणे” असा आहे. मराठीत ह्याला पुनरुज्जीवन चळवळ, प्रबोधन काळ, पुनरुद्भवन (enlightenment) नवजीवन हे प्रतिशब्द अभासाकांनी योजले आहेत
सेंट पीटर बॅसिलिका मधील सिस्टाइन चॅपेलच्या छतावरील जगप्रसिद्ध फ्रेस्को चितरणारा आणि पिएता, किंग डेव्हिड सारखी अप्रतिम शिल्पे बनवणारा मायकेल अँजेलो, The Last Supper आणि मोनालिसा रंगवणारा लिओनार्दो द विंची, येशूचे रुपपालट (The Transfiguration), महादूत मायकल सारखी अद्वितीय पेन्टिंग रंगवणारा राफेल आदी दिग्गज ह्याच काळाने मानवजातीला दिले. योगायोगाने हे सारे कलावंत जवळपास एकाच वेळी म्हणजे इ.स. १४८३ ते इ.स. १५१९ ह्या ३६ वर्षांच्या “सुवर्ण” कालखंडात, आपल्या कलाकृतींचं दान भरभरून देत होते.
मायकेल अँजेलो, लिओनार्दो द विंची आणि राफेल हे एकाच प्रांतातील, म्हणजे सध्याच्या इटलीमधील. हे “नवचेतन” केवळ इटलीपुरतं मर्यादित नव्हतं तर युरोपमधील इतर राज्यांत देखील अनेक कलावंत आपल्या कलाकृतींनी लोकांची वाहवा मिळवीत होते. ह्याच सुवर्णयुगात जर्मनीत आल्ब्रेख्त ड्युरर (इ.स. १४७१ ते १५२८) ह्या कलावंताने आपल्या कलेने जगाला भुरळ घातली होती. त्याच्या अनेक कलाकृती जगभरातील म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या गेल्या आहेत.
प्रार्थनेत जोडलेले हात (The Praying Hands) ह्या ड्युररच्या रेखाचित्रामागे एक दंतकथा देखील आहे.
आल्ब्रेख्त ड्युररचा जन्म इ.स. १४७१ चा. त्याचे वडील सोनारकाम करीत असत. ड्युरर दाम्पत्याला अठरा मुलं होती. सोनारकामात चांगली कमाई असली तरी वीस जणांचं कुटुंब पोसताना वडिलांना नाकी नऊ येत असे.
आल्ब्रेख्त आणि त्याचा मोठा भाऊ अल्बर्ट चित्रकलेत वाकबगार होते. युरोपमधील त्या काळाचं वातावरणच कलाधार्जिणं होतं. त्यामुळे दोघांनाही न्युरेम्बर्गमधील प्रतिष्ठित कला अकादमीत शिक्षण घेऊन आपण मोठं कलावंत बनावं ही इच्छा होती. पण प्रतिष्ठित कला अकादमीत प्रवेश घ्यायचा तर खिशात दाम हवा. वडिलांना दोन मुलांचं सोडाच, एकाचंही उच्च शिक्षण करणं अशक्य होतं.
दोघा भावांनी अनेक पर्याय शोधले. पण ठोस असं काहीही ध्यानात येईना. खूप विचारविनिमय झाला आणि अल्बर्टने एक प्रस्ताव मांडला. दोघांपैकी एका भावाने आधी आपलं शिक्षण पूर्ण करायचं. दुसऱ्याने कामधंदा करून त्या शिक्षणाचा सारा खर्च उचलायचा. मग दुसऱ्या भावाने शिकायचं आणि पहिल्याने खर्च उचलायचा.
हा पर्याय चालण्यासारखा होता. मात्र पहिलं कोणी शिकायचं ते कसं ठरवणार? शेवटी “छाप-काटा” करायचं ठरलं. अल्बर्टने नाणेफेक केली आणि तो हरला (त्याचा ‘सिक्का’ पुढे शोलेमधील जयच्या हाती लागला असावा, असा आपला एक अंदाज).
आल्ब्रेख्त चार वर्षाच्या अभ्यासासाठी कला अकादमीत रुजू झाला. वडिलांकडून पैशाची काहीच अपेक्षा नव्हती. तेव्हा अल्बर्ट, मोठा भाऊ, नोकरीच्या शोधात निघाला. एका मोठ्या खाणीमध्ये त्याला खोदण्याचे काम मिळाले. युरोपच्या थंडीत, खोल खाणीत दिवसाचे बारा ते चौदा तास मेहनत करून त्याने पै-पै जमविली आणि आपल्या भावाच्या शिक्षणावर खर्च केली. सोनाराच्या कुटुंबातील ह्या तरुणाला खाणीतल्या श्रमाची सवय नव्हती. पण त्याने जिद्द सोडली नाही. आपल्या लहान भावाला काहीही कमी पडू दिलं नाही.
चार वर्षे सरली. आल्ब्रेख्तच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला. चित्रकला, रेखाचित्र आणि प्रिंटमेकिंगमध्ये तो आपल्या शिक्षकांपेक्षाही पुढे गेला होता. त्याच्या चित्रांनी लोकांना भुरळ पाडली होती. मोठमोठे उमराव त्याला काम देऊ लागले होते. आपल्या थोरल्या भावाने आपल्यासाठी केलेल्या कष्टांचे त्याला भान होते. आता मोठ्या भावाची कला अकादमीत जायची पाळी होती. आल्ब्रेख्तच्या मिळणाऱ्या कामाच्या पैशातून तो अल्बर्टच्या शिक्षणाचाच नव्हे तर राहण्याचा खर्च लीलया निभावून नेणार होता.
आल्ब्रेख्त घरी परतला. त्याच्या सन्मानार्थ जंगी मेजवानी झाली. आल्ब्रेख्तने थोरल्या भावाला सांगितलं, आता तू जायचंस. खर्चाची काहीही चिंता नको. तू माझ्याहून अधिक कुशल आहेस, प्रतिभावान आहेस. तू माझ्याहून मोठा होशील.
थोरला अल्बर्टच्या डोळ्यात अश्रू तरारले. त्याच्या उष्ण अश्रूत आपण केलेल्या श्रमाचं चीज झालं ही भावना होतीच, पण चित्रकार होण्याचं आपलं स्वप्न कधीही साकार होणार नाही ह्याचा विषाद देखील होता. आल्ब्रेख्तला त्या अश्रूंची भाषा कळायला थोडा विलंब लागला. आपल्या थोरल्या भावाचे हात आपल्या हातात घेऊन ‘तू उदास का’ असं त्यानं विचारायच्या आधीच भावाच्या हाताच्या स्पर्शाने तो व्याकुळ झाला. कारण तो स्पर्श चित्रकाराच्या नाजूक सडपातळ बोटांचा, उबदार हाताचा नव्हता तर खाणकाम करून राकट झालेल्या, संधीवाताने वाकड्या झालेल्या बोटांचा, चेतना हरवलेल्या हाताचा होता. खाणीत काम करताना त्याचे हात अनेकवेळा चेचले गेले होते, मोडले देखील होते. आता तो फक्त हातोडा चालवू शकत होता, ब्रश नाही. कलावंत बनण्याची त्याची संधी कायमची नष्ट झाली होती.
आपल्या भावाच्या निस्वार्थ त्यागामुळे आल्ब्रेख्त गहिवरला. तो काहीच बोलला नाही. बोलू शकला नाही. अल्बर्टचा त्याग अबोल होता, त्याच्या वेदना अबोल होत्या. आल्ब्रेख्तची परतफेड देखील अशीच अबोल असणार होती.
हेलर नावाच्या एका उमरावाने आल्ब्रेख्तला चर्चमधील मोठ्या वेदीसाठी एक ऑल्टरपीस बनवण्याचे काम दिले होते. त्या पॅनेलच्या एका बाजूला हात जोडून प्रार्थनेत मग्न अशा येशूच्या एका शिष्याची प्रतिमा असणार होती. ती प्रतिमा कोरायच्या आधी त्याचे रेखाचित्र करणे गरजेचं होतं.
त्या रेखाचित्रासाठी कोणते हात योग्य आहेत ते आल्ब्रेख्तला तत्काळ जाणवलं. त्याने अल्बर्टला प्रार्थना करण्याच्या मुद्रेत उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर शाई आणि पेन्सिलचा वापर करून आल्ब्रेख्तने अल्बर्टच्या ओबडधोबड झालेल्या हाताचे, प्रार्थना करणाऱ्या हातांचे, रेखाचित्र चितारले. ते रेखाचित्र म्हणजेच The Praying Hands. ह्या रेखाचित्राला आणखी एक नाव आहे. Hands of an Apostle म्हणजे ‘प्रेषिताचे हात’. आल्ब्रेख्तसाठी त्याचा थोरला भाऊ प्रेषिताहून कमी नव्हता. ह्या चित्राद्वारे आपल्या थोरल्या भावाच्या त्यागाला आणि त्याच्या बंधुप्रेमाला आल्ब्रेख्तने अजरामर केले.
गरिबी आणि खडतर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तींच्या अनेक कथा इतिहासात वाचायला मिळतात. त्यात बंधुप्रेम, त्याग, सत्याची कास आदी नीतिमूल्ये असली की अशा कथा जनमानसाला भुरळ घालतात, व्याख्याते, गुरु आदी मंडळींच्या मुखांतून रसाळपणे वाहत राहतात आणि आख्यायिका बनून जातात.
अगोदर म्हटल्याप्रमाणे आल्ब्रेख्तची वरील कथा एक दंतकथा आहे कारण आल्ब्रेख्त आपल्या कामाच्या सविस्तर नोंदी करायचा. त्याच्या कोणत्याही नोंदीत ‘प्रार्थनेत जोडलेले हात’ ह्या रेखाचित्रासाठी आपल्या भावाचे हात वापरल्याचा उल्लेख नाही. आल्ब्रेख्तला मोठा भाऊ होता हे खरे, पण त्याने खाणीत काम केल्याचा उल्लेख सापडत नाही. किंबहुना तो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सोनारकामात पारंगत झाला असा उल्लेख सापडतो. आल्ब्रेख्तचे वडील देखील सधन होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ झाली असण्याची शक्यता देखील तेवढीच धूसर.
मग प्रश्न असा उरतो की बंधुप्रेम, त्याग, जिद्द ह्या गुणांची भलावण करणाऱ्या गोष्टीत खोटेपणा घुसडावा असं कोणाला का वाटलं असावं? आपण वाचलेल्या अनेक आत्मचरित्रांमध्ये सत्याच्या जोडीला थोडं असत्य असतं किंवा अडचणीचं वाटेल असं सत्य दडपून ठेवलेलं असतं हे आपल्याला जाणवलं असेलच. पण काही वेळेला तद्दन असत्यालाच सत्याची थोडीशी फोडणी असते. कोणी एक कोट्यधीश बाई विमानप्रवासात इतकी साधी साडी वापरते की तिला बिझनेस क्लासच्या रांगेत पाहून एखादी रुपगर्विता तिला खडसावते आणि इकॉनॉमी क्लासच्या रांगेत उभं राहायला सांगते त्याची सुरस आणि चमत्कारिक कथाही तुम्ही वाचली असेल. किंवा कोणी एक बॉलीवूडचा खिलाडी आपलं बालपण किती गरिबीत गेलं आणि हॉटेलमध्ये कपबशा विसळून आपण कसे जगलो आणि वर आलो हे सांगताना आपले बाबा किती मोठ्या पदावर होते आणि आपलं शिक्षण कोणत्या महागड्या शाळेतून झालं हे नमूद करायला सोयीस्कर विसरतो.
आल्ब्रेख्त कुशल कलावंत होता. त्याच्या अनेक कलाकृती लाकडावर कोरलेल्या आहेत. अशा कोरीव चित्रावरून अनेक प्रतिकृती निर्माण करण्याची क्लृप्ती त्याने शोधून काढली होती. एकोणिसाव्या शतकात आल्ब्रेख्तच्या कलेबद्दल लोकांचं औत्सुक्य पुन्हा जागृत झालं. त्याच्या ‘जोडलेले हात’ ह्या रेखाचित्राबद्दल लोक भरभरून बोलायला लागले. ह्या चित्राच्या मोठ्या प्रमाणावर कॉपी काढून त्या विकल्या तर खूप पैसा मिळेल अशी कल्पना कोण्या व्यापारी मनोवृत्तीच्या माणसाच्या डोक्यात आली. हजारो कॉपी तर काढल्या. पण त्या विकायच्या तर उत्तम ‘मार्केटिंग’ हवं. मग एक ‘कथक’ तय्यार झालं. आल्ब्रेख्तचा श्रीमंत बाप, मुलांचं शिक्षणदेखील न करता येण्याइतपत गरीब केला गेला. त्याचा कुशल सोनार असलेला भाऊ खाणकामगार बनला. येशूच्या प्रेषिताचे म्हणून चितारलेले हात ‘प्रार्थनेत जोडलेले हात’ झाले. त्यात बरचसं बंधुप्रेम आणि त्याग मिसळला. खाणीतल्या कष्टांची फोडणी दिली. कथा तयार झाली. चित्राच्या कॉपी हजारांनी विकल्या गेल्या. बक्कळ पैसा आला. मार्केटिंग झिंदाबाद. सत्याची ऐशी तैशी!
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांची एक कथा प्रसिद्ध आहे. त्यांच्या बालपणी त्यांनी त्यांच्या बागेतील चेरीचं झाड गंमत म्हणून कापून टाकलं. मात्र वडिलांनी विचारताच ‘मी खोटं बोलू शकत नाही’ असं म्हणत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ही गोष्ट चक्क त्यांच्या चरित्रग्रंथात आहे. पण ती खोटी असल्याचं आणि जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांच्या मृत्युनंतर आपण ती दडपून घुसडल्याचं त्यांच्या चरित्रकाराने मान्य केलं. कारण? ‘नेहेमी खरे बोलावे’ हा संदेश लहान मुलांपर्यंत पोहोचावा! म्हणजे मुलांनी खरं बोलावं हे मूल्य शिकवण्यासाठी एका ‘अ-मूल्याचा’ वापर हा एक अमूल्य आणि गमतीशीर विरोधाभास समजायचा.
शुद्ध सोन्याचे दागिने बनवत नाहीत. त्यासाठी सोन्यात हिणकस मिळवतात. मग असे चौदा, अठरा कॅरेटचे दागिनेच स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालू शकतात. सत्याचंही तसंच असावं. निखळ सत्याला देखील गिऱ्हाईक मिळत नसावं. कारण ते पायात चप्पल घालून बाजारात निघेपर्यंत असत्य जगभर हिंडून आलेलं असतं! म्हणून बोरकरांची क्षमा मागून म्हणावसं वाटतं – “असत्याची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती”